Captain Rakesh Ranjan Singh Merchant Navy Death : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाचा भारतावरही मोठा परिणाम होताना दिसून येत आहे. या तणावामुळे भारतीय मर्चंट नेव्हीतील अनुभवी कॅप्टन राकेश रंजन सिंह यांचे पार्थिव गेल्या काही दिवसांपासून दुबईत अडकून पडले आहे. पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी जोडणारी होर्मुझची सामुद्रधुनी जवळपास बंद असल्याने त्यांचे पार्थिव भारतात आणण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जाते आहे. केंद्र सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी मृत अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर कोण होते कॅप्टन राकेश रंजन सिंह? त्यांचे निधन नेमके कशामुळे झाले? त्याविषयीचा हा आढावा…
कोण होते कॅप्टन राकेश रंजन सिंह?
४७ वर्षीय कॅप्टन राकेश रंजन सिंह हे भारतीय मर्चंट नेव्हीतील वरिष्ठ अधिकारी होते. झारखंडमधील रांची येथील रहिवासी असलेल्या सिंह यांना जहाजवाहतूक क्षेत्रात तब्बल २० वर्षांहून अधिक अनुभव होता. मूळचे बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील बिहार शरीफ येथील असलेल्या राकेश यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा बेंगळुरूमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून दुसरा मुलगा दहावीत शिकत आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, २ फेब्रुवारीला राकेश हे रांचीहून दुबईला निघालेल्या ‘ASP Avana’ या मालवाहू जहाजावर रुजू झाले. त्यानंतर हे जहाज इराण आणि ओमानदरम्यान असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दुबईला रवाना झाले. १ मार्चला खनिज तेल भरल्यानंतर जहाज पुन्हा भारताच्या दिशेने निघाले.
कॅप्टन राकेश सिंह यांचा मृत्यू कसा झाला?
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका व इस्रायल यांनी संयुक्त हल्ला करून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांची हत्या केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही अमेरिका व इस्रायलवर हल्ले करण्यास सुरुवात केली. यादरम्यान निर्माण झालेल्या तणावामुळे पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी जोडणाऱ्या होर्मुझची सामुद्रधुनीतील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी जागतिक बाजारात खनिज तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आणि कॅप्टन सिंह यांचे जहाजही त्याच भागात अडकून पडले. गेल्या १८ दिवसांपासून ‘ASP Avana’ हे जहाज दुबई किनारपट्टीपासून सुमारे २५-३० किमी अंतरावर नांगर टाकून उभे होते. १८ मार्च रोजी जहाजावर कर्तव्यावर असतानाच कॅप्टन सिंह यांची प्रकृती अचानक खालावली.
आणखी वाचा : पाकिस्तानची आंतरखंडीय क्षेपणास्त्राची निर्मिती? अमेरिकेने चिंता का व्यक्त केली?
हृदयविकाराच्या झटक्याने राकेश यांचा मृत्यू?
राकेश यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी तातडीने दुबईतील वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि एअर अॅम्ब्युलन्सची मागणी केली. मात्र, युद्ध सुरू असल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव एअर अॅम्ब्युलन्सला उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली नाही. परिणामी वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने राकेश यांचा मृत्यू झाला. त्यांचे मोठे बंधू उमेश सिंह यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, दुबईने हवाई मदत नाकारल्यानंतर जहाजावरील कर्मचाऱ्यांनी राकेश यांना उपचारासाठी बोटीच्या सहाय्याने दुबईला नेले. मात्र, किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी बराच वेळ लागल्याने डॉक्टरांना त्यांचे प्राण वाचवता आले नाही. जर एअर अॅम्ब्युलन्सची परवानगी मिळाली असती, तर आज राकेश आम्हाला सोडून गेले नसते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अजूनही स्पष्ट करण्यात आलेले नाही, असेही उमेश सिंह म्हणाले.
सिंह कुटुंबाची सरकारकडे आर्त हाक
राकेश रंजन सिंह यांचे पार्थिव मायदेशी आणण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी आता केंद्र आणि राज्य सरकारकडे धाव घेतली आहे. या घटनेला जवळपास १८ दिवस उलटूनही तांत्रिक प्रक्रियेमुळे पार्थिव अद्याप दुबईतच असल्याने कुटुंबाने तीव्र दुःख आणि चिंता व्यक्त केली आहे. कॅप्टन राकेश यांचा मुलगा प्रवर सिंह यांनी संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांना पत्र लिहून आपल्या वडिलांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. वडिलांच्या निधनानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण व्हायला खूप वेळ लागत आहे, ज्यामुळे आमचे कुटुंब प्रचंड मानसिक तणावाखाली आहे. त्यांचे पार्थिव भारतात आणण्याबरोबरच सरकारने आम्हाला आर्थिक मदतही जाहीर करावी, असे प्रवर सिंह यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : US-Iran War : अमेरिकेच्या ‘अदृश्य’ विमानावर इराणचा अचूक नेम? ८०० कोटींचे ‘फायटर जेट’ कशामुळे निकामी?
पार्थिव भारतात आणण्यास नेमके अडथळे काय?
कॅप्टन राकेश सिंह यांचे पार्थिव भारतात आणण्याच्या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. याबाबत दुबई पोलिसांकडून अद्याप ना-हरकत प्रमाणपत्र मिळणे बाकी आहे. भारतीय दूतावास आणि इमिग्रेशन विभागाकडून मिळणाऱ्या परवानग्यांमध्येही वेळ जात आहे. सध्या सुरू असलेल्या रमजान आणि ईदच्या सुट्ट्यांमुळे दुबईतील सरकारी कार्यालयांचे कामकाज मंदावले असून, त्यामुळे प्रक्रियेला अधिक विलंब होत असल्याचे दी इंडियन एक्स्प्रेसने आपल्या वृत्तात म्हटले आहे. संबंधित शिपिंग कंपनीच्या प्रतिनिधींनी बुधवारी (१८ मार्च) रांची येथे पीडित कुटुंबाची भेट घेतली. राकेश यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ईदच्या तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे या कामाला थोडा उशीर झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
