-भक्ती बिसुरे

गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील (सर्व्हायकल कॅन्सर) पहिली भारतीय लस लवकरच उपलब्ध होणार असल्याची बातमी काही महिन्यांपूर्वी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे जाहीर करण्यात आली. सीरमने विकसित केलेल्या या लशीला केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाने (ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) मान्यता दिली आहे. ही काहीशी दिलासादायक बातमी समोर आल्यानंतर अल्पावधीतच या कर्करोगाची भारतावरील टांगती तलवार स्पष्ट करणारा अहवाल ‘लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकाकडून प्रकाशित करण्यात आला आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या जगातील दर पाच पैकी एक रुग्ण भारतात आहे. हे प्रमाण सुमारे २१ टक्के आहे, असे लॅन्सेटच्या अहवालात नोंदवण्यात आले आहे. त्यामुळेच या आजाराबद्दल माहिती देणारे हे विश्लेषण.

High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
hepatitis disease (1)
‘हेपिटायटिस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू; हा आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
wheat India wheat production estimated at 1120 lakh tonnes this year
यंदा गव्हाचे उच्चांकी उत्पादन? तापमान वाढीची झळ कमी; ११२० लाख टन उत्पादनाचा अंदाज

गर्भाशय मुखाचा कर्करोग म्हणजे काय?

गर्भाशय मुखाचा कर्करोग हा स्तनांच्या कर्करोगाखालोखाल महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे. ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) नामक विषाणूमुळे हा कर्करोग होतो. जगातील कर्करोगाच्या अनेक प्रकारांपैकी कारण माहिती असलेला बहुदा हा एकमेव कर्करोग आहे. दरवर्षी भारतातील सुमारे एक लाख २२ हजार ८४४ महिलांना या कर्करोगाचे निदान होते. त्यांपैकी सुमारे ६७ हजार ४७७ महिलांचा या कर्करोगामुळे मृत्यू होतो. १५ वर्षांवरील वयोगटातील महिलांना या कर्करोगाचा धोका सर्वाधिक आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी एचपीव्ही लस दिली जाते. प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असलेला हा एकमेव कर्करोग आहे.

लॅन्सेटने मांडलेली भारतातील सद्य:स्थिती काय?

दरवर्षी जगातील सुमारे सहा लाख नवीन महिलांना या कर्करोगाचा त्रास होतो. त्यांपैकी ५८ टक्के रुग्ण आशियामध्ये आहेत. त्यापाठोपाठ आफ्रिकेत २० टक्के, युरोप आणि अमेरिकेमध्ये प्रत्येकी १० टक्के रुग्ण आहेत. सुमारे ५८ टक्के मृत्यूही आशियामध्येच होत असून आफ्रिकेत हे प्रमाण २२ टक्के आणि लॅटिन अमेरिकेत ते सुमारे नऊ टक्के एवढे आहे. आशियातील रुग्णसंख्येपैकी २१ टक्के रुग्णसंख्या भारतात, तर उर्वरित १८ टक्के रुग्णसंख्या चीनमध्ये आहे. भारत, ब्राझील, थायलंड आणि पोलंड यांसारख्या देशांमध्ये प्रजनन दर कमी झाल्यामुळे तसेच चाचण्या आणि उपचारांचे पर्याय वाढत असल्यामुळे मृत्युदरात घट असल्याची दिलासादायक माहितीही या अहवालात नमूद करण्यात आली आहे. अल्प उत्पन्न गटातील लोकसंख्या, स्वच्छता आणि निरोगी आयुष्यासाठी लागणारा भवताल न मिळणाऱ्या महिलांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण आढळते. विशेषत: देहविक्री करणाऱ्या महिलांना हा कर्करोग होण्याचे प्रमाण लक्षणीय असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरच्या २०२० मधील माहितीतून हा तपशील समोर आला आहे.

हा कर्करोग कशामुळे होतो?

प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असलेला तसेच कर्करोग होण्याचे निश्चित कारण माहिती असलेलाही हा एकमेव कर्करोग आहे. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या नावाच्या विषाणूमुळे हा कर्करोग होतो. योनीमार्गातील संसर्ग, स्वच्छतेच्या सवयींचा अभाव अशा कारणांमुळे या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते. लहान वयापासून आलेले शारीरिक संबंध किंवा एकापेक्षा अधिक व्यक्तींशी आलेले संबंध, धूम्रपानासारख्या सवयी आणि इतर व्यसने, अनेक बाळंतपणे अशी पूरक कारणेही हा कर्करोग होण्यामागे आहेत. ४० ते ५० वर्ष वयोगटात याची लक्षणे दिसली असता त्याची सुरुवात सुमारे पाच ते १० वर्षे आधीच झालेली असण्याची शक्यता असते. इतर बहुतांश कर्करोगांप्रमाणे हा कर्करोगही प्राथमिक अवस्थेत लक्षात आला आणि त्याचे निदान झाले तर पूर्ण बरा होतो. ‘पॅप स्मिअर’ नावाच्या एका चाचणीद्वारे हा कर्करोग होण्याची शक्यताही पडताळून पाहता येते.

लक्षणे आणि उपचार?

प्राथमिक टप्प्यात या कर्करोगाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मात्र रक्तस्राव, पांढरा स्त्राव, ओटीपोटात दुखणे, शारीरिक संबंधांनंतर होणारा रक्तस्राव ही या कर्करोगाची काही प्रमुख लक्षणे असू शकतात. यांपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास पॅप स्मिअर सारखी चाचणी किंवा इतर तपासण्या करून घेतल्यास आजाराचे लवकरच्या टप्प्यात निदान होणे शक्य असते. गर्भाशय मुखाशी असलेली गाठ, त्यातून होणारा रक्तस्राव हेही एक लक्षण असल्यास योग्य उपचार आणि तपासण्यांची गरज असते. शस्त्रक्रियांद्वारे यावर उपचार केले जातात. मात्र, फारशी लक्षणे न दाखवता बराच काळ निरुपद्रवी राहून हा कर्करोग वाढला असता तो उर्वरित शरीरात पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे शक्यतो कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.

लशींबाबत सद्य:स्थिती काय?

गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंधासाठी सध्या दोन प्रकारच्या लशी उपलब्ध आहेत. गार्डासील आणि सर्व्हिरिक्स या दोन लशी वय वर्ष ११ ते ४५ दरम्यान तीन मात्रांमध्ये दिल्या जातात. या लशींमुळे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची शक्यता ९० टक्के कमी होते. मासिक पाळी जास्त दिवस येणे, अतिरिक्त रक्तस्राव होणे, दोन मासिक पाळ्यांतील अंतर कमी असणे, मासिक पाळी गेल्यानंतरही रक्तस्राव होत राहणे यांपैकी कोणतेही लक्षण दिसल्यास आवश्यक त्या शारीरिक तपासण्या करून निदान करणे योग्य ठरते. नियमित तपासणी, जनजागृती, योग्य उपचार या गोष्टींच्या मदतीने गर्भाशयाच्या कर्करोगामुळे होणारे मृत्यू टाळता येतात. त्याचबरोबर लस घेण्यामुळे कर्करोगाची शक्यता कमी करणेही आपल्या हातात आहे. सध्या भारतात उपलब्ध असलेल्या गार्डासील आणि सर्व्हिरिक्स या दोन लशी तीन मात्रांमध्ये घ्याव्या लागतात. त्यांच्या किमती प्रत्येक मात्रेसाठी अनुक्रमे तब्बल ३३०० आणि २८०० एवढ्या आहेत. सर्व्हिरिक्स ही एचपीव्ही प्रतिबंधात्मक लस ग्लॅक्सो स्मिथ क्लाईन या ब्रिटिश कंपनीतर्फे बनवली जाते. गार्डासिल ही लस अमेरिकन मर्क ॲण्ड कंपनीतर्फे बनवली जाते. त्यामुळेच संपूर्ण भारतीय बनावटीची लस उपलब्ध झाली असता लशीची किंमत पर्यायाने गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधातील संरक्षणच सर्वसामान्य महिलांच्या आवाक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.