‘स्वस्तिक’ हे चिन्ह भारतीय संस्कृतीत मंगलमय आणि पावित्र्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही शुभप्रसंगी घरांच्या प्रवेशद्वारावर बऱ्याच ठिकाणी स्वस्तिक काढलं जातं. स्वस्तिकची पूजा केली जाते. पण याच स्वस्तिकचं स्वागत करण्यास पाश्चात्य राष्ट्रे, विशेषत: अमेरिका आणि युरोपमधील देश अनुत्सुक असतात. एवढंच नाही, तर काही ठिकाणी स्वस्तिकला विरोधदेखील केला जातो. याचं महत्त्वाचं कारण थेट हिटरलच्या नाझीवादापर्यंत जाऊन पोहोचतं. पण हिटरलनं त्याचा नाझीवाद पसरवण्यासाठी निवडलेलं स्वस्तिक, त्यात केलेला बदल आणि हिंदू, बौद्ध किंवा जैन संस्कृतीत पवित्र मानलं जाणारं स्वस्तिक यामध्ये नेमका फरक काय आहे? त्यांचा इतिहास काय आहे? अमेरिकेतील कॅलिफोर्नियानं नुकत्याच पारित केलेल्या एका कायद्यामुळे स्वस्तिक चिन्हाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाझीवादाशी फारकत होण्यास कशी मदत होणार आहे? जाणून घेऊयात सविस्तर…
स्वस्तिकची चर्चा का सुरू झाली?
कॅलिफोर्नियानं २३ ऑगस्ट रोजी एक कायदा मंजूर केला आहे. या कायद्यानुसार हिटलरनं त्याच्या नाझीवादाचा प्रसार करण्यासाठी निवडलेल्या नाझी हाकेनक्रूजच्या चिन्हावर (हे तिरप्या स्वस्तिक चिन्हासारखं दिसतं) बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय या विधेयकामध्ये हे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे की यातून हिंदू, बौद्ध किंवा जैन संस्कृतीमध्ये पवित्र मानण्यात आलेल्या स्वस्तिक चिन्हाच्या वापरावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. या विधेयकाचं महत्त्व यासाठी आहे, की यामुळे हिंदू, बौद्ध किंवा जैन परंपरांमधील प्राचीन स्वस्तिक चिन्हाला शांततेचं प्रतीक अशी मान्यता देणारं कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील पहिलंच राज्य ठरलं आहे. हिटलरच्या चिन्हापासून स्वस्तिक वेगळं असल्यास अधिकृतपणे मान्यता देण्यात आली आहे. स्वस्तिक चिन्हाचा लोकांना घाबरवण्यासाठी वापर करणं कायद्यानं गुन्हा ठरवण्यात आलं आहे.
हिटलरचं हाकेनक्रूज आणि स्वस्तिक यात फरक काय?
स्वस्तिक हे हिंदू, बौद्ध आणि जैन संस्कृतींमध्ये पवित्र मानलं जाणारं चिन्ह आहे. जगभरात पसरलेल्या या संस्कृतींमध्ये स्वस्तिकला आनंद आणि पावित्र्याचं स्थान आहे. त्याउलट हिटलरनं निवडलेलं हाकेनक्रूज हे स्वस्तिकपेक्षा काहीसं वेगळं आहे. हाकेनक्रूजची रचना स्वस्तिकप्रमाणेच असली, तरी ते काहीसं उजव्या बाजूला झुकलेलं आहे. त्यातून आर्य वंशाचं स्वामित्व अधोरेखित होणं अपेक्षित आहे. नवनाझी गटांकडून या चिन्हाचा द्वेष पसरवण्यासाठीदेखील वापर केला जातो.
विश्लेषण : मनुस्मृती काय आहे? सध्या सुरू असलेला नेमका वाद काय?
स्वस्तिक हा शब्द मुळात संस्कृत भाषेतून आला आहे. भारतात अनेक सांस्कृतिक ठिकाणी स्वस्तिक चिन्ह दिसून येतं. मंदिर, घर, वाहन, प्रवेशद्वार किंवा दरवाजावरची भिंत अशा अनेक ठिकाणी हे चिन्ह पवित्र आणि चांगल्या गोष्टींचं स्वागत करण्यासाठी वापरलं किंवा रेखाटलं जातं. स्वस्तिक हे प्रामुख्याने लाल किंवा पिवळ्या रंगात काढलं जातं. ते एकदम सरळ असून कुठल्याही बाजूला झुकलेलं नाही. स्वस्तिकच्या चारही चौकोनांमध्ये चार बिंदू असतात, जे चार वेदांचं प्रतीक असल्याचं सांगितलं जातं. आत्तापर्यंत सर्वात जुनं स्वस्तिक हे आत्ताच्या युक्रेन देशात हस्तिदंतावर कोरलेलं सापडलं आहे. ते जवळपास ख्रिस्तपूर्व १० हजार वर्ष जुनं असल्याचा अंदाज आहे. त्याशिवाय मेसोपोटेमिया, अमेरिका, अल्गेरिया आणि अतीपूर्वेकडच्या देशांमध्ये देखील प्राचीन काळातील स्वस्तिकाचे पुरावे सापडले आहेत.
पाश्चात्य देशांना स्वस्तिकबद्दल द्वेष का?
हिंदू, बौद्ध आणि जैन संस्कृतीतील हजारो वर्षांपूर्वीपासूनचा इतिहास साक्ष असूनही युरोप आणि अमेरिकेतील देशांमध्ये अजूनही स्वस्तिक चिन्ह हिटलरच्या कार्यकाळाशीच जोडलं जातं. एवढंच नाही, तर दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीचा आणि पर्यायाने हिटलरच्या नाझीवादाचा पराभव झाल्यानंतर जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया आणि लिथुआनिया या युरोपियन देशांमध्ये स्वस्तिकवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, अजूनही जगभरात छोट्या-छोट्या गटात असणारे नवनाझीवादी समूह हिटलरच्या हाकेनक्रूज चिन्हाचा वापर स्वत:ला नाझीवादाचे समर्थक म्हणून दर्शवण्यासाठी करताना दिसतात.
हिटलरनं नेमकं स्वस्तिक हे चिन्ह कसं निवडलं?
स्वत: हिटलरनं यासंदर्भात त्याचं आत्मचरित्र माईन काम्फ अर्थात माझा लढा या पुस्तकात लिहून ठेवलं आहे. जर्मनीमध्ये आपला जम बसवत असताना नाझी पक्षाला एका अशा झेंड्याची आवश्यकता होती, जो फक्त त्यांच्या चळवळीचं प्रतिनिधित्व करणार नाही, तर लोकांच्या मनात लगेच घर करेल आणि नाझी चळवळीकडे लोकांना आकर्षित करू शकेल. ४५ अंशात उजवीकडे झुकवलेलं स्वस्तिक चिन्ह अर्थात हाकेनक्रूज हा त्यासाठी एकदम योग्य पर्याय ठरला. १९२०मध्ये हिटलरनं हाकेनक्रूजला नॅशनल सोशॅलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी अर्थात नाझी पार्टीचं चिन्ह म्हणून मान्यता दिली. लाल रंगाच्या चौकोनी कापडावर पांढऱ्या वर्तुळात रेखाटलेलं काळ्या रंगाचं उजवीकडे झुकलेलं स्वस्तिक हा त्यानं आपल्या पक्षाचा झेंडा ठरवला. लाल, काळा आणि पांढरा हे रंग त्यानं थेट जर्मन साम्राज्याच्या झेंड्यावरून घेतले होते. हिटलरसाठी हे चिन्ह म्हणजे राष्ट्रीय समाजवाद आणि उज्वल भवितव्याची आशा होतं.
विश्लेषण : युरोपमध्ये ५०० वर्षांमधील सर्वात भयंकर दुष्काळ, ४७ टक्के जमीन वाळवंट बनण्याच्या वाटेवर?
त्यानं याबाबत माईन काम्फमध्ये लिहिलंय, “या ध्वजातला लाल रंग हा चळवळीमध्ये असणारा सामाजिक विचार दर्शवतो. पांढरा रंग राष्ट्रीयत्वाची भावना दर्शवतो. तर स्वस्तिक आर्यन वंशाच्या अंतिम विजयाची आम्हाला सोपवण्यात आलेली मोहीम अधोरेखित करतं.”
हिटलरचा नाझीवाद काय सांगतो?
जर्मन लोक हे मूळच्या आर्यांचे वंशज अर्थात पृथ्वीतलावरील सर्वोच्च वंश असल्याची धारणा हिटलरची होती. त्यामुळे मूळचे जर्मन लोक हे इतर सर्व वंशांपेक्षा श्रेष्ठ असल्याच्या भयंकर धारणेचा नाझीवाद पुरस्कार करत होता. त्यामुळे नाझीवाद मानणाऱ्या लोकांसाठी या कथित वांशिक श्रेष्ठत्वाचं जतन आणि संवर्धन करणं याला सर्वोच्च प्राधान्य होतं. त्यामुळेच इतर सर्व वंशाचे लोक त्यांच्यासाठी कनिष्ठ किंवा दुय्यम दर्जाचे होते. ज्यू लोक हे नाझी लोकांना सर्वात मोठे शत्रू वाटत होते. त्यांचा पृथ्वीतलावरून नि:पात करणं हे हिटलर आणि त्याच्या अनुयायांना त्याचं सर्वोच्च कर्तव्य वाटत होतं. याच विचारसरणीचं प्रतीक म्हणून हिटलरनं बदल करून स्वस्तिक चिन्हाचा वापर केला. त्यामुळे पाश्चात्य देशांमध्ये या चिन्हाला आत्तापर्यंत आडकाठी किंवा प्रसंगी विरोध केला जात होता. आता कॅलिफोर्नियाच्या रुपाने अमेरिकेत हिंदू, बौद्ध किंवा जैन संस्कृतींमध्ये पवित्र मानलं जाणारं स्वस्तिक आणि हिटलरच्या राक्षसी नाझीवादाचं प्रतीक असणारं हाकेनक्रूज हे एकमेकांपासून स्वतंत्र असून स्वस्तिकचं या संस्कृतींसाठी असणारं पवित्र स्थान मान्य केलं जाण्यास सुरुवात झाली आहे!