Tiger poop reveal stress levels: माणसांच्या सततच्या वावराचा वन्यजीवांवर नेमका काय परिणाम होतो, हा भारतातील व्याघ्र प्रकल्पांसमोरील मोठा पेच आहे. एकीकडे पर्यटनामुळे महसूल, स्थानिक रोजगार आणि संवर्धनाला राजकीय बळ मिळते; मात्र दुसरीकडे सफारी गाड्यांचा गोंधळ, धूर आणि मानवी लुडबुड जंगलाच्या नैसर्गिक शांततेत थेट व्यत्यय आणते. त्यामुळे पर्यटनाचे अर्थकारण आणि वन्यजीवांचे स्वातंत्र्य यांच्या नाजूक समतोलावर आज आपले व्याघ्र प्रकल्प उभे आहेत

CCMB चा अभ्यास आणि त्यांचे निष्कर्ष:

‘सेंटर फॉर सेक्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी’च्या संशोधकांनी ॲनिमल कन्झर्व्हेशन (Animal Conservation) या नियतकालिकात नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासात याच प्रश्नाचा वेध घेतला आहे. भारतातील पाच व्याघ्र प्रकल्पांमधून जमा केलेल्या वाघांच्या विष्ठेचे non-invasive hormone analysis करून संशोधकांनी मानवी हालचाली वाढलेले ‘फिकल ग्लुकोकोर्टिकॉइड मेटाबोलाइट्स’ आणि संभाव्य प्रजननस्थळांचे भौगोलिक वितरण यांच्यातील परस्परसंबंध नोंदविले आहेत.

अभ्यासातून आलेले निष्कर्ष :

  • पर्यटन आणि मानवी व्यत्ययाचा वाघांच्या शारीरिक प्रक्रियांवर परिणाम होऊ शकतो.
  • प्रजनन करणाऱ्या वाघिणींचा प्राधान्याने मानवी व्यत्यय कमी असलेल्या भागांचा वापर करण्यावर भर असतो.

पर्यटनामुळे वाघिणीच्या प्रजनन प्रक्रियेत अडथळे येत असतील किंवा ती पिल्लांना जेथे जन्म देणार आहे किंवा देतेय यांवर परिणाम होत असेल, तर त्याचा थेट संबंध व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाशी येतो. पर्यटकांची संख्या, पर्यटनाचा मार्ग आणि त्याची धोरणे, या गोष्टी आता वन्यजीवांना माणसांच्या वावरामुळे किती आणि कसा त्रास होतो याचा अभ्यास करून ठरवला जात आहे. त्यामुळे गोळा केलेली माहिती (dataset) प्रत्यक्षात काय सिद्ध करते आणि त्याचा काय अर्थ काढला जावा, यातील फरक समजून घेणं गरजेचं आहे.

व्यवस्थापनात काय बदल घडणार?

CCMB चे संशोधन हे संवर्धन जीवशास्त्रातील एका मोठ्या बदलाचे प्रतीक आहे. या अभ्यासातून व्यवस्थापनात काय बदल होणार आहेत ते जाणून घेऊया…

  • आधीच्या अभ्यास पद्धतीत प्रत्यक्ष वन्यजीवांना पकडून, त्यांच्यावर अभ्यास गेला जात असे. मात्र, आता केवळ वन्यजीवांच्या विष्ठा, केस, पिसे किंवा मलाच्या नमुन्यांवरून त्यांच्या शरीरातील बदलांचा (संप्रेरकांचा/Hormones) अभ्यास करता येणार आहे.
  • वन्यक्षेत्रात माणसांच्या वावरामुळे वन्यजीवांच्या संप्रेरकांवर येणार ताण, प्रजनन प्रक्रियेमध्ये येणारा व्यत्यय किंवा आजारपणावर काय परिणाम होतात याची चाचणी केली जाऊ शकते.
  • नवीन तंत्रज्ञानामुळे माहिती गोळा करणं सोपं झालं आहे; पण या मिळालेल्या आकडेवारीचा नक्की काय अर्थ काढायचा? हे खरं आव्हान आहे.
  • हे नवीन संशोधन केवळ व्याघ्र प्रकल्पापुरतं मर्यादित न राहता, आता या नवीन संशोधनामुळे इतर वन्यजीवांचा अभ्यास करणं सुकर झालं आहे.
वाघांच्या अभ्यासात बदलतेय संशोधनाची दिशा—थेट वाघावर प्रयोग करण्याऐवजी त्याच्या विष्ठेतील संप्रेरकांचा अभ्यास करून ताणतणाव आणि आरोग्याचा वेध.

ताणतणावाचे वातावरण म्हणजे नेहमीच धोका असतो का?

‘ताण’ किंवा ‘स्ट्रेस’ ही संज्ञा जीवशास्त्राच्या पलीकडे रोजच्या व्यावहारिक भाषेत अगदी ढोबळपणे वापरली जाते. वाढलेला ताण म्हणजे कामाचा स्ट्रेस व त्यामुळे आरोग्यावर होणारा परिणाम, संथ झालेली कार्यक्षमता आणि शेवटी या सगळ्या ‘स्ट्रेस’चा विपरीत परिणाम शरीरावर होत असतो. मात्र, शरीरशास्त्रानुसार ‘स्ट्रेस’चा अर्थ थोडा गुंतागुंतीचा आहे.

ग्लुकोकोर्टिकॉइड्स हे संप्रेरक मूत्रपिंडाच्या (किडनीच्या)वर असणाऱ्या ॲड्रेनल ग्रंथीच्या (Adrenal Gland) बाहेरील थरामधून (Cortex) रक्तात स्रवले जाते. या संप्रेरकाचं वन्यजीवांमध्ये काय महत्त्व आहे ते जाणून घेऊया:

  • हे संप्रेरक केवळ ताण किंवा धोक्याचा इशारा देण्याचं काम करीत नाहीत, तर शरीरातील ऊर्जा, पचनक्रिया आणि रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित करण्याचं काम करते.
  • ॲलोस्टॅसिस’ या संकल्पनेनुसार, आजूबाजूच्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी शरीरात ही संप्रेरके काही काळासाठी वाढणं ही एक अगदी सामान्य आणि नैसर्गिक क्रिया आहे.
  • शरीरात ग्लुकोकोर्टिकॉइड्सचे प्रमाण वाढले म्हणजे प्राण्याला प्रचंड त्रास होतोय, त्याचे आरोग्य धोक्यात आले आहे किंवा त्यामुळे प्राण्यांची संख्या घटत आहे, असा थेट निष्कर्ष काढता येत नाही.
  • ऋतूंमध्ये बदल, अन्नाची उपलब्धता, प्रजननाचा काळ किंवा इतर प्राण्यांशी होणारी स्पर्धा अशा अनेक दैनंदिन कारणांमुळेही ही पातळी बदलू शकते.
  • केवळ संप्रेरकांची पातळी पाहून वन्यजीवांची सुरक्षा किंवा संवर्धन यांबद्दल थेट कोणताही निष्कर्ष काढू नये, असा इशारा वैज्ञानिक देतात.

संशोधनाचं महत्त्व आणि विश्वासार्हता :

या संशोधनात मर्यादा आढळल्या असल्या तरी त्यामुळे अभ्यासाचं महत्त्व कमी होत नाही. या संशोधन करताना वन्यजीवांना इजा न पोहोचवता, त्यांच्या अधिक सखोल अभ्यासातून विश्वासार्ह माहिती गोळा केली गेली आहे. मानवी वावर जास्त असलेल्या भागात ताणतणावाची संप्रेरके जास्त आढळली असली तरी त्याला केवळ पर्यटनच कारणीभूत आहे, असा थेट निष्कर्ष काढता येणार नाही.

  • वाघांच्या शरीरातील संप्रेरकांची पातळी ही शिकार मिळवणं, स्वतःच्या हद्दीसाठी इतर वाघांशी होणारी स्पर्धा, प्रजननाचा काळ आणि हवामान यांवरही अवलंबून असते.
  • या अभ्यासात वाघांच्या प्रत्यक्ष हालचालींचा (GPS ट्रॅकिंग) किंवा शिकारीच्या अचूक प्रमाणाचा डेटा उपलब्ध नव्हता. त्यामुळे संप्रेरकांमधील बदलांमागे इतरही नैसर्गिक कारणं असू शकतात, हे अभ्यासकांनी स्वतः नमूद केलं आहे.
  • ही माहिती भौगोलिकदृष्ट्या वाघ कुठे आणि कसा प्रतिसाद देतात हे दाखविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे; पण केवळ यावरून शरीरातील अंतर्गत जैविक प्रक्रिया नेमकी कशी घडते, हे निश्चित करण्यासाठी अजूनही सखोल पुराव्यांची गरज आहे.

संप्रेरकांवरून प्रजननाचे निर्णय ओळखता येतात का?

वाघीण आपल्या पिलांना जन्म देण्यासाठी मानवी व्यत्यय कमी असलेल्या परिसराला प्राधान्य देऊ शकते. प्रजननाची स्थिती दर्शवणारं संप्रेरक म्हणजे फिकल प्रोजेस्टेरॉन मेटाबोलाइट्स, याची पातळी त्याच परिसरात जास्त आढळली, जिथे ग्लुकोकोर्टिकॉइड्सची पातळी तुलनेने कमी होती. अनेक प्राणी प्रजननाच्या काळात व्यत्यय टाळण्याचा प्रयत्न करीत असतात. पण, वाघीण मुद्दामहून कमी व्यत्यय असलेल्या जागांची निवड करत असते हे सिद्ध करण्यासाठी संप्रेरकांच्या प्रमाणापेक्षा इतर अनेक ठोस पुराव्यांची गरज आहे. संप्रेरकं केवळ शारीरिक स्थिती दर्शवू शकतात; ती थेट वर्तनात्मक निर्णय दर्शवीत नाहीत.

वाघांचा अभ्यास करताना काही मर्यादा येतात ज्या पूर्णपणे काढून टाकणं अशक्य आहे:

  • वाघ ज्या पायवाटांवरून फिरतात, नेमके तेच रस्ते पर्यटनाच्या गाड्यांसाठीही वापरले जातात. त्यामुळे नमुने गोळा करण्याची जागा आणि मानवी वावर या दोन्ही गोष्टी आपोआप एकाच ठिकाणी एकत्र येतात.
  • वाघांची जनुकीय (Genetic) तपासणी न केली गेल्यामुळे एकाच वाघाची विष्ठा नकळत वारंवार गोळा झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • ही पद्धत चुकीची नसली तरी मानवी वावरामुळेच ताण वाढला, असा थेट भौगोलिक निष्कर्ष काढताना या मर्यादा लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

विज्ञान आणि संवर्धन धोरण:

या अभ्यासाचे परिणाम केवळ भारताच्या व्याघ्र प्रकल्पांपुरते मर्यादित नाहीत. विविध प्रजातींमध्ये, वन्यजीव पर्यटनाचा संबंध प्राण्यांचं विस्थापित होणं, हालचाली बदलणं, मानवाची सवय होणं किंवा काही बाबतीत नगण्य परिणाम होण्याशी जोडला गेला आहे. निर्णय घेणाऱ्या व्यवस्थापकांना परिपूर्ण माहिती मिळेपर्यंत थांबण्याची सवलत नसते. तरीही शारीरिक संबंध दर्शविणारा पुरावा आणि परिसंस्थेवरील प्रत्यक्ष परिणाम दर्शविणारा पुरावा यांमध्ये स्पष्ट फरक असतो. पर्यटनाची विभागणी, पर्यटकांच्या मर्यादा आणि सुरक्षित क्षेत्रांचं नियोजन यांवर धोरणात्मक निर्णय घेताना या निष्कर्षांचा विचार केला जातो.

हा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे कारण- तो एका नवीन संशोधनाचा मार्ग मोकळा करतो. भविष्यात संप्रेरकांच्या अभ्यासासोबत जीपीएस ट्रॅकर, वर्तनाचं निरीक्षण, भक्ष्यांची संख्या आणि प्रजननाचं दीर्घकालीन निरीक्षण एकत्र केल्यास पर्यटनाचा वाघांवर होणारा परिणाम अधिक अचूकपणे समजेल.