Buldhana Honor Killing Mistake: Shocking case of police negligence where daughter Shivani Kalmekar returned alive: न केलेल्या गुन्ह्यासाठी तब्बल २२ दिवस तुरुंगवास भोगावा लागला, तर काय होईल? मध्य प्रदेशातील बुऱ्हानपूरच्या एका निरपराध कुटुंबासोबत महाराष्ट्र पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे हा अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. ‘ऑनर किलिंग’चा कथित रंग देऊन दबावाखाली घेतलेल्या कबुलीजबाबावर विश्वास ठेवून पोलिसांनी वडील आणि भावाला अटक केली, मात्र ज्या मुलीच्या खुनाचा आरोप होता, ती ‘शिवानी कलमेकर’ स्वतः पोलीस ठाण्यात जिवंत हजर झाली…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत गेल्याच आठवड्यात पोलिसांची एक ‘गंभीर चूक’ मान्य केली. या घोडचुकीने केवळ एका निरपराध कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त तर केलेच, पण त्याचबरोबर फौजदारी तपास यंत्रणेमधील वैज्ञानिक पुरावे, कबुलीजबाब, तपासाची घाई आणि न्यायव्यवस्थेतील मूलभूत त्रुटींवरही बोट ठेवण्याचे काम केले आहे.

न केलेल्या गुन्ह्यासाठीच तुरुंगात जावे लागले, तर?

कल्पना करा… तुम्ही स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या हरवलेल्या मुलीची तक्रार देता. काही दिवसांनी पोलीस तुमच्या दारात येतात आणि सांगतात की, तुमची मुलगी मृतावस्थेत सापडली आहे. तुम्हाला मृतदेह ओळखण्यासाठी नेले जात आहे, असे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात तुम्हाला अटक होते. चौकशीदरम्यान तुम्हाला आणि तुमच्या मुलाला मारहाण केली जाते. दबावाखाली कबुलीजबाब घेतला जातो. न्यायालयीन कोठडी मिळते आणि तब्बल २२ दिवस तुरुंगात राहावे लागते. आणि मग… एक दिवस तुमची मुलगी स्वतः पोलीस ठाण्यात जिवंत येते. हे एखाद्या चित्रपटाचे कथानक नाही. तर मध्य प्रदेशातील बुऱ्हानपूर जिल्ह्यातील खडकी गावातील बापूराम कलमेकर आणि त्यांचा मुलगा अजय कलमेकर यांच्याबाबत प्रत्यक्षात घडलेली ही घटना आहे. या प्रकरणाने महाराष्ट्र पोलिसांच्या तपासपद्धतीवर आणि पुराव्यांच्या पडताळणीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Buldhana Honor Killing Mistake police negligence investigation | Shivani Kalmekar found alive after Burhanpur murder mystery | बुलढाणा ऑनर किलिंग पोलीस तपासातील गंभीर चूक | शिवानी कलमेकर जिवंत परत आली पोलीस गुन्हा खुलासा
कलमेकरांच्या संदर्भात घडलेल्या चुकीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घेतली आणि कारवाईचे आदेश दिले

नेमके काय घडले?

एप्रिल २०२६ मध्ये बापूराम कलमेकर यांची मुलगी शिवानी घरातून निघून गेली. ती परत न आल्याने वडिलांनी मध्य प्रदेशातील खाकनार पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात नदीकाठी एका महिलेचा अर्धवट अवस्थेत जळलेला आणि शिरच्छेद केलेला मृतदेह आढळला. सुमारे शंभर मीटर अंतरावर तिचे शीरही सापडले. याच काळात पोलिसांनी आसपासच्या जिल्ह्यांमधील हरवलेल्या महिलांच्या नोंदी तपासल्या आणि वयाच्या साधर्म्यावरून हा मृतदेह शिवानीचाच असल्याचा निष्कर्ष काढला.

परंतु…

हा मृतदेह खरोखर शिवानीचाच आहे का, याची डीएनए चाचणी, जैविक नमुने, दंतवैद्यकीय तपासणी किंवा इतर कोणत्याही वैज्ञानिक पद्धतीने खात्री करण्यात आली नव्हती. याच गंभीर त्रुटीमुळे पुढचा संपूर्ण तपास चुकच्याच गोष्टींच्या आधारावर करण्यात आला.

‘ऑनर किलिंग’चा सिद्धांत कसा उभा राहिला?

तपासादरम्यान पोलिसांना लक्षात आले की, शिवानी विवाहित असून ती माहेरी आली होती. त्यानंतर नातेवाईक असलेल्या अरुण कलमेकर याच्यासोबत गेली. यावरून पोलिसांनी एक कथित ‘ऑनर किलिंग’चा सिद्धांत मांडला.

पोलिसांच्या मते…

  • वडील आणि भावाने शिवानीची हत्या केली
  • बांबूच्या काठीने तिला मारण्यात आले
  • मृतदेह रात्रभर घरात ठेवण्यात आला
  • मोटारसायकलवरून १०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर बुलढाण्यापर्यंत नेण्यात आला
  • मृतदेह जाळण्यात आला
  • आणि शिर वेगळे करून वेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले

यासाठी पोलिसांनी कथित रक्ताचे कपडे, बांबूची काठी इत्यादींचाही उल्लेख केला. परंतु या संपूर्ण कथानकाचा एकच पाया होता, तो म्हणजे सापडलेला मृतदेह शिवानीचाच आहे, हा चुकीचा समज.

कबुलीजबाब कसा मिळाला?

बापूराम कलमेकर यांनी The Indian Express ला सांगितलेले की, “पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी नेत असल्याचे सांगितले मात्र प्रत्यक्षात मला खाकनार पोलीस ठाण्यातच एक रात्र आणि दिवसभर ठेवले. शेवटपर्यंत मला मृतदेह पाहाताच आला नाही. पोलीस तेवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलगा अजय आणि मला वेगळे करण्यात आले. मला सांगितले की, मुलाने गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि मुलाला सांगितले की, बापाने म्हणजे मी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यामुळे अखेरीस त्रास चुकवण्यासाठी आम्ही कबुल असल्याचे सांगितले आणि विषय संपवला.” अजय कलमेकर यानेही सांगितले की, “अखेरीस पोलिसांनी विचारलेल्या प्रत्येक गोष्टीला आम्ही हो सांगून मोकळे झालो.”

ती जिवंत असल्याचे स्पष्ट झाले

पोलिसांसमोर दिलेल्या या कथित कबुलीजबाबाच्या आधारे तपासाची दिशा निश्चित होत गेली आणि दोघांनाही अटक करण्यात आली. आणि मग तपास अचानक गोत्यातच आला… मध्य प्रदेश पोलिसांनी मात्र वेगळा तपास सुरू ठेवला. खाकनार पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक जाधव यांच्या मते, अरुण कलमेकरचा शोध घेत असताना तो मजुरीसाठी इतरत्र गेल्याचे समजले. त्याच्यापर्यंत पोहोचल्यानंतर शिवानी त्याच्यासोबत जिवंत असल्याचे स्पष्ट झाले.

जाधव यांनी सांगितले की, “सुरुवातीस आम्ही त्यांना नागपूरला ठेवले. त्यांचा विश्वास संपादन केला आणि नंतर त्यांना बुऱ्हाणपुरला येण्याची विनंती केली. ते आल्यानंतर शिवानीचे बायोमेट्रिक आणि इतर मार्गांनीही आम्ही तीच हरवलेली मुलगी असल्याचे सिद्ध केले” त्यानंतर शिवानीला महाराष्ट्रातील जळगाव जामोद पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले. ती स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचली आणि संपूर्ण कथित खून प्रकरणाचा तपास निकालातच निघाला. अखेरीस तब्बल २२ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर बापूराम आणि अजय यांची सुटका करण्यात आली.

विधानसभेत मुख्यमंत्री काय म्हणाले?

पोलिसांनी या प्रकरणात `गंभीर चूक’ केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधानसभेत मान्य केले आणि पुढील आदेश जारीही केले…

  • संबंधित तपास अधिकाऱ्यांचे निलंबन
  • त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
  • तीन महिन्यांत विभागीय चौकशी पूर्ण करण्याचे आदेश
  • पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची घोषणा

मात्र बापूराम कलमेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप त्यांच्यापर्यंत यापैकी काहीच पोहोचलेले नाही. त्यांनी सांगितले की, “कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने आजतागायत माझी माफी मागितलेली नाही. जाहीर झालेल्या नुकानभरपाईपैकीही मला काहीही मिळालेले नाही. मुख्यमंत्र्‍यांनीच स्वतः हे जाहीर केल्याचा व्हिडिओ मला एकाने दाखवला, त्यावेळेस मला कळले.”

एक मोठा प्रश्न अद्याप अनुत्तरितच…

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्या महिलेचा मृतदेह सापडला होता ती नेमकी कोण होती, याचा ठाव अद्याप लागलेला नाही. तो मृतदेह अद्याप ‘अनोळखी महिले’चाच आहे. म्हणजेच एका महिलेची प्रत्यक्षात हत्या झाली आहे. परंतु पोलिसांनी चुकीच्या व्यक्तीची ओळख निश्चित केल्यामुळे तिच्या खुनाचा मूळ तपासच मागेच पडला. आता त्या महिलेच्या हत्येचा तपास नव्याने करावा लागणार आहे.

वैज्ञानिक तपास का महत्त्वाचा असतो?

गंभीर गुन्ह्यांमध्ये मृतदेहाची ओळख निश्चित करण्यासाठी जगभरात काही मूलभूत पद्धती वापरल्या जातात, त्या पुढीलप्रमाणे-

  • डीएनए तपासणी
  • बोटांचे ठसे
  • दंतवैद्यकीय नोंदी
  • जैविक नमुने
  • हाडांचे फॉरेन्सिक परीक्षण
  • चेहऱ्याची पुनर्रचना (Facial Reconstruction)
  • कपडे व वैयक्तिक वस्तूंची पडताळणी

यापैकी केवळ कपड्यांवर किंवा वयाच्या अंदाजावर अवलंबून राहणे तपासाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक मानले जाते. विशेषतः मृतदेह जळलेल्या किंवा विद्रूप अवस्थेत असेल तर डीएनए तपासणी जवळपास अपरिहार्य मानली जाते.

भारतीय तपास व्यवस्थेसाठी महत्त्वाचा धडा

१. केवळ कबुलीजबाबावर अवलंबून राहणे चुकीचे

भारतीय न्यायव्यवस्था वैज्ञानिक पुराव्यांपेक्षा कबुलीजबाबांवर अवलंबून राहते, अशी टीका अनेकदा केली जाते. त्यामुळे कबुलीजबाबाव्यतिरिक्त पुरावे असायला हवेत.

२. वैज्ञानिक पुराव्यांकडे दुर्लक्ष

डीएनए अहवाल येण्यापूर्वीच अटक करण्यात आली, ही मोठीच घोडचूक होती.

३. तपासातील पूर्वग्रह

‘ऑनर किलिंग’चा मुद्दा निश्चित झाल्यानंतर सर्व पुराव्यांकडे त्याच नजरेतून पाहण्यात आले.

४. मानवी हक्कांचा प्रश्न

बापूराम आणि अजय यांना आयुष्यभर तुरुंगवास झाला असता तर? त्यांच्या आयुष्याचे नुकसान कोणी भरून काढले असते? नुकसान केवळ तुरुंगवासाचे नव्हते, कारण बापूराम कलमेकर हे रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत. २२ दिवस तुरुंगात असल्यामुळे त्यांचे घर बंदच राहिले. सून बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. शिवाय या प्रकरणामुळे गावात सामाजिक बदनामी झाली, ती वेगळीच. आजही गावकरी सांगतात की, बापूराम फारसे कोणाशी बोलत नाहीत. सकाळी कामावर जातात आणि रात्री उशिरा घरी परततात. आदिवासी नेते विनोद डाबेराव सांगतात, “कुटुंबाला या प्रकरणाचा एवढा जबरदस्त धक्का बसला आहे की, कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याशी बोलायला ते खूप घाबरतात. अजयलाही तेवढाच धक्का बसला आहे. आम्ही अधुनमधून कार्यकर्ते मंडळी त्यांची भेट घेऊन ठीक चाललेय ना याची खात्री करून घेतो.”

पुढे काय?

या प्रकरणात दोन समांतर तपास आता महत्त्वाचे ठरणार आहेत. पहिला म्हणजे संबंधित पोलिसांवरील विभागीय व फौजदारी कारवाई. दुसरा बुलढाणा येथे मृतदेह सापडलेल्या अज्ञात महिलेच्या हत्येचा मूळ तपास.

तपास यंत्रणेसमोरचा मूलभूत प्रश्न… पुरावे आधी की, निष्कर्ष?

मृतदेहाची ओळख वैज्ञानिकदृष्ट्या निश्चित न करता केवळ अंदाज, कथित कबुलीजबाब आणि परिस्थितीजन्य तर्क यांच्या आधारे खुनाचा तपास पुढे नेला, तर निरपराध व्यक्तीही तुरुंगात जाऊ शकतात आणि खरा गुन्हेगार मोकाट राहू शकतो. बापूराम कलमेकर यांची कथा ही केवळ एका चुकीच्या तपासाची नाही; तर भारतीय फौजदारी न्यायव्यवस्थेसाठी वैज्ञानिक पुराव्यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित करणारी घटना आहे. एका बाजूला २२ दिवस विनाकारण तुरुंगात गेलेले वडील आणि मुलगा आहेत; तर दुसऱ्या बाजूला अद्याप नाव-ओळख न पटलेली आणि हत्या करण्यात आलेली मृत महिला!