Cervical Cancer Prevention: सामान्यतः किशोरवयीन मुलींमध्ये गर्भाशयमुखाच्या (सर्व्हायकल) कॅन्सराचा धोका अतिशय कमी असतो. मात्र, या वयात मानवी पॅपिलोमा विषाणूचा (HPV) संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हाच HPV पुढील आयुष्यात गर्भाशयमुखाच्या कॅन्सरचे एक प्रमुख कारण ठरू शकतो. दुर्दैवाने, HPV कसा पसरतो किंवा तो भविष्यात आरोग्यावर कोणते परिणाम करू शकतो, याची पुरेशी माहिती अनेकांना नसते. म्हणूनच हा संबंध समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. HPV आणि त्याच्या संभाव्य धोक्यांविषयी माहिती असल्यास किशोरवयीन मुलींना योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत होते आणि संभाव्य धोका टाळता येतो. उदाहरणार्थ, HPV लस घेणे आणि सुरक्षित वर्तनाचा अवलंब करणे. यामुळे वाढत्या वयात त्यांचे आरोग्य अधिक प्रभावीपणे सुरक्षित राहू शकते.
“गर्भाशयमुखाचा कॅन्सर प्रामुख्याने धोक्याची पातळी अधिक असलेल्या मानवी पॅपिलोमा विषाणू (HPV) संसर्गामुळे होतो. हा विषाणू इतका सामान्य आहे की, आयुष्यात कधीतरी बहुतांश लोकांचा त्याच्याशी संपर्क येतोच येतो,” चेन्नई येथील अपोलो क्रॅडल अँड चिल्ड्रन्स हॉस्पिटल्स, करापाक्कम येथील प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ, लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. सौम्या राघवन यांनी हेल्थ शॉट्ससी संवाद साधताना ही माहिती दिली. जर्नल ऑफ कोलपोस्कोपी अँड लोअर जेनिटल ट्रॅक्ट पॅथॉलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधात, गर्भाशयमुखाचा कॅन्सर हा जगभरातील महिलांमध्ये चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कॅन्सर असल्याची माहिती देण्यात आली आहे, तर भारतात कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या कारणांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. “किशोरावस्थेत HPV चा लवकर संपर्क झाल्यास पुढील आयुष्यात तरुण महिलांना आरोग्यविषयक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते,” असेही डॉ. राघवन यांनी स्पष्ट केले.
गर्भाशयमुखाच्या (सर्व्हायकल) कॅन्सरचा धोका कसा कमी करता येईल?
स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मते, काही महत्त्वाचे बदल वेळेवर केल्यास गर्भाशयमुखाच्या कॅन्सरचा धोका लक्षणीयरीत्या कमी करता येतो. यासाठी त्यांनी पाच महत्त्वाच्या उपाययोजना सांगितल्या आहेत.
१. HPV लस (व्हॅक्सिन)
किशोरवयीन मुलींमध्ये गर्भाशयमुखाच्या कॅन्सरचा धोका साधारणतः कमी असतो. तरीही या वयात मानवी पॅपिलोमा विषाणूचा (HPV) संसर्ग होऊ शकतो, आणि हाच संसर्ग पुढील आयुष्यात गर्भाशयमुखाच्या कॅन्सराचे कारण ठरू शकतो. याच पार्श्वभूमीवर HPV लस घेण्याची शिफारस केली जाते.
ही लस HPV च्या काही ठराविक प्रकारांपासून प्रभावी संरक्षण देते …विशेषतः गर्भाशयमुखाच्या कॅन्सराशी थेट संबंधित असलेल्या १६ आणि १८ या प्रकारांपासून. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ते १२ वयोगटात, शक्यतो लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्यापूर्वी, ही लस घेणे अधिक फायदेशीर ठरते. मात्र, वय वर्षे २६ किंवा त्याहून अधिक असले तरी डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसार ही लस घेता येते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, कमी वयात HPV लसीकरण केल्यास पुढील आयुष्यात गर्भाशयमुखाच्या कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. “ही लस फक्त लस घेणाऱ्या व्यक्तीचेच संरक्षण करत नाही, तर समाजातील इतर लोकांमध्ये आणि पुढील पिढ्यांमध्येही या कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करते,” असे स्त्रीरोगतज्ज्ञ स्पष्ट करतात. असा प्रतिबंधात्मक निर्णय तरुणांना अधिक सजग आणि सक्षम बनवतो, तसेच त्यांच्या एकूण आरोग्यावरही सकारात्मक परिणाम घडवून आणतो.
२. सुरक्षित लैंगिक वर्तन
HPV लस घेतल्यानंतरही सुरक्षित लैंगिक वर्तनाची जाणीव ठेवणे आणि ते पाळणे तितकेच आवश्यक आहे. “HPV लस संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करते, मात्र तो पूर्णपणे संपवू शकत नाही. त्यामुळे लैंगिक संबंधांच्या वेळी नेहमी कंडोमचा वापर करणे गरजेचे आहे,” असे लॅप्रोस्कोपिक सर्जन सांगतात. यामुळे HPV बरोबरच इतर लैंगिक संसर्गजन्य आजारांपासूनही संरक्षण मिळते. विविध आजारांचा प्रसार रोखण्यास कंडोम उपयुक्त ठरतात, परंतु विषाणूच्या संपर्कात येऊ शकणाऱ्या सर्व भागांचे ते संपूर्ण संरक्षण करू शकत नाहीत. त्यामुळेच “लैंगिक साथीदारांची संख्या मर्यादित ठेवणे हा अधिक सुरक्षित आणि शहाणपणाचा मार्ग आहे,” असे फर्टिलिटी स्पेशालिस्ट स्पष्ट करतात. तसेच, आपल्या लैंगिक आरोग्याविषयी जोडीदाराशी मोकळेपणाने संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही पारदर्शकता नातेसंबंध अधिक दृढ करते आणि प्रत्येकाला स्वतःच्या आरोग्याबाबत जबाबदारीने व जागरूकपणे निर्णय घेण्यास मदत करते.
३. निरोगी जीवनशैली स्वीकारा
तरुण वयात घेलेले जीवनशैलीविषयक निर्णय पुढील आयुष्यातील एकूण आरोग्यावर मोठा प्रभाव टाकतात… त्यात गर्भाशयमुखाच्या आरोग्याचाही समावेश आहे. “धूम्रपानामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, त्यामुळे HPV आणि इतर संसर्गांशी लढणे अधिक कठीण होते,” असे डॉक्टर सांगतात. सिगारेटमधील घातक रसायने गर्भाशयमुखातील पेशींना थेट इजा करू शकतात, त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.
म्हणूनच धूम्रपान टाळून फळे, भाज्या आणि धान्य यांनी समृद्ध असा संतुलित आहार स्वीकारणे अधिक हितावह ठरते. असा आहार रोगप्रतिकारक शक्ती बळकट करतो आणि एकूण आरोग्य सुधारतो. “यासोबतच नियमित व्यायाम, पुरेसे पाणी पिणे आणि ध्यान किंवा योगासारख्या उपायांनी तणाव नियंत्रणात ठेवले, तर शरीरासाठी एक मजबूत पाया तयार होतो,” असे तज्ज्ञ स्पष्ट करतात. यामुळे आरोग्याशी संबंधित विविध धोक्यांना सामोरे जाणे शरीरासाठी अधिक सोपे होते.
४. तपासण्यांविषयी माहिती ठेवणे आणि जागरूक राहणे
साधारणतः गर्भाशयमुखाच्या कॅन्सरसाठी तपासणी आयुष्याच्या विशीच्या नंतरच्या टप्प्यात सुरू करण्याची शिफारस केली जाते. तरीही, या तपासण्यांचे महत्त्व लवकर समजून घेणे आणि त्याबाबत जागरूक राहणे अत्यावश्यक आहे. “गर्भाशयमुखाचा कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात बहुतांश वेळा कोणतीही ठळक लक्षणे दाखवत नाही. कॅन्सर अधिक वाढल्यानंतरच समस्या जाणवू लागतात,” असे डॉ. राघवन स्पष्ट करतात.
म्हणूनच विशीच्या सुरुवातीच्या काळात पॅप चाचणी (Pap test) आणि HPV चाचणीद्वारे नियमित तपासणी सुरू करणे महत्त्वाचे ठरते. या चाचण्या गर्भाशयमुखात कॅन्सर होण्यापूर्वी होणारे सूक्ष्म बदल ओळखू शकतात. बीएमसी मेडिकल एथिक्सच्या अहवालांनुसार, आरोग्यातील बदलांचे लवकर निदान अत्यंत निर्णायक ठरते, कारण त्यामुळे कॅन्सरचे प्रमाण तसेच त्यामुळे होणारे मृत्यू कमी करता येतात. “वय वाढत जाईल, त्यानुसार तपासण्यांचे नियमित वेळापत्रक ठरवणे ही प्रत्येक महिलेची प्राधान्यक्रमाची बाब असली पाहिजे,” असे डॉक्टर सांगतात. ही माहिती मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबीयांनाही शेअर करा. एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा सोपा, पण प्रभावी मार्ग आहे.
५. आरोग्यविषयक संवादासाठी सुरक्षित वातावरण तयार करा
आरोग्याशी संबंधित विषयांवर… विशेषतः लैंगिक आणि प्रजनन आरोग्यावर… मोकळेपणाने व निर्भयपणे चर्चा करता येईल, असे वातावरण निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. “सुरुवातीला असे विषय बोलताना संकोच वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, मित्रमैत्रिणी, कुटुंबीय किंवा विश्वासू प्रौढ व्यक्तींशी या मुद्द्यांवर संवाद साधल्यास प्रजनन आरोग्याबाबत असलेली भीती, लाज आणि गैरसमज हळूहळू दूर होतात,” असे तज्ज्ञ सांगतात.
माहिती असणे म्हणजेच सक्षम होणे. “जेव्हा आपण गर्भाशयमुखाच्या आरोग्याविषयी खुलेपणाने बोलतो, तेव्हा अधिकाधिक तरुण लाज किंवा अपुरी माहिती यामुळे मागे न राहता वेळेवर योग्य उपचार आणि मार्गदर्शन घेतात,” असेही तज्ज्ञ स्पष्ट करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून, तसेच सामुदायिक आरोग्य कार्यशाळांद्वारे स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याबाबत जागरूकता पसरवणे हे एक सकारात्मक, प्रभावी आणि समाजोपयोगी पाऊल ठरते.

