Oral health and heart disease जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, तोंडाच्या आरोग्याशी संबंधित समस्या जगभरात वाढत आहेत. कोलगेट-पामोलिव्ह ओरल केअर विभागाच्या संचालिका डॉ. स्वप्ना कोप्पीकर यांनी ‘फायनान्शियल एक्स्प्रेस डॉट कॉम’ला सांगितले, “भारतातील तोंडासंबंधीच्या आरोग्य समस्या वाढत आहेत. अंदाजे ८५ टक्के लोकांना दातांमध्ये कीड, हिरड्यांचे रोग व तोंडाचा कर्करोग यांसारख्या समस्यांचा त्रास होत आहेत.” कारण- लोक दातांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहत नाहीत.
किडलेल्या दातांचा संबंध क्वचितच कोणी कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखरेची पातळी किंवा हृदयविकाराच्या वाढलेल्या धोक्याशी जोडतो. परंतु, ब्रिटनमधील एका नव्या वैद्यकीय अभ्यासातून एक धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. हा अभ्यास काय सांगतो? खरंच दातांच्या वेदना, कीड आदी समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास डायबेटीज, हृदयविकार यांसारख्या समस्या उदभवू शकतात का? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…
नवीन अभ्यास काय सांगतो?
लंडन येथील बायोमेड सेंट्रलने प्रकाशित केलेल्या आणि ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये नमूद केलेल्या ‘जर्नल ऑफ ट्रान्सलेशनल मेडिसिन’मध्ये मांडण्यात आलेला हा अभ्यास ‘एपिकल पीरियडॉन्टायटिस’वर आधारित आहे. ‘एपिकल पीरियडॉन्टायटिस’ हा दातांच्या मुळाशी होणारा आणि दीर्घकाळ टिकणारा संसर्ग आहे. हा संसर्ग वाढत असताना कधी कधी हलक्या स्वरूपाच्या वेदना होतात. बरेच लोक वेदनाशामक औषधे घेऊन किंवा त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून उपचारांना उशीर करतात. पण, जेव्हा या संसर्गाने ग्रस्त असलेल्या ६५ रुग्णांवर रूट कॅनाल उपचार करण्यात आले आणि दोन वर्षांनंतर त्यांची पुन्हा तपासणी झाली, तेव्हा संशोधकांना एक आश्चर्यकारक गोष्ट आढळली. दातांवर केलेल्या या उपचारांमुळे त्यांच्या दातांचे आरोग्य सुधारण्याबरोबरच हृदयविकार आणि मधुमेहाचा धोकाही कमी झाला होता.
त्यांची कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारली आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आले, हे सर्व त्यांच्या जीवनशैलीत कोणतेही मोठे बदल न करता घडले. दातांच्या संसर्गामुळे हृदयविकार किंवा मधुमेह होतो हे या अभ्यासाने सिद्ध केले नसले तरी उपचार न केल्यास दातांचा संसर्ग चयापचय आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीची स्थिती बिघडवू शकतो, असे अभ्यासातून समोर आले आहे. या संसर्गावर उपचार केल्यास एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.
दाताशी संबंधित समस्या तुमच्या हृदयावर किंवा रक्तातील साखरेवर परिणाम करू शकतात का?
एपिकल पीरियडॉन्टायटिस हा आजार दातामध्ये खोलवर पोहोचलेल्या जीवाणू संसर्गामुळे होतो. त्यामुळे दातांच्या मुळाशी जळजळ निर्माण होते. या प्रकारच्या संसर्गामुळे नेहमी तीव्र वेदना होत नाहीत. या संसर्गित दातांतील जीवाणू रक्तप्रवाहात प्रवेश करतात, तेव्हा समस्या वाढते. हे जीवाणू रक्तात गेल्यास जळजळ निर्माण होते. शरीर जळजळ वाढवणारी रसायने सोडण्यास सुरुवात करते, जी रक्तवाहिन्या, संप्रेरक संतुलन आणि चयापचय प्रणालीवर परिणाम करतात.
ही प्रक्रिया इन्सुलिन प्रतिरोध वाढवते आणि त्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे अधिक कठीण होते. परिणामी धमन्यांमध्ये ‘प्लेक’ निर्माण होऊ शकतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, दाताला झालेला संसर्ग शरीरावर हळुवारपणे ताण वाढवू शकतो आणि त्यामुळे हृदय, यकृत व रोगप्रतिकार प्रणालीचेदेखील नुकसान होऊ शकते.
भारतासाठी या अभ्यासाचा अर्थ काय?
२०२३ च्या ICMR-INDIAB अभ्यासानुसार, देशात १०१ दशलक्षांहून अधिक लोक मधुमेहाने त्रस्त आहेत; तर १३६ दशलक्ष लोक प्री-डायबेटिसच्या टप्प्यात आहेत. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाच्या नमुना नोंदणी सर्वेक्षणानुसार देशातील एकूण मृत्यूंपैकी जवळजवळ एक-तृतीयांश मृत्यू हृदयविकारामुळे होतात. अभ्यासातून असेदेखील स्पष्ट होते की, भारतातील ३५-४५ टक्के प्रौढ व्यक्ती दातांच्या संसर्गाने त्रस्त आहेत, ज्यात एपिकल पीरियडॉन्टायटिससारख्या संसर्गांचा समावेश आहे, हे असे लोक आहेत, ज्यांनी त्यावर कोणतेही उपचार घेतलेले नाहीत. तरीही बहुतेक लोक केवळ वेदना कमी करण्यासाठी दंतवैद्याकडे जातात. भारतातील तोंडाच्या आरोग्य समस्यांकडे अनेकदा प्राथमिक आरोग्य सेवेत दुर्लक्ष केले जाते. ‘आयुष्मान भारत’सारख्या सरकारी योजनांसह बहुतेक विमा योजनांमध्ये रूट कॅनाल उपचार समाविष्ट नाही.
वर्षानुवर्षे दंतवैद्यांनी तोंडातील जीवाणू आणि प्रणालींतर्गत रोगांमधील विशेषतः हृदयविकार, संधिवात व मधुमेह यांच्यातील संबंधावर लक्ष वेधले आहे. परंतु, हृदयरोग तज्ज्ञ , मधुमेह विशेषज्ञ आणि सामान्य चिकित्सक यांसारखे वैद्यकीय विशेषज्ञ क्वचितच नियमित तपासणीमध्ये दातांची तपासणी समाविष्ट करतात. काही सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, कामाच्या ठिकाणी, विमा कंपन्या आणि अगदी सरकारी आरोग्य शिबिरांमध्येदेखील रक्तदाब आणि साखर तपासणीसह मूलभूत दातांच्या संसर्गाची तपासणी समाविष्ट करणे सुरू केले पाहिजे.
काय काळजी घ्यावी?
प्रत्येक दातदुखी म्हणजे गंभीर आजार नाही. परंतु, दातांच्या संसर्गाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम दूरगामी असू शकतात. तोंडात झालेला संसर्ग तुमच्या एकूण आरोग्यावर परिणाम करीत असल्याची लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात:
- पुन्हा पुन्हा होणारी दातदुखी किंवा सूज
- हिरड्यांमधून रक्त येणे
- सतत तोंडाला दुर्गंधी
- अकारण थकवा
- रक्तदाब किंवा साखरेच्या पातळीत चढ-उतार
जर तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकाराची चिंता किंवा ऑटोइम्यूनसारख्या समस्या असतील, तर नियमित दंत तपासणी आवश्यक असू शकते.
