Can pomegranate help with heart failure: रोजच्या ताटात एक साधं डाळिंब थेट हृदयाच्या गंभीर आजारावर रामबाण उपाय ठरू शकतं, असा विचार कोणी केला असेल का? पण लंडनच्या ‘किंग्ज कॉलेज’मधील शास्त्रज्ञांनी डाळिंब खाल्ल्यानं होणाऱ्या फायद्यांचा शोध घेतला आहे. डाळिंब, अक्रोड यांसारख्या पदार्थांमधून शरीरात तयार होणारं ‘युरोलिथिन-ए’ (Urolithin-A) हे नैसर्गिक संयुग हृदयाची कार्यक्षमता चक्क ८०% सुधारू शकतं. ज्या प्रकारच्या ‘हार्ट-फेल्युअर’वर आधुनिक वैद्यकशास्त्रात आजही प्रभावी औषधं नाहीत, अशा लाखो रुग्णांसाठी हा शोध नवी आशा घेऊन आला आहे.
हा आजार नेमका काय? (HFpEF)
आपल्याला सर्वसाधारणपणे माहिती असलेला हृदयविकार म्हणजे हृदयाची रक्त पंप करण्याची ताकद कमी होणं. मात्र, या संशोधनात अशा आजारावर लक्ष केंद्रित केलं गेलं, ज्याला वैद्यकीय भाषेत ‘हार्ट फेल्युअर विथ प्रिजर्व्हड इजेक्शन फ्रॅक्शन’ (HFpEF) असं म्हणतात.
हार्ट फेल्युअरच्या एकूण प्रकरणांपैकी तब्बल ५०% रुग्ण याच प्रकारानं ग्रस्त असतात. या परिस्थितीत:
काही परिस्थितीत हृदयाचं शरीराला रक्तपुरवठा करण्याचं कार्य सुरळीतपणे चालू असतं; मात्र दोन ठोक्यांच्या दरम्यान त्यात पुरेशा प्रमाणात शिथिलता येत नाही. अशा स्थितीत हृदयाचे स्नायू ताठर आणि कडक बनलेले असतात, ज्यामुळे त्यात पुढील हृदयाचे योग्य प्रमाणात ठोके पडण्यासाठी पुरेसं रक्त भरलंच जात नाही. त्यामुळे रुग्णाला थोड्याशा हालचालीनंही तीव्र धाप लागणं, सतत थकवा जाणवणं आणि दैनंदिन कामं करणं अशक्य होणं अशा त्रासांना सामोरं जावं लागतं.
हा आजार प्रामुख्यानं वाढतं वय, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि मधुमेहामुळे उद्भवतो. पारंपरिक औषधं या समस्यांवर फारशी प्रभावी ठरत नसल्यानं डॉक्टरांना केवळ रुग्णाचं वजन आणि साखर नियंत्रित ठेवण्यावरच अवलंबून राहावं लागत होतं.
‘युरोलिथिन-ए’ कसं काम करतं?
डाळिंब, अक्रोड आणि काही विशिष्ट बेरीवर्गीय फळांमध्ये आढळणाऱ्या घटकांवर जेव्हा आपल्या पोटातील उपयुक्त जीवाणू (Gut Microbiome) प्रक्रिया करतात, तेव्हा शरीरात ‘युरोलिथिन-ए’ची निर्मिती होते. अलीकडच्या काळात पेशींमधील ऊर्जानिर्मिती केंद्र असलेल्या ‘मायटोकाँड्रिया’चं आरोग्य सुधारणं आणि दीर्घायुष्यासाठी या घटकाचा अभ्यास जगभर सुरू आहे.
किंग्ज कॉलेज लंडनच्या संशोधकांनी केलेल्या प्रयोगात असं दिसून आलं की, ‘युरोलिथिन-ए’ थेट ‘PKGIα’ नावाच्या एका विशिष्ट प्रथिनाला सक्रिय करतं. हे प्रथिन रक्तवाहिन्यांचं आरोग्य राखण्यात आणि हृदयाचे स्नायू शिथिल करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.
प्रयोगातील प्रमुख निष्कर्ष:
- ८०% पर्यंत सुधारणा: प्राण्यांवर केलेल्या प्रयोगात ‘युरोलिथिन-ए’ दिल्यानंतर त्यांच्या हृदयाची शिथिल होण्याची क्षमता आणि एकूण कार्यक्षमतेत ८० टक्क्यांपर्यंत उल्लेखनीय सुधारणा नोंदवली गेली.
- हृदयाचा आकार वाढण्यास प्रतिबंध: या घटकामुळे हृदयाच्या स्नायूंच्या पेशी अवाजवी फुगण्यापासून (Hypertrophy) रोखल्या गेल्या, ज्यामुळे पेशींचं मूळ कार्य टिकून राहिलं.
- फायब्रोसिसमध्ये घट: हृदयाच्या उतींवर येणारे घातक व्रण किंवा गाठी (Scarring/Fibrosis) कमी झाल्याचं स्पष्ट झालं.
- मानवी स्टेम सेल्सवर यशस्वी चाचणी: शास्त्रज्ञांनी मानवी स्टेम सेल्सपासून प्रयोगशाळेत हुबेहूब मानवी हृदयासारख्या उती तयार केल्या. या मानवी उतींवरही ‘युरोलिथिन-ए’चा असाच सकारात्मक परिणाम दिसून आला.
संशोधक आणि तज्ज्ञ काय म्हणतात?
या अभ्यासाचे प्रमुख संशोधक व किंग्ज कॉलेज लंडनचे कार्डिओव्हॅस्क्युलर सायंटिस्ट डॉ. जोसेफ बर्गोइन यांनी या संशोधनाचं महत्त्व स्पष्ट करताना सांगितलं,
“हार्ट फेल्युअरचा हा प्रकार उपचारांच्या दृष्टीनं वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांत आव्हानात्मक आजारांपैकी एक आहे. वाढतं वय, लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या वाढत्या प्रमाणामुळे अशा रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. आमच्या संशोधनानं उपचारासाठी एक पूर्णपणे नवा मार्ग (Therapeutic Target) शोधून काढला आहे. ‘युरोलिथिन-ए’ या मार्गाला सक्रिय करून हृदयाचा ताठरपणा कमी करू शकतं, ज्यामुळे या आजाराची तीव्रता घटते. भविष्यात रुग्णांचं जीवनमान सुधारण्यासाठी नवी औषधं विकसित करण्याच्या दृष्टीनं ही अत्यंत उत्साहवर्धक बाब आहे.”
आहारातून मिळणाऱ्या फायद्यांबद्दल स्पष्टीकरण देताना डॉ. बर्गोइन पुढे म्हणाले,
“केवळ डाळिंब खाल्ल्यानं हार्ट फेल्युअर पूर्णपणे बरं होईल, असा दावा करण्यासाठी सध्याचे पुरावे पुरेसे नाही. मात्र, शरीरात ‘युरोलिथिन-ए’चं प्रमाण वाढवणारा आहार या आजाराची लक्षणं आणि त्रास कमी करण्यास नक्कीच मदत करू शकतो, अशी नवी शक्यता या संशोधनातून निर्माण झाली आहे.”
या महत्त्वपूर्ण अभ्यासाला ‘ब्रिटिश हार्ट फाउंडेशन’ (BHF)नं निधी पुरवला आहे. या संस्थेचे संशोधन संचालक प्रा. जेम्स लेइपर यांनी याबाबत अधिक प्रकाश टाकताना सांगितलं,
“HFpEF हा आजार रुग्णाला अत्यंत दुर्बल आणि असहाय बनवू शकतो. प्रायोगिक मॉडेल्समधील या सुरुवातीच्या अभ्यासातून असं स्पष्ट होतं की ‘युरोलिथिन-ए’ हृदयाच्या उतींना शिथिल होण्यास आणि योग्य प्रकारे रक्त पुरवण्यास मदत करू शकतं. हा परिणाम सध्या प्राण्यांमध्ये आणि प्रयोगशाळेतील मानवी उतींवर दिसला असल्यानं, मानवी रुग्णांवर क्लिनिकल चाचण्या (Clinical Trials) केल्या जाणं आवश्यक आहे. तोपर्यंत भरपूर फळं आणि भाज्यांचा समावेश असलेला संतुलित आहार हेच आपल्या हृदयाची काळजी घेण्याचं सर्वोत्तम साधन आहे. परंतु, कोणत्याही एकाच फळावर अवलंबून राहून, संपूर्ण आजार टाळता येत नाही हे लक्षात ठेवणंही गरजेचं आहे.”
रुग्ण आणि आपल्या जीवनशैलीसाठी याचा काय फायदा होऊ शकतो?
अनेक प्रायोगिक औषधांच्या तुलनेत ‘युरोलिथिन-ए’ मानवी वापरासाठी आधीच सुरक्षित मानलं गेलं आहे. मात्र, याचा अर्थ लगेचच बाजारातून डाळिंबाचा रस पिऊन औषधं बंद करणं, असं मुळीच होत नाही. प्रत्येकाच्या आतड्यांमधील जीवाणूंची रचना वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाच्या शरीरात डाळिंब खाल्ल्यावर सारख्याच प्रमाणात ‘युरोलिथिन-ए’ तयार होईलच असं नाही. म्हणूनच या घटकावर आधारित योग्य प्रमाणातील औषध तयार करण्याचं काम भविष्यातील क्लिनिकल चाचण्यांवर अवलंबून असेल. तरीही हा शोध आपल्याला एका गोष्टीची पक्की जाणीव करून देतो. आपल्या रोजच्या जेवणातील डाळिंब, अक्रोड, सफरचंद, आणि जांभळासारखी रंगीबेरंगी फळं केवळ तोंड गोड करण्यासाठी नसून, आपल्या प्रत्येक हृदयाच्या ठोक्याला ऊर्जा आणि आराम देण्याची निसर्गदत्त ताकद त्यांच्यात दडलेली आहे.
