Cancer From Infection Lancet Study : आनुवंशिकता, जीवनशैली किंवा तंबाखूचे सेवन याच कारणांमुळे कॅन्सर होतो, असा समज प्रचलित आहे. मात्र, आता कॅन्सरचा थेट संबंध विषाणू आणि जिवाणूंमुळे होणाऱ्या संसर्गाशीही जोडला जात आहे. भारतात २०२४ मध्ये अशाच संसर्गांमुळे सुमारे एक लाख ९० हजार लोकांना कॅन्सर झाल्याचे ‘द लॅन्सेट ऑन्कोलॉजी’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून समोर आले आहे. या अभ्यासानुसार, जागतिक स्तरावर याच वर्षात आढळलेल्या एकूण कर्करोगाच्या प्रकरणांपैकी १२ टक्के म्हणजेच तब्बल २३ लाख नवीन प्रकरणे विविध विषाणू आणि जीवाणूंच्या संसर्गाशी संबंधित होती.

भारतातील या प्रकरणांपैकी एक लाखाहून अधिक प्रकरणांचा संबंध ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV)शी आहे. या विषाणूमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होऊ शकतो. विशेष म्हणजे HPV संसर्गापासून संरक्षण देणाऱ्या लसीकरणामुळे या प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी करता येतो.

त्याशिवाय हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी या विषाणूंच्या दीर्घकालीन संसर्गामुळे यकृताचा कॅन्सर होऊ शकतो. भारतातील संसर्गाशी संबंधित कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये पोटातील ‘हेलिकोबॅक्टर पायलोरी’ (H. pylori) या जीवाणूचाही मोठा वाटा आहे. या जिवाणूच्या संसर्गाशी संबंधित सुमारे ४७ हजार कॅन्सरची प्रकरणे असल्याचा अंदाज आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जठराचा कॅन्सर असतो; तर एपस्टीन-बार व्हायरस (EBV)मुळे सुमारे २२ हजार, हेपॅटायटिस बी व्हायरसमुळे १० हजार आणि हेपॅटायटिस सी व्हायरसमुळे सुमारे ५,३०० कॅन्सरची प्रकरणे भारतात आढळली.

GLOBOCAN (Global Cancer Observatory)च्या आकडेवारीनुसार, भारतातील वर्षभरातील एकूण कॅन्सरच्या प्रकरणांपैकी सुमारे १२ टक्के प्रकरणे संसर्गाशी संबंधित आहेत. त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी केवळ उपचारांवर भर देणे पुरेसे नाही, तर संसर्ग रोखण्यावरही लक्ष देणे गरजेचे असल्याचे अभ्यासकांनी नमूद केले आहे.

अभ्यासकांनी काही प्रभावी उपाय सांगितले आहेत. HPV आणि हेपॅटायटिस बीची लस घेणे, HIV, H. pylori, हेपॅटायटिस बी व सीच्या संसर्गाची तपासणी करून वेळेवर उपचार घेणे, तसेच इंजेक्शन देताना सुरक्षित पद्धतींचा वापर करणे यांचा समावेश आहे. HIV चा प्रसार रोखण्यासाठी कंडोम आणि PrEP (Pre-Exposure Prophylaxis) उपलब्ध करून देणे, तसेच HPVशी संबंधित गर्भाशयाच्या मुखाचा आणि गुदद्वाराचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात होणारे बदल ओळखण्यासाठी नियमित तपासणी करणेही महत्त्वाचे असल्याचे अभ्यासक सांगतात.

एचपीव्ही लसीकरणाची स्थिती

भारतात राष्ट्रीय स्तरावर एचपीव्ही लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आतापर्यंत ८० लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. आता हे लसीकरण नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कार्यक्रमात गार्डसिल-4 ही चार प्रकारच्या एचपीव्हीपासून संरक्षण देणारी लस वापरली जाते. यात गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या एचपीव्ही-16 व एचपीव्ही-18 या उच्च जोखमीच्या प्रकारांसह एचपीव्ही-6 व एचपीव्ही-11 यांच्यापासूनही संरक्षण मिळते. भारतात एचपीव्ही-16 व एचपीव्ही-18 च्या संसर्गामुळे ८० टक्क्यांहून अधिक लोकांना गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

प्रयास हेल्थ ग्रुपच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. स्मिता जोशी या अभ्यासाचा भाग नसल्या तरी त्यांनी एचपीव्ही लसीकरणाच्या बाबतीत काही राज्यांनी चांगली प्रगती केल्याचे सांगितले; मात्र केवळ लसीकरण पुरेसे नाही. प्रौढ महिलांची एचपीव्ही चाचणीद्वारे तपासणी करणे आणि चाचणी पॉझिटिव्ह आल्यास योग्य उपचार व पुढील व्यवस्थापन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्यापूर्वीच त्याचा धोका ओळखून प्रतिबंधात्मक उपाय करता येतात.

प्रीव्हेंटिव्ह हेल्थ ऑर्गनायझेशन-इंडियाचे सरचिटणीस डॉ. आय. एस. गिलाडा यांनी सांगितले की, लसीकरणाच्या माध्यमातून एचपीव्ही आणि हेपॅटायटिस बी या दोन्ही संसर्गांपासून पूर्णपणे बचाव करता येतो. हेपॅटायटिस बीची लस कमी किमतीत उपलब्ध आहे. मात्र, अनेकदा तिचा पुरवठा कमी पडतो, असे त्यांनी नमूद केले.

‘ट्रिपल एच’ (HCV, HIV व HBV) तपासणी कार्यक्रमांतर्गत गर्भवती महिलांच्या तपासणीच्या केंद्रांपासून ते रक्तपेढ्या आणि शस्त्रक्रियेपूर्वीचे तपासणी केंद्र अशा अनेक ठिकाणी हेपॅटायटिस बीची तपासणी केली जाते. मात्र, HBV चाचणी निगेटिव्ह आलेल्या लोकांना पुढे हेपॅटायटिस बीची लस देण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे, असेही डॉ. गिलाडा यांनी सांगितले. या अभ्यासात तपासण्यात आलेल्या १२ रोगजंतूंपैकी (Pathogens) पाच मुख्य रोगजंतूमुळे बहुतांश लोकांना संसर्ग होतो, असे समोर आले.

अभ्यासातून काय समोर आले?

या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका डॉ. हॅरिएट रमगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २०२४ मध्ये जगभरात नव्याने आढळलेल्या कॅन्सरच्या प्रकरणांची आकडेवारी आणि त्यापैकी विविध संसर्गांमुळे होणाऱ्या कॅन्सरचे प्रमाण यांचा अभ्यास केला. या अभ्यासात १२ प्रकारच्या रोगजंतूचा विचार करण्यात आला. त्यापैकी पाच रोगजंतूंमुळे झालेल्या संसर्गामुळेच सर्वांना कॅन्सर झाल्याचे आढळून आले.

त्यामध्ये २०२४ मधील सुमारे ७.६ लाख कॅन्सरच्या प्रकरणांशी (एकूण कॅन्सरच्या चार टक्के) H. pylori संसर्गाचा संबंध होता. तर एचपीव्हीमुळे ७.५ लाख (चार टक्के) लोकांना, हेपॅटायटिस बी व्हायरसमुळे ३.६ लाख (दोन टक्के), Epstein-Barr virus (EBV) मुळे २.६ लाख (एक टक्का) आणि हेपॅटायटिस सी व्हायरसमुळे १.६ लाखाहून अधिक (एक टक्क्यापेक्षा कमी) लोकांना कॅन्सर झाल्याचे आढळून आले.

पूर्व आशियात कॅन्सरचे प्रमाण अधिक

संसर्गाशी संबंधित कॅन्सरच्या एकूण प्रकरणांपैकी ७७ टक्के प्रकरणे ही कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आढळतात. त्यामध्ये पूर्व आशियाचा वाटा सर्वाधिक आहे. या भागात सुमारे ९.९ लाख कॅन्सरच्या प्रकरणांचा संसर्गाशी संबंध असल्याचे आढळले, जगभरातील प्रकरणांपैकी हे प्रमाण सुमारे ४२ टक्के आहे. त्यामध्ये H. pylori आणि हेपॅटायटिस बी संसर्गामुळे बाधित झालेल्या रुग्णांचा मोठा वाटा आहे.

उप-सहारा आफ्रिकेत मात्र एकूण कॅन्सरच्या प्रकरणांपैकी सुमारे एक-चतुर्थांश प्रकरणांचा संबंध संसर्गाशी होता. येथे एचपीव्हीशी संबंधित कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे.

जगभरातील कॅन्सरच्या प्रकरणांची संख्या ही २०२४ मधील दोन कोटी संख्येवरून २०५० पर्यंत ३.५ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. लोकसंख्या वाढणे आणि वृद्धत्व हे त्यामागचे प्रमुख कारण ठरेल, असेही अभ्यासकांनी नमूद केले. तर संसर्गजन्य घटक (Infectious agents) हे जागतिक स्तरावर कर्करोगाचे एक प्रमुख आणि रोखता येण्याजोगे कारण ठरत आहेत. जगातील १४१ देशांमध्ये महिलांमध्ये तर ५८ देशांमध्ये पुरुषांमध्ये बदलता येण्याजोगा किंवा टाळता येण्याजोगा कर्करोगाचा सर्वांत मोठा धोकादायक घटक म्हणून संसर्गांकडे पाहिले जात आहे.