Cancer Symptoms in Marathi :  ‘कर्करोग’ असे नावही जरी ऐकले तरी अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. गेल्या काही वर्षांत या आजाराने जगभरातील अनेकांना विळखा घातला आहे. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात तपासणीसाठी साधनसंपत्ती नसल्यामुळे अनेकांना कर्करोगाची लक्षणे लवकर समजत नाहीत. त्यातच आरोग्य सुविधा आणि जागरूकतेच्या अभावामुळे त्याचे निदान अंतिम टप्प्यात असल्यामुळे मृत्युदराचा धोकाही वाढतो आहे. यादरम्यान ‘लिक्विड बायोप्सी’ नावाच्या नव्या रक्त तपासणीमुळे ही परिस्थिती बदलू शकते. या चाचणीच्या मदतीने कर्करोगाचे निदान अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच होऊ शकते, असा दावा आरोग्य तज्ज्ञांनी केला आहे. त्याविषयीचा हा आढावा…

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये सुमारे एक कोटींहून अधिक लोकांचा कर्करोगाने मृत्यू झाला आहे. चिंताजनक बाब म्हणजे, या रुग्णांमध्ये तरुण आणि तरुणींचे प्रमाण सर्वाधिक आहे. तरुणांना तोंडाचा तसेच आतड्यांचा कर्करोग होत असल्याचे दिसून येत आहे; तर तरुणींमध्ये ब्रेस्ट कॅन्सर म्हणजेच स्तनांचा कर्करोगाची समस्या वाढली आहे. कर्करोगाची लक्षणे लवकर ओळखणे हे वैद्यकीय क्षेत्रापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. लिक्विड बायोप्सी या तपासणीमुळे कर्करोगाचा धोका लवकर ओळखता येतो, असा दावा अमेरिकेच्या ‘CANCER’ या प्रतिष्ठित वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून करण्यात आला आहे.

लिक्विड बायोप्सीमुळे कर्करोग लवकर ओळखणे शक्य?

नियमित लिक्विड बायोप्सी तपासणी केल्यास विविध प्रकारच्या कर्करोगांचे लवकर निदान होऊ शकते. ही तंत्रज्ञानात्मक क्रांती कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात नवे दालन उघडू शकते आणि हजारो जीव वाचवू शकते, असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. सध्या नियमित कर्करोग तपासणी केवळ काही मोजक्या प्रकारांसाठीच केली जाते. मात्र, नव्या संशोधनानुसार ‘लिक्विड बायोप्सी’ किंवा ‘मल्टी-कॅन्सर अर्ली डिटेक्शन टेस्टिंग’ या तंत्राद्वारे उशिराने निदान होणाऱ्या कर्करोगांच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात. त्यामुळे या आजाराला सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखता येईल आणि रुग्णांवर अधिक प्रभावी उपचार केले जातील.

आणखी वाचा : Kidney Damage Symptoms : जगभरातील ८० कोटी लोकांना ‘या’ आजाराची लागण; अनेकांचा मृत्यू,’ही’ लक्षणे दिसताच सावध व्हा!

‘लिक्विड बायोप्सी’ नेमकी कशी कार्य करते?

सध्या नियमित तपासणीची शिफारस फक्त चार प्रकारच्या कर्करोगांसाठीच केली जाते. परिणामी सुमारे ७० टक्के कर्करोगाची प्रकरणे रुग्णांमध्ये लक्षणे दिसून लागल्यानंतरच उजेडात येतात. त्यातच बहुतांश प्रकरणांमध्ये ही लक्षणे उशिराने म्हणजेच आजाराच्या प्रगत अवस्थेत दिसतात. कर्करोगाचे निदान अंतिम टप्प्यात असल्यामुळे उपचार प्रभावी ठरण्याचे प्रमाण कमी होते आणि मृत्युदराचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत ‘मल्टी-कॅन्सर अर्ली डिटेक्शन टेस्ट’ म्हणजेच एकाच रक्तनमुन्यातून अनेक प्रकारचे कर्करोग शोधण्याची क्षमता ‘लिक्विड बायोप्सी’मध्ये असल्याचा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे. या पद्धतीमुळे कर्करोगाच्या उपचारांमध्ये मोठे यश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

लिक्विड बायोप्सी म्हणजे नेमके काय?

लिक्विड बायोप्सी ही रक्त तपासणीची आधुनिक पद्धती आहे. रुग्णांच्या शरीरातील कर्करोगाच्या पेशींची उपस्थिती आणि त्यांची वाढ ओळखण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जात आहे. कर्करोग ओळखण्याच्या पारंपारिक पद्धतीत शरीरातील गाठ किंवा ऊतकाचा नमुना घेऊन त्याचे प्रयोगशाळेत परीक्षण केले जाते; पण लिक्विड बायोप्सीमध्ये फक्त रक्त तपासणीतूनच कर्करोगाचे सूक्ष्म लक्षणे शोधली जातात. ही आधुनिक उपचार पद्धती मोठी प्रभावी ठरत असल्याचे ‘CANCER’ या जर्नलमध्ये नमूद करण्यात आले आहे. या पद्धतीमुळे कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये मोठी घट झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

लिक्विड बायोप्सीमुळे कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये मोठी घट?

‘कॅन्सरगार्ड’ नावाच्या लिक्विड बायोप्सी चाचणीच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी अमेरिकेतील एका मोठ्या राष्ट्रीय कर्करोग डेटाबेसचा वापर केला. त्यांनी कर्करोगाच्या एकूण ८० टक्के घटना आणि मृत्यूसाठी जबाबदार असलेले १४ प्रमुख कर्करोगांचे प्रकार निवडले. या अभ्यासात ५० ते ८४ वर्षे वयोगटातील जवळपास ५० लाख अमेरिकी नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले. यावेळी कर्करोगाची लागण झालेल्या रुग्णांची नियमित आरोग्य तपासणीबरोबरच रक्तावर आधारित ‘मल्टी-कॅन्सर अर्ली डिटेक्शन टेस्ट’ करण्यात आली. अभ्यासातून असे समोर आले की, कर्करोगाचे पहिल्या टप्प्यातील निदान १० टक्क्यांनी वाढले होते; तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील निदान अनुक्रमे २० आणि ३० टक्क्यांनी वाढले होते. सर्वात महत्वाचे म्हणजे चौथ्या (अंतिम) टप्प्यातील निदान ४५ टक्क्यांनी घटल्याचे समोर आले. याचाच अर्थ लिक्विड बायोप्सी ही तपासणी नियमित केली गेल्यास कर्करोगाचे निदान अधिक लवकर होऊ शकते. तसेच गंभीर अवस्थेत सापडणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास निम्म्याने कमी होऊ शकते.

हेही वाचा : Kidney health: खूप पाणी प्यायल्याने किडनीचे विकार बरे होतात का? तज्ज्ञ काय सांगतात?

संशोधकांनी नेमका काय दावा केला?

संशोधनात असेही दिसून आले की, फुफ्फुसासह मोठ्या आतड्याचा आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे चौथ्या टप्प्यातील निदानाचे प्रमाण कमी झाले होते. तसेच गर्भाशयाचा, यकृताचा आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग या प्रकारांमध्ये सर्वाधिक टक्केवारीने सुधारणा दिसून आली. ‘मल्टी-कॅन्सर ब्लड टेस्ट्स’ कर्करोग नियंत्रणासाठी मोठा उपयोगी ठरू शकतात, असा दावा या संशोधनाचे अभ्यासक आणि तज्ज्ञ डॉ. जगप्रीत छतवाल यांनी केला आहे. कर्करोग पसरण्यापूर्वीच त्याचे लवकर निदान करून या चाचण्यांमुळे रुग्णांना दीर्घायुष्य मिळू शकते, तसेच कर्करोगामुळे येणारा वैयक्तिक आणि आर्थिक ताणदेखील कमी होऊ शकतो,” असेही त्यांनी म्हटले आहे. डॉ. छतवाल हे मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील इन्स्टिट्यूट फॉर टेक्नॉलॉजी असेसमेंटचे संचालक आहेत.