Can White Hair Turn Black Naturally Dermatologist Guide : अलीकडच्या काळात केस पांढरे होण्याची समस्या अनेकांमध्ये दिसून येत आहे. केसांच्या रंगात लवकर होणाऱ्या या बदलामुळे बहुतांश लोकांना नैराश्याचा सामना करावा लागत आहे. साधारणपणे वय वाढल्यानंतर केस पांढरे होण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुरू होते; पण सध्या तरुण वयातच ही समस्या वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यादरम्यान काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्याने किंवा पेये घेतल्याने पांढरे केस पुन्हा नैसर्गिकरित्या काळे होऊ शकतात, असा दावा समाजमाध्यमांवर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कमी वयातच केस पिकण्याची कारणे कोणती? एकदा पांढरे झालेले केस पुन्हा काळे होऊ शकतात का? याबाबत आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात? त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…

केस हे अनेकांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि ओळखीचा महत्त्वाचा भाग असल्याने त्यांच्या रंगात झालेला बदल सहजपणे लक्षात येतो. तरुण वयात केस पांढरे होण्यामागे अनेक जैविक आणि वैद्यकीय घटक कारणीभूत असतात. कुटुंबात आधी कोणाला ही समस्या असल्यास पुढील पिढीमध्ये ती दिसून येण्याची शक्यता जास्त असते. त्याशिवाय शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे न मिळाल्याने त्याचा केसांच्या रंगावर परिणाम होतो, असे ‘International Journal of Dermatology’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका नवीन अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तरुण वयात केस पांढरे झाल्यास ते पुन्हा काळे करण्यासाठी समाजमाध्यमांवरील उपायांवर अवलंबून न राहता त्यामागील संभाव्य कारणांचा आढावा घेणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

केसांचा रंग पांढरा का होतो?

तज्ज्ञांच्या मते, केसांच्या रंगासाठी मेलानिन नावाचे रंगद्रव्य महत्त्वाची भूमिका बजावते. केसांमध्ये मेलानिनचे प्रमाण कमी झाल्यास त्यांचा रंग फिका होत जातो आणि अखेरीस ते पांढरे किंवा करडे दिसू लागतात. हे रंगद्रव्य तयार करणाऱ्या मेलानोसाइट्स पेशींचे प्रमाण आणि कार्य टाळूच्या आरोग्यासह विविध घटकांवर अवलंबून असते. जसजसे वय वाढत जाते, तसतसे शरीरातील मेलोनिनचे प्रमाण नैसर्गिकरित्या कमी होते. त्यामुळे वाढत्या वयात केस पांढरे होणे ही शरीरातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र, अकाली आणि मोठ्या प्रमाणावर केस पांढरे होण्यामागे प्रामुख्याने अनुवंशिक कारणे असू शकतात. अशा परिस्थितीत केसांचा पांढरेपणा झाकण्यासाठी बाह्य हेअर कलरचा वापर केला जाऊ शकतो. पण, कोणता हेअर कलर वापरायचा हे केसांचा प्रकार आणि संबंधित उत्पादनातील घटक लक्षात घेऊन ठरवणे आवश्यक आहे.

केस पांढरे होण्याची कारणे कोणती?

‘International Journal of Dermatology’ या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, जैविक, पर्यावरणीय आणि वैद्यकीय कारणांमुळे अनेकांचे केस पांढरे होऊ शकतात. सततच्या वायुप्रदूषणामुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढू शकतो आणि त्याचा केसांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. याशिवाय धूम्रपान, पोषणाची कमतरता आणि काही स्वयंप्रतिकार विकारांमुळेही केस पांढरे होण्याची शक्यता असते. मात्र, पांढरे झालेले केस पुन्हा पूर्ववत काळे करण्यासाठी उपलब्ध उपचार मर्यादित आहेत. कुटुंबात कोणाचे केस लवकर पांढरे झाले असल्यास, मेलॅनोसाइट पेशींची कार्यक्षमता कमी होण्याचा हा गुणधर्म आनुवंशिकतेने पुढील पिढीत येऊ शकतो. शरीरात व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन डी, फोलेट, लोह आणि तांबे यांची कमतरता असल्यास केस पांढरे होऊ शकतात. ‘हायपोथायरॉईडीझम’ किंवा ‘हायपरथायरॉईडीझम’ यांसारख्या थायरॉईड विकारांमुळे केसांच्या रंगात बदल होऊ शकतो. त्याशिवाय अतिधूम्रपानामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचत नाही, ज्यामुळे केसांमधील पांढरेपणा वाढतो.

पांढरे केस पुन्हा काळे होऊ शकतात का?

सर्वसाधारणपणे एकदा पांढरे झालेले केस पुन्हा नैसर्गिकरित्या काळे होणे शक्य नसते. मात्र, केस पांढरे होण्यामागे एखादी सुधारता येण्यासारखी वैद्यकीय किंवा पोषणाशी संबंधित समस्या कारणीभूत असेल, तर त्यात सुधारणा होऊ शकते. केस पांढरे होण्यामागे केवळ वाढते वय हेच कारण नसते. जीवनसत्त्वांची कमतरता, काही औषधांचा वापर, थायरॉईडशी संबंधित विकार तसेच शरीरावर येणारा तात्पुरता शारीरिक ताण यामुळेही केस अकाली पांढरे होऊ शकतात. मात्र केस तात्पुरते पांढरे झाले आहेत की कायमस्वरूपी, हे केवळ त्वचारोगतज्ज्ञच योग्य तपासणीनंतर सांगू शकतात. त्यामुळे केस अकाली पांढरे होत असल्याची चिंता असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये केसांचा नैसर्गिक रंग परत येण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, शरीरातील व्हिटॅमिन बी १२ किंवा लोहाची कमतरता दूर केल्यास काही व्यक्तींमध्ये केसांच्या पांढरेपणात सुधारणा होऊ शकते. बेंगळुरू येथील अपोलो रुग्णालयातील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अमुल्या राममूर्ती यांच्या मते, भारतातील बहुतांश लोकांचे केस तरुण वयातच पांढरे होण्यास सुरुवात होते. त्यामागे पोषणातील कमतरता किंवा तीव्र ताण हे कारण असल्यास काही निवडक प्रकरणांमध्ये केसांचा रंग पुन्हा येऊ शकतो. बाजारात केस पुन्हा काळे करण्याचा दावा करणारी अनेक उत्पादने उपलब्ध असली तरी त्यांना ठोस वैज्ञानिक आधार नाही.

आवळा, कढीपत्ता, कांद्याचा रस केस पुन्हा काळे करतात का?

केस काळे करण्यासाठी कढीपत्ता, आवळा, भृंगराज, काळे तीळ आणि कांद्याचा रस यांसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करण्याचे दावे केले जातात. या घटकांमुळे केसांच्या आरोग्यास काही फायदे होऊ शकतात; मात्र ते पांढरे झालेले केस पुन्हा काळे करतील, याचा ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे केस अकाली पांढरे होत असल्यास घरगुती उपायांवर अवलंबून राहण्याऐवजी मूळ कारण शोधून त्यावर योग्य उपचार करणे हाच अधिक प्रभावी मार्ग आहे. दीर्घकाळ नियंत्रणात न राहिलेला मानसिक ताण केस पांढरे होण्यास कारणीभूत ठरू शकतो. काही प्रकरणांमध्ये ताण कमी झाल्यानंतर केसांमध्ये अंशतः पुन्हा रंग येण्याची शक्यता असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. त्यामुळे ताणाचे व्यवस्थापन, पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित जीवनशैली याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरत आहे. वयानुसार केस पांढरे होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र, ही प्रक्रिया शक्य तितकी लांबवायची असेल, तर जीवनशैलीतील काही सवयींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

केस पांढरे होण्याचा वेग कमी करण्यासाठी काय करावे?

तज्ज्ञांच्या मते, वाढत्या वयानुसार केस पांढरे होण्याची नैसर्गिक प्रक्रिया मंदावण्यासाठी आणि केसांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे, ताणतणावाचे व्यवस्थापन करणे, नियमित आणि पुरेशी झोप घेणे, धूम्रपानापासून दूर राहणे, शरीरात व्हिटॅमिन किंवा खनिजांची कमतरता असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे, ऊन, धूळ आणि प्रदूषणापासून केसांचे रक्षण करणे, महत्वाचे ठरते. केसांवर वारंवार करण्यात येणारे विविध उपचार, जास्त तापमानाचा वापर करणारी हेअर स्टायलिंग उपकरणे तसेच केसांचे स्वरूप सुधारण्यासाठी करण्यात येणाऱ्या काही प्रक्रियांमुळे केसांच्या नैसर्गिक रचनेला नुकसान होऊ शकते. त्याचा दीर्घकाळ परिणाम केसांच्या मुळांवर आणि हेअर फॉलिकल्सवर होण्याची शक्यता असते, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. एकंदरीत अकाली पांढरे झालेले केस काही विशिष्ट परिस्थितींमध्ये पुन्हा काळे होण्याची शक्यता असते. पण, त्यासाठी त्वचारोगतज्ज्ञांकडून योग्य तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.