Cancer in 20s: भारतात सोशल मीडिया तसेच इतर ठिकाणी कर्करोगाबाबत (कॅन्सर) जनजागृती होत असल्याचे पाहायला मिळते. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर किंवा कर्करोगाची गाठ आढळल्यानंतर सिनेसृष्टीतील अभिनेते, अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देतात. कमी वयाच्या मुलांनादेखील कर्करोग होत असल्याचे आढळत आहे. त्यामुळे तरूणाई कर्करोगाबाबत जागृत झाली आहे. कर्करोगाचे प्रमाण वाढल्याने तरूण मुले-मुली कर्करोगाशी संबंधित तपासणी करत आहेत. जेनेटिक टेस्टिंग किट्स, ट्यूमर मार्कर ब्लड टेस्ट्स आणि एक्झिक्युटिव्ह चेक-अप्स यांसारख्या व इतर काही तपासण्या करून कर्करोगाचे निदान करता येते.
विशीतील तरूणांमध्ये कर्करोगाचे प्रमाण किती ?
विशीतील तरूणांमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण दुर्मिळ मानले जाते. साधारणत: प्रौढ व्यक्तींना कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक आहे. अमेरिकेत दरवर्षी एकूण कर्करोगाचे निदान झालेल्या रूग्णांपैकी पाच टक्के रूग्ण हे १५ ते ३९ वर्ष या वयोगटातील असल्याचे दिसून आले आहे. “अमेरिकेत विशीतील २५००० मुलांना कर्करोग झाल्याचे आढळले आहे”, अशी माहिती न्यूयॉर्कमधील कर्करोग तज्ज्ञ प्रा. डेनाइज रोकिट्का (रोसवेल पार्क कॉम्प्रहेन्सिव कॅन्सर सेंटर) यांनी दिली.
“विशीतील तरूणांमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण दुर्मिळ आहे. परंतु, तरीदेखील वीस ते तीस वर्षांच्या तरूणांमध्ये कर्करोग झाल्याचे आढळून येते. या वयात मुख्यत: लिम्फोमा, हॉजकिन लिम्फोमा, तरूणांमध्ये टेस्टिक्युलर कॅन्सर, तरूणींमध्ये सरव्हायकल कॅन्सर तसेच हाडे व मऊ तंतुंशी संबंधित कॅन्सरचे निदान होते. या कर्करोगांचे निदान लवकर झाल्यास त्यावर योग्य उपचार करून तो बरा होण्याची शक्यता असते. त्यामुळे कर्करोगाबाबत तरूणांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे”, असे मत डॉ. निधी टंडन (नारायणा हेल्थसिटी, बंगळुरू) यांनी व्यक्त केले आहे.
२२ वर्षीय तरूण आणि कर्करोग
राजस्थानातील जयपूरमधील एका २२ वर्षीय तरूणाला दोन वर्षांपूर्वी कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यावेळी त्याची भावना नेमकं काय होती, याबाबत त्याने ‘न्यूज १८’ ला माहिती दिली आहे. या तरूणाला मद्य व धूम्रपान करण्याचे व्यसन होते. तो म्हणाला, “मी २० वर्षांचा होतो तेव्हा मला टेस्टिक्युलर कॅन्सर झाल्याचे समजले. त्या भागाला हात लावल्यावर तिथे एक गाठ आल्याचे मला समजले. त्यावेळी त्याबाबत काहीही माहिती नसल्याने मी ती गाठ गांभीर्याने घेतली नाही. त्यानंतर काही दिवसांनी मला तो भाग जड वाटत होता, तसेच थोड्या वेदना होत होत्या. मी त्याबाबत ऑनलाइन माहिती घ्यायला सुरूवात केली. त्यानंतर मी डॉक्टरकडे गेलो. ही गोष्ट घरच्यांना सांगायची मला लाज वाटत होती. पण, मी बरा होईल की नाही, याची मला खात्री नव्हती. डॉक्टरांनी माझ्या काही तपासण्या केल्यानंतर मला टेस्टिक्युलर कॅन्सर झाल्याचे सांगितले. त्यावेळी कॅन्सर हा शब्द ऐकून माझे अवसानच गळून पडले. मी रडायला लागलो होतो. डॉक्टरांनी मला सर्जरीचा मार्ग सांगितला. त्यावेळी मी घरच्यांना मला कर्करोग झाल्याचे कळवले.”
आताची तरूणाई आरोग्याकडे दुर्लक्ष करते, याबाबत कर्करोगाशी झुंज देणाऱ्या तरूणाला विचारले असता तो म्हणाला, आरोग्याशी संबंधित समस्या या भविष्यात येतील, असा आपला समज असतो. आरोग्य ही वर्तमानातली जबाबदारी आहे. आजची तरूणाई धूम्रपान, अवेळी जेवण करणे, मोबाईल फोनचा अतिरेकी वापर करणे यात गुंतलेली आहे. त्यांना धोकादायक काहीच नाही, असं वाटतं. पण, एक गंभीर आजार जेव्हा होतो, तेव्हा हा भ्रम तुटतो. आरोग्याची काळजी ही भीतीमुळे घेऊ नये. आरोग्याचा आपण सन्मान केला पाहिजे. आरोग्याचा सन्मान करणे आपण जितक्या लवकर सुरू करू तितकं आपलं आरोग्य आपल्याला भविष्यात येणाऱ्या आरोग्याच्या समस्यांपासून वाचवण्यास मदत करेल.
झोपेला कुठलाही दुसरा पर्याय नाही. तणाव तुम्हाला मॅनेज करेल, त्याआधीच तुम्ही तणावाला मॅनेज करा. खूप ताणतणावाने काही मिळवण्याचा प्रयत्न करू नका. जे आवश्यक आहे ते लसीकरण तुमच्या शरीरासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करून घ्या. सतत आरोग्याची तपासणी करा. आपण सतत अॅक्टिव्ह राहायला हवं. चालणे, सायकलिंग करणे, पोहणे, योगा नियमितपणे करायला हवा. आपण दररोज ब्रश जसा नित्यनियमाने करतो तसाच व्यायामही केला पाहिजे, असेही तो तरूण म्हणाला.
कर्करोगाची तपासणी कधी करावी ?
वीस ते तीस वर्ष वयोगटातील तरूणांनी त्यांच्या आरोग्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवे. शरीरात एखादे लक्षण काही आठवड्यांपासून जाणवत असेल आणि त्याबाबत ठोस माहिती नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. विनाकारण वजन कमी होणे, थकवा येणे, गाठ होणे, रक्तस्राव होणे, पोटातील आतड्यांशी संबंधित आजार होणे यांसारखी लक्षणे आठवड्यांपासून दिसून येत असल्यास डॉक्टरांचे मार्गदर्शन अत्यावश्यक ठरते, असे डॉ. निधी टंडन म्हणाल्या. त्या म्हणाल्या, अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांकडे जाण्याची भीती बाळगू नये. अशा परिस्थितीत लवकरात लवकर उपचार सुरू होण्यासाठी डॉक्टरांकडे जाणे आवश्यक असते.
२५ व्या वर्षी कर्करोगाची तपासणी करावी का ?
विशीत असलेले तरूण कर्करोगाबाबत जागृत असल्याचे दिसून येतात. कर्करोगाशी संबंधित तपासणी नेमकं कधी करावी ? याबाबत ते गोंधळलेले असतात. परंतु, मेडिकल गाइडलाइन्सने तरूणांनी कर्करोगाची तपासणी केव्हा करावी हे सांगून हा गोंधळ दूर केला आहे. विशीतच कर्करोगाशी संबंधित सगळ्या चाचण्या करायला हव्या, असे आवश्यक नाही. काही चाचण्या या ३० वर्ष वय होण्याच्या आधी करणे आवश्यक असते, असे डॉ. निधी पाटणी (डायरेक्टर,रेडिएशन आँकोलॉजी, नारायणा हॉस्पिटल, जयपूर) यांनी म्हटले आहे.

