scorecardresearch

विश्लेषण : फ्लेक्स फ्यूएल पर्यायी इंधन ठरू शकते का?

२८ सप्टेंबर रोजी फ्लेक्स फ्यूएलवर चालणारी टोयोटाची कोरोला ही भारतातील पहिली हायब्रीड कार बाजारात येत आहे.

विश्लेषण : फ्लेक्स फ्यूएल पर्यायी इंधन ठरू शकते का?
हे फ्लेक्स फ्यूएल काय आहे व ते पर्यायी इंधन ठरू शकते का?

-बापू बैलकर

पारंपरिक इंधनाचे वाढणारे दर व त्यांमुळे होणारे प्रदूषण याला आळा घालण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायी इंधनांचा शोध घेतला जात आहे. विद्युत वाहने बाळसे धरत असताना आता २८ सप्टेंबर रोजी फ्लेक्स फ्यूएलवर चालणारी टोयोटाची कोरोला ही भारतातील पहिली हायब्रीड कार बाजारात येत आहे. इंधन म्हणून या कारमध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करता येईल व त्यामुळे इंधनावर होणारा वाहनचालकांचा खर्च कमी होईल व प्रदूषणाची मात्राही संपेल, असा दावा करण्यात येत आहे. मात्र हे फ्लेक्स फ्यूएल काय आहे व ते पर्यायी इंधन ठरू शकते का? ‘किसान बनेगा अन्नदाता, ६२ रुपये लिटर मिलेगा पेट्रोल…’ ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा असून त्यांच्याच हस्ते भारतातील पहिल्या फ्लेक्स फ्यूएल मोटारीचे अनावरण होत आहे. त्यांच्या या घोषणेतील काही तथ्येही आपण यात पडताळून पाहणार आहोत.

इथेनॉल म्हणजे काय? 

इथेनॉल हे एक प्रकारचे अल्कोहोल आहे, जे पेट्रोलमध्ये मिसळले जाते आणि वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरले जाते. इथेनॉल उसापासून तयार होते. हे पेट्रोलमध्ये मिसळल्यास कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण ३५ टक्क्यांनी कमी होऊ शकते. इथेनॉलमिश्रित पेट्रोलचा सामान्य लोकांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होईल. इथेनॉलने चालवलेली कार पेट्रोलपेक्षा कमी गरम होते. इथेनॉलमध्ये अल्कोहोलचे पटकन बाष्पीभवन होते, ज्यामुळे इंजिन लगेच गरम होत नाही.

सरकारचे धोरण काय आहे?

भारत हा ब्राझीलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ऊस उत्पादक देश, तर इंधन आयातीत तिसऱ्या क्रमांकाचा प्रमुख आयातदार देश आहे. देशाच्या एकूण गरजेपैकी ८२ टक्के इंधन विदेशातून आयात करावे लागते. त्यामुळे इंधन म्हणून इथेनॉलचा वापर केल्यास इंधनासाठीचे परावलंबित्व कमी होईल. इथेनॉल हे वातावरणीय उष्म्याची (ग्लोबल वॉर्मिंग) दाहकता कमी करेल. ते पर्यावरणपूरक, शेतीशी निगडित असल्याने पुनर्निर्मित तसेच शेतकरी व देशासाठी वरदान ठरणारे जैवइंधन ठरेल. त्यामुळे आता केंद्र सरकारने ब्राझीलच्या धर्तीवर वाहनांमध्ये शंभर टक्के इथेनॉलचा वापर करून पेट्रोल व डिझेल या इंधनांना पर्याय म्हणून पाहत असून त्यासाठी धोरण आखले आहे. सन २०१८मध्ये केंद्र सरकारने नव्याने ‘राष्ट्रीय जैवइंधन धोरण’ जाहीर करून २०२२पर्यंत १० टक्के व २०२५पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्या दृष्टीने वाहन उत्पादक कंपन्यांनी या इंधनावर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती सुरू केली असून टोयोटा मोटर्सने यात आघाडी घेतली आहे. कोरोला ही फ्लेक्स फ्यूएलवरील मोटर ते बाजारात आणत आहेत.

फ्लेक्स फ्यूएल इंजिनमुळे काय होणार? 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घोषणेनुसार वाहनांमध्ये केवळ पेट्रोल इंजिन नव्हे तर फ्लेक्स-फ्यूएल इंजिन असेल. त्यामुळे वाहनचालकांना इंधन म्हणून १०० टक्के कच्च्या तेलाचा वापर करता येईल. हे इंधन कमी खर्चीक, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी आहे. फ्लेक्स फ्यूल इंजिन अनिवार्य केल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.

पारंपरिक इंधनाला योग्य पर्याय कोणते?

भारतात सध्या पेट्रोल, डिझेल या पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांसह सीएनजी, एलपीजी आणि आता विद्युत वाहने आदी पर्याय आहेत. यात आता फ्लेक्स फ्यूएल इथेनॉलची भर पडणार आहे. पण पारंपरिक इंधनाला पर्यायाचा विचार केला तर विद्युत वाहने हा चांगला पर्याय आहे. मात्र यासाठीच्या पायाभूत सुविधा, परवडणारी वाहने नसणे या काही महत्त्वपूर्ण समस्या असल्याने या वाहनांना म्हणावा तसा मोठा प्रतिसाद दिसत नाही. डिझेल वाहने तर बंद करण्याचे धोरण शासनाने आखले आहे. पेट्रोल वाहनांचा विचार केला तर पेट्रोलचे दर शंभर रुपयांपेक्षा अधिक झाले आहेत. साधारण पाचशे रुपयांचे पेट्रोल टाकले तर आपण ६० ते ८० किलोमीटरचा प्रवास करू शकतो. इथेनॉल सध्या ६५ रुपये लिटरच्या दरम्यान आहे. सारासार विचार केला तर दरामध्ये दुपटीने फरक दिसत आहे. मात्र इथेनॉलच्या वापरामुळे वाहनांची किलोमीटर क्षमता घटते, असा अनुभव आहे. १० टक्के इथेनॉल मिसळले तर ७ टक्के, २० टक्के मिसळले तर १५ टक्के, २७ टक्के मिसळले तर २० टक्के ॲव्हरेज कमी होते. याची गोळाबेरीज केली तर एक लिटर पेट्रोल किंवा इथेनॉलमध्ये वाहनांचा ॲव्हरेजमध्ये मोठा फरक दिसत नाही. त्यामुळे इंधन म्हणून इथेनॉल हा एकमेव पर्याय होऊ शकत नाही. त्या तुलनेत सीएनजी वाहने ५०० रुपयांच्या सीएनजीत १५० ते १७५ किलोमीटरचा टप्पा पार करतात, तर विद्युत वाहनांत ५०० रुपयांची वीज खर्च केली तर हे वाहन ३०० ते ४०० किलोमीटरचा टप्पा पार करू शकते. त्यामुळे सध्या वापरात असलेल्या इंधनाला इथेनॉल हा चांगला पर्याय ठरू शकतो याबाबत साशंकता आहे. आगामी काळात वाहने बाजारात आल्यानंतर ती इंधनदृष्ट्या किती परवडणारी असतील यावर या पर्यायचे भविष्य अवलंबून आहे. 

सर्वाधिक फायदा कोणाला?

इथेनॉलचा वापर वाहनांत इंधन म्हणून मोठ्या प्रमाणात झाल्यास याचा सर्वाधिक फायदा हा शेतकरी व वाहन उत्पादकांना होऊ शकतो. इथेनॉलचा पर्याय ठेवल्यानंतर सुरुवातीला वाहन उत्पादक कंपन्यांनी विरोध केला होता, मात्र नंतर त्यांनी यावर काम सुरू केले. या क्षेत्रातील काही वाहन अभ्यासकांच्या मते इथेनॉल हे अल्कोहोल आहे. ते प्लास्टिकच्या संपर्कात आले तर लवकर खराब होते. यामुळे वाहनांचे आयुष्य कमी होऊ शकते. म्हणजे इथेनॉल वापरामुळे वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढेल. तसेच इथेनॉल हे ऊस, गहू, तांदूळ आदी पिकांपासून तयार होते. त्यामुळे ब्राझीलचा अनुभव पाहता या पिकांच्या उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळून त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. तसेच यामुळे इथेनॉलनिर्मितीचे उद्योगही मोठ्या प्रमाणात उभे राहू शकतात. 

संभाव्य धोके कोणते?

हे फायदे होणार असले तरी काही संभाव्य धोकेही लक्षात घेणे गरजेचे आहे. इथेनॉलनिर्मितीमुळे शेतकऱ्यांनी इतर पिकांकडे दुर्लक्ष करून फक्त यासाठीच्या पिकांच्या उत्पन्नावरच भर दिला तर अन्नधान्य तुटवड्याचा प्रश्नही समोर येऊ शकतो. सध्या इथेनॉलनिर्मिती आणि त्यातून निर्माण होणारा कचरा यामुळे मोकळ्या जागा व नदीपात्रातील प्रदूषणाच्या समस्या वाढल्याचे दिसून येत आहे. इथेनॉलनिर्मिती मोठ्या प्रमाणात झाल्यास या समस्येत मोठी वाढ होऊ शकते. नद्यांच्या प्रदूषणात वाढ होऊ शकते. त्यामुळे ग्लोबल वार्मिंगची दाहकता कमी करेल, हा दावा किती खरा ठरेल हाही प्रश्न आहे. त्याचप्रमाणे वाहनांचा देखभाल खर्चही वाढू शकतो अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 

त्यामुळे फ्लेक्स फ्यूएल इथेनॉलवर चालणारी वाहने बाजारात येऊ लागली असून ती पारंपरिक इंधनासाठीचे भारताचे परावलंबित्व कमी करू शकतात  यामुळे शेतकऱ्यांना व वाहन उत्पादकांना फायदा होणार असला तरी ब्राझीलमध्ये या धोरणामुळे समोर आलेले धोके टाळून हे धोरण राबवणे गरजेचे होणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या