Can son-in-law claim father-in-law’s property : आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीत मुलांइतकाच मुलींचाही समान हक्क असतो. ‘हिंदू वारसा हक्क (दुरुस्ती) कायदा २००५’ मध्ये त्या संदर्भातील नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. एखाद्या व्यक्तीला जर वडिलोपार्जित संपत्तीपासून दूर ठेवले जात असेल तर तो न्यायालयात धाव घेऊन आपल्या हक्काबाबत दावा करू शकतो; पण आई-वडिलांच्या संपत्तीत जसा मुलींना अधिकार असतो तसाच हक्क त्यांचा जावईही सांगू शकतो का? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातो. त्याविषयीचा हा आढावा…

वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय?

साधारणत: संपत्ती दोन प्रकारची असते. एक म्हणजे स्वत: कमावलेली आणि दुसरी वडिलोपार्जित. कोणत्याही व्यक्तीला आपल्या वडिलांकडून, आजोबांकडून किंवा पणजोबांकडून जी संपत्ती प्राप्त होते, त्याला वडिलोपार्जित संपत्ती असे म्हटले जाते. जन्मानंतर त्या व्यक्तीचा वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क स्थापित होतो. एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबात जर तीन मुले असतील, तर पहिली वाटणी त्यांच्यामध्ये समान केली जाईल. तिसऱ्या पिढीच्या मुलांना म्हणजेच त्या व्यक्तींची नातवंडांना ती संपती आपापल्या वडिलांच्या हिश्शातून मिळते. वडील स्वतःच्या इच्छेने ही संपत्ती कोणत्याही एकाच्या नावावर करू शकत नाही. त्याशिवाय कोणताही एक वारस संपूर्ण वडिलोपार्जित संपत्ती इतर वारसांच्या संमतीशिवाय विकू शकत नाही. मुस्लीम समाजात संपत्तीच्या वाटणीची हीच पद्धत थोडीशी वेगळी आहे. जोपर्यंत पहिल्या पिढीतील अंतिम व्यक्ती जिवंत असते, तोपर्यंत त्याच्या संपत्तीची वाटणी तिसऱ्या पिढीत केली जात नसल्याचे एका मुस्लीम व्यक्तीने सांगितले.

वडिलांच्या ‘या’ संपत्तीवर मुलाचा हक्क नाही

एखादी मालमत्ता वडिलांनी स्वतःच्या पैशांनी विकत घेतली असल्यास ती वडिलोपार्जित ठरत नाही, त्यामुळे अशा मालमत्तेवर मुले हक्क सांगू शकत नसल्याची बाब कायद्यात नमूद केलेली आहे. आई-वडिलांची इच्छा नसल्यास त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या घरात मुलगा आणि सुनेला राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा नुकताच ओडिसा उच्च न्यायालयाने दिला. या प्रकरणातील याचिका फेटाळून लावताना मुलाला घराबाहेर काढण्याचा आईचा निर्णय न्यायालयाने योग्य ठरवला. ओडिशातील भुवनेश्वर येथे राहणाऱ्या ७५ वर्षीय वृद्ध महिलेने तिच्या मुलासह सुनेवर शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप केला होता. काबाडकष्ट करून बांधलेल्या घरात मुलगा आणि सून आपल्याला सुखाने राहू देत नसल्याची याचिका न्यायालयात दाखल केली होती. सदरील मालमत्ता आपण स्वतःच्या पैशांनी विकत घेतली असल्याने ती वडिलोपार्जित ठरत नाही, त्यामुळे मुलाचा या मालत्तेवर अधिकार सांगायचा कोणताही हक्क नसल्याचे महिलेने याचिकेत म्हटले होते. न्यायालयीन सुनावणीवेळी या महिलेने मालमत्ता आपल्या नावावर असल्याची कागदपत्रेही सादर केली होती.

आणखी वाचा : आईच्या मालमत्तेवर मुलगा हक्क सांगू शकतो का? कायदा काय सांगतो? उच्च न्यायालयाचा निर्णय काय?

वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा किती हक्क?

वडिलांच्या संपत्तीचा खरा वारसदार मुलगाच असतो असा समज आजही अनेकांमध्ये आहे. हिंदू कुटुंबांमध्ये मुलगा हाच घराचा कर्ता मानला जात असल्यामुळे २००५ पूर्वी कायदाही तसाच होता; पण त्यानंतर कायद्यात बदल करण्यात आला आणि वडिलांच्या संपत्तीवर मुलांइतकाच मुलींनाही अधिकार देण्यात आला आहे. मुलगी विवाहित असली तरीही तिचा वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीवरील हक्क कायम राहतो. ‘हिंदू वारसा हक्क (दुरुस्ती) कायदा २००५’ मध्ये तशी बाब नमूद करण्यात आली आहे. मात्र, वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी २० डिसेंबर २००४ पूर्वी झाली असेल तर त्यावर मुलीचा हक्क मानला जात नाही, कारण या प्रकरणात संपत्ती वाटपात जुने नियम लागू होतात आणि नव्याने वाटणी करता येत नाही. हा कायदा हिंदूंसह बौद्ध, जैन आणि शीख समाजाला लागू करण्यात आला आहे.

सासऱ्यांच्या मालमत्तेवर जावयाचा किती हक्क?

सासरे आणि जावई यांच्यातील नातेसंबंध सामान्यतः वडील-मुलाचे नाते म्हणून पाहिले जाते, त्यामुळे जावई आपल्या सासरच्या मालमत्तेचा वारसा मिळवू शकतो का असा प्रश्न आजही अनेकांकडून उपस्थित केला जातो. हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार, सासू किंवा सासऱ्यांच्या संपत्तीवर जावयाचा कोणताही कायदेशीर हक्क नसतो. जर सासू किंवा सासऱ्यांनी स्वतःच्या कष्टाने किंवा पैशाने मालमत्ता खरेदी केली असल्यास ती कोणाच्या नावावर करायची याचा संपूर्ण अधिकार त्यांचाच असतो. जावई त्याच्या सासऱ्यांच्या मालमत्तेवर तेव्हाच हक्क सांगू शकतो, जेव्हा त्याच्या पत्नीला तिच्या वडिलांकडून मालमत्ता वारसा हक्काने मिळाली असेल. पत्नीच्या संमतीशिवाय किंवा सासू-सासऱ्यांच्या इच्छेशिवाय जावई त्या संपत्तीवर हक्क सांगू शकत नाही. जर सासू किंवा सासऱ्यांनी स्वतःच्या इच्छेने मृत्युपत्र करून जावयाला काही हिस्सा दिला असेल तरच त्याला ती संपत्ती कायदेशीररित्या मिळू शकते.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्यामुळे पाकिस्तानात खळबळ का उडाली? कारण काय?

सासू-सासरे यांच्या मालमत्तेवर सुनेचा किती अधिकार?

आई-वडिलांच्या मालमत्तेत मुलाचा अधिकार असतो अशी बाब कायद्यात नमूद करण्यात आली आहे. परंतु, एखाद्या प्रकरणात जर मुलाचे निधन झाले तर त्याची पत्नी संपत्तीवर अधिकार करू शकते का? असाही प्रश्न काहीजण विचारतात. खरेतर पतीच्या वडिलोपार्जित संपत्तीवर पत्नीचा पहिला अधिकार मानला जातो. कायद्यानुसार एखाद्या कुटुंबात वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर सून त्या संपत्तीवर दावा करू शकते. मात्र, सासू आणि सासऱ्यांनी स्वत:च्या पैशांमधून मालमत्ता खरेदी केली असेल तर त्यावर सून कोणताही अधिकार सांगू शकत नाही. सासू आणि सासरे हे त्यांची कमावलेली मालमत्ता कुटुंबातील कोणत्याही सदस्याला मृत्युपत्राद्वारे देऊ शकतात. अशा मालमत्तेवर सुनेला कायदेशीर हक्क सांगता येत नाही.