Can Blood Test Detect Cancer Early : सतत थकवा जाणवत असल्यास किंवा अचानक वजन कमी झाल्यास आरोग्य तज्ज्ञांकडून रक्त तपासणीचा सल्ला दिला जातो. वैद्यकीय क्षेत्रात विविध आजारांचे निदान करण्यासाठी रक्ताची चाचणी हे एक अत्यंत प्रभावी साधन मानले जाते; पण एका साध्या रक्त चाचणीच्या मदतीने कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे निदान होऊ शकते का, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. त्याबाबत संशोधन काय सांगते? त्याविषयीचा हा आढावा…

रक्त चाचणी नेमकी कशी काम करते?

रक्ताची चाचणी ही ‘पॅथॉलॉजी’ या वैद्यकीय शाखेतील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. पॅथॉलॉजी म्हणजे आजारांचे स्वरूप आणि त्यामागील कारणांचा अभ्यास करणारे विज्ञान. रक्तामध्ये कोणत्या प्रकारच्या पेशी, प्रथिने आणि इतर रेणू उपस्थित आहेत, याचा अभ्यास रक्त तपासणीद्वारे केला जातो. या चाचणीच्या मदतीने डॉक्टर शरीरातील विविध गोष्टींचे निरीक्षण करू शकतात. त्यामध्ये शरीरातील जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता ओळखणे, शरीराची संसर्गाशी लढण्याची क्षमता तपासणे, शरीरात काही संसर्ग किंवा इन्फेक्शन असल्यास त्याची पुष्टी करणे, यकृत, मूत्रपिंड यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांचे कार्य व्यवस्थित सुरू आहे का, याची तपासणी करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. या माहितीच्या आधारे डॉक्टर रुग्णाच्या आरोग्याविषयीचा अधिक अचूक अंदाज लावू शकतात. गंभीर आजारांच्या निदानासाठी रक्ताची चाचणी हा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा ठरतो. त्याद्वारे पुढील उपचारांची दिशा निश्चित केली जाते.

रक्त चाचणीतून कॅन्सरचे निदान शक्य आहे?

वैद्यकीय क्षेत्रात प्रगती होत असली तरीही रक्त चाचणीद्वारे कर्करोग ओळखता येतो का, असा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे. सध्या केवळ रक्त तपासणीच्या आधारे बहुतेक प्रकारच्या कर्करोगचे अचूक निदान करणे शक्य नसल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, रक्तातील कर्करोगाच्या पेशी आणि शरीरातील निरोगी पेशी यांच्यातील फरक ओळखणे अनेकदा कठीण जाते. विशेषतः कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात हा फरक ओळखणे अधिक अवघड ठरते. तरीदेखील रक्त तपासणीच्या माध्यमातून डॉक्टरांना कर्करोगाचे काही संकेत मिळतात.

आणखी वाचा : उन्हाळ्याआधीच Kidney stone आणि UTI च्या रुग्ण संख्येत वाढ; लक्षणे काय आहेत? डॉक्टर काय सांगतात?

रक्त तपासणीतून कर्करोगाचे संकेत कसे मिळतात?

कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा छडा लावण्यासाठी डॉक्टर रक्ताच्या चाचण्यांचा वापर प्रामुख्याने दोन प्रकारे करतात. जरी या चाचण्या अंतिम निदान नसल्या तरीही त्या शरीरातील धोक्याचे संकेत देतात. रक्ताच्या संबंधित कर्करोगामध्ये सहसा शरीरातील पेशींच्या संख्येत मोठे बदल दिसून येतात. हे बदल कम्प्लीट ब्लड काउंट किंवा फुल ब्लड एक्झामिनेशन या तपासणीद्वारे मोजता येतात. त्यामध्ये प्रामुख्याने लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्सची गणना केली जाते. रक्ताचा कर्करोग झालेल्या रुग्णाच्या शरीरात विशिष्ट प्रकारच्या रक्तपेशी वाढण्यास सुरुवात होते. विशेषतः संसर्गाशी लढणाऱ्या शरीरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढल्यास रक्ताचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. मात्र, केवळ कम्प्लीट ब्लड काउंटच्या आधारे रक्ताचा कर्करोगाचे निश्चितपणे निदान करता येत नाही. त्यासाठी इतर तपासण्याही कराव्या लागतात. त्यामध्ये बायोप्सी किंवा एमआरआय, सीटी स्कॅन आणि एक्स-रे यांसारख्या इमेजिंग तपासण्यांचा समावेश असू शकतो.

ट्यूमर मार्कर्स पेशींचा शोध

कर्करोगाच्या पेशी अनेकदा शरीरात काही विशिष्ट प्रथिने मोठ्या प्रमाणावर तयार करतात. रक्त तपासणीद्वारे या प्रथिनांचा शोध घेता येतो आणि या प्रथिनांना ट्यूमर मार्कर्स, असे म्हटले जाते. उदाहरणार्थ पुरुषांमधील प्रोस्टेट म्हणजे पुरुषस्थ ग्रंथी शरीरात ‘प्रोस्टेट-स्पेसिफिक अँटीजेन’ नावाचे प्रथिन तयार करते. निरोगी व्यक्तीमध्ये याचे प्रमाण कमी असते; परंतु पुरुषस्थ ग्रंथीच्या कर्करोगाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये या प्रथिनाचे प्रमाण कमालीचे वाढलेले दिसते. वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगाचा शोध घेण्यासाठी अनेक प्रकारचे ट्यूमर मार्कर्स वापरले जातात. मात्र, तपासणीची ही पद्धत नेहमीच अचूक नसते. कारण- प्रोस्टेट ग्रंथीला झालेली दुखापत किंवा सूज यामुळेही ही पातळी वाढू शकते. त्यामुळे डॉक्टर केवळ या चाचणीवर अवलंबून न राहता, इतर चाचण्यांचाही आधार घेतात.

रक्तातील भटक्या पेशींचा शोध

कर्करोगाच्या निदानासाठी सध्या जगभरात मोठी संशोधने सुरू आहेत. त्यामध्ये रक्तातील ‘रोग्यू’ म्हणजेच भटक्या पेशींवर संशोधकांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. द कॉन्व्हर्सेशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून यातील काही महत्त्वाचे टप्पे समोर आले आहेत. कर्करोग शरीरात पसरू लागताच मुख्य ट्यूमरमधून काही पेशी वेगळ्या होऊन रक्तात मिसळतात. या पेशींना ‘सर्क्युलेटिंग ट्यूमर सेल्स’ असे म्हणतात. ही चाचणी सहसा निदानापेक्षा प्रोग्नोस्टिक म्हणून वापरली जाते. म्हणजेच आधीच निदान झालेल्या कर्करोगाची व्याप्ती किती वाढली आहे, हे पाहण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

हेही वाचा : Rajshri Deshpande Breast Cancer: लठ्ठपणा आणि रक्तातील साखर वाढल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो? लॅन्सेट संशोधनातील ‘या’ ६ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

एकाच रक्त चाचणीतून सर्व कर्करोगाचे निदान शक्य आहे का?

संशोधकांच्या मते, सध्या तरी केवळ एकाच रक्त तपासणीद्वारे कर्करोग निश्चितपणे शोधण्याची पद्धत उपलब्ध नाही. हे काम अत्यंत कठीण असले तरीही त्यासाठी सातत्याने संशोधन करण्यात येत आहे. सध्या ‘सर्क्युलेटिंग ट्यूमर डीएनए’ हा संशोधनाचा महत्त्वाचा विषय ठरला आहे. या डीएनएमध्ये अशा प्रकारचे म्युटेशन्स (जीन्समधील बदल) असतात, जे निरोगी पेशींमध्ये आढळत नाहीत. त्यामुळे या डीएनएमधून कर्करोगाबाबत महत्त्वाची माहिती मिळू शकते. ऑस्ट्रेलियातील एका संशोधनात ४४१ रुग्णांच्या रक्तातील ट्यूमर डीएनएवरून त्यांना केमोथेरपीचा किती फायदा होईल, हे तपासण्यात आले. त्याचप्रमाणे २०२५ मधील आणखी एका अभ्यासात फुप्फुसाचा कर्करोग असलेल्या ९४० रुग्णांवर विविध उपचारांचा परिणाम कसा होत आहे हे पाहण्यासाठी सर्क्युलेटिंग ट्यूमर डीएनएचा वापर करण्यात आला होता. २०२१ मध्ये ब्रिटनमध्ये सुरू झालेल्या या चाचणीने ५० हून अधिक प्रकारच्या कर्करोगाचा शोध लावण्याचा दावा केला होता. मात्र, तज्ज्ञांनी अद्याप यावर शंका उपस्थित केल्या आहेत.

Source : John (Eddie) La Marca, Senior Research Officer, Blood Cells and Blood Cancer, WEHI (Walter and Eliza Hall Institute of Medical Research) ; Cameron Lewis, Clinician Scientist, WEHI (Walter and Eliza Hall Institute of Medical Research) , and Sarah Diepstraten, Senior Research Officer, Blood Cells and Blood Cancer Division, WEHI (Walter and Eliza Hall Institute of Medical Research)