बांगलादेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी’(बीएनपी) या पक्षाने मोठा विजय मिळवला. ‘जमात-ए-इस्लामी’ या धर्मवादी पक्षाला नाकारताना बांगलादेशी नागरिकांनी बीएनपीच्या सुधारणावादी धोरणांच्या बाजूने कौल दिला. तब्बल दोन दशकांनंतर बांगलादेशात बीएनपीचे सरकार स्थापन होणार असून, या पक्षाचे मुख्य नेते तारिक रहमान यांच्या पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. बीएनपीच्या या मोठ्या विजयामुळे देशातील अल्पसंख्याक हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर तारिक रहमान यांचा विजय बांगलादेशातील हिंदूंसाठी दिलासादायक ठरेल का, असा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्याविषयीचा हा आढावा…
पंतप्रधान मोदींकडून रहमान यांचे अभिनंदन
बांगलादेशातील संसदीय निवडणुकीत बीएनपीने २९९ पैकी २०० हून अधिक जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. ‘जमात-ए-इस्लामी’ या धर्मवादी पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीला केवळ ७० जागांवरच समाधान मानावे लागले. त्याशिवाय इतर १० जागा छोटेखानी पक्षांनी आपल्या पदरात पाडून घेतल्या. या अभूतपूर्व विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारिक रहमान यांचे अभिनंदन केले. बांगलादेशातील संसदीय निवडणुकीत बीएनपीला निर्णायक विजय मिळवून दिल्याबद्दल मी तारिक रहमान यांचे हार्दिक अभिनंदन करतो. बांगलादेशच्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा राहील. इतिहास आणि संस्कृतीने जोडलेल्या दोन शेजारी देशांमधील शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी भारताची बांधिलकी कायम आहे, असे मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशात झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून भारतात पलायन करावे लागले होते. त्यानंतर बांगलादेशने हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केल्यानंतर भारताने त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. दरम्यानच्या काळात बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समाजावरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. त्याचे पडसाद भारतातही उमटल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध आणखीनच ताणले गेले. बीएनपीच्या विजयामुळे दोन शेजाऱ्यांमधील संबंध पुन्हा रुळावर येतील, अशी आशा निर्माण झाली आहे.
आणखी वाचा : बांगलादेशच्या निवडणुकीत विजय मिळवणारे हिंदू उमेदवार कोण? त्यांनी कोणाचा पराभव केला?
बांगलादेशातील हिंदू भीतीच्या छायेत
अलीकडच्या वर्षांत बांगलादेशातील हिंदू समुदायाला लक्ष्य करणाऱ्या अनेक घटना घडल्यामुळे तेथील अल्पसंख्याक भीतीच्या छायेत जगत आहेत. शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर देशात जातीय हिंसाचाराच्या २,००० हून अधिक घटना नोंदवल्या गेल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. त्यामध्ये हत्या, सामूहिक बलात्कार, धार्मिक स्थळांची तोडफोड, लूटमार व जाळपोळ अशा घटनांचा समावेश आहे. अल्पसंख्याक समुदायांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिल’ या संघटनेने मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारवर हिंसाचाराच्या घटनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. निवडणूक काळातही देशातील अल्पसंख्याकांवरील हल्ले सुरूच होते. मतदानाच्या आदल्या दिवशी ईशान्य बांगलादेशातील कमलगंज तालुक्यात एका हिंदू तरुणाचा मृतदेह आढळून आला. हातपाय दोरीने बांधून त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्या आठवड्यात हिंदूची हत्या झाल्याची ही दुसरी घटना होती.
हिंसाचाराला नेमकी कशाची फूस?
१८ डिसेंबर २०२५ रोजी इस्लामी नेता शरीफ उस्मान हादी याच्या हत्येनंतर बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांमध्ये आणखीनच वाढ झाली. त्याच्या मृत्यूनंतर काही तासांतच उत्तर बांगलादेशातील मयमनसिंग भागात एका २७ वर्षीय हिंदू तरुणाची जमावाने निर्घृणपणे हत्या केली आणि त्याचा मृतदेह जाळून टाकला. या थरारक घटनेचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर देशातील हिंदू समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ‘जमात-ए-इस्लामी’ या धर्मवादी पक्षाचे पुनरागमन झाल्यानंतर बांगलादेशातील अल्पसंख्यांकावरील हल्ले वाढल्याचे सांगितले जाते. हिंसाचारात सामील असलेल्या व्यक्तींना कायद्याच्या कक्षेत आणले जात नाही. त्यांना कठोरात कठोर शिक्षा होत नसल्याने हिंदूंवरील हल्ल्यांना अधिकच खतपाणी मिळत असल्याचे मत तेथील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
तारिक रहमान हिंदूंचे संरक्षण करू शकतील का?
बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तारिक रहमान यांच्यासमोर अनेक आव्हाने असतील. त्यापैकी सर्वांत मोठे आव्हान देशातील अल्पसंख्याक समुदायांचे संरक्षण करणे हे असेल. मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या काळात हिंदूंवर झालेल्या हल्ल्यांमुळे भारत व बांगलादेशातील संबंधात कटूता आली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी रहमान यांना आपल्या देशातील हिंदू समुदायाची भीती दूर करावी लागेल. ढाका येथील एका जाहीर सभेत रहमान म्हणाले की, आपल्या देशात विविध समुदाय आणि जाती-धर्मांचे लोक राहतात. त्यांचे संरक्षण करण्यासाठीच आम्हाला नवीन बांगलादेश घडवायचा आहे. यादरम्यान त्यांनी दीपू चंद्र दास या हिंदू तरुणाच्या हत्येचाही तीव्र निषेध केला. कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखली गेलीच पाहिजे. चिथावणीला बळी न पडता, सर्वांनी शांत राहणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले.
हेही वाचा : बांगलादेशात नव्या पर्वाची सुरुवात; चीन-पाकिस्तानसाठी आनंदाची बातमी की धोक्याची घंटा?
हिंदूंनी देश सोडू नये- बीएनपीच्या खासदाराचे आवाहन
किशोरगंज-४ मतदारसंघातून विजयी झालेले बीएनपीचे उमेदवार व स्वातंत्र्यसैनिक फजलूर रहमान यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हिंदूंना बांगलादेश न सोडण्याचे आवाहन केले होते. तुमचा स्वतःचा देश सोडून जाण्याचा विचार कधीही करू नका. मी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहिलो आहे आणि यापुढेही राहीन. मी एक स्वातंत्र्यसैनिक असून, आम्ही पाकिस्तानच्या तावडीतून देशाला मुक्त केले आहे. बांगलादेशचा एक हात हिंदू आणि दुसरा हात मुस्लीम आहे. त्यामुळे एक हात तुटला, तर दुसऱ्याचेही अस्तित्व धोक्यात येईल, असे फजलूर रहमान म्हणाले होते.
लोकशाही आणि कायद्याचे राज्य हवे : गयेश्वर चंद्र रॉय
बीएनपीचे उमेदवार गयेश्वर चंद्र रॉय यांनी ढाका मतदारसंघातून निवडणुकीत विजय मिळवला. या विजयानंतर ‘द वायर’शी संवाद साधताना त्यांनी देशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांवर भाष्य केले. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवायचे असतील, तर लोकशाही आणि कायद्याचे राज्य आवश्यक आहे. लोकशाही प्रक्रियेशिवाय कुणालाही हक्क मिळू शकत नाही, असे ते म्हणाले. राजकीय विश्लेषकांच्या मते, तब्बल दोन दशकांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बांगलादेशात बीएनपी सत्ता स्थापन करणार आहे. याआधी २००१ ते २००६ या कालावधीत देशात बीएनपीची सत्ता असताना हिंदूंवरील हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली होती. त्यावेळी ‘जमात-ए-इस्लामी’ हा धर्मवादी पक्षही त्यांच्याबरोबर सत्तेत होता. यंदा मात्र मतदारांनी बीएनपीला एकहाती कौल दिल्याने अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांना लगाम लागेल, अशी आशा अनेकांना आहे.

