कान्हा व्याघ्र प्रकल्पातील घटनेने खळबळ का?

कान्हा व्याघ्र प्रकल्प परिसरात एका वाघिणीसह तिच्या बछड्यांचा ‘कॅनाईन डिस्टेंपर’ विषाणूमुळे मृत्यू झाल्यानंतर देशातील व्याघ्रसंवर्धन व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत आहे. वाघीण आणि बछड्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर वनविभागाने त्यांना ताब्यात घेऊन उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) सर्व व्याघ्र प्रकल्पांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. आतापर्यंत शिकारी आणि अधिवास नष्ट होणे हाच वाघांसाठी सर्वात मोठा धोका मानला जात होता. मात्र, आता संसर्गजन्य रोगही मोठे संकट ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘कॅनाईन डिस्टेंपर’ म्हणजे काय? तो किती घातक?

‘कॅनाईन डिस्टेंपर’ हा विषाणू मुख्यत: श्वानांमध्ये आढळतो. मात्र तो वाघ, बिबट्या, सिंह, लांडगे यांसारख्या मांसाहारी वन्यप्राण्यांमध्येही पसरू शकतो. ताप, अशक्तपणा, डोळे आणि नाकातून स्राव, श्वसनाचा त्रास, असामान्य हालचाली आणि मज्जासंस्थेवर परिणाम अशी त्याची प्रमुख लक्षणे आहेत. गंभीर संसर्ग झाल्यास प्राण्यांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. हा विषाणू एका प्राण्यापासून दुसर्‍या प्राण्यात वेगाने पसरू शकतो. विशेषत: एखाद्या वाघिणीला संसर्ग झाल्यास तिच्या बछड्यांनाही तो होण्याची शक्यता अधिक असते. कान्हा व्याघ्र प्रकल्पातील घटनेने यावर शिक्कामोर्तब केले आहे.

या विषाणूचा जीनपूलवर परिणाम होतो का?

एखाद्या व्याघ्र प्रकल्पात एकाच कुटुंबातील अनेक वाघ मृत्युमुखी पडल्यास त्या परिसरातील आनुवंशिक विविधतेवर परिणाम होऊ शकतो. विशेषत: बछड्यांची संख्या अधिक असलेल्या वनक्षेत्रासाठी हे दीर्घकालीन संकट ठरू शकते. आफ्रिकेत सेरेन्गेटी परिसरात सिंहांमध्येही ‘कॅनाईन डिस्टेंपर’चा मोठा उद्रेक झाला होता. त्यामुळे भारतातील ही परिस्थिती जागतिक संवर्धन आव्हानांचा भाग असल्याचे म्हणता येईल.

जंगलात हा संसर्ग कसा पोहोचतो?

हा विषाणू प्रामुख्याने श्वानांमध्ये आढळतो. मात्र, जंगलालगतच्या गावांमधील पाळीव किंवा भटकी श्वाने वनक्षेत्रात गेल्यानंतर त्यांचा संपर्क वाघ, बिबट, सिंह यांसारख्या मांसाहरी प्राण्यांशी येतो आणि संसर्गाची साखळी तयार होते. मोहफुले, तेंदुपत्ता किंवा इतर वनउत्पादनांच्या हंगामात गावकर्‍यांचा जंगलातील वावर वाढतो. अनेकदा ते सुरक्षेसाठी श्वानांना सोबत नेतात. हे श्वान जंगलातील पाणवठ्यांवर जातात आणि त्याच ठिकाणी नंतर वाघ किंवा इतर वन्यप्राणी येतात. त्यामुळे संसर्गाची साखळी तयार होण्याचा धोका वाढतो, असे ज्येष्ठ वन्यजीवतज्ज्ञ अजय दुबे यांनी नमूद केले आहे. भविष्यात हा धोका अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारतात याआधीही अशा घटना घडल्या आहेत का?

गीर अभयारण्यात २०१८ मध्ये अनेक सिंहांचा मृत्यू ‘कॅनाईन डिस्टेंपर’मुळे झाल्याची नोंद आहे. अधिकृत आकड्यांपेक्षा मृत्यूंची संख्या अधिक असल्याचा दावा काही वन्यजीवतज्ज्ञांनी केला होता. तसेच पन्ना व्याघ्र प्रकल्पात २०१५ मध्ये एका वाघिणीचा मृत्यू याच विषाणूमुळे झाला होता. भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेने २०१२ ते २०१७ दरम्यान तपासलेल्या नमुन्यांमध्ये ११ वाघ, १७ बिबट आणि ५४ सिंहांना या विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे हा धोका अचानक निर्माण झालेला नसून अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. मात्र, वन्यजीवांच्या आरोग्य व्यवस्थेकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही, ही वस्तुस्थिती कान्हा व्याघ्र प्रकल्पातील घटनेने सिद्ध केली आहे.

‘एनटीसीए’ने कोणत्या सूचना दिल्या आहेत?

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने व्याघ्र प्रकल्पांच्या बफर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर श्वानांचे लसीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. पशुसंवर्धन विभाग, स्थानिक प्रशासन आणि वनविभाग यांच्या समन्वयातून ‘इम्युनायझेशन बफर’ उभारण्यावर भर दिला जात आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे गेल्या दोन वर्षांपासून परिसरातील गावांमध्ये श्वान आणि पाळीव जनावरांचे सातत्याने लसीकरण केले जात आहे. कान्ह्यातील घटनेनंतर मध्य प्रदेशातही मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू करण्यात आली असून हजारो जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात गेल्या दोन वर्षांपासून परिसरातील गावांमध्ये श्वान आणि पाळीव जनावरांच्या लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे.

‘वन हेल्थ’ संकल्पनेचे महत्त्व काय?

ही घटना ‘वन हेल्थ’ संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. मानव, पाळीव प्राणी आणि वन्यजीव यांचे आरोग्य परस्परांशी जोडलेले असल्याने एका घटकातील संसर्ग संपूर्ण परिसंस्थेला प्रभावित करू शकतो. त्यामुळे व्याघ्र संवर्धनाचा विचार केवळ वाघांची संख्या वाढवण्यापुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. जंगलांवरील मानवी दबाव, भटकी श्वाने, पर्यटन विस्तार आणि हवामान बदल यांचाही त्यात विचार करावा लागणार आहे. भविष्यात व्याघ्र संवर्धनाचा मोठा लढा हा शिकारीविरोधातच नव्हे, तर अशा अदृश्य विषाणूंविरोधातही असणार असल्याचे या घटनेने स्पष्ट केले आहे. वाघांसह आता जंगलाचे आरोग्यदेखील सुरक्षित ठेवावे लागणार, हेदेखील स्पष्ट झाले आहे.