कंबोडियामध्ये वन्य प्राण्यांचा अवैध व्यापार केला जात असून खास चीनमधील व्यापारी, पर्यटक, नागरिक यांच्यासाठी वाघ, हत्ती, गेंडे आणि खवले मांजर यांसारख्या अनेक संकटग्रस्त प्राण्यांचे अवयव सर्रास विकले जात आहेत. वाघाचे बछडे पाळीव प्राणी म्हणून विकले जात असून वाघांच्या हाडांपासून बनवलेल्या खास वाइनचीही विक्री केली जात आहे. चीनसाठी केल्या जात असलेल्या कंबोडियातील या वन्यप्राणी तस्करीविषयी…
कंबोडियामध्ये वन्यप्राण्यांचा वापर कसा?
पर्यावरणविषयक गुन्हेगारीविरुद्ध लढणाऱ्या अमेरिकेतील ‘अर्थ लीग इंटरनॅशनल’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या एका नव्या तपासानुसार, कंबोडियामध्ये प्रामुख्याने चिनी नागरिकांसाठी चालणारा अवैध वन्यजीव व्यापार तेजीत आहे. या संस्थेने तयार केलेल्या अहवालात असे आढळून आले की, वाघ, हत्ती, गेंडे आणि खवले मांजर यांसारखे अनेक संकटग्रस्त प्राणी आणि त्यांचे अवयव, प्रामुख्याने उच्च-पदस्थ सरकारी अधिकारी, अनिवासी चिनी नागरिक, श्रीमंत व्यावसायिक आणि चिनी पर्यटकांना उघडपणे विकले जातात. उत्तम बाटल्यांमधील वाघाच्या हाडांपासून बनवलेली वाइन सर्रास वितरित होते. वाघाची पिल्ले पाळीव प्राणी म्हणून जिवंत विकली जातात. उच्चभ्रू उपाहारगृहांमध्ये खवले मांजर आणि नागाचे मांस यांपासून बनवलेले खाद्यपदार्थ दिले जातात. गेंड्याची शिंगे, हस्तीदंताचे दागिने, वाघाची कातडी आणि खवले मांजराच्या चामड्यापासून बनवलेल्या पिशव्या यांची सर्रास विक्री केली जात आहे.
ही तस्करी कशी उघडकीस आली?
‘अर्थ लीग इंटरनॅशनल’ या संस्थेने वन्यप्राणी व्यापार नेटवर्कचा नकाशा तयार केला आणि कोणत्या प्रजाती विकल्या जातात व कोण खरेदी करते, याची माहिती गोळा केली. या संस्थेच्या गुप्त तपासकर्त्यांनी कंबोडियातील भरभराटीला आलेल्या अवैध वन्यजीव व्यापार चालवणाऱ्या पाच सूत्रधारांनाही शोधून काढले आहे. हे तस्कर वन्यजीव आणि त्यांच्या अवयवांची तस्करी कशी करतात, ते काय विकतात आणि त्यांचे मुख्य ग्राहक कोण आहेत, याबद्दल तपशील गोळा केला. त्यांनी या काळ्या बाजारातील व्यापाराला मानवी आणि अमली पदार्थांच्या तस्करीच्या नेटवर्कशी आणि कंबोडियातून चालणाऱ्या, आपल्या लक्ष्यांची फसवणूक करणाऱ्या घोटाळे केंद्रांशीही जोडले. वर्षभर चाललेल्या या तपासात असे उघड झाले आहे की, श्रीमंत चिनी आणि कंबोडियन खरेदीदारांमुळे कंबोडियामध्ये वन्यजीव उत्पादनांना प्रचंड मागणी आहे.
तस्करीत चीनचा हात?
तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी कंबोडियामध्ये कार्यरत असलेल्या पाच सूत्रधारांना ओळखले आहे, जे जगभरातून वन्यजीवांची तस्करी करणारे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्क चालवतात. विशेष म्हणजे हे पाचही जण चिनी वंशाचे असून कंबोडियामध्ये त्यांचे तस्करीचे मोठे जाळे आहे. त्यापैकी दोघे मेकाँग प्रदेशातील सर्वात मोठे वन्यजीव व्यापारी असल्याचे मानले जाते. आग्नेय आशियातील वन्यजीव तस्करी ९० टक्के चिनी नागरिकांच्या हातात आहे. या प्रदेशात त्यांचे मजबूत व्यावसायिक संबंध आहेत. रिअल इस्टेट, उपाहारगृह, क्लब यांच्यामध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहेत, असे तपासकर्त्यांनी सांगितले. सर्वात मोठे तस्कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोघांची कंबोडियामध्ये किमान नऊ दुकाने आहेत. या दुकानांमध्ये संकटग्रस्त वन्यजीव उत्पादने उघडपणे विकली जात आहेत. त्याशिवाय काही जणांचे गेंड्याची शिंगे व हस्तिदंगत कोरणारे कारखाने आहेत, तर एकाची टायगर बोन वाइन बनवणारी वाइनरी आहे.
वाघांच्या हाडांपासून बनवलेली वाइन?
‘टायगर बोन वाइन’ हे वाघांच्या हाडापासून बनवले जाणारे एक महागडे मद्य आहे. हे मद्य अनेकदा वाघाच्या आकाराच्या नक्षीदार बाटल्यांमध्ये विकले जाते. हजारो वर्षांपासून पारंपारिक चिनी औषध म्हणून वापरले जात असले तरी, आता ती एक महागडी प्रतिष्ठेची वस्तू बनली आहे. टायगर बोन वाइन देणे किंवा भेट देणे हा प्रतिष्ठा दर्शवण्याचा किंवा एखादा सौदा पक्का करण्याचा एक मार्ग आहे. या अहवालात कंबोडियामध्ये वाघ आणि त्यांच्या अवयवांचा एक भरभराटीचा व्यापार असल्याचे उघड झाले आहे. या अहवालात दोन तस्करांना प्रमुख पुरवठादार म्हणून ओळखण्यात आले आहे, जे टायगर वाइन बनवण्यासाठी हाडे आणि संपूर्ण सांगाडे विकत होते आणि राजधानी नोम पेन्हमधील उच्चभ्रू रेस्टॉरंट्सना वाघाचे मांस देत होते. तेथे कंबोडियन सरकारचे उच्चपदस्थ अधिकारी आणि श्रीमंत चिनी व्यावसायिक नेहमी येत असतात. तथापि, या उच्चभ्रू रेस्टॉरंट्समध्ये केवळ वाघाचे मांस आणि वाइनच दिली जात नव्हती, असे तपासात आढळून आले. खवले मांजर, नाग, लाल पांडा आणि सोनेरी तितर यांसारख्या इतर वन्यजीवांचे पदार्थ दिले जात होते आणि मेनूवर या प्राण्यांची चित्रे प्रदर्शित केली जात होती.
