प्रथमेश गोडबोले

राज्यात निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक किल्ले, टेकड्या, दुर्गम भाग, वनसंपदा, ऐतिहासिक वारसा स्थळे, लेणी आणि धरणे अशी अनेक पर्यटनाची ठिकाणे आहेत. यातील अनेक ठिकाणी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसर असल्याने पक्के बांधकाम करता येत नाही. परिणामी हॉटेल वा निवासस्थानांच्या सोयी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. अशा ठिकाणी कॅराव्हॅन व कॅम्प व्हॅनच्या साहाय्याने पर्यटकांना निवासाच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यभरातून तीन कॅराव्हॅनना पर्यटन विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे. ही वाहने कृषी पर्यटन केंद्र, एमटीडीसी निवासस्थाने किंवा खासगी हॉटेल यांच्या परिसरात उभी करता येणार आहेत. परदेशात अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या कॅराव्हॅन किंवा कॅम्प व्हॅनचा वापर पर्यटकांकडून करण्यात येतो. भारतात केरळ आणि गुजरात या राज्यांतही अशा प्रकारच्या व्हॅनना परवानगी आहे. आता महाराष्ट्रातही कॅराव्हॅनना परवानगी देण्यास सुरूवात करण्यात आल्याने अशा प्रकारचे पर्यटन वाढीस लागण्यास मदत होणार आहे.

कॅराव्हॅन म्हणजे काय?

कॅराव्हॅन म्हणजे एका अर्थी चाकावरचे घर. या व्हॅनमध्ये खाटेची सुविधा, स्वयंपाकघर, स्वच्छतागृह, सोफा, टेबल असून विश्रांती आणि निवासाच्या दृष्टीने त्याची बांधणी केलेली असते. सिंगल एक्सेल कन्व्हेन्शनल कॅराव्हॅन, टि्वन ॲक्सल कॅराव्हॅन, टेन्ट ट्रेलर, फोल्डिंग कॅराव्हॅन, कॅम्प ट्रेलर अशा प्रकारचे कॅराव्हॅनचे विविध प्रकार असतात. घरी किंवा हॉटेलमधील खोलीत ज्या प्रकारच्या सुविधा असतात, त्या सर्व सुविधा या व्हॅनमध्ये असतात.

राज्यात कॅराव्हॅन धोरण कधी आणले?

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना याबाबतचे धोरण तयार करण्यात आले. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीत कॅराव्हॅन आणि कॅराव्हॅन पार्क या सुविधा पर्यटकांना उपलब्ध करून देण्यासाठी कॅराव्हॅन पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता देण्यात आली. कॅराव्हॅन पार्क आणि कॅराव्हॅन असे दोन भाग या धोरणात असून यामुळे राज्यातील वैविध्यपूर्ण निसर्ग सौंदर्याचा लाभ सहजपणे पर्यटकांना घेता येईल. त्यामुळे रोजगारदेखील वाढीस लागणार आहे. कॅराव्हॅन पर्यटन धोरणासंदर्भात राज्यस्तरीय समिती असून पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अध्यक्ष आहेत.

विश्लेषण : शिवस्मारकाचे झाले काय? हा प्रकल्प अजूनही प्रलंबित का?

कॅराव्हॅन पार्क संकल्पना काय?

मूलभूत सोयी-सुविधांनी युक्त अशा जागेवर कॅराव्हॅन पार्क उभे करून मुक्काम करता येऊ शकतो. यामध्ये लहान मोठ्या आकाराच्या कॅराव्हॅन उभ्या करता येऊ शकतात. असे पार्क खासगी किंवा शासकीय जमिनीवर स्वत: जमीन मालक किंवा विकासक उभारू शकणार आहेत. वाहनतळाच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा तसेच स्वतंत्र पाणी, रस्ते व वीज जोडणी असेल. या ठिकाणी पर्यटक सुविधा केंद्र, उद्यानदेखील असेल. कॅराव्हॅन पार्क मालकांनी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करणे अपेक्षित आहे. याठिकाणी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहेदेखील असतील आणि शारीरिक विकलांग नागरिकांकरिता चाकाच्या खुर्चीची सुविधा असतील. यासाठीच्या आवश्यक त्या परवानग्या स्थानिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणार आहेत. परदेशात अशा प्रकारचे कॅराव्हॅन पार्क ठिकठिकाणी उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात ही संकल्पनाच नवी असल्याने तूर्त अशा प्रकारचे पार्क नाहीत. त्यामुळे परवानगी देण्यात आलेल्या कॅराव्हॅन सध्या राज्यातील राज्यातील कृषी पर्यटन केंद्रे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (एमटीडीसी) निवासस्थाने किंवा खासगी हॉटेल यांच्या परिसरातच उभी करावी लागणार आहेत.

कॅराव्हॅन नोंदणी बंधनकारक का?

पर्यटन संचालनालयाकडे कॅराव्हॅन आणि कॅराव्हॅन पार्कची नोंदणी आवश्यक आहे. या पर्यटन संकल्पनेमुळे पर्यटकांना राहण्याची सुविधा; तसेच खासगी गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळणार आहे. कौटुंबिक सहलींचे आयोजन, हॉटेल्स आणि रिसॉर्ट या पारंपरिक निवास व्यवस्थेपेक्षा वेगळा अनुभव, ना विकास क्षेत्राचा योग्य वापर, दुर्गम भागातील पर्यटनाला चालना देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे यामुळे शक्य होणार आहे. कॅराव्हॅन पार्कमध्ये मूलभूत सोयीसुविधांनी युक्त अशा जागेवर मुक्काम करता येईल. यामध्ये लहान-मोठ्या आकाराच्या कॅराव्हॅन उभ्या करता येतील. या व्हॅनमध्ये निवास करणाऱ्यांची सुरक्षितता आणि या व्हॅनमधून तयार होणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट संबंधित हॉटेलच्या माध्यमातून लावण्यात येणार आहे. या व्हॅनसाठी चार्जिंगची आवश्यकता असते. पर्यटन विभागाकडून कॅम्प व्हॅन म्हणून परवानगी घेतलेल्या वाहनांना प्रादेशिक परिवहन विभागाचा कर आणि व्यावसायिक वाहनांना द्याव्या लागणाऱ्या करातून माफी देण्यात आली आहे. त्यामुळे या व्हॅनची नोंदणी करणे बंधनकारक आहे, असे पुणे विभागाच्या पर्यटन उपसंचालक सुप्रिया करमरकर-दातार यांनी सांगितले.

कॅराव्हॅनसाठी परवानगी देण्यास प्रारंभ कधी?

राज्यातील पर्यटनस्थळी निवासासाठी आता वैयक्तिक कॅराव्हॅन वापरता येणार आहे. अशा कॅराव्हॅनना पर्यटनस्थळी नेऊन त्यामध्ये निवास करण्यासाठीची परवानगी पर्यटन विभागाकडून देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत राज्यात तीन कॅराव्हॅनना परवानगी देण्यात आली आहे. परदेशांप्रमाणे देशातील गुजरात, केरळ या राज्यांत कॅराव्हॅन धोरण राबविण्यात आले आहे. या धर्तीवर महाराष्ट्रातही कॅराव्हॅन किंवा कॅम्प व्हॅनच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यात येत आहे. या व्हॅनना परवानगी देताना संबंधित व्हॅनधारकाकडून पर्यटकांची सुरक्षितता, सांडपाणी व्यवस्थापन याबाबत स्वघोषणा पत्र घेण्यात येते. सध्या ही व्हॅन राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे लावता येणार असून कुठेही लावता येणार नाही. अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

विश्लेषण : पावसाळ्यात वाघांचे हल्ले का वाढतात?

कॅराव्हॅनसाठी परवानगी घेण्यासाठी काय कराल?

कॅराव्हॅन पार्क आणि कॅराव्हॅन तसेच हायब्रीड कॅराव्हॅन पार्कची नोंदणी पर्यटन संचालनालयाच्या http://www.maharashtratourism.gov.in संकेतस्थळावर करता येणार आहे. नोंदणी शुल्क पाच हजार आणि नूतनीकरणासाठी दोन हजार रुपये शुल्क असणार आहे.

Story img Loader