कॅन्सर हा जगातील सर्वात प्राणघातक आजारांपैकी एक मानला जातो. त्यामुळेच कॅन्सरचे नावही ऐकले तरी अनेकांचा पोटात भीतीचा गोळा उठतो. गेल्या दशकभरात देशातील कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. चिंताजनक बाब म्हणजे त्यात तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले. कॅन्सरवर प्रभावी उपचार पद्धती शोधून काढण्यासाठी सध्या ठिकठिकाणी संशोधन सुरू आहे. यादरम्यान लॅन्सेट या वैद्यकीय नियकालिकात नुकताच एक नवीन अभ्यास प्रकाशित करण्यात आला. त्यात कॅन्सरची प्रकरणे वाढण्यास कारणीभूत ठरत असलेल्या जीवाणू आणि विषाणूंची माहिती देण्यात आली. या अभ्यासामुळे देशभरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्याविषयी….
२०२४ मध्ये भारतातील तब्बल एक लाख ९० हजार कॅन्सरच्या प्रकरणांमागे विविध विषाणू आणि जिवाणूंचा संसर्ग कारणीभूत असल्याचा धक्कादायक दावा लॅन्सेटच्या अहवालातून करण्यात आला. त्याच वर्षी जगभरात तब्बल २३ लाखांहून अधिक कॅन्सरची प्रकरणे ही संसर्गामुळेच उद्भवल्याचे अभ्यास नमूद करण्यात आले आहे. भारतात संसर्गामुळे होणाऱ्या कॅन्सरची बहुतांश प्रकरणे ही ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’ (HPV) या विषाणूशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरसाठी हा विषाणू कारणीभूत ठरत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्यावर एचपीव्ही लस उपलब्ध असून ती घेतल्यास या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय, ‘हिपॅटायटिस बी’ आणि ‘हिपॅटायटिस सी’ या दीर्घकालीन संसर्गांमुळे प्रामुख्याने यकृताचा कॅन्सर होत असल्याचे अभ्यासात नमूद आहे.
कॅन्सरसाठी कोणत्या विषाणू-जिवाणूंचा संसर्ग कारणीभूत?
२०२४ मध्ये भारतात ‘हिपॅटायटिस बी’ विषाणूमुळे १०,०००, तर हिपॅटायटिस सी विषाणूमुळे कॅन्सरच्या पाच हजार ३०० प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. तसेच एच. पायलोरी या पोटातील जिवाणूमुळे सुमारे ४७ हजार कॅन्सरची प्रकरणे आढळून आली आहे. त्यातील बहुतांश प्रकरणे पोटाच्या कॅन्सरशी संबंधित असल्याची माहिती आहे. त्यानंतर एपस्टीन-बार व्हायरसमुळे (EBV) सुमारे २२ हजार कॅन्सर प्रकरणे, हिपॅटायटिस बी व्हायरसमुळे (HBV) १० हजार प्रकरणे, तर हिपॅटायटिस सी व्हायरसमुळे (HCV) अंदाजे ५,३०० कॅन्सरच्या प्रकरणांची नोंद झाल्याचा अंदाजही अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे. संसर्गजन्य आजारांवर वेळीच नियंत्रण आणि योग्य लसीकरण केल्यास यातील अनेक कर्करोग रोखणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या अहवालाच्या लेखकांनी संसर्गावर वेळेत नियंत्रण मिळवून कर्करोगाचा धोका कसा मोठ्या प्रमाणावर कमी करता येऊ शकतो, यावर विशेष भर दिला आहे. अत्यंत प्रभावी असूनही दुर्लक्षित राहिलेल्या अनेक प्रतिबंधात्मक उपायांकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे.
कॅन्सरचा धोका नेमका कसा कमी करता येऊ शकतो?
- गर्भाशयाच्या मुखाचा आणि यकृताचा कर्करोग रोखण्यासाठी ‘एचपीव्ही’ (HPV) व ‘हिपॅटायटिस बी’ (HBV) प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम राबवणे.
- एचआयव्ही, पोटातील ‘एच. पायलोरी’ जिवाणू, तसेच ‘हिपॅटायटिस बी’ आणि ‘हिपॅटायटिस सी’ यांचे वेळेवर अचूक निदान करून तातडीने योग्य उपचार सुरू करणे.
- एचआयव्ही संसर्ग रोखण्यासाठी कंडोमचा वापर आणि संसर्गाचा धोका टाळण्यासाठी प्री-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिसची उपलब्धता वाढवणे.
- एचपीव्ही’मुळे होणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या आणि गुदद्वाराच्या कर्करोगाचे वेळीच निदान करण्यासाठी कॅन्सरपूर्व बदलांची नियमित तपासणी व स्क्रीनिंग करणे.
- सुरक्षित इंजेक्शन पद्धतींचा वापर बंधनकारक करणे आणि इतर संसर्ग नियंत्रणाचे साधे आणि प्रभावी उपाय काटेकोरपणे राबवणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
- संसर्गाचे वेळेवर निदान, प्रतिबंध आणि उपचार यांना प्राधान्य दिल्यास त्या संबंधित कर्करोगाचे प्रमाण कमी होऊ शकते, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.
भारतात HPV लसीकरणाचे ८० लाखांहून अधिक डोस
भारताने नुकताच राष्ट्रीय HPV लसीकरण कार्यक्रम सुरू केला असून, आतापर्यंत ८० लाखांहून अधिक महिलांना हा डोस देण्यात आला आहे. आता हे लसीकरण नियमित लसीकरणाच्या वेळापत्रकात समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेत आहे. या कार्यक्रमात गार्डासिल-४ या चार घटकांच्या लसीचा वापर केला जात आहे. ही लस उच्च जोखमीच्या HPV-16 आणि HPV-18 या प्रकारांपासून संरक्षण देते. भारतातील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या ८० टक्क्यांहून अधिक प्रकरणांसाठी हे दोन्ही प्रकार जबाबदार असल्याचे सांगितले जाते. या लसीमुळे HPV-6 आणि HPV-11 या प्रकारांपासूनही संरक्षण मिळते. यादरम्यान लॅन्सेटच्या अभ्यासाशी संबंधित नसलेल्या प्रयस हेल्थ ग्रुपच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. स्मिता जोशी यांनी सांगितले की, देशातील काही राज्यांनी HPV लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने चांगली कामगिरी केली आहे. प्रौढ महिलांची HPV चाचणीद्वारे तपासणी करणे आणि ती पॉझिटिव्ह आल्यास योग्य उपचार व व्यवस्थापन करणे हे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. पीपल्स हेल्थ ऑर्गनायझेशन-इंडियाचे महासचिव डॉ. आय. एस. गिलाडा यांनीही HPV आणि हिपॅटायटिस-बी या दोन्ही संसर्गांना लसीकरणाच्या माध्यमातून पूर्णपणे रोखता येत असल्याचे सांगितले आहे.
लॅन्सेटच्या अभ्यासातून नेमके काय समोर आले?
फ्रान्समधील लियॉन येथील ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ या संस्थेच्या कर्करोग निरीक्षण विभागाच्या प्रमुख संशोधक डॉ. हॅरियट रमगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २०२४ मधील कॅन्सरची नवीन रुग्णांची आकडेवारी आणि विविध संसर्गांमुळे उद्भवणाऱ्या कॅन्सरचे प्रमाण यांचा एकत्रित अभ्यास केला. त्यात १२ रोगजंतूंपैकी केवळ पाच प्रमुख जंतू संसर्गामुळे होणाऱ्या कॅन्सरच्या जवळपास सर्व प्रकरणांसाठी कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये एच. पायलोरी संसर्गाचा संबंध सुमारे ७ लाख ६० हजार कर्करोगाच्या प्रकरणांशी होता. त्याचप्रमाणे, HPV संसर्गाशी संबंधित कॅन्सरची ७ लाख ५० हजार प्रकरणे, हिपॅटायटिस-बी विषाणूमुळे ३ लाख ६० हजार प्रकरणे, एपस्टीन-बार विषाणूमुळे २ लाख ६० हजार प्रकरणे, तर ‘हिपॅटायटिस-सी’ या विषाणूचा संबंध १ लाख ६० हजार प्रकरणांशी दिसून आला.
पूर्व आशियात संसर्गाशी संबंधित कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण
जगभरातील संसर्गाशी संबंधित कॅन्सरच्या एकूण प्रकरणांपैकी ७७ टक्के प्रकरणे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आढळून आली. त्यामध्ये पूर्व आशियात सर्वाधिक ९ लाख ९० हजार प्रकरणे आढळली. हे प्रमाण जगभरातील संसर्गाशी संबंधित कर्करोगाच्या एकूण प्रकरणांच्या सुमारे ४२ टक्के आहे. या भागातील बहुतांश प्रकरणांसाठी एच. पायलोरी आणि हिपॅटायटिस-बी हे संसर्ग कारणीभूत असल्याचे आढळले. दरम्यान, उप-सहारा आफ्रिका प्रदेशात संसर्गजन्य कॅन्सरचे प्रमाण सर्वात जास्त राहिले. या भागातील सुमारे एक चतुर्थांश कॅन्सरची प्रकरणे संसर्गाशी संबंधित आहेत. यामागे प्रामुख्याने HPV मुळे होणाऱ्या कॅन्सरचे मोठे प्रमाण कारणीभूत असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
२०५० पर्यंत कॅन्सचे कोट्यवधी रुग्ण आढळण्याची शक्यता
जगभरातील कॅन्सरग्रस्त प्रमाण आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. लोकसंख्येच्या वाढत्या वयोमानामुळेच २०२४ मधील दोन कोटी नवीन कॅन्सरच्या प्रकरणांची संख्या २०५० पर्यंत तब्बल तीन कोटी ५० लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. संसर्गजन्य घटक हे जागतिक स्तरावर कॅन्सरचा धोका वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याचे कारण मानला जात आहे. जगातील तब्बल १४१ देशांमधील महिलांमध्ये आणि ५८ देशांमधील पुरुषांमध्ये वेळीच नियंत्रण किंवा प्रतिबंध करता येण्याजोगा प्रमुख जोखीम घटक म्हणून संसर्गजन्य रोगजंतूंचा क्रमांक लागतो, असे या अभ्यासात नमूद केले आहे.
