Can Memories Be Retrieved from a Dead Brain? मानवी आयुष्य हे अनेकदा संघर्षमय असतं. वाटेच्या प्रत्येक वळणार हृदयात घर करणारी माणसं भेटतात, त्याच प्रमाणे दुखावणारी माणसंही असतात. या ऊन- पावसाच्या खेळात जो शेवटपर्यंत साथ देतो, ज्याच्या सहवासात आपण खुलतो, हळवे होतो, कधी चिडतो, रागावतो …ती व्यक्ती प्रत्यक्ष समोर नसली तरी तीच असणं हाच आपल्यासाठी आधार असतो. त्यामुळेच तीच जाण कदाचित एखाद्या आघाताप्रमाणे असते आणि मागे राहतात त्या केवळ आठवणी….
या आठवणी कधी वस्तूच्या रूपाने जपल्या जातात, तर कधी अश्रूंच्या माध्यमातून. जे मागे राहिले आहेत त्यांना किमान त्यांच्या स्मृतीचा आधार असतो. परंतु, जे जग सोडून गेले आहेत, त्यांचं काय? …त्यांच्या आठवणींचं नेमकं काय होतं?

त्या मृत व्यक्तीच्या विचारांना, अनुभवांना आणि आयुष्यातील क्षणांना पुन्हा प्राप्त करता येत का? याचाच शोध संशोधकांनी घेतला आहे. काही आठवणी मृत्यूनंतरही जतन करता येतात, असे मत संशोधक व्यक्त करतात. परंतु ही प्रक्रिया जटिल आहे. त्यात काही महत्त्वाचे टप्पे पार पाडावे लागतात.

स्मरणशक्तीचे शास्त्र

स्मृती निर्माण होणे ही, मानवी मेंदूतील सर्वात गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामधील मेंदूतज्ज्ञ डॉन अरनॉल्ड यांनी ‘Live Science’ ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, न्यूरॉन्सच्या समूहांद्वारे आठवणी कोड केल्या जातात. हे न्यूरॉन्स म्हणजे अशा पेशी असतात, ज्या एखादा अनुभव घेताना किंवा एखादी गोष्ट, प्रसंग आठवत असताना सक्रिय होतात. विशेषतः, अल्पकालीन आणि दीर्घकालीन आठवणी हिप्पोकॅम्पस मध्ये निर्माण होतात, तर इतर संवेदनाक्षम तपशील पॅरिएटल लोब आणि सेन्सरी कॉर्टेक्ससारख्या विविध भागांमध्ये संग्रहित होतात.

जेव्हा न्यूरॉन्स एकत्र कार्यरत होतात, तेव्हा ते एंग्राम (Engram) नावाचा भौतिक ठसा तयार करतात, जो आठवणींचा जैविक साक्षीदार म्हणून काम करतो. या संकल्पनेचा प्राण्यांच्या अभ्यासामध्ये मोठ्या प्रमाणावर शोध घेण्यात आला आहे. संशोधकांनी उंदरांच्या मेंदूतील एंग्रामची यशस्वीरित्या ओळख पटवली आहे. उदाहरणार्थ, २०१२ साली ‘Nature’ मध्ये प्रकाशित झालेल्या एका शोध निबंधात भीतीशी संबंधित मेंदूच्या विशिष्ट पेशी ओळखण्यात आल्या होत्या. मात्र, डॉन अरनॉल्ड यांच्या मते, मानवी मेंदूच्या अत्यंत गुंतागुंतीच्या संरचनेमुळे, माणसांमध्ये अशा आठवणींचे ठसे ओळखणे खूप कठीण आहे.

आठवणी पुन्हा मिळवण्यातील अडथळे

मृत व्यक्तीच्या मेंदूतून आठवणी परत मिळवण्यासाठी शास्त्रज्ञांना सर्वप्रथम त्या आठवणींशी संबंधित विशिष्ट न्यूरॉन्सचा समूह शोधावा लागेल. यासाठी मेंदूमधील न्यूरॉन्सच्या गुंतागुंतीच्या जाळ्याचा सखोल अभ्यास करावा लागेल. कारण न्यूरॉन्स मेंदूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पसरलेले असू शकतात. आठवणी स्थिर नसल्यामुळे ही प्रक्रिया आणखी कठीण होते. आठवणी काळानुसार विकसित होतात आणि त्या मेंदूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरत राहतात, असे मत डॉन अरनॉल्ड व्यक्त करतात. प्रारंभी जे न्यूरॉन्स एखाद्या अनुभवाच्या वेळी सक्रिय झालेले असतात, ते एक एंग्राम तयार करतात, असे अरनॉल्ड यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, कालांतराने मेंदूमध्ये आठवणी स्थिर होत असताना त्या वेगवेगळ्या ठिकाणी पसरल्याचे पुरावे मिळाले आहेत. म्हणजेच, आठवणी एका ठिकाणी कायमस्वरूपी साठवलेल्या नसतात तर त्या प्रवाही असतात, त्यामुळे त्यांना परत मिळवणे अधिक कठीण ठरते.

एक दूरची स्वप्नपूर्ती

सध्या, मेंदूचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांकडे मानवी मेंदूचा संपूर्ण नकाशा नाही. त्यामुळे एखाद्या विशिष्ट आठवणीचे अचूक स्थान ओळखणे अशक्य आहे. पण, हे त्यांना जमले, तरीही आठवणी परत मिळवणे संगणकावरून एखादी फाईल उघडण्याइतके सोपे नाही. एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, आठवणी भूतकाळातील घटनांचे परिपूर्ण चित्रण नसतात. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया डेव्हिस मधील Memory and Plasticity कार्यक्रमाचे संचालक चरण रंगनाथ सांगतात, स्मरणशक्ती ही मुळात पुनर्रचनात्मक (reconstructive) असते. आठवणी या पुनर्रचनात्मक असतात, म्हणजे तुम्ही एखाद्या घटनेचे काही तुकडे आठवू शकता, पण संपूर्ण अनुभव जसाच्या तसा मिळत नाही,” असे रंगनाथ यांनी Live Science ला सांगितले.

याचा अर्थ असा की, शास्त्रज्ञांना जरी एखाद्या आठवणीशी संबंधित न्यूरॉन्स सापडले, तरीही त्या घटनेचा नेमका अनुभव जसाच्या तसा पुनर्रचित करता येणार नाही. उदाहरणार्थ, एखाद्या वाढदिवसाच्या पार्टीची आठवण घ्या. एखाद्या व्यक्तीला चॉकलेट केक खाल्ल्याचे आणि पकडापकडी खेळल्याचे आठवेल, पण सर्व पाहुणे कोण होते किंवा त्या दिवशी पाऊस पडला होता का, याची स्पष्ट आठवण असण्याची शक्यता कमी आहे. मेंदू अशा विसरलेल्या गोष्टी भरून काढतो आणि आधीच्या ज्ञानाच्या आधारे त्या घटनेचा एक छाप तयार करतो, पण संपूर्ण व अचूक अनुभव मात्र टिकून राहत नाही.

स्मरणशक्तीसी संबंधित संशोधनाचे भविष्य

तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली असली तरी, मृत व्यक्तीच्या मेंदूतून आठवणी परत मिळवू शकणारं मशीन लर्निंग मॉडेल तयार करणं अजूनही खूप दूरची गोष्ट आहे. चरण रंगनाथ यांच्या मते, अशी प्रणाली विकसित करायची असेल तर त्या व्यक्तीचा मेंदू आयुष्यभरात वेळोवेळी स्कॅन करावा लागेल, जेणेकरून आठवणींची नोंद राहील आणि त्यावरून स्मरणशक्तीची अचूक रचना उभी करता येईल.

मात्र ही कल्पना अशा गृहितकावर आधारलेली आहे की, आठवणी या जणू संगणकाच्या हार्ड ड्राइव्हवर जतन केलेल्या स्थिर फाईलींसारख्या असतात. पण आता या गृहितकावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण माणूस आपल्या आठवणींना अनेकदा वेगवेगळे अर्थ आणि दृष्टिकोन देतो आणि त्या प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचं अचूक प्रतिबिंब असतीलच असं नाही. रंगनाथ सांगतात, “आपण भूतकाळ जसाच्या तसा पुन्हा अनुभवत नाही, तर तो कसा असू शकला असता, याचीच कल्पना करतो.”

म्हणून सध्या तरी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यभराच्या आठवणी त्याच्यासोबतच कायमस्वरूपी बंद राहतात आणि त्याच्या निधनानंतर त्या नष्ट होतात. आठवणी परत मिळवण्याची कल्पना रोमहर्षक असली तरी मेंदूशास्त्राच्या दृष्टीने ती अद्याप खूप दूर आहे. आत्तापुरतं, एखाद्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी जपण्याचा खरा मार्ग म्हणजे त्यांनी मागे ठेवलेल्या कथा, छायाचित्रं आणि त्यांचा वारसा आहे.