Flydubai Smit Machchhar Health Update : फ्लायदुबईच्या विमानात सहवैमानिकाने जीवघेणा हल्ला केला तरीही कॅप्टन स्मित मच्छार यांनी धाडसाने कॉकपिटचा दरवाजा उघडला ज्यामुळे १८२ लोकांचा जीव वाचला. मात्र या हल्ल्यात स्मित मच्छार यांना गंभीर दुखापत झाली. कुऱ्हाडीचा घाव बसल्याने मच्छार यांच्या डोक्याच्या कवटीमध्ये फ्रॅक्चर झाले, दृष्टीला इजा झाली तसेच त्यांच्या हातालाही गंभीर दुखापत झालीय, असे फर्स्ट पोस्टने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.

फर्स्ट पोस्टने वृत्तात नमूद केले की, कुऱ्हाडीच्या घावामुळे त्यांच्या नसांना आणि दृष्टीला गंभीर इजा झाली आहे. कॅप्टनला स्मित मच्छार यांना ठार मारण्याऐवजी कायमचे जायबंदी करण्याचा सहवैमानिक अल-हम्मामीचा प्रयत्न होता. तसेच विमानावर ताबा मिळवून तो पाडण्याचा अल हम्मामीचा हेतू होता, असा अनेक माध्यमांनी दावा केला आहे. तेल अवीवला जाणाऱ्या विमानांची माहिती आधीच मिळवली होती आणि फ्लायदुबईचे विमान निवडण्यामागेही ठरावीक कारण होते. तेल अवीवमधील एखाद्या उंच इमारतीवर विमान धडकवण्याचा त्याचा कट होता, असे त्याने चौकशीदरम्यान कबूल केले आहे.

या जीवघेण्या हल्ल्यामुळे कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शरीरावरच नव्हे, मनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यांना शारीरिक आणि मानसिक आघातातून बाहेर पडण्यासाठी बराच काळ उपचाराधीन राहावे लागू शकते.

स्मित मच्छार यांच्या प्रकृतीबाबत नवी माहिती

कॅप्टन स्मित मच्छर यांना नेमकी काय इजा झाली होती, याचे नवे तपशील समोर आले आहेत. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कवटीला ‘डिप्रेस्ड फ्रॅक्चर’ झाले होते. या प्रकारात कवटीचे हाड तुटून त्याचा काही भाग आत, मेंदूच्या दिशेने दबला जातो. त्यामुळे तुटलेला हाडाचा तुकडा आजूबाजूच्या कवटीच्या तुलनेत खाली सरकतो.

ही साधी कवटीची दुखापत नसून गंभीर स्वरूपाची इजा मानली जाते. आत दबलेला हाडाचा तुकडा मेंदूवर दाब आणू शकतो किंवा मेंदूला इजा पोहोचवू शकतो. त्यामुळे अशा दुखापतीनंतर तातडीने वैद्यकीय उपचार करणे आवश्यक असते आणि परिस्थितीनुसार शस्त्रक्रियाही करावी लागू शकते.

फ्लायदुबईच्या विमानाने सौदी अरेबियातील तबूक येथे आपत्कालीन लँडिंग केल्याने मच्छार यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या कवटीवर पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना यूएईतील अबुधाबी येथे विमानाने हलवण्यात आले. तेथील लष्करी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून, ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जखमी अवस्थेत कॉकपिटचा दरवाजा उघडल्याने प्रवासी आणि क्रू सदस्यांना आत प्रवेश करता आला. त्यानंतर त्यांनी हल्लेखोर सहपायलटला ताब्यात घेतले आणि विमानावरील नियंत्रण स्थिर करण्यास मदत केली. तबूक येथे विमान सुरक्षितपणे उतरवल्यानंतर मच्छर यांना पुढील उपचारांसाठी अबुधाबीला हलवण्यात आले.

दृष्टीसोबत स्मरणशक्तीवरही परिणाम

हल्ल्यात त्यांच्या डोक्याव्यतिरिक्त हात-पाय, छाती आणि पोटाच्या वरच्या भागालाही दुखापत झाली होती. हल्ल्यानंतर त्यांच्या दृष्टीवरही गंभीर परिणाम झाला होता. कॅप्टन मच्छर यांनी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहू यांच्याशी संवाद साधला. यावेळी मच्छार म्हणाले, सुरुवातीला डोक्यावर सलग वार झाल्याने त्यांची दृष्टी जवळपास पूर्णपणे धूसर झाली होती. त्याच अवस्थेत विमान वेगाने खाली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला.

आता समोर येत असलेल्या माहितीनुसार, या हल्ल्याचा परिणाम केवळ त्यांच्या दृष्टीपुरता मर्यादित राहिलेला नाही. सौदी अरेबियात विमान उतरल्यानंतर त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले. या दुखापतीमुळे त्यांच्या स्मरणशक्तीवरही परिणाम झाला आहे. त्या प्रसंगातील घटना त्यांना सलग आठवत असल्या तरी, काही गोष्टी तुटक स्वरूपात लक्षात असल्याचे त्यांनी नेतान्याहूंना सांगितले. “माझी स्मरणशक्ती सध्या तुटक आहे. पण त्या वेळची मला एवढीच गोष्ट आठवते,” असे मच्छर म्हणाले.

दरम्यान, कॅप्टन मच्छार यांना सध्या तीव्र डोकेदुखीचा त्रास होत आहे. त्यांच्यावर न्यूरोलॉजिकल तपासण्या सुरू असून, त्यांना वेदनाशामक तसेच शांती देणारी औषधे दिली जात आहेत.

प्रकृतीत सुधारणा; पुन्हा उड्डाणाची इच्छा

कॅप्टन मच्छार यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ते आता काही पावले चालू लागले असून थोडेफार अन्नही खायला सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सूत्रांनी नमूद केले.

दृष्टी पूर्णपणे पूर्ववत व्हावी यासाठी डॉक्टर विशेष प्रयत्न करत आहेत. गंभीर दुखापतीनंतरही मच्छार यांचा सकारात्मक दृष्टिकोन कायम आहे. हल्ल्यामुळे धूसर झालेली दृष्टी पूर्णपणे बरी व्हावी आणि त्याचा त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीवर परिणाम होऊ नये, यासाठी तज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत. कॅप्टन मच्छर यांनी पुन्हा विमान उड्डाणाची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांची दृष्टी पूर्ववत करण्याबरोबरच न्यूरोलॉजिकल स्थितीतही अपेक्षित सुधारणा व्हावी, यासाठी डॉक्टर प्रयत्न करत आहेत.

त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठा आधार ठरत आहे. “या संपूर्ण प्रसंगातून जात असतानाही ते हसतमुख आहेत. त्यांचा सकारात्मक उत्साह मोठी ताकद ठरत आहे,” त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती असलेल्या एका सूत्राने सांगितले. विशेष म्हणजे, मराठी भाषेत ‘स्मित’ या शब्दाचा अर्थ ‘हास्य’ तसेच गुजराती भाषेत ‘हसू’ असा होतो. नावाप्रमाणेच या कठीण प्रसंगातही मच्छार यांनी चेहऱ्यावरील हास्य कायम ठेवले आहे.

कॉकपिटमध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊनही मच्छार यांनी दरवाजा उघडल्याने प्रवासी आणि क्रूला आत जाण्याची संधी मिळाली. त्यानंतर विमानावरील नियंत्रण पुन्हा मिळवण्यात मदत झाली आणि मोठी दुर्घटना टळली. आता ते पुन्हा कामावर कधी रुजू होणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.