अनोळखी मोबाइल क्रमांकावरून येणारे कॉल अनेकदा त्रासदायक ठरतात. कामात व्यस्त असताना कधी स्पॅम कॉल तर कधी नको असलेल्या व्यक्तीचे फोन येतात. त्यातच कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव दिसत नसल्यामुळे फोन उचलावा की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. काही वेळा ओळखीची व्यक्तीही नवीन क्रमांकावरून फोन करते. अशावेळी फोन नेमका कोणाचे आहे हे समजत नसल्याने गोंधळ उडतो. आता मात्र ही अडचण दूर होण्यास मदत होणार आहे. कारण यापुढे मोबाइलवर फोन येताच क्रमांकासोबत कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नावही दिसणार आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडिया या दूरसंचार कंपन्यांना ही सुविधा अनिवार्य करावी लागणार आहे. दूरसंचार विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार हा बदल करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाला ‘कॉलर नेम प्रेझेंटेशन’ असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान ही सुविधा नेमकी कशी काम करणार? कॉल करणाऱ्या अनोळखी व्यक्तीचे नावही फोनवर कसे दिसणार? त्याविषयी…

अलीकडच्या काळात ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. अनोळखी नंबरवरून आलेल्या फोन कॉलमुळे अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे. विशेषतः डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केली जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळेच कॉल करणाऱ्या व्यक्तीची ओळख समजण्यास मदत करणारी ही नवीन सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. दूरसंचार विभागाच्या परिपत्रकानुसार, १ नोव्हेंबरपासून प्रत्येकाच्या मोबाइलवर फोन येताच कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव दिसेल. हे नाव संबंधित दूरसंचार कंपनीकडे ग्राहकाच्या नोंदणीवेळी दिलेल्या माहितीच्या आधारे दाखवले जाईल. या सुविधेमुळे फोन उचलण्यापूर्वी कॉल कोणाकडून आला आहे याची माहिती मिळण्यास नागरिकांना मदत होईल. ही सेवा किमान 4G नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांसाठीच उपलब्ध असेल. 2G आणि 3G नेटवर्क तसेच लँडलाइन कनेक्शनसाठी ही सेवा सुरू करण्याबाबत स्वतंत्रपणे विचार केला जाईल, असे दूरसंचार विभागाने स्पष्ट केले आहे.

नवीन कॉलर आयडी सेवा कशी काम करणार?

या नव्या सेवेमध्ये फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव दाखवण्याची जबाबदारी संबंधित दूरसंचार कंपनीची असेल. म्हणजेच ज्या कंपनीच्या नेटवर्कवरून फोन केला जाईल, ती कंपनी कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव दाखवण्याची सेवा उपलब्ध करून देईल. यासाठी ग्राहकांना स्वतंत्रपणे कोणतीही विनंती करण्याची आवश्यकता नसेल. या कॉलर आयडी सेवेमध्ये कॉल आल्यावर मोबाइल स्क्रीनवर दोन गोष्टी दिसतील. पहिल्या भागात सध्याच्या पद्धतीप्रमाणे कॉल करणाऱ्या व्यक्तीचा क्रमांक असेल, तर दुसऱ्या भागात त्या व्यक्तीचे अधिकृत नाव दिसेल. फोन करणाऱ्या व्यक्तीचा क्रमांक मोबाइलमध्ये आधीच सेव्ह केलेला असेल, तर नेहमीप्रमाणे त्या व्यक्तीचे सेव्ह केलेले नाव दिसेल. मात्र, नंबर सेव्ह केलेला नसेल, तर देशांतर्गत कॉलच्या बाबतीत दूरसंचार कंपनीच्या डेटाबेसमध्ये नोंदवलेले संबंधित व्यक्तीचे नाव दिसेल. परदेशातून कॉल आल्यास स्क्रीनवर ‘इंटरनॅशनल कॉल’ असे दाखवले जाईल.

ग्राहकांच्या गोपनीयतेची घेतली जाणार काळजी

ग्राहकांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी दूरसंचार विभागाने कंपन्यांना ‘सिक्युरिटी बाय डिझाइन’ या तत्त्वाचे पालन करण्यास सांगितले आहे. त्यानुसार कॉल संपल्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीच्या नावाची माहिती साठवून ठेवण्यास परवानगी दिली जाणार नाही. ज्या ग्राहकांनी ‘कॉलिंग लाइन आयडेंटिफिकेशन रिस्ट्रिक्शन’ सेवा सक्रिय केली आहे, त्यांना या नव्या प्रणालीतून वगळण्यात येईल. त्यामुळे अशा ग्राहकांची नावे कॉलर नेम प्रेझेंटेशन प्रणालीमध्ये दाखवली जाणार नाहीत. याशिवाय, ग्राहकांचा हा डेटाबेस, नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित आणि सायबर धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्याचे कडक निर्देशही दूरसंचार कंपन्यांना देण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत मोबाइलच्या स्क्रीनवर कॉल करणाऱ्या अनोळखी व्यक्तीचे नाव दिसणार असले तरी प्रत्येक कॉल सुरक्षित किंवा विश्वासार्ह असेलच असे नाही. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहावे, अनोळखी व्यक्तीला ओटीपी, बँक खात्याची माहिती तसेच इतर गोपनीय तपशील देऊ नयेत, असे आवाहनही दूरसंचार विभागाने केले आहे.

व्यावसायिक कनेक्शनसाठी काय सुविधा मिळणार?

व्यावसायिक वापरासाठी किंवा मोठ्या संख्येने सिमकार्ड वापरणाऱ्या कंपन्या आणि संस्थांना नवीन कॉलर आयडी सेवेत आपल्या पसंतीचे नाव दाखवण्याची सुविधा मिळणार आहे. हे नाव दूरसंचार कंपनीच्या ग्राहक डेटाबेसमध्ये नोंदवलेल्या नावापेक्षा वेगळे असू शकते. मात्र, पसंतीचे नाव दाखवण्यासाठी काही अटींचे पालन करावे लागेल. संबंधित व्यवसायाच्या नावावर ट्रेडमार्क नोंदणीकृत असणे किंवा वस्तू आणि सेवा कर (GST) पोर्टलवर त्या व्यवसायाचे व्यापारनाव नोंदवलेले असणे आवश्यक असेल. पसंतीचे नाव मंजूर करण्यापूर्वी दूरसंचार कंपन्यांना आवश्यक पडताळणी करावी लागेल. तसेच, संबंधित व्यवसायाची त्या नावाने नोंदणी असल्याचा पुरावा देणाऱ्या कागदपत्रांच्या सत्यप्रतीही जतन करून ठेवाव्या लागतील. या सुविधेमुळे कंपन्या आणि संस्थांना ग्राहकांना फोन करताना त्यांच्या नोंदणीकृत व्यवसायाचे नाव दाखवता येईल. त्यामुळे फोन घेणाऱ्या व्यक्तीला कॉल कोणत्या व्यवसायाकडून आला आहे हे ओळखणे सोपे होईल.