Calling Your Parents Every Day makes you dependent or independent: आपले घरातले आपल्याला दर वेळी सांगतात, “ऑफिसला पोहोचल्यावर कळव” किंवा “निघताना निदान एक फोन तरी करत जा”. अगदीच जर घरातली व्यक्ती बाहेरगावी कामानिमित्त राहत असेल किंवा शिकायला बाहेर गेली असेल, तर दिवसातून किमान ५-६ वेळा कॉल्स येत राहतात; विशेषतः आईचे! पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या संस्कृतीत ही घरातल्यांची गोड लुडबुड आपल्यासाठी जरी सवयीची असली तरी काही संस्कृतींमध्ये घरच्यांशी रोज फोनवर बोलणं दुर्बलतेचं लक्षण मानलं जातं.

मानसशास्त्रीय अभ्यासानुसार, एखादी व्यक्ती आपल्या पालकांशी रोज कितपत बोलते यावर ती व्यक्ती किती स्वावलंबी किंवा परावलंबी आहे हे गणित ठरत असतं. परदेशी संस्कृतींमध्ये मूल जेव्हा प्रौढतेचं वय ओलांडतं तेव्हा त्याला स्वतःचे खर्च उचलणं भाग असतं आणि त्याचबरोबर तिथे बाहेरगावी शिकण्याला प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे अवघ्या १७ व्या वा १८ व्या वर्षी आई-वडिलांना सोडून संपूर्णपणे नवीन जागेत स्थायिक होतात; पण ती मुलं या वयात आपले निर्णय स्वतः घेण्यासाठी तयार आहेत हे कशावरून ठरवणार?

केवळ पालकांशी संपर्काचं प्रमाण किती आहे यावरून एखाद्या व्यक्तीची भावनिक परिपक्वता किंवा स्वातंत्र्य ठरत नाही. त्यात महत्वाचं हे आहे की, हे संवाद निर्णय क्षमतेच्या आड येतात की सकारात्मक नातेसंबंधांना पाठिंबा देतात? कौटुंबिक मानसशास्त्रातील संशोधनानुसार पालकांशी नियमित संपर्क हा आपुलकीचा, जवळीकतेचा, सांस्कृतिक मूल्य आणि परस्पर सहकार्य दर्शवू शकतो. याउलट जर हेच संवाद जर तुमची निर्णय क्षमता, किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत असतील, तर तुम्ही तुमच्या पालकांवर परावलंबित आहात.

मर्यादित अटॅचमेंट जवळीक निर्माण करते:

जॉन बॉल्बी (John Bowlby) यांनी मांडलेल्या आणि नंतर मानसशास्त्रज्ञ मेरी आइन्सवर्थ (Mary Ainsworth) यांनी विकसित केलेल्या ‘अ‍ॅटॅचमेंट थिअरी’मधून (Attachment Theory) हा मुद्दा आपण सविस्तर समजून घेऊ शकतो. अ‍ॅटॅचमेंट थिअरी म्हणजे लहानपणी पालकांसोबत निर्माण होणाऱ्या नात्याचा आपल्या मोठेपणीच्या स्वभाव आणि नातेसंबंधांवर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास.

  • सुरक्षित आधार (Secure Base) : लहानपणी पालकांकडून योग्य प्रेम आणि पाठिंबा मिळाला की, मुलाला जग सुरक्षित वाटतं. त्यामुळे ते नवीन गोष्टी शिकण्यास आणि स्वतंत्रपणे वावरण्यास घाबरत नाहीत.
  • मनातील विचारसरणी (Internal Working Models): बालपणीच्या अनुभवांवरून मूल मनाशी दोन गोष्टी ठरवतं, “इतर लोक विश्वास ठेवण्यासारखे आहेत का?” आणि “मी काळजी घेण्यायोग्य आहे का?”.
  • सुरक्षित नातं (Secure Attachment): लहानपणी भावनिक सुरक्षा मिळालेली मुलं मोठी झाल्यावर स्वतंत्र, आत्मविश्वासी बनतात आणि इतरांशी चांगली नाती जपू शकतात.
  • असुरक्षित नातं (Insecure Attachment): लहानपणी दुर्लक्ष किंवा नकार मिळाला असल्यास मोठेपणी मनात अविश्वास, भीती किंवा जास्त परावलंबित्व निर्माण होऊ शकतं.
  • आयुष्यभर प्रभाव: ही भावना केवळ बालपणापुरती राहत नाही, तर मोठेपणी आपले मित्र, जोडीदार आणि कामाच्या ठिकाणच्या नात्यांवरही प्रभाव पाडते.
    लहानपणी मिळालेलं प्रेम आणि भावनिक सुरक्षितता माणसाला मोठेपणी स्वावलंबी, स्वतंत्र आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतं
लहानपणी आईशिवाय जगणं कठीण; मोठेपणी आईशी बोलणंही कधी कधी अवघड का होतं?

कुटुंबाशी जवळीक आणि स्वातंत्र्य : एका नाण्याच्या दोन बाजू

समजा, एखादी प्रौढ व्यक्ती रोज संध्याकाळी कामावरून घरी परतताना आई-वडिलांना फोन करते. दिवसभरात काय घडलं, ऑफिसमध्ये काय गमतीजमती झाल्या हे सांगणं तिला आवडतं; पण याचा अर्थ असा नाही की, ती निर्णय घेण्यासाठी पालकांवर अवलंबून आहे. ती स्वतःचे आर्थिक निर्णय स्वतः घेते, ऑफिसमधील अडचणी स्वबळावर सोडवते आणि मित्रांसोबत तिचं एक स्वतंत्र जगही जपते. इथे रोजचा फोन हा परावलंबी असण्याचा पुरावा नसून, एका सशक्त नात्याची आणि भावनिक जोडलेपणाची खूण आहे.
मानसशास्त्रज्ञ याला एक सुरक्षित नातेसंबंध मानतात, जिथे जवळीक आणि स्वायत्तता दोन्ही गोष्टी एकत्र नांदतात.

संवादाचं स्वरूप महत्त्वाचं, प्रमाण नाही!

या संदर्भात मानसोपचार तज्ज्ञ मरे बोवेन (Murray Bowen) यांची ‘फॅमिली सिस्टीम्स थिअरी’ (Family Systems Theory) खूप महत्त्वाचा दृष्टिकोन देते. बोवेन यांनी ‘डिफरेंशिएशन ऑफ SELF’ (Differentiation of Self – स्व-भिन्नता) ही संकल्पना मांडली. या संकल्पनेनुसार, एक सकारात्मक विचारांचं कुटुंब तेच असतं, जे सदस्यांना कुटुंबाशी भावनिकदृष्ट्या जोडून ठेवत असतानाच स्वतःची स्वतंत्र ओळख आणि विचारसरणी जपण्याची पूर्ण संधी देतं.
याचं एक सोपं उदाहरण पाहूया, एका कुटुंबातील भाऊ-बहीण दररोज घरच्यांना फोन करतात. भाऊ पालकांशी चर्चा करतो, त्यांचा सल्ला ऐकून घेतो; पण शेवटी स्वतःची बुद्धी आणि आत्मविश्वास यांच्या साह्याने निर्णय घेतो. दुसरीकडे बहीण लहानसहान खरेदीपासून ते करिअरच्या निवडीपर्यंत पालकांच्या मंजुरीशिवाय एक पाऊलही टाकू शकत नाही. वरवर पाहता, दोघांचं वर्तन अगदी एकसारखं दिसत, दोघंही रोज फोन करतात; पण त्यामागील मानसशास्त्र आणि नात्याचं स्वरूप मात्र पूर्णपणे वेगळं आहे. केवळ संपर्काच्या प्रमाणावरून कोणी परावलंबी ठरत नाही.

स्वायत्तता आणि नातेसंबंध एकत्र असू शकतात?

मानसशास्त्रज्ञ एडवर्ड देची (Edward Deci) व रिचर्ड रायन (Richard Ryan) यांनी मांडलेली ‘सेल्फ-डिटर्मिनेशन थिअरी’ (Self-Determination Theory) सांगतं की, माणसाच्या मानसिक समाधान आणि आरोग्यासाठी पूर्ण होणं गरजेचं असलेल्या तीन मूलभूत गरजा :

  • स्वायत्तता (Autonomy) : स्वतःच्या मूल्यांनुसार निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य.
  • क्षमता (Competence): स्वतःची कामं सक्षमपणे करण्याची ताकद.
  • नातेसंबंध/जवळीक (Relatedness): आपल्या माणसांशी जोडून राहण्याची भावना.

या गरजा अजिबात परस्परांच्या विरुद्ध नाहीत. एखादी व्यक्ती स्वतःचं स्वतंत्र आयुष्य आत्मविश्वासानं जगत असतानाही पालकांशी घट्ट नातं जपू शकते. उदा. एखादी मुलगी रोज सकाळी आईला फोन करते. कारण- तिला त्या नात्याचं मूल्य समजतं आणि आईशी बोलल्यानंतर तिला एक ऊर्जा मिळते, समाधान मिळतं; रोजच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तिला आईच्या परवानगीची गरज असते म्हणून नाही!

संस्कृती आणि कौटुंबिक संवादाचा ढाचा

आपल्या कौटुंबिक संवादावर संस्कृतीचाही खूप मोठा प्रभाव असतो. मानसशास्त्रज्ञ हॅझेल मार्कस (Hazel Markus) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘क्रॉस-कल्चरल सायकॉलॉजी’ (Cross-Cultural Psychology) मध्ये केलेल्या संशोधनानुसार, भारत, इटली, लॅटिन अमेरिका आणि पूर्व आशियातील अनेक समूहवादी (Collectivist) संस्कृतींमध्ये प्रौढावस्थेतही पालकांशी जवळचे संबंध ठेवण्याला महत्त्व दिलं जातं.
इथे दररोज फोन करून विचारपूस करणं हा परावलंबित्व किंवा कमकुवतपणा मानला जात नाही, तर तो आदर, आपुलकी, काळजी आणि कौटुंबिक जबाबदारीचा एक भाग मानला जातो. याउलट अधिक व्यक्तिवादी (Individualistic) संस्कृतींमध्ये याच वर्तनाचा अर्थ ‘स्वतंत्र न होणं’ असा लावला जाऊ शकतो. त्यामुळे फोनवर रोज बोलण्याचा अर्थ काय, हे ते कुटुंब कोणत्या सांस्कृतिक पार्श्वभूमीत जगतं आहे यावरही अवलंबून असतं.

सकारात्मक नातेसंबंधांमधून मिळणारा भावनिक आधार:

मानसशास्त्रज्ञ शेली गॅबल (Shelly Gable) यांच्या ‘परसीव्हड रिस्पॉन्सिव्ह सपोर्ट’ (Perceived Responsive Support) या सिद्धांतानुसार, जेव्हा लोकांना असा विश्वास असतो की, समोरची व्यक्ती आपल्या भावना आणि विचारांची मनापासून काळजी घेते, तेव्हा ती नाती अधिक बहरतात.
नियंत्रण न ठेवता किंवा विनाकारण टीका न करता, शांतपणे ऐकून घेणारे पालक हे मुलांसाठी आयुष्यभराचा एक मोठा भावनिक आधार असतात. कामाच्या ठिकाणी पदोन्नती (Promotion) मिळाल्यावर किंवा एखादृं यश संपादित केल्यावर वडिलांना फोन करून ती बातमी सांगणं, यानं तुमचा आत्मविश्वास किंवा स्वातंत्र्य कमी होत नाही; उलट त्यामुळे कौटुंबिक बंध अधिक मजबूत होतात.

स्वातंत्र्य म्हणजे भावनिक दुरावा नव्हे!

प्रौढ किंवा स्वतंत्र होणं म्हणजे पालकांपासून भावनिकदृष्ट्या दूर जाणं किंवा त्यांच्याशी बोलणं कमी करणं, हा एक फार मोठा गैरसमज आहे. विकासात्मक मानसशास्त्रज्ञांच्या मते, खरी परिपक्वता ही जबाबदार निर्णयक्षमता, भावनिक स्थैर्य आणि स्वतःच्या आयुष्याचं उत्तरदायित्व स्वीकारण्यात असतं; कुटुंबाशी संपर्क तोडण्यात नव्हे. दररोज पालकांना फोन करणारी व्यक्तीसुद्धा एकटी राहू शकते, उत्तम करिअर घडवू शकते, स्वतःच्या मुलांचं संगोपन करू शकते आणि आयुष्यातील कठीण निर्णय स्वबळावर घेऊ शकते. त्यांच्या नात्यातील ताकद ही सततच्या अगतिक परावलंबित्वात नसून, एका सातत्यपूर्ण आणि सुंदर जोडलेपणात असते. महत्त्वाची गोष्ट ही नाही की, तुम्ही दिवसातून किती वेळा घरी फोन करता, तर महत्त्वाची गोष्ट ही आहे की, ते संवाद तुमच्यात आत्मविश्वास, परस्पर आदर आणि स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य निर्माण करतात का? जर हे संवाद तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात उडण्याचं बळ देत असतील, तर रोज होणारा फोन हा कमकुवतपणा नसून एका सुरक्षित आणि विश्वासाच्या नात्याचा सुंदर पुरावा आहे.

.