Gun Rules In Flight Aviation Safety Guidelines : उत्तर प्रदेशातील वाराणसी विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान प्रवाशाच्या पिस्तुलातून अचानक गोळी सुटल्याने दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना रविवारी, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, संबंधित प्रवासी हा एअर इंडिया एक्स्प्रेसच्या वाराणसी-मुंबई विमानाने प्रवास करणार होता. या घटनेनंतर त्याला ताब्यात घेण्यात आले असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली. या घटनेनंतर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात विमानाने प्रवास करताना प्रवाशाला पिस्तूल किंवा अन्य शस्त्र बाळगता येते का? त्यासाठी कोणते नियम आहेत? त्याविषयीचा हा आढावा…

वाराणसी विमानतळावर नेमके काय घडले?

प्राथमिक माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील आझमगड येथील कमलेश केदारनाथ राय हे त्यांच्या पत्नीसमवेत वाराणसी येथून मुंबईला येण्यासाठी निघाले होते. रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांनी विमानतळावर प्रवेश केला. केदारनाथ यांच्याकडे असलेल्या बॅगेत ७.६२ मिमीची पिस्तूल आणि २१ जिवंत काडतुसे होती. अनिवार्य सुरक्षा तपासणीसाठी त्यांना निर्धारित स्क्रीनिंग क्षेत्रात नेण्यात आले. याच ठिकाणी शस्त्र तपासणीदरम्यान अचानक गोळी सुटली आणि त्यात दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. रोहित राज आणि सुमन कुमारी अशी जखमी कर्मचाऱ्यांची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांनी शस्त्र हाताळताना आणि त्याची तपासणी करताना चुकून गोळी झाडली गेल्याने ही घटना घडली आहे. या घटनेनंतर कमलेश यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे शस्त्र बाळगण्याचा वैध परवाना होता का, शस्त्र विमानतळावर कसे आणले गेले आणि तपासणीदरम्यान गोळी कशी सुटली, याचा तपास केला जात आहे.

पिस्तूलातून गोळी नेमकी सुटलीच कशी?

यादरम्यान जखमी झालेल्या तपासणी कर्मचारी सुमन कुमारी यांनी या घटनेचा थरारक क्षण सांगितला. त्यांच्या म्हणण्यानुसार, विमानतळावरील तपासणीदरम्यान प्रवाशाने ‘पाहा, पिस्तूल अनलोड आहे’ असे सांगितले. मात्र, ते दाखवताना अचानक त्यातून गोळी सुटली. प्रवाशाला पिस्तूल लोडेड होती की अनलोडेड याची माहिती होती की नाही, हे तोच सांगू शकतो. ‘पिस्तूल अनलोड आहे’ हे दाखवण्यासाठी त्याने ट्रिगर दाबला आणि त्यातून गोळी सुटली. दुसरे जखमी कर्मचारी रोहित राज यांनीही घटनेबाबत माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रवासी विमानतळावर आल्यास त्याची तपासणी करणे ही स्क्रीनर्सची जबाबदारी असते. प्रवासी कमलेश हे विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत तपासणीसाठी आले होते. त्यांनी शस्त्र तपासणीसाठी टेबलवर ठेवले होते. सुरुवातीला आम्ही कमलेश यांची पिस्तूल तपासली असता त्यात काडतूस असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी ती अनलोड असल्याचे दाखवण्यासाठी ट्रिगर दाबला. कदाचित गोळी सुटणार नाही, असे त्यांना वाटले असावे, पण पिस्तुलातून गोळी सुटली आणि मी आणि माझी सहकारी जखमी झालो. या घटनेनंतर विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली, असे राज यांनी स्पष्ट केले.

विमानातून शस्त्र नेण्याबाबत काय आहेत नियम?

भारतात विमान प्रवासादरम्यान शस्त्र बाळगण्याबाबत कठोर नियम असून, कोणत्याही प्रवाशाला आपल्या बॅगेत स्फोटके नेण्यास पूर्णपणे बंदी आहे. पण, काही विशिष्ट परिस्थितीत परवानाधारक शस्त्रे आणि काडतुसे विमानाने नेण्यास परवानगी आहे. मात्र, त्यासाठी कठोर सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यासाठी संबंधित नियमांचे पालन करणे आणि विमानतळ सुरक्षा यंत्रणेला शस्त्राची माहिती देणे आवश्यक असते. त्यासोबत संबंधित शस्त्र परवाना आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शस्त्रातील सर्व गोळ्या/काडतुसे काढून ते पूर्णपणे अनलोड केले जाते. एका सुरक्षित बॉक्समध्ये सील करून केवळ नोंदणीकृत सामान म्हणून विमानाच्या कार्गो भागात ठेवले जाते. प्रवासादरम्यान शस्त्र किंवा काडतुसे प्रवाशाच्या हातात किंवा बॅगेत ठेवण्यास परवानगी नसते. एअर इंडियाच्या नियमांनुसार, परवानाधारक प्रवासी एक पिस्तूल किंवा बंदूक आणि निर्धारित प्रमाणातील काडतुसे घेऊन प्रवास करू शकतो. पण, त्यासाठी लागू असलेल्या सुरक्षा आणि सुरक्षाविषयक सर्व अटींचे पालन करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे शस्त्र आणि काडतुसे वाहून नेताना त्याच्या एकूण वजनाची कमाल मर्यादा पाच किलो असते.

विमानातून शस्त्र नेण्यासाठी कोणाला सूट?

एअर इंडियाच्या नियमांनुसार, सेवेत असलेले संरक्षण दल, निमलष्करी दल, पोलीस आणि कस्टम्स विभागातील कर्मचारी यांना काही परिस्थितीत शुल्कातून सूट देण्यात आली आहे. तसेच देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रवास करणाऱ्या किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंनाही काही अटींवर सूट लागू आहे. इतर प्रवाशांना देशांतर्गत विमान प्रवासासाठी प्रति शस्त्र आणि ५० काडतुसे यासाठी पाच हजार रुपयांचे शुल्क भरावे लागते. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी हे शुल्क सुमारे १०० डॉलर असल्याचे वृत्त आहे. विमानतळावरील एअरलाइनच्या काउंटरवर आपल्याकडे शस्त्र असल्याचे घोषित केल्यानंतर प्रवाशाला आवश्यक कागदपत्रे भरावी लागतात. त्यानंतर पिस्तूल आणि काडतुसे संबंधित अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी जमा करावी लागतात. तपासणी पूर्ण झाल्यानंतर पिस्तूल अनलोड केलेली आणि सुरक्षितरीत्या लॉक केलेली असणे आवश्यक असते. काडतुसेही स्वतंत्र बॉक्समध्ये सुरक्षितपणे पॅक केले जातात. त्यानंतर हे साहित्य चेक-इन बॅगेजमध्ये ठेवून विमानाच्या एका विभागात ठेवले जातात. म्हणजेच, प्रवाशाला बंदूक केबिनमध्ये किंवा स्वतःजवळ ठेवून प्रवास करता येत नाही.

विमानतळावरील गोळीबारानंतर पुढे काय?

वाराणसी विमानतळावरील घटनेने विमानात शस्त्र नेण्यासाठी लागू असलेल्या अनेक स्तरांवरील सुरक्षा तपासणी आणि कठोर नियमांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले आहे. सध्या ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीने (BCAS) या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. सुरक्षा प्रक्रियेतील सर्व नियम आणि प्रोटोकॉलचे पालन झाले होते का, याचीही तपासणी केली जात आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यास आला असून वाराणसी पोलिसांनी कमलेश राय यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पिस्तूलातील गोळी सुटल्याने जखमी झालेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वाराणसी विमानतळाचे संचालक पुनीत गुप्ता यांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडे सोपवण्यात आला असून दोषीवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.