कौशल्य शिक्षण देणाऱ्या सरकारी शिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) आपल्या दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करताना कौशल्य शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ध्ये इयत्ता दहावीमध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धत’ बदलण्यात आली असून दहावीसाठी व्यावसायिक शिक्षण हा विषय अनिवार्य केला आहे.

सीबीएसईच्या अभ्यासक्रमात कोणते बदल?

इयत्ता नववीच्या २०२६-२७ आणि दहावीच्या २०२७-२८ या दोन शैक्षणिक वर्षांसाठी सीबीएसईने नवी योजना लागू करण्यात येणार आहे. २०२६-२७मध्ये इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या बदलांचा कोणताही परिणाम होणार नसून त्यांच्यासाठी जुनीच अभ्यासक्रम योजना कायम राहणार आहे. अभ्यासक्रमाच्या अमलबजावणीचे वेळापत्रक लक्षात घेऊन मंडळाने नववीच्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात ‘इंडिव्हिज्युअल्स इन सोसायटी’ हा विषय आणि ‘सीटी अँड एआय’ मॉड्यूल्स अभ्यासक्रम वगळण्यात आला आहे. तसेच २०२७-२८मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन’ हा विषयही लागू केला जाणार नाही. मात्र इयत्ता नववीसाठी २०२६-२७ आणि दहावीसाठी २०२७-२८ या विद्यार्थ्यांना एकूण नऊ अनिवार्य विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे. यामध्ये पहिली भाषा, दुसरी भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, तिसरी भाषा, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण व आरोग्य आणि व्यावसायिक शिक्षण या विषयांचा समावेश आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना एक ऐच्छिक विषय निवडण्याचीही संधी विद्यार्थ्यांना असणार आहे.

दहावीत विद्यार्थ्यांसाठी कोणते पर्याय?

दहावीच्या २०२७-२८च्या बोर्ड परीक्षेत प्रथम, द्वितीय, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या पाच मुख्य विषयांची परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच मंडळाने जाहीर केलेल्या ५७ ऐच्छिक विषयांच्या यादीतून विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार विषय निवडता येईल. मात्र, ऐच्छिक विषय म्हणून भाषेची निवड करताना ती प्रथम, द्वितीय आणि तृतीय या तीन भाषांपेक्षा वेगळी असणे आवश्यक आहे. तिसऱ्या भाषेचे, कला शिक्षण आणि शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयांचे मूल्यमापन शाळास्तरावर अंतर्गत पद्धतीने केले जाणार आहे. कौशल विकास निवडलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापनही शाळेमार्फतच करण्यात येणार आहे. व्यावसायिक शिक्षण अनिवार्य असले तरी त्यासाठी विद्यार्थ्यांना विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मंडळाने निश्चित केलेले २२ कौशल्याधारित विषय कोणते?

रिटेल (किरकोळ विक्री व्यवस्थापन), माहिती तंत्रज्ञान, सुरक्षा, ऑटोमोटिव्ह, वित्तीय बाजारपेठेची ओळख, पर्यटनाची ओळख, सौंदर्य व आरोग्य, कृषी, अन्न उत्पादन, फ्रंट ऑफिस ऑपरेशन्स, बँकिंग आणि विमा, विपणन आणि विक्री, आरोग्य सेवा, परिधान उद्योग, मल्टिमीडिया, मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, शारीरिक क्रियाकलाप प्रशिक्षक, डेटा सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर, विज्ञानासाठी पायाभूत कौशल्ये (औषधनिर्माण आणि जैवतंत्रज्ञान), डिझाइन थिंकिंग आणि इनोव्हेशन या विषयांचा २२ कौशल्याधारित विषयांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या २२ विषयांव्यतिरिक्त ‘कौशल विकास’ हा पर्यायी विषय उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या २३ पर्यायांपैकी कोणताही एक विषय निवडून व्यावसायिक शिक्षणाची अनिवार्य अट पूर्ण करता येईल.

कौशल विकास निवडल्यास मंडळाची परीक्षा नाही

‘कौशल विकास’ निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये स्वतंत्र बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नाही. या विषयाचे मूल्यमापन शाळास्तरावर अंतर्गत पद्धतीने होईल. या मूल्यमापनात किमान ३३ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेकडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या विषयासाठी शाळा गुणांसह श्रेणीही (ग्रेड) प्रदान करणार आहेत. याउलट, २२ कौशल्याधारित विषयांपैकी एखादा विषय निवडल्यास दहावीमध्ये त्या विषयाची बोर्ड परीक्षा देणे बंधनकारक असेल. या परीक्षेतील गुण आणि श्रेणी मंडळाच्या गुणपत्रिकेत नमूद केली जाईल. तसेच संबंधित कौशल्य विषयाची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एनएसक्यूएफ प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.

उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात ३३ टक्के गुण आवश्यक

दहावीच्या बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पाच मुख्य विषयांमध्ये किमान ३३ टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. मात्र, बोर्ड परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाचे एकत्रित गुण विचारात घेण्यात येणार आहेत. एखाद्या विद्यार्थ्याला बोर्ड परीक्षेत ८० पैकी २४ गुण आणि अंतर्गत मूल्यमापनात २० पैकी ९ गुण मिळाले, तर एकूण १०० पैकी ३३ गुण होतात. अशा विद्यार्थ्याला संबंधित विषयात उत्तीर्ण घोषित करण्यात येणार आहे.

कौशल्य विषयामुळे मुख्य विषय बदलण्याची संधी

एखाद्या विद्यार्थ्याने २२ कौशल्याधारित विषयांपैकी एक विषय निवडला असेल आणि त्याला गणित, विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र या तीन विषयांपैकी एखाद्या विषयात ३३ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले, मात्र कौशल्याधारित विषयात तो उत्तीर्ण झाला, तर संबंधित मुख्य विषयाच्या जागी कौशल्याधारित विषयाचा विचार करून दहावीचा निकाल तयार केला जाईल. मात्र, व्यावसायिक शिक्षणासाठी ‘कौशल विकास’ निवडलेल्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार नाही. त्याचप्रमाणे प्रथम किंवा द्वितीय भाषांपैकी एखाद्या विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आणि त्याने पर्यायी विषय म्हणून वेगळी भाषा निवडली असेल व त्या भाषेत उत्तीर्ण झाला असेल, तर पर्यायी भाषेच्या आधारे अनुत्तीर्ण भाषेची जागा बदलण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पर्याय

विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना किमान एका अनिवार्य भाषेचा अभ्यास करावा लागणार आहे. त्या भाषेची बोर्ड परीक्षा द्यावी लागेल. उर्वरित चार बोर्ड परीक्षा विषय निवडताना गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, अन्य भाषा, संगीत, चित्रकला, गृहविज्ञान, व्यवसायाची मूलतत्त्वे, लेखाशास्त्र, संगणक ॲप्लिकेशन आणि कौशल्याधारित विषय यांमधून निवड करता येईल. या विद्यार्थ्यांना ऑटोमोटिव्ह विषय वगळता जास्तीत जास्त दोन कौशल्याधारित विषय निवडता येतील. मात्र, माहिती तंत्रज्ञान, संगणक ॲप्लिकेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तीन विषय एकत्र निवडता येणार नाहीत.

vinayak.dige@expressindia.com