Trump be impeached for Venezuela strikes २०२६ मध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणुका होणार आहेत. याबाबत बोलताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मध्यावधी निवडणुकीत हाऊस रिपब्लिकन्सचा पराभव झाला तर त्यांच्यावर महाभियोग चालवला जाऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना सत्तेवरून हटवणाऱ्या ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, आता अमेरिका त्या देशाचा कारभार पाहील आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ व संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यामध्ये पुढाकार घेतील.

मात्र, तिथे मादुरो यांची राजवट अजूनही आहे आणि अमेरिकेचे कोणतेही सैन्य तिथे प्रत्यक्ष तैनात नाहीत. ट्रम्प यांच्या स्वतःच्या समर्थकांसह अनेकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अमेरिका पुन्हा एकदा मोठ्या वादात अडकेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. पण, ट्रम्प यांना नक्की कशाची चिंता आहे? व्हेनेझुएलावरील हल्ल्यासाठी त्यांच्यावर महाभियोग चालवला जाऊ शकतो का?जाणून घेऊयात…

ट्रम्प यांना कशाची चिंता?

मंगळवारी वॉशिंग्टनमधील रिपब्लिकन सदस्यांच्या वार्षिक बैठकीत ट्रम्प यांनी भाषण दिले. ‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प म्हणाले, “ही एक अप्रतिम लष्करी कामगिरी होती.” हा कार्यक्रम जॉन एफ. केनेडी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्समध्ये झाला. ट्रम्प म्हणाले, “लोक म्हणत आहेत की, ही घटना इतिहासातील सर्वात अविश्वसनीय कामगिरींपैकी एक म्हणून नोंदवली जाईल. अनेकजण प्रत्यक्ष सैन्याबद्दल बोलत आहेत, पण त्यावेळी आपले बरेच सैनिक तिथे होते.”

“या कारवाईत कोणताही अमेरिकन मारला गेला नाही, पण दुसऱ्या बाजूला खूप लोक मारले गेले. दुर्दैवाने मला हे म्हणावे लागत आहे. त्यांना आम्ही येणार असल्याची कल्पना होती आणि ते सुरक्षित होते, पण आमचे तरुण सुरक्षित नव्हते. आपले जवान हेलिकॉप्टरमधून उड्या मारत होते आणि त्यांच्याकडे कोणतेही संरक्षण नव्हते, तरीही त्यांनी ते अत्यंत हुशारीने करून दाखवले.” मादुरो यांच्याबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले, “लोक वर्षानुवर्षे या माणसाच्या मागे होते. तो एक हिंसक प्रवृत्तीचा माणूस आहे. त्याने लाखो लोकांना मारले आहे. कराकसच्या मध्यभागी त्यांनी त्यासाठी खास खोली तयार केली आहे, जी आता बंद केली जात आहे, तिथे त्याने लोकांचा छळ केला आहे.”

त्यानंतर ट्रम्प यांनी रिपब्लिकन नेत्यांना नोव्हेंबरमधील मध्यावधी निवडणुका जिंकण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “तुम्हाला मध्यावधी निवडणूक जिंकावीच लागेल. जर आपण मध्यावधी निवडणूक जिंकलो नाही तर ते (डेमोक्रॅट्स) माझ्यावर महाभियोग चालवतील.” ट्रम्प म्हणाले, “लोक म्हणतात की जेव्हा तुम्ही राष्ट्राध्यक्षपद जिंकता, तेव्हा तुम्ही मध्यावधी निवडणूक हरता. तुमच्याकडे अनेक चांगल्या गोष्टी आहेत, त्या वापरा. जर तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचवू शकलात तर आपण नक्कीच जिंकू.”

ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवला जाऊ शकतो का?

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर देशद्रोह, लाचखोरी, इतर मोठे गुन्हे आणि गैरवर्तन यासाठी महाभियोग चालवला जाऊ शकतो. ट्रम्प यांची स्थिती सध्या नाजूक आहे. नोव्हेंबरमध्ये हाऊसच्या सर्व ४३५ जागांसाठी आणि सिनेटच्या ३३ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. २००६ मध्ये जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्यानंतर प्रत्येक मध्यावधी निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्राध्यक्षांनी हाऊसच्या जागा गमावल्या आहेत. १९९२ पासून सत्ताधारी पक्षाने आठ पैकी सहा वेळा मध्यावधी निवडणुका गमावल्या आहेत.

सर्वात मोठा पराभव १९९४ मध्ये बिल क्लिंटन यांच्या काळात झाला होता. त्यावेळी डेमोक्रॅट्सनी हाऊसमध्ये ५४ जागा गमावल्या होत्या. त्यानंतर २०१० मध्ये बराक ओबामा यांच्या काळात डेमोक्रॅट्सनी ६० जागा गमावल्या आणि २०१८ मध्ये ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात रिपब्लिकन पक्षाला ४० जागा गमवाव्या लागल्या होत्या. ट्रम्प यांच्यावर त्यांच्या पहिल्या कार्यकाळात डेमोक्रॅट्सनी दोनदा महाभियोग चालवला होता. सध्या हाऊसमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत अवघ्या पाच मतांच्या फरकाने आहे.

वाढत्या महागाईमुळे लोकांमध्ये असलेली नाराजी पाहता, रिपब्लिकन पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागू शकतो, असे सध्याचे चित्र आहे. काही डेमोक्रॅटिक सदस्यांनी ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगाची तयारी सुरू केली आहे. मेरीलँडच्या प्रतिनिधी एप्रिल मॅक्लेन डेलानी यांनी डेमोक्रॅट्सना व्हेनेझुएला प्रकरणावरून महाभियोगाच्या प्रक्रियेवर तातडीने विचार करण्याचे आवाहन केले आहे. “संविधानानुसार कोणतीही चर्चा न करता राष्ट्राध्यक्षांनी व्हेनेझुएलावर हल्ला केला आणि तो देश चालवण्याची आपली इच्छा व्यक्त केली,” असे डेलानी म्हणाल्या.

कोलंबिया विद्यापीठाचे कायद्याचे प्राध्यापक आणि बुश प्रशासनातील माजी राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी मॅथ्यू वॅक्समन यांनी ‘द इंडिपेंडेंट’ला सांगितले की, “राष्ट्राध्यक्ष असा दावा करतील की, अमेरिकेचे संरक्षण करण्यासाठी त्यांना असलेल्या व्यापक अधिकारांच्या कक्षेत ही कारवाई येते. परंतु, टीकाकार असा आरोप करतील की, काँग्रेसच्या परवानगीशिवाय केलेली ही कारवाई राष्ट्राध्यक्षांच्या अधिकारांच्या मर्यादेबाहेर आहे.” डेमोक्रॅट्सनी ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवला तरी सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे मजबूत बहुमत आहे. सिनेटमध्ये ट्रम्प यांना दोषी ठरवण्यासाठी किमान ६७ मतांची आवश्यकता असेल, जी सध्या तरी शक्य दिसत नाही.

इतिहास काय सांगतो?

इतिहास हा अशा प्रकरणांमध्ये मार्गदर्शक ठरू शकतो. ट्रम्प यांच्यावर हाऊस डेमोक्रॅट्सनी दोनदा महाभियोग चालवला आहे. २०१९ मध्ये युक्रेन प्रकरणावरून आणि २०२१ मध्ये कॅपिटल हिलवरील दंगलींवरून त्यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला आहे. दोन्ही वेळा सिनेटमधील रिपब्लिकन सदस्यांनी ट्रम्प यांची निर्दोष मुक्तता केली होती. जर ट्रम्प दोषी आढळले असते तर ते पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरले असते. आजवर एकाही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला महाभियोगाद्वारे पदावरून हटवण्यात आलेले नाही.

१९७४ मध्ये वॉटरगेट घोटाळ्यावरून सिनेटमध्ये महाभियोग चालवण्यापूर्वीच रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला होता. १९९८ मध्ये मोनिका लेविन्स्की प्रकरणावरून बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला होता, पण सिनेटने त्यांची मुक्तता केली होती. २०१६ पासून अनेक वाद होऊनही रिपब्लिकन पक्ष ट्रम्प यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे, त्यामुळे यंदाही ट्रम्प यांना प्रत्यक्षात पदावरून हटवले जाण्याचा धोका कमी आहे. असे असले तरी ट्रम्प यांच्या नावावर तीनदा महाभियोग चालवलेले एकमेव राष्ट्राध्यक्ष अशी नामुष्की ओढवू शकते.