डॉ. देवदत्त पोखरकर
Kadamba Tree history connection with Lord Krishna: भारतीय संस्कृतीत काही वृक्षांना विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. त्यापैकीच एक म्हणजे श्रीकृष्णाच्या लीलांशी जोडलेला ‘कदंब वृक्ष’. केवळ पौराणिक कथांमध्येच नव्हे, तर आधुनिक वनस्पतीशास्त्र आणि आयुर्वेदातही कदंबाचे स्थान अत्यंत मोलाचे आहे. युगानुयुगे साथसोबत करणाऱ्या पुराणवृक्षाची ही रोमहर्षक कहाणी…
कदंबाखाली मजला छेडु नको रे
पावसाळ्याच्या दिवसांत एखाद्या हिरव्यागार कदंबाच्या झाडाखाली उभे राहिले की त्याच्या गोलाकार पिवळसर फुलांकडे लक्ष जाते अन् आठवते ती शोभा गुर्टू यांनी गायलेली ‘इथे कदंबाखाली मजला छेडु नको रे नंदलाला’ ही लोकप्रिय मराठी गवळण आणि मग आपल्याला जणू द्वापारयुगातील कृष्णाच्या कथेत प्रवेश केल्यासारखं वाटतं.
कॉफी कुळाचा वंशज
कदंबाचे शास्त्रीय नाव निओलामार्किया कदंबा (Neolamarckia cadamba) असं आहे. पूर्वी याला अँथोसिफॅलस कदंबा (Anthocephalus cadamba) या नावानंही ओळखलं जाई. हा रुबिएसी Rubiaceae म्हणजेच कॉफी कुळातला वृक्ष आहे. भारतीय उपखंडासह दक्षिण आणि आग्नेय आशियातील उष्ण व दमट प्रदेशात हा वृक्ष आढळतो. भारतात पावसाळी आणि नदीकाठच्या भागांत कदंबाची वाढ उत्तम प्रकारे होते. विशेषतः पश्चिम घाट, कोकण, ईशान्येकडील जंगलात तसेच उत्तर व पूर्व भारतातील नदीकाठच्या सुपीक प्रदेशात आढळतो. हा वेगाने वाढणारा, गगनचुंबी उंचीचा, दाट पर्णसंभार असलेला, परिसराला आकर्षक हिरवाईची झालर चढवणारा असा पुराणवृक्ष आहे. त्याचा उपयोग लाकूड, कागदनिर्मिती आणि इतर उद्योगांसाठीही केला जातो.

पुराणकथेतलं कॅरेक्टर
कदंबाचा संबंध श्रीकृष्णाशी जोडला जाण्याचं एक कारण म्हणजे, कृष्णकथांमध्ये त्याचा वारंवार होणारा उल्लेख. यमुनेच्या काठावरचे कदंबवृक्ष, कृष्णाची बासरी, गोप-गोपी आणि वृंदावनातील लीलांचे वर्णन भारतीय धार्मिक आणि साहित्यिक परंपरेत खोलवर रुजलंय. कृष्ण कदंबाच्या झाडावर चढला, त्याच्या फांदीवर बसला किंवा कदंबाच्या सावलीत गोपाळांसोबत रमला, अशा अनेक लोककथा आणि भक्तिपरंपरा प्रचलित आहेत. या कथांमध्ये इतिहास आणि वनस्पतिशास्त्रीय पुरावा वेगळा ठेवणे आवश्यक असलं तरी पौराणिक कथात कदंबाचं कृष्णाशी असलेले नातं दृढ आहे. कदंबाचा भारतीय बौद्ध परंपरेतील काही कथांशी आणि दक्षिण आशियातील विविध धार्मिक-सांस्कृतिक परंपरांशी असलेला संबंध जिव्हाळ्याचा आहे.
काय याचे रंगरुप?
कदंबाची सर्वात सहज सोपी ओळख पटते, ती त्याच्या फुलांमुळे. फुले चेंडूसारखी गोल पिवळसर असतात. सुरुवातीला फिकट रंगाचा दिसणारा हा फुलोरा पुढे पिवळसर किंवा नारिंगी छटा धारण करतो. फुलांची गोलाकार रचना आणि त्यातून येणारा मंद सुगंध कदंबाला इतर वृक्षांपासून वेगळं करतो. पावसाळ्यात फुललेला कदंब म्हणजे निसर्गाने हिरव्या दाट पाचूच्या गालिच्यावर लहान लहान सोनेरी चेंडूची सजावट केल्यासारखे भासते. भरगच्च पर्णसंभारामुळे कदंब दाट सावली देतो. त्याची फुलं आणि फळं मुंग्या, मधमाश्या, खारुताई, माकडे, वटवाघळे या सजीवांना आकर्षित करतात. इतर अनेक स्थानिक वृक्षांप्रमाणे कदंबही स्थानिक परिसंस्थेतील जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग ठरतो.
फुलोरा फुलला…
कदंब फुलांची रचना वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने आकर्षक आहे. आपल्याला दिसताना एक गोल फूल दिसतं; पण प्रत्यक्षात ते एकच फूल नसून अनेक लहान फुलांचा समूह असतो. अशा प्रकारच्या फुलोऱ्याला वनस्पतीशास्त्रीय भाषेत head किंवा capitulum स्वरूपाची रचना म्हणतात. ही फुले रात्रीच्या वेळेस उमलतात, त्यांचा सुगंधही त्या काळात अधिक जाणवतो. त्यामुळे पतंगासारखे कीटक तसेच वटवाघळासारखे प्राणी त्यांच्याकडे सहजपणे आकर्षित होतात. फुलांमधला गोड मध (Nectar) पितात आणि त्याच बरोबर परागीभवन (Pollination) घडवून आणतात. म्हणजेच आजच्या भाषेत, एकावर एक फ्री!
फळे रसाळ गोमटी
फुलांप्रमाणेच कदंबाच्या फळांमध्येही अशीच सामूहिक रचना दिसते. कदंबाचं फळ गोलाकार, साधारण चेंडूसारखं दिसतं. त्याला संयुक्त फळ (Composite Fruit) म्हणतात. फलनानंतर असंख्य लहान फुलांची अंडाशयं एकत्र येऊन हा गोलाकार मांसल फळगुच्छ तयार होतो. सुरुवातीला हिरवं असलेलं फळ पिकल्यावर पिवळसर, नारंगी किंवा गडद तपकिरी होतं. कदंबाची फळं लहान बिया असलेली, मऊ आणि रसाळ असतात. त्यावर विविध पक्षी, वटवाघुळं आणि काही प्राणी यथेच्छ ताव मारतात. त्यामुळे बीजप्रसार होण्यासही आपसूक मदत होते.
कृष्णलीलेचा साक्षीदार
भगवान श्री कृष्णाशी असलेल्या नात्यामुळे उत्तर भारतातील भक्तिसाहित्यात कदंबाला विशेष महत्त्व मिळालंय. सूरदास, रसखान आणि इतर कृष्णभक्त कवींनी ज्या वृंदावनाची कल्पना आपल्या काव्यात रंगवली, त्या वृंदावनाच्या सांस्कृतिक प्रतिमेत कदंबाचं स्थान अनन्यसाधारण आहे. कृष्णाच्या बासरीचा स्वर आणि कदंबाच्या फांद्यांची सावली ही प्रतिमा भारतीय मनात शतकानुशतके जिवंत आहे. त्यामुळे कदंब हा केवळ वृक्ष नाही तर, कृष्णभक्तीच्या मार्गातला एक हवाहवासा विसावा आहे.
राजघराण्याची ओळख
मात्र कदंबाचं सांस्कृतिक महत्त्व केवळ श्रीकृष्णापुरतं मर्यादित नाही. तर कर्नाटकाच्या सांस्कृतिक इतिहासातही कदंबाचं विशेष स्थान आहे. प्राचीन कदंब राजवंशाचे नावच या वृक्षावरून पडलं असल्याचं मानलं जातं. कर्नाटक-गोव्याकडं कदंब हे आदरानं घेतलं जाणारं नाव आहे.
आयुर्वेदातलं स्थान काय?
आयुर्वेद आणि पारंपरिक औषधात कदंब वृक्षाच्या विविध भागांचा उपयोग होत असल्याचा उल्लेख आढळतो. खोडाची साल, पानं, फुलं आणि इतर भागांचा पारंपरिक उपचारपद्धतींमध्ये वापर झाल्याचे उल्लेख आढळतात. सालीचा उपयोग ताप, जखमा, सूज आणि त्वचेच्या तक्रारीवर करतात परंतु अशा पारंपरिक उपयोगांकडे पाहताना मात्र वैज्ञानिक पुराव्यांचा आधारही आवश्यक ठरतो. उगाच कोणी सांगितलं म्हणून लावली कदंबाची साल अंगाला, तर भलताच दुष्परिणाम संभवू शकतो.
वारसा कोणाचा, कोणासाठी?
कोणताही वृक्ष फक्त ऑक्सिजन देणारी नैसर्गिक यंत्रणा नसते, तो आपला देदीप्यमान इतिहास असतो, आपली गौरवशाली संस्कृती असते, पिढ्यापिढ्या चालत आलेल्या धार्मिककथांचा आधार असतो. पक्ष्यांचं, प्राण्यांचं हक्काचं घर आणि कीटकांचे आश्रयस्थानही असतो. म्हणूनच कृष्णाच्या कथेतला कदंब आणि आधुनिक शहरात लावला जाणारा कदंब हे दोन वेगळे वृक्ष नाहीत; तर ते भारतीय समाजाच्या सांस्कृतिक जीवनाशी एकरूप झालेल्या दीर्घ नात्याचे दोन पैलू आहेत. कदंबाला जपणं म्हणजे केवळ एका वृक्षाची जपणूक नव्हे; तर निसर्ग आणि संस्कृती यांना जोडणाऱ्या एका जिवंत वारशाचं जाणीवपूर्वक रक्षण करणं आहे.
सुखी जगण्याचा मंत्र
एकीकडे काँक्रिटची शहरी जंगलं विस्तारत चाललेली असताना, स्थानिक जैवविविधता टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं ठरत आहे. अशा प्रसंगी, कदंबासारख्या स्थानिक किंवा भारतीय हवामानाशी चांगल्या प्रकारे जुळवून घेणाऱ्या पुराणवृक्षांचा विचार शहरी आणि ग्रामीण वृक्षलागवडीत करणं म्हणजे आपलंच म्हणजेच माणसांचं जगणं सुखी करणं आहे.
