Cause of fatigue despite good sleep demands right health tips for daily recovery: “मी रोज ७ ते ८ तास भरपूर झोपतो, तरीही सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही. उलट दिवसभर अंगात जडपणा राहतो.” हा अनुभव आजकाल घराघरांत ऐकायला मिळतो. बहुतेक जणांचा असा समज असतो की, थकवा हा फक्त अपुऱ्या झोपेशी संबंधित असतो. पण वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास, शरीर आणि मेंदू ताजेतवाने न होण्यामागे केवळ झोपेचे तास नव्हे, तर झोपेची गुणवत्ता (Deep Sleep Quality) कारणीभूत असते.

थकवा का टिकून राहतो?

“सतत अंगात जडपणा असतो, काही काम केलं नाही तरी थकल्यासारखं वाटतं.”
हल्ली अनेकांना असा अनुभव येतो. बहुतेक जणांना वाटतं की, थकवा फक्त कमी झोपेमुळे येतो. पण प्रत्यक्षात थकवा हा फक्त झोपेशी संबंधित नसतो. काही वेळा पुरेशी झोप असूनही शरीर आणि मेंदू ताजेतवाने झाल्यासारखे वाटत नाहीत. मग प्रश्न असा झोप पूर्ण होत असतानाही थकवा का टिकून राहतो?

थकवा म्हणजे नेमकं काय?

शारीरिक थकवा ही शरीर आणि मेंदूची एक प्रोटेक्टिव सिस्टम असते. थकवा म्हणजे शरीर ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, मज्जासंस्था (नर्वस सिस्टम) ओव्हरलोड झाली आहे, रिकवरी अपुरी पडते आहे. हा शरीराचा स्लो डाउन करण्याचा करण्याचा संकेत असू शकतो. फक्त झोपेचं प्रमाण नाही, झोपेची गुणवत्ता देखील तितकीच महत्वाची आहे.

झोपूनही थकवा जाणवणे कारणे आणि उपाय | सकाळी उठल्यावर थकवा घालवण्याचे उपाय | Cause of fatigue despite good sleep health tips in Marathi | Tiredness after sleeping sleep hygiene tips
पुरेशी झोप होऊनही शरीरात थकवा जाणवण्याची मुख्य कारणे (Image- Gemini)

गाढ झोप नसेल तर…

“मी ८ तास झोपतो” म्हणजे रिकवरी पूर्ण झालीच असं नाही. जर झोप वारंवार तुटत असेल, उशिरापर्यंत स्क्रीनचा वापर होत असेल, गाढ झोप (deep sleep) नसेल तर शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही.
म्हणजेच तास जास्त = रिकवरी चांगलीच असेल असं नाही.
शरीर दिवसभर फक्त शारीरिक कामाने थकत नाही.

मेंदू सतत अॅक्टिव

हल्ली थकव्याचं मोठं कारण असतं, ते म्हणजे मेंटल लोड. सतत नोटिफिकेशन्स, कामाचा ताण, मल्टिटास्किंग, सतत स्क्रीनकडे पाहणं यामुळे मेंदू सतत अॅक्टिव राहतो. शरीर शांत बसलेलं असलं तरी नर्वस सिस्टम सतत काम करत असते. त्यामुळे दिवसाच्या शेवटी डोकं जड वाटणं, अंगात ऊर्जा नसल्यासारखं वाटणं, मोटिवेशन कमी होणं हे अनुभव येऊ शकतात.

इनइफेक्टिव फटीग

हे थोडं विरोधाभासी वाटू शकतं, पण खूप कमी हालचाल केल्यानेही थकवा वाढू शकतो. दीर्घकाळ बसून काम करणं, गाडी चालवणं आणि स्क्रीनसमोर राहणं यामुळे रक्तपुरवठा कमी होतो, शरीर स्टिफ होतं, ऊर्जा कमी वाटते याला काही वेळा इनइफेक्टिव फटीग म्हणतात. म्हणूनच “दिवसभर काही केलं नाही, तरी थकल्यासारखं वाटतं” असं अनेकांना जाणवतं.

वेदना आणि थकवा यांचा संबंध

सतत वेदना असणाऱ्या व्यक्तींमध्ये थकवा जास्त दिसतो. कारण वेदना व्यवस्थापनासाठी मेंदूला जास्त ऊर्जा वापरावी लागते, नर्वस सिस्टम सतत अलर्ट अवस्थेतच राहते. त्यामुळे शरीर लवकर थकतं, रिकवरी कमी होते म्हणून दीर्घकालीन वेदनेसोबत थकवा सुद्धा येतो.

मानसिक ताणाचा मोठा परिणाम

ताण (stress) हा फक्त मानसिक अनुभव नाही. त्याचा शरीरावरही परिणाम होतो. दीर्घकाळ ताण असल्यास झोपेची गुणवत्ता कमी होते, स्नायूंमध्ये ताण वाढतो, नर्वस सिस्टम सतत ऐक्टिव राहते यामुळे सकाळी उठल्यावरही फ्रेश वाटत नाही, शरीर थकल्यासारखं वाटतं.

“मी आरामच करतो, तरी थकवा जात नाही”, असं का?

कारण रिकवरी म्हणजे फक्त आराम नाही. रिकवरी साठी चांगली झोप, योग्य हालचाल, मानसिक विश्रांती, संतुलित दिनचर्या हे सगळं आवश्यक असतं. पूर्ण दिवस पडून राहिल्याने काही वेळा शरीर अधिक वाटू शकतं.

शरीराची एनर्जी सिस्टम कशी प्रभावित होते?

जेव्हा झोप अनियमित असते, हालचाल कमी असते, ताण जास्त असतो तेव्हा शरीराची ऊर्जा वापरण्याची आणि पुनर्बांधणीची प्रक्रिया प्रभावित होऊ शकते. यामुळे छोट्या कामानेही थकवा येणे, कॉन्सन्ट्रेशन कमी होणे, शरीर जड वाटणं असे अनुभव येऊ शकतात.

कोणाला जास्त त्रास होतो?

  • डेस्क जॉब करणारे : दीर्घकाळ बसणं + मानसिक ताण
  • विद्यार्थ्यांना: झोपेची कमतरता + स्क्रीन टाइम
  • दीर्घकाळ वेदना असणारे: सतत च्या वेदनेचं होणार प्रोसेसिंग आणि त्यामुळे येणारा थकवा
  • कमी हालचाल करणारे: शरीराची सहनशक्ती कमी होत जाते

उपाय काय?

१. मूवमेंट आवश्यक
दर ३०–४५ मिनिटांनी उठून चालणं, हलकी हालचाल ऊर्जा सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतं.
२. स्क्रीन हायजिन
झोपण्याआधी स्क्रीन वापर कमी करणं महत्त्वाचं.
३. झोपेचं रूटीन
दररोज एकाच वेळेत झोपणं आणि उठणं.
४. कंट्रोल्ड व्यायाम
हलका आणि नियमित व्यायाम शरीराची ऊर्जा वापरण्याची आणि नियंत्रित करण्याची क्षमता सुधारू शकतो.
५. तणावाचे व्यवस्थापन
श्वसन तंत्र, रिलॅक्सेशन आणि डिजिटल ब्रेक्स उपयोगी ठरू शकतात.

फिजिओथेरेपीची भूमिका

फिजिओथेरेपीमध्ये थकव्याकडे फक्त वीकनेस म्हणून पाहिलं जात नाही. फिजिओथेरेपिस्ट अॅक्टिविटीज लेवल्स असेस करतात, लोड मॅनेजमेंट शिकवतात, ग्रेडेड अॅक्टिविटीज प्लान तयार करतात, शरीराची सहनशक्ती वाढवण्यावर काम करतात यामुळे फटीग सायकल कमी होण्यास मदत होऊ शकते.

नर्वस सिस्टमचा ओव्हरलोड

थकवा म्हणजे आळस नाही. अनेक वेळा तो शरीर आणि नर्वस सिस्टमचा ओव्हरलोड असू शकतो.

पुरेशी झोप असूनही थकवा जाणवण्यामागे खराब स्लीप क्वालिटी, कमी हालचाल, मानसिक ताण सततची वेदना, नर्वस सिस्टम ओव्हरलोड ही कारणं असू शकतात.

लक्षात ठेवा:

  • फक्त झोप पुरेशी असणं पुरेसं नाही
  • रिकवरी ही अनेक गोष्टींचा परिणाम असते
  • हालचाल आणि विश्रांती दोन्ही आवश्यक आहे
    • कधी कधी शरीर थकव्याच्या माध्यमातून फक्त एवढंच सांगत असतं “मला थोडं संतुलन हवं आहे.”