Can one death of sadness Expert Explains : जगप्रसिद्ध कादंबरी ‘पर्सेपोलिस’च्या लेखिका मार्जाने सत्रापी यांचे गुरुवारी (४ जून) वयाच्या ५६ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे पती व स्वीडिश चित्रपट निर्माते मॅटियास रिपा यांनी वर्षभरापूर्वीच जगाचा निरोप घेतला होता. पतीच्या विरहाचे दु:ख सहन न झाल्यामुळेच सत्रापी यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी स्थानिक माध्यमांना सांगितले. त्यांनी मॅटियास यांचा उल्लेख सत्रापी यांच्या आयुष्यातील खरे प्रेम, असा केला आहे. या पार्श्वभूमीवर अतिदुःखामुळे एखाद्या व्यक्तीचा खरंच मृत्यू होऊ शकतो का, असा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे, त्याविषयीचा हा आढावा…

दुःखामुळे मृत्यू होणे ही केवळ एक भावनिक व्याख्या असून, त्याला कोणताही वैद्यकीय आधार नाही, असे नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या मानसोपचार विभागाच्या प्राध्यापिका डॉ. ममता सूद यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. त्या म्हणाल्या की, तीव्र दुःख किंवा शोक हे मृत्यूचे थेट कारण नसते; परंतु ते एखाद्या व्यक्तीला आधीपासून असलेल्या आजारांना किंवा शारीरिक समस्यांना अधिक गंभीर बनवण्यास कारणीभूत ठरू शकते. एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर निर्माण होणारा तीव्र शोक, तणाव आणि एकाकीपणामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते. त्याचा विपरीत परिणाम हृदयविकार, उच्च रक्तदाब, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, झोपेचे विकार आणि नैराश्य यांसारख्या समस्यांवर होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये आधीपासून असलेले आजार अधिक गंभीर होऊन, संबंधित व्यक्तीच्या मृत्यूचा धोका वाढू शकतो, असेही डॉ. ममता यांनी स्पष्ट केले.

  • मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, तीव्र भावनिक धक्क्यानंतर काही लोकांमध्ये ‘ब्रोकन हार्ट सिंड्रोम’ नावाची स्थिती निर्माण होऊ शकते.
  • या अवस्थेत हृदयाचा एक भाग तात्पुरता फुगतो आणि त्याची रक्त पंप करण्याची क्षमता कमी होते. त्याची लक्षणे हृदयविकाराच्या झटक्यासारखी असू शकतात.
  • ही स्थिती बहुतेक वेळा उपचारांनी सुधारत असली तरी काही प्रकरणांमध्ये ती अत्यंत जीवघेणी ठरू शकते.
  • अचानक आलेल्या ताणामुळे शरीरातील जुने आजार गंभीर रूप धारण करतात.
  • त्यातच औषधोपचारात दुर्लक्ष झाल्यास संबंधित व्यक्तीच्या जीवालाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
  • जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतरचे पहिले सहा महिने त्याच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत जोखमीचे असतात.
  • या काळात दु:खात असलेल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचा स्ट्रोक किंवा हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचा धोका सर्वाधिक असतो.
  • हा वाढलेला धोका अनेक वर्षे कायम राहू शकतो आणि तो विशेषतः पुरुषांमध्ये अधिक आढळतो.

पुरुषांमधील वाढीव मृत्युदरामागे आत्महत्या, अपघात, हृदयविकार आणि संसर्गजन्य आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण अधिक असल्याचे अभ्यासांमधून स्पष्ट झाले आहे. तीव्र दुःखाचा एखाद्या व्यक्तीच्या मेंदू आणि शरीरावर नेमका कसा परिणाम होतो, याबाबत अद्याप संशोधन सुरू असून, त्याचे अंतिम निष्कर्ष समोर आलेले नाहीत. मात्र, काही अभ्यासांमधून असे समोर आले की, तीव्र दुःख सहन करताना मेंदूचे अनेक भाग सक्रिय होतात. तज्ज्ञांच्या मते, मेंदूतील अमिग्डाला हा भाग जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूला एक मोठा धोका मानून अधिक सक्रिय होतो, ज्यामुळे चिंता आणि अस्वस्थता वाढते. त्याच वेळी निर्णय क्षमता आणि विचार प्रक्रियेशी संबंधित असलेल्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स या भागाची सक्रियता कमी होते. त्यामुळे तीव्र दुःखात असलेल्या व्यक्तीची एकाग्रता कमी होऊन, त्याला गोंधळल्यासारखे वाटू शकते, ज्याला सामान्य भाषेत ‘ब्रेन फॉग’ (संभ्रमावस्था) म्हणतात. त्याशिवाय वेदनांवर नियंत्रण ठेवणारा अँटेरिअर सिंग्युलेट गायरस हा भाग जास्त प्रमाणात सक्रिय झाल्यामुळे संबंधित व्यक्तीला भावनिक आणि शारीरिक वेदना तीव्रतेने जाणवतात.

  • सामान्यतः शरीरातील तणाव नियंत्रित करणारी हायपोथॅलॅमिक-पिट्युटरी-अ‍ॅड्रिनल (HPA) मुख्य प्रणाली धोक्याच्या वेळी तणावजन्य हार्मोन्सचे प्रमाण वाढवते आणि धोका टळल्यानंतर ते पुन्हा कमी करते.
  • मात्र, तीव्र दुःखाच्या अवस्थेत शरीरातील ‘कॉर्टिसॉल’ या स्ट्रेस हार्मोनची पातळी अनेक आठवडे किंवा महिन्यांपर्यंत वाढलेलीच राहते.
  • त्यामुळे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊन संसर्गाचा धोका वाढतो, झोपेचे चक्र बिघडते आणि भूक कमी-जास्त होऊ शकते.
  • त्याशिवाय शरीरातील सिम्पथेटिक नर्व्हस सिस्टीम अधिक सक्रिय राहिल्याने अ‍ॅड्रेनालिनचे प्रमाण वारंवार वाढते.
  • परिणामी हृदयाचे ठोके आणि रक्तदाब सातत्याने वाढून हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
  • तज्ज्ञांच्या मते, सामान्य दुःख, प्रदीर्घ दुःख व नैराश्य या तीन नैसर्गिक प्रक्रिया असून, प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यांचे स्वरूप वेगवेगळे असू शकते.
  • जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास शोकाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील दुःख अत्यंत तीव्र आणि वेदनादायी असते.
  • त्यामध्ये सतत उदास वाटणे, रडू येणे, चिंता वाटणे, मृत व्यक्तीची तीव्र आठवण येणे, झोप आणि भूक बिघडणे, एकाग्रता कमी होणे आणि दैनंदिन कामांमध्ये रस कमी होणे, अशी लक्षणे जाणवू शकतात.

सामान्यतः काही आठवडे किंवा महिन्यांनंतर व्यक्ती हळूहळू वास्तव स्वीकारू लागते आणि दैनंदिन आयुष्याकडे परतते. मृत व्यक्तीची आठवण दुःखद आणि भावनिक असली तरी ती सतत मनावर वर्चस्व गाजवत नाही. ही अवस्था सामान्य शोक प्रक्रिया मानली जाते आणि ती मानसिक आजार समजली जात नाही. मात्र, मृत्यूनंतर सहा महिन्यांहून अधिक काळ एखाद्या व्यक्तीची सतत तीव्र आठवण येत राहणे किंवा त्या व्यक्तीबद्दलचे विचार मनातून न जाणे, याला प्रदीर्घ शोक विकार, असे म्हटले जाते. या अवस्थेत व्यक्तीला तीव्र दुःख, अपराधीपणा, राग, वास्तव नाकारण्याची भावना, स्वतःचा एक भाग हरवल्याची जाणीव, आनंद अनुभवता न येणे, भावनिक सुन्नपणा आणि सामाजिक जीवनापासून दूर राहण्याची इच्छा होते. याउलट, क्लिनिकल डिप्रेशन म्हणजेच नैराश्य हा एक मानसिक विकार आहे. त्यात किमान दोन आठवडे किंवा त्याहून अधिक काळ सतत उदासीनता, पूर्वी आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये रस न उरणे आणि सतत थकवा जाणवणे ही प्रमुख लक्षणे असतात. ही लक्षणे सलग किमान दोन आठवडे टिकून राहतात आणि संबंधित व्यक्तीचे आयुष्य पूर्णपणे विस्कळित करू शकतात.

तज्ज्ञांच्या मते, बहुतेक लोकांचे दु:ख कालांतराने नैसर्गिकरीत्या कमी होत जाते आणि त्यासाठी कोणत्याही उपचारांची गरज भासत नाही. कुटुंबीयांचा आधार, मित्र-परिवाराचे सहकार्य, सामाजिक पाठबळ, धार्मिक किंवा आध्यात्मिक आचरण व भावनिक आधार यामुळे अनेकांना दुःखातून सावरण्यास मदत होते. मात्र, एखाद्या व्यक्तीला तीव्र दु:ख झाल्यास मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत समुपदेशन, मानसोपचार आणि आवश्यकतेनुसार औषधोपचार दिले जाऊ शकतात. तसेच एखाद्याला नैराश्याचा विकार असल्यास त्यासाठी उपचार अत्यावश्यक असतात. योग्य वेळी निदान आणि उपचार मिळाल्यास संबंधित व्यक्तीचे मानसिक आरोग्य सुधारण्यास आणि दैनंदिन जीवन सुरळीत होण्यास मदत होते.