पशुधन आणि श्वान, मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांना आधुनिक वैद्यकीय सेवा मिळावी या उद्देशाने केंद्र सरकाने पायाभूत सुविधा आणि मानवी संसाधनांच्या आवश्यकतांसह व्यापक राष्ट्रीय मार्गदर्शक मानके निश्चित केली आहेत. ती कोणती आणि त्यामुळे काय फायदा होईल, याचा हा आढावा.
केंद्र सरकारचा निर्णय काय?
‘लाइव्हमिंट’ या संकेतस्थळाने केंद्र सरकारमधील दोन अधिकाऱ्यांच्या हवालाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने देशातील पशुधनासाठी आणि पाळीव प्राण्यांच्या आरोग्यसेवेचे आधुनिकीकरण करण्यासाठी प्रथमच ‘पशुवैद्यकीय पायाभूत सुविधांच्या किमान मानकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे’ जारी केली आहेत. यामुळे विशेषतः दुर्गम भागात दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा उपलब्धतेतील असमानता दूर होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने पशुवैद्यकीय रुग्णालयांसाठी मानके तयार करण्यासाठी आणि तसेच तेथील सुविधा सक्षम करण्यासाठी एक समिती स्थापन केली. या समितीने १९ नोव्हेंबर रोजी सादर केलेल्या शिफारशी सरकारने देशभरातील पशुवैद्यकीय क्षेत्रात पायाभूत सुविधांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी स्वीकारल्या आहेत. यामध्ये दर्जेदार सेवा सुनिश्चित करण्यासाठी विशिष्ट भौतिक आवश्यकता अनिवार्य केल्या आहेत, ज्यामध्ये पशू तपासणी क्षेत्रे, पशुधन ठेवण्यासाठी पिंजरे, किरकोळ शस्त्रक्रिया युनिट आणि प्राथमिक केंद्रांसाठी औषध वितरण कक्ष यांचा समावेश आहे.
पशुवैद्यकीय सेवेचे चार स्तर कोणते?
पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने पाळीव प्राण्यांसाठी आणि पशुधनासाठी वैद्यकीय सेवेचे आधुनिकीकरण करण्यासाठी चार स्तरीय संस्थात्मक प्रणाली सादर केली आहे. मूलभूत स्तरावर, प्राथमिक पशुवैद्यकीय केंद्रे ग्रामपंचायतींना सेवा देतील. यामध्ये लसीकरण, सामान्य आजार आणि किरकोळ शस्त्रक्रियांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. येथे साधारण ५ हजार गुरांसाठी एक केंद्र असेल. तहसील स्तरावरील पशुवैद्यकीय रुग्णालये त्यांना मध्यम ते गुंतागुंतीच्या प्रकरणांना हाताळण्यासाठी तसेच आवश्यक सेवा देण्यासाठी साह्य करतील. जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयांचे तिसरे स्तर आपत्कालीन काळजी आणि प्रगत निदानासाठी प्रादेशिक केंद्र म्हणून काम करतील.
सर्वोच्च स्तरावर, राज्य पशुवैद्यकीय पॉलीक्लिनिक्स आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालये विषाणूशास्त्र, डिजिटल इमेजिंग आणि दंत काळजी यांसारख्या विशेष सेवा देतील. उच्च स्तरांमध्ये शस्त्रक्रिया विभाग, बायोकेमिकल लॅब, बायोसेफ्टी लेव्हल लॅब आणि शववच्छेदन या सुविधा असतील. मार्गदर्शक मानकांमध्ये कर्मचाऱ्यांची आवश्यकताही मांडण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा रुग्णालयांसाठी विशेष सर्जन आणि पॅथॉलॉजिस्टसह किमान १९ विभागांत कर्मचारी असणे अनिवार्य आहे. प्रत्येक प्राथमिक केंद्रासाठी एक हजार गुरांमागे किमान एक पशुवैद्यकीय डॉक्टर आणि एक पशुवैद्यकीय साहाय्यक असावा, असे यात म्हटले आहे. तसेच जिल्ह्यातील शेवटच्या टोकापर्यंत पशुवैद्यकीय सेवा पोहोचावी यासाठी आवश्यक औषधांचे किट आणि शस्त्रक्रिया सुविधांसह मोबाइल पशुवैद्यकीय युनिट असेल. या युनिटला टोल-फ्री कॉल सेंटरचे साह्य मिळेल.
पशुवैद्यकीय सेवेची सद्यःस्थिती काय?
भारतात ३० हजार १८४ सरकारी पशुवैद्यकीय दवाखाने, २४ हजार ५३२ मदत केंद्रे आणि १३ हजार १७३ रुग्णालये आहेत. याशिवाय, राज्य-संचालित पशुवैद्यकीय परिषदेच्या मते, सुमारे १० हजार खासगी पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. मोठ्या पशुवैद्यकीय दवाखाने आणि रुग्णालय साखळ्यांमध्ये मॅक्स व्हेट्स, सेस्ना लाइफलाइन, क्राऊन व्हेटर्नरी सर्व्हिसेस, डॉ. पॉज आणि अर्बन व्हेट यांचा समावेश आहे. इन्व्हेस्ट इंडिया आणि पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या मते, भारतात पाळीव प्राण्यांची संख्या ३.५ कोटी आहे. तर २० व्या पशुधन जनगणनेनुसार (२०१९) देशात ५३.५७ कोटी पशुधन आहे. ज्यामध्ये १९.२४ कोटी गुरेढोरे, १४.८८ कोटी शेळ्या, १०.९८ कोटी म्हशी, ७.४२ कोटी मेंढ्या आणि ९०.६ लाख डुकरांचा समावेश आहे. मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकी २०२५ नुसार, भारताच्या पशुधन क्षेत्राने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये सध्याच्या सकल मूल्यवर्धित (Gross Value Added – GVA) मध्ये ५.४९ टक्के म्हणजेच जवळपास ८.८६ लाख कोटी रुपयांचे योगदान दिले, तर आर्थिक वर्ष २५ मध्ये ६६ हजार २४९ कोटी रुपयांची उत्पादने निर्यात केली.
मार्गदर्शक मानकांचा फायदा काय?
ह्युमन वर्ल्ड फॉर ॲनिमल्स इंडियाच्या स्ट्रीट डॉग प्रकल्पाचे पशुवैद्य आणि संचालक डॉ. पीयूष पटेल यांनी सरकारने जाहीर केलेल्या मानकांचे स्वागत केले आहे. पायाभूत सुविधा बळकट झाल्यास त्याचा फायदा श्वान, मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांना होईल. पशुधन क्षेत्राचे आर्थिक योगदान प्रचंड असले तरी, ही मानके प्राण्यांच्या हितासाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या मानकांचे योग्य प्रकारे पालन होण्यासाठी सरकारने कर्मचाऱ्यांच्या कमतरतेवर आणि विशेष कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करावे, यासाठी आग्रही असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.
चंडीगडमधील पशुवैद्यकीय व्यावसायिक डॉ. अनुज कुमार यांनी सरकारच्या मार्गदर्शक मानकांमुळे प्राण्यांच्या आरोग्यसेवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच यामुळे पशुधनाबद्दल नैतिक पद्धती सुनिश्चित होतील आणि रोगांवर देखरेख राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अनेक पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे त्यांनी मान्य करत मार्गदर्शक मानकांच्या अंमलबजावणीमुळे प्राण्यांना वेळेवर आणि आधुनिक उपचार मिळतील, असेही त्यांनी या वेळी सांगितले. बाजारपेठेचा अभ्यास करणाऱ्या आणि त्या संदर्भात सल्ला देणाऱ्या केन रिसर्च या कंपनीच्या मते भारतातील पशुवैद्यकीय रुग्णालयांच्या बाजारपेठचे सध्या मूल्य २.१ अब्ज डाॅलर म्हणजेच जवळपास २१० कोटी असून सरकारने जाहीर केलेली मानके या बाजारपेठेच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.
dharmesh.shinde@expressindia.com

