आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी चीन ब्रह्मपुत्रेचा भारतात जाणारा प्रवाह रोखू शकतो, असा दावा करणाऱ्या पाकिस्तानवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, ही नदी भारतातही वाहते; मध्ये थांबत नाही. पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे वरिष्ठ सहायक राणा इहसान अफझल यांनी पाकिस्तानबरोबरचा सिंधू जल करार रद्द करण्यात आल्यानंतर चीन ब्रह्मपुत्रेच्या पाण्याचा भारतात जाणारा प्रवाह रोखू शकतो, असे वादग्रस्त विधान केले होते. “जर भारताने असे काही केले आणि पाकिस्तानला जाणारा प्रवाह थांबवला, तर चीनही तसेच करू शकतो. पण जर अशा गोष्टी घडल्या, तर संपूर्ण जगावर युद्धाचे संकट ओढवेल”, असे अफझल यांनी ‘जिओ न्यूज’ला सांगितले.
पण, खरंच चीन ब्रह्मपुत्रेचा भारतात जाणारा प्रवाह थांबवू शकतो का? तांत्रिक, भौगोलिक व भू-राजकीय घटकांचा विचार केल्यास चीन ब्रह्मपुत्रेचा प्रवाह काही प्रमाणात बदलू शकतो; मात्र पूर्णपणे थांबवू शकत नाही. खरे सांगायचे झाल्यास प्रवाह बदलल्यानेही मोठे परिणाम होऊ शकतात. चीन भारतात जाणारा ब्रह्मपुत्रेचा प्रवाह पूर्णपणे का थांबवू शकत नाही? याविषयी सविस्तर जाणून घेऊ…

भौगोलिक घटक आणि नदीतील पाण्याच्या प्रवाहाचा स्रोत
‘natstrat.org’वरील एका लेखानुसार, ब्रह्मपुत्रा नदीच्या एकूण पाण्याच्या विसर्गात चीनचा वाटा फक्त २२ ते ३० टक्के आहे. हा लेख माजी भारतीय सिंधू जल आयुक्त व भोपाळ येथील केन बेतवा लिंक प्रकल्प प्राधिकरणाचे सल्लागार पी. के. सक्सेना आणि भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या ब्रह्मपुत्रा आणि बराक येथील माजी आयुक्त तीरथ सिंग मेहरा यांनी लिहिला आहे.
लेखात प्रवाहाविषयी काय सांगण्यात आले?
- चीनमध्ये वाहणाऱ्या नदीचा स्रोत प्रामुख्याने हिमनदी वितळणे आणि तिबेटवरील मर्यादित पाऊस यांच्याशी निगडित आहे.
- त्यात असेही नमूद आहे की, भूतानचा आकार लहान असूनही ते नदीच्या खोऱ्यात २१ टक्के इतके योगदान देतात.
- तर, ब्रह्मपुत्रा नदीत एकूण विसर्गाच्या ३४.२ टक्के भाग व्यापणाऱ्या भारतीय खोऱ्यातून सर्वाधिक म्हणजेच ३९ टक्के पाणी येते.
- भारतात प्रवेश करण्यापूर्वी संपूर्ण ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहापैकी फक्त १४ टक्के पाणी नदीचे असते आणि उर्वरित ८६ टक्के पाणी भारतातील पावसाळ्यामुळे मिळालेले असते.
- त्यामुळे ब्रह्मपुत्रेच्या नदीप्रवाहात चीनचे योगदान अगदी किरकोळ आहे.
आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी त्यांच्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये नमूद केले आहे की, चीन ब्रह्मपुत्रेच्या एकूण प्रवाहापैकी फक्त ३० ते ४० टक्के वाटा देतो, ज्याचा स्रोत मुख्यत्वे हिमनदी वितळणे आणि तिबेटवरील मर्यादित पाऊस आहे. ते म्हणाले की, नदीचे उर्वरित ६५ ते ७० टक्के पाणी भारतात वाहणाऱ्या नदी आणि पावसातून मिळते. नदीचे उर्वरित ६५-७० टक्के पाणी भारतात निर्माण होते.
“हे पाणी नदीला अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड व मेघालयातील मुसळधार पाऊस, तसेच सुबानसिरी, लोहित, कामेंग, मानस, धनसिरी, जिया-भराली, कोपिली यांसारख्या प्रमुख उपनद्यांमुळे मिळते. खासी, गारो व जैंतिया टेकड्यांमधून वाहणाऱ्या कृष्णाई, दिगारू व कुल्सी यांसारख्या नद्यांमधून पाण्याचा अतिरिक्त प्रवाह वाढतो,” असेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “भारत-चीन सीमेवर नदीचा प्रवाह दोन ते तीन हजार घनमीटर प्रति सेकंद असतो. परंतु, मान्सूनदरम्यान आसामच्या मैदानी प्रदेशात (उदा. गुवाहाटी) नदीचा प्रवाह १५ ते २० हजार घनमीटर प्रति सेकंद वाढतो.”
ब्रम्हपुत्रा नदीवरील चीनचे धरण बांधकाम
चीनने ब्रह्मपुत्रेवर (तिबेटमधील यारलुंग त्सांगपो) जगातील सर्वांत मोठ्या जलविद्युत धरणाच्या बांधकामाला मान्यता दिली आहे. या नदीच्या प्रवाहाचा काही भाग बोगद्यांमधून वळवून जलविद्युत निर्मिती करणे या प्रकल्पात समाविष्ट आहे. चीनने पाण्याचा प्रवाह बदलणे भारतासाठी चिंतेची बाब असली तरी ही चिंता हंगामी आहे. म्हणजेच पाऊस नसलेल्या महिन्यांत याचा विपरीत परिणाम जाणवू शकतो.
आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी जानेवारीमध्ये तिबेटमधील ब्रह्मपुत्रा नदीवर चीनच्या प्रस्तावित धरणाबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि म्हटले होते की, या प्रकल्पामुळे संपूर्ण परिसंस्था नाजूक आणि कोरडी होईल. त्यांनी नमूद केले होते की, हे धरण बांधण्यात आल्यास आसाम राज्य हे अरुणाचल प्रदेश आणि भूतानमधील पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. ‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार सरमा म्हणाले होते की, भारत सरकारने चीनला आपल्या चिंतेविषयीची माहिती दिली आहे. ते म्हणाले, “आम्ही आधीच कळवले आहे की, जर हे धरण तयार झाले, तर ब्रह्मपुत्रेची परिसंस्था नाजूक व कोरडी होईल आणि नंतर आपण अरुणाचल प्रदेश आणि भूतानमधील पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहू.”
मुख्य म्हणजे हा प्रकल्प चीनसाठीदेखील आव्हाने निर्माण करणारा आहे. हाँगकाँग येथील ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्टने वृत्त दिले आहे की, तिबेट पठार भूकंपाच्या दृष्टीने सक्रिय आहे, ज्यामुळे मोठे धरण प्रकल्प धोकादायक ठरू शकतात आणि त्यामुळे मोठे भूकंप होण्याची शक्यता आणखी वाढते. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे विनाशकारी पूर येऊ शकतो, जो चीनसाठीदेखील हानिकारक असेल. ‘बिझनेस टुडे’च्या वृत्तानुसार, तज्ज्ञांनी असाही इशारा दिला आहे की, जर धरण भूकंपाच्या हालचाली, संरचनात्मक त्रुटी किंवा तोडफोड यांमुळे पडले, तर त्याच्या परिणामामुळे अरुणाचल प्रदेश आणि आसाम काही मिनिटांतच उद्ध्वस्त होऊ शकतो.
या धरणाच्या बांधकामामुळे ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. कारण- चीन नदीच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवत आहे. दरम्यान, भारत अरुणाचल प्रदेशातील सियांग अप्पर बहुउद्देशीय प्रकल्पाच्या विकासासठीही प्रयत्नशील आहे. ११,००० मेगावॅट जलविद्युत निर्माण करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा आहे. परंतु, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पर्यावरणीय आणि विस्थापन या बाबतीत स्थानिक विरोधाला तोंड द्यावे लागत आहे.
प्रवाह बदलण्याचे भूराजकीय परिणाम
चीनने भारताबरोबर २०२२ पासूनचा अपस्ट्रीम हायड्रोलॉजिकल डेटा शेअर केलेला नाही. ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहात बदल करण्यासाठी केलेली चीनची कोणतीही एकतर्फी कृती भारत-चीन संबंध बिघडवू शकते आणि त्यामुळे प्रादेशिक सुरक्षेची चिंता निर्माण होऊ शकते. प्रवाह रोखल्यास केवळ बांग्लादेशवरच नाही, तर चीनचे बांगलादेशशी असलेले राजनैतिक संबंधदेखील बिघडू शकतात. या स्वरूपाच्या भौगोलिक मर्यादा आणि भू-राजकीय परिस्थितीमुळे चीन भारतात जाणारा ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह पूर्णपणे थांबवू शकत नाही. भारतातच या नदीची ताकद आणखी वाढते.