Canada new immigration rules 2026 कॅनडाने २०२६ साठी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांकरिता नवीन इमिग्रेशन (स्थलांतर) नियम लागू केले आहेत. २०२६ मध्ये कॅनडाला जाण्याचे नियोजन करणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना या बदललेल्या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. या नवीन नियमांमध्ये नागरिकत्वाच्या नवीन नियमांची अंमलबजावणी, ‘होम केअर वर्कर’ प्रोग्राम बंद करणे, भारतीय व्यवस्थापक (मॅनेजर्स) आणि आंतरराष्ट्रीय डॉक्टरांसाठी संधी, ‘स्टार्ट-अप व्हिसा’ बंद करणे आणि मास्टर, तसेच डॉक्टरेट स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी काही सकारात्मक बदल करण्यात आले आहेत.
परंतु, सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅनडाने आपल्या तात्पुरत्या रहिवाशांची संख्या कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचा परिणाम म्हणून ‘स्टडी परमिट’धारकांची संख्या सप्टेंबर २०२५ पर्यंत सुमारे ७,२५,००० पर्यंत खाली आली आहे. जानेवारी २०२४ मध्ये ही संख्या १० लाखांहून अधिक होती. २०२७ च्या अखेरीस कॅनडातील तात्पुरत्या रहिवाशांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या पाच टक्क्यांपेक्षा कमी करणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. नवे इमिग्रेशन नियम काय आहेत? नक्की काय बदलले? जाणून घेऊयात…
नव्या इमिग्रेशन नियमांमध्ये काय?
२०२६-२०२८ च्या इमिग्रेशन लेव्हल्स प्लॅननुसार, इमिग्रेशन, रेफ्युजी सिटीझनशिप कॅनडा (आयआरसीसी) २०२६ मध्ये एकूण ४,०८,००० पर्यंत स्टडी परमिट जारी करण्याची शक्यता आहे. त्यामध्ये १,५५,००० नवीन येणारे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि २,५३,००० सध्याच्या किंवा परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुदतवाढीचा समावेश आहे. ही संख्या २०२५ च्या ४,३७,००० च्या लक्ष्यापेक्षा सात टक्क्यांनी आणि २०२४ च्या ४,८५,००० च्या लक्ष्यापेक्षा १६ टक्क्यांनी कमी आहे. २०२६ मध्ये जारी होणाऱ्या ४,०८,००० स्टडी परमिटपैकी केवळ १,८०,००० परमिट अशा अर्जदारांना दिले जातील, ज्यांना प्रोव्हिन्शियल किंवा टेरिटोरियल अटेस्टेशन लेटर (PAL/TAL)आवश्यक आहे. त्याचा अर्थ २,२८,००० अर्जदारांना कॅनडामध्ये शिकण्यासाठी PAL/TAL ची गरज भासणार नाही.
‘MSM Unify’चे संस्थापक संजय लाउल यांनी सांगितले, “कॅनडात मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांच्यासाठी हे नवीन नियम अडचणीचे ठरू शकतात. ‘रॉयटर्स’ने केलेल्या आयआरसीसीच्या आकडेवारीच्या विश्लेषणानुसार, ऑगस्ट २०२५ मध्ये भारतीय विद्यार्थ्यांना पोस्ट-सेकंडरी स्टडी परमिट नाकारण्याचे प्रमाण ७४ टक्के होते. ऑगस्ट २०२३ मध्ये हे प्रमाण ३२ टक्के होते.”
पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या आणि डॉक्टरेट स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी
पब्लिक डेसिग्नेटेड लर्निंग इन्स्टिट्यूशन (डीएलआय)मध्ये प्रवेश घेतलेल्या मास्टर आणि डॉक्टरेट स्तरावरील विद्यार्थ्यांना, तसेच इतर काही विशिष्ट विद्यार्थ्यांना आता त्यांच्या स्टडी परमिट अर्जाबरोबर प्रोव्हिन्शियल किंवा टेरिटोरियल अटेस्टेशन लेटर (PAL/TAL) सादर करण्याची गरज राहणार नाही. हा नवीन नियम १ जानेवारी २०२६ पासून लागू झाला आहे. सध्याचे स्टडी परमिटधारक त्याच संस्थेत आणि त्याच स्तरावर शिक्षणासाठी मुदतवाढीचा अर्ज करीत आहेत, त्यांनाही या पत्राची आवश्यकता नसेल.
त्यामुळे कॅनडामध्ये स्टडी परमिट मिळवू इच्छिणाऱ्या मास्टर आणि डॉक्टरेट स्तरावरील विद्यार्थ्यांची प्रक्रिया सुलभ झाली आहे. आता ते आयआरसीसीच्या प्रोसेसमधून सुटतील आणि स्टडी परमिटची मर्यादा संपल्यानंतरही अर्ज करू शकतील. या नवीन नियमामुळे स्टडी परमिटचा सुरुवातीचा खर्चही कमी झाला आहे. कारण- PAL/TAL मिळवण्यासाठी अनेकदा प्रवेश निश्चित करण्यासाठी शैक्षणिक संस्थेत मोठी ठेव जमा करावी लागत असे.
स्टार्ट-अप व्हिसा बंद
परदेशी उद्योजकांसाठी आता कॅनडाचे स्टार्ट-अप व्हिसा उपलब्ध नसतील. कॅनडाने ३१ डिसेंबर २०२५ पासून नवीन ‘स्टार्ट-अप व्हिसा (एसयूव्ही) कमिटमेंट सर्टिफिकेट’ स्वीकारणे बंद केले आहे. तसेच १९ डिसेंबरपासून नवीन स्टार्ट-अप व्हिसा वर्क परमिट अर्ज स्वीकारणेदेखील थांबवले आहे. जे अर्जदार आधीच कॅनडामध्ये आहेत आणि त्यांच्या सध्याच्या स्टार्ट-अप व्हिसा वर्क परमिटची मुदत वाढवू इच्छितात, त्यांच्याव्यतिरिक्त इतर कोणाचेही नवीन अर्ज आता स्वीकारले जाणार नाहीत. त्यात एक चांगली बाब म्हणजे कॅनडा २०२६ च्या अखेरीस एक नवीन ‘पायलट प्रोग्राम’ सुरू करण्याच्या तयारीत आहे. हा कार्यक्रम विशेषतः उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून आणि बिझनेस प्रोग्राममधील अर्जांचे नियोजन चांगल्या प्रकारे करण्यासाठी डिझाईन केला जाईल.
आंतरराष्ट्रीय डॉक्टरांसाठी आनंदाची बातमी
कॅनडा आंतरराष्ट्रीय डॉक्टरांसाठी एक नवीन ‘एक्स्प्रेस एन्ट्री’ कॅटेगरी तयार करीत आहे. त्यामुळे परदेशी डॉक्टरांना कायमस्वरूपी वास्तव्याचा मार्ग सुलभ होईल आणि देशाच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळेल. या नवीन कॅटेगरीसाठी २०२६ च्या सुरुवातीला अर्ज करण्यासाठीचे आमंत्रणे पाठवली जातील. ज्या परदेशी डॉक्टरांकडे गेल्या तीन वर्षांत किमान एक वर्षाचा कॅनडातील कामाचा अनुभव आहे, ते या श्रेणीसाठी पात्र असतील.
भारतीय व्यवस्थापकांसाठी संधी
भारत आणि इतर देशांमध्ये व्यवस्थापकीय पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता कॅनडामध्ये कायमस्वरूपी निवास परमिटसह स्थायिक होण्याची संधी मिळणार आहे. जे कर्मचारी व्यवस्थापकीय पदावर आहेत, त्यांना कॅनडा कायमस्वरूपी वास्तव्याचा परमिट देऊ करीत आहे. कॅनडा सरकार वरिष्ठ व्यवस्थापक, शास्त्रज्ञ, संशोधक व लष्करी कर्मचाऱ्यांसाठी नवीन एक्स्प्रेस एन्ट्री कॅटेगरी सुरू करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे त्यांना कॅनडाचे कायमस्वरूपी वास्तव्य मिळवणे सोपे होईल.
होम केअर वर्कर प्रोग्राम स्थगित
कॅनडाने ‘होम केअर वर्कर इमिग्रेशन’ प्रोग्राम स्थगित केला आहे, ज्यामुळे संभाव्य अर्जदार आणि त्यांच्या कुटुंबांना धक्का बसला आहे. सततची वाढती मागणी आणि मर्यादित जागांमुळे, होम केअर वर्कर इमिग्रेशन प्रोग्रामसाठी अर्ज स्वीकारणे थांबवण्यात आले आहे. मार्च २०२६ मध्ये हा प्रोग्राम पुन्हा सुरू केला जाणार नाही, असे आयआरसीसीने जाहीर केले आहे. मात्र, यापूर्वी प्राप्त झालेल्या अर्जांवर प्रक्रिया सुरू राहील, असेही सांगण्यात आले आहे.
नागरिकत्वाचे नवीन नियम
परदेशात जन्मलेल्या किंवा दत्तक घेतलेल्या कॅनेडियन नागरिकांसाठी आता नागरिकत्वाचे नवीन नियम लागू झाले आहेत. नागरिकत्व कायदा २०२५ मध्ये दुरुस्ती करणारा ‘बिल C-3’ हा कायदा १५ डिसेंबर २०२५ पासून अमलात आला आहे. त्यामुळे परदेशात जन्मलेल्या किंवा दत्तक घेतलेल्या कॅनेडियन व्यक्तींना नागरिकत्व मिळवणे शक्य झाले आहे. १५ डिसेंबर २०२५ पूर्वी जन्मलेले लोक, जे केवळ ‘फर्स्ट-जनरेशन लिमिट’ किंवा इतर जुन्या नियमांमुळे नागरिकत्व मिळवू शकले नव्हते, ते आता कॅनेडियन नागरिक मानले जातील आणि नागरिकत्वाच्या पुराव्यासाठी अर्ज करू शकतील. तसेच, २०२६ आणि त्यानंतरच्या काळात प्रभावित नागरिक नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतील.
