गेल्या आठवड्यात उत्तराखंडमधील मसुरी येथे १७व्या शतकातील सूफी कवी बुल्ले शाह यांच्या दर्ग्यावर काही समाजकंटकांनी तोडफोड केली. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला आणि सूफी वारसा जपण्याची मागणी जोर धरू लागली. या प्रतिक्रियांमधून बुल्ले शाह यांचे आजही असलेले सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट झाले. पंजाबमधील महान सूफी कवी म्हणून ओळखले जाणारे बुल्ले शाह यांची तुलना अनेकदा रुमी यांच्याशी केली जाते. त्यांनी सर्व धर्मांपेक्षा ‘इश्क’ म्हणजेच सार्वत्रिक प्रेमाला सर्वोच्च स्थान दिले. जात, पंथ, धर्म आणि लिंग यांच्या आधारावर होणारे भेद त्यांनी ठामपणे नाकारले. पंजाबी कवी आणि लेखक डॉ. गुरभजन गिल यांच्या मते, बुल्ले शाह हे धर्मनिरपेक्ष विचारांचे प्रतिनिधी होते आणि त्यांच्या प्रसिद्ध ‘काफी’ (सूफी कवितेचा एक प्रकार) मध्ये ही जीवनदृष्टी स्पष्टपणे उमटते.
“Masjid dha de, mandir dha de, dha de jo kujh dhainda. Par kisi da dil na dhavin, Rabb dilan vich rehnda.” (अर्थ: मशिदी किंवा मंदिरं पाडली तरी चालतील, पण माणसाचं हृदय तोडू नये. कारण देव एखाद्या इमारतीत नाही, तर माणसाच्या मनात राहतो.)
अमृतसरमधील गुरु नानक देव विद्यापीठातील भाषा विभागाचे डीन डॉ. एच. एस. भाटिया यांच्या मते, बुल्ले शाह यांच्या विचारांचा केंद्रबिंदू सार्वत्रिक प्रेम, सहिष्णुता, करुणा आणि मानवजातीबद्दलची आस्था हा होता. त्यांना फारसी आणि अरबी या भाषा अवगत होत्या, तरीही त्यांनी साध्या, सर्वसामान्यांना समजेल अशा पंजाबी भाषेत लेखन केले. त्यांच्या लिखाणात स्थानिक संस्कृतीचे बारकावे होते, त्यामुळेच आजही त्यांना मोठ्या प्रमाणावर वाचक आणि चाहत्यांचा मान मिळतो.
कसूर येथे जन्म
बुल्ले शाह यांचा जन्म १६८० साली आजच्या पाकिस्तानातील कसूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव अब्दुल्ला शाह असे होते. त्यांचे पूर्वज बहावलपूरमधील उच गिलानियां येथून आले होते. मात्र अभ्यासकांच्या मते, त्यांचा जन्म पंडोके भटियान या गावात झाला, या गावात त्यांचे वडील शाह मोहम्मद दरवेश शिक्षक म्हणून काम करत होते. उच्चवर्णीय सैय्यद कुटुंबातील शाह मोहम्मद हे धर्मोपदेशक होते. त्यांना अरबी, फारसी आणि कुराणाचे सखोल ज्ञान होते.
शिक्षणाचं महत्त्वाचं केंद्र
आजही पंडोके भटियान येथे असलेल्या त्यांच्या कबरीवर शाह मोहम्मद यांचा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो. सूफी परंपरेत अशा उत्सवाला ‘उर्स’ म्हटलं जातं. बुल्ले शाह यांनी उच्च शिक्षण कसूरमध्ये घेतलं. त्या काळात कसूर हे शिक्षणाचं महत्त्वाचं केंद्र होतं. तिथे त्यांनी हजरत गुलाम मुर्तझा यांच्याकडे शिक्षण घेतलं. हेच गुरु प्रसिद्ध पंजाबी कवी वारिस शाह यांचेही शिक्षक होते. यानंतर बुल्ले शाह यांनी बटाला येथे कादरिया सिलसिल्यात शिक्षण घेतलं. ही सिलसिला सुन्नी सूफी परंपरेतील एक शाखा असून तिची स्थापना १२व्या शतकात बगदाद येथे अब्दुल कादिर गिलानी यांनी केली होती.
जात, धर्म आणि पितृसत्ताकाविरोधातील बंड
पंजाब विद्यापीठाच्या पंजाबी विभागातील माजी प्राध्यापक सुखदेव सिंह सिरसा यांनी संगितले की, बुल्ले शाह हे कायम सत्याचा शोध घेणारे ‘शोधक’ होते. त्यांनी जात, धर्म आणि पितृसत्ताक व्यवस्था याविरोधात ठामपणे बंड केलं. बटाला येथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बुल्ले शाह मार्गदर्शनासाठी लाहोरला गेले. तिथे त्यांनी शाह इनायत कादरी यांना गुरु मानलं. शाह इनायत हे उदारमतवादी विचारांचे तत्त्वज्ञ होते. त्यांच्या प्रगत विचारांमुळे अफगाण गव्हर्नरने त्यांना कसूरमधून हाकलून दिलं होतं.
कादरी सिलसिला
चिश्ती परंपरेसोबतच कादरी सिलसिला पंजाबमधील सर्वांत सहिष्णू सूफी परंपरांपैकी एक मानला जातो. कादरी परंपरेत संगीताला मान्यता होती आणि विविध धर्मांचे अनुयायीही या परंपरेत सामील होत असतं. मुघल काळात धार्मिक असहिष्णुता वाढत असतानाही, १७व्या आणि १८व्या शतकात पंजाबमध्ये सूफी विचार मोठ्या प्रमाणावर फोफावले. यामागे कादरी सिलसिल्याचा मोठा वाटा होता, तसेच ‘काफी’सारख्या लोकभाषेतील भक्तीपर कवितांवर असलेलं त्यांचं प्रेमही कारणीभूत ठरलं.
आत्मज्ञानाकडे जाण्याचा मार्ग
बुल्ले शाह सैय्यद घराण्यातील असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाने शाह इनायत कादरी यांना गुरु मानण्याच्या त्यांच्या निर्णयाला तीव्र विरोध केला. कारण शाह इनायत हे भाजीपाला पिकवणाऱ्या अराईं जातीतले होते. मात्र त्यांच्या कुटुंबात केवळ त्यांची बहीण (तिनेही बुल्ले शाह यांच्यासारखंच अविवाहित आयुष्य स्वीकारलं) त्यांच्या पाठीशी उभी राहिली. लोककथेनुसार, लाहोरमध्ये शाह इनायत कादरी भाजीपाला विक्री करत असताना बुल्ले शाह त्यांना भेटले आणि आत्मज्ञानाचा मार्ग काय आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर कादरी यांनी उत्तर दिलं की, “बुल्ल्या, देव मिळवणं कठीण नाही; फक्त इथून उचलून तिथे ठेवायचं आहे.” म्हणजेच, देवाकडे जाण्याचा मार्ग हा बाह्य विधींमध्ये नाही, तर मनाची दिशा सांसारिकतेकडून अध्यात्माकडे वळवण्यात आहे.
धर्माच्या रूढी-परंपरांविरोधात बंड
बुल्ले शाह यांचं दुसरं बंड थेट धर्माच्या रूढी-परंपरांविरोधात होतं. त्यांनी हज यात्रा, रमजानमधील उपवास, शरिया कायदे आणि रोजचा नमाज यांसारख्या कर्मकांडांची खुलेआम खिल्ली उडवली. त्या काळात मुघल सत्तेखाली इस्लाम अधिक रुढीवादी होत चालला होता आणि पंजाबमध्ये नव्याने उदयास आलेल्या शीख समुदायाच्या वारंवार होणाऱ्या बंडांमुळे अस्थिरता होती. अशा परिस्थितीत बुल्ले शाह यांच्या या भूमिकेमुळे धर्मगुरू प्रचंड संतप्त झाले.
त्यांच्या एका ‘काफी’मध्ये ते म्हणतात, “तुला काफिर काफिर म्हणतात आणि तू उत्तर देतोस -हो, हो, मीच आहे!” (म्हणजे लोक तुला नास्तिक म्हणतात, पण तू त्याला नकार न देता निर्भयपणे स्वीकारतोस.)
तिसरं बंड पितृसत्ताकाविरोधात
मुघल सत्तेकडून कारवाई होण्याची भीती वाटत असल्याने शाह इनायत कादरी यांनी काही काळासाठी बुल्ले शाह यांना आपल्यापासून दूर केलं. मात्र नंतर दोघांमध्ये पुन्हा समेट झाला. बुल्ले शाह यांचं तिसरं बंड हे पितृसत्ताकाविरोधात होतं. त्यांनी गायन आणि नृत्य शिकायला सुरुवात केली. पारंपरिक हिरव्या इस्लामी पोशाखाऐवजी त्यांनी पंजाबी वधू परिधान करतात ते गुलाबी रंगाचे कपडे घालायला सुरुवात केली. प्राध्यापक सुखदेव सिंह सिरसा यांच्या मते, बुल्ले शाह यांच्या ‘काफी’ कवितांमध्ये स्त्रीस्वर आढळतो. या कवितांमधून ते महिलांना अन्याय आणि दडपशाही नाकारण्याचं आवाहन करतात.
नाथ योगी परंपरेचाही प्रभाव
बुल्ले शाह यांच्यावर नाथ योगी परंपरेचाही प्रभाव होता. या परंपरेत तांत्रिक शैव साधना आणि तंत्रप्रेरित बौद्ध विचार यांचा समावेश होता. प्राध्यापक सिरसा सांगतात की बुल्ले शाह यांना ही परंपरा आकर्षित करत होती, कारण त्यांच्या मते नाथ योगी धर्माच्या चौकटींपलीकडे जाऊन योगसाधनेद्वारे माणसाला परमसत्तेशी जोडतात. त्यांच्या एका ‘काफी’मध्ये बुल्ले शाह म्हणतात, “तुला मिळवण्यासाठी मी श्वासावर नियंत्रण मिळवलं आहे.”
समकालीन भक्ती चळवळीचा प्रभावही त्यांच्या विचारांवर होता. बुल्ले शाह यांच्यासाठी त्यांचे मुर्शिद (गुरु) हेच ईश्वराचं साक्षात रूप होते.
कृष्ण आणि रामातही देव पाहणारे बुल्ले शाह
कलकत्ता विद्यापीठातील प्राध्यापक अमित डे यांनी “Locating Bulleh Shah in the Mystical Tradition of South Asia” या लेखात म्हटलं आहे की, बुल्ले शाह यांच्या लिखाणात वेदांतिक अद्वैतवाद खोलवर दिसतो. या तत्त्वज्ञानानुसार ब्रह्मातूनच सर्वकाही निर्माण झालं आहे आणि जे सर्वत्र आहे. हेच अंतिम सत्य आहे. अमित डे यांच्या मते, बुल्ले शाह देवाला विरोधांतही पाहतात. मित्र/ शत्रू, हिंदू/ मुस्लीम, स्त्री/ पुरुष अशा भेदांपलीकडे जाऊन ते ईश्वराला पाहतात. ते वेगवेगळ्या धार्मिक श्रद्धांनाही एकत्र गुंफताना दिसतात. डे लिहितात, “ते कृष्ण आणि रामामध्ये देव पाहतात. बुल्ले शाह मुहम्मद यांना देवाचा संदेश देणारा नव्हे, तर देवाचे अवतार मानतात.”
पंजाब आणि त्यापलीकडचा वारसा
१७५८ साली बुल्ले शाह यांचे निधन झाले, तेव्हा धर्मगुरूंनी त्यांना दफनासाठी जागा देण्यास नकार दिला. डॉ. एच. एस. भाटिया यांच्या मते, ट्रान्सजेंडर व्यक्ती आणि गायकांनी त्यांना कसूरच्या बाहेर दफन केलं. आज पाकिस्तानमधील त्यांची कबर जगभरातून श्रद्धाळूंना आकर्षित करते. स्थानिक श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोक त्यांच्या जवळ दफनभूमी मिळावी, यासाठी प्रयत्न करतात.
दोन्ही देशांमध्ये चाहते
सीमापारही दिग्दर्शक आणि गायक त्यांच्या ‘काफी’ कवितांना मनापासून जपतात. मणिरत्नम, फराह खान, इम्तियाज अली, गुलजार यांसारख्या दिग्दर्शकांना त्यांच्या रचनांनी प्रेरणा दिली आहे. “बुल्ला की जाना मैं कौन”, “दमा दम मस्त कलंदर”, “मेरा पिया घर आया”, “छैयाँ छैयाँ” यांसारखी गाणी चित्रपटांतून लोकप्रिय झाली. पाकिस्तानमध्ये बुल्ले शाह यांच्यावर आधारित एक चरित्रपट सध्या तयार होत आहे.
त्यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये आलामी पंजाबी इकठ्ठचा ‘बुल्ले शाह पुरस्कार’ (२००७ साली प्रथम: स्व. पंजाबी कवी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सुरजीत पातर यांना देण्यात आला) आणि पाकिस्तानचे बुल्ले शाह सुवर्णपदक (२०२५ मध्ये कर्नाटकातील कवी अजीज बेलगौमी यांना देण्यात आले) यांचा समावेश आहे. इतका सन्मान असो किंवा तोडफोड. बुल्ले शाह कदाचित दोन्हींकडे उदासीनच राहिले असते. कारण त्यांनीच लिहिलं आहे…
“मिट्टी दा तू मिट्टी होणा, काह्दी बल्ले बल्ले” (मातीपासून आलेला तू पुन्हा मातीच विलीन होणार; मग हा एवढा गोंधळ कशासाठी?)

