Delhi Murder Case arrest of long-term fugitive Chhabbi Lal after 35 years: दिल्लीतील एका थक्क करणाऱ्या ‘कोल्ड केस’चा शेवट तब्बल ३५ वर्षांनी झाला. केवळ एक जुना धूसर फोटो आणि जुन्या जमान्यातील फीचर फोनच्या तांत्रिक विश्लेषणाच्या जोरावर दिल्ली पोलिसांनी एका खुनी आरोपीला जेरबंद केले. ‘छब्बी लाल, इथे ये’ ही हाक पोलिसांसाठी ठरली आरोपीची ओळख पटवणारी आणि अखेरीस तीन दशकांहून अधिक काळ पोलिसांना चकवणाऱ्या या कहाणीचा शेवट झाला.

३५ वर्षांनंतर पकडला गेलेला आरोपी

१० एप्रिल २०२६…
संध्याकाळची वेळ

पंजाबमध्ये लुधियानातील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाजवळच्या चार मजली इमारतीभोवती काही अनोळखी लोक सतर्कतेने नजर ठेवून होते. कोचिंग क्लासेस आणि खाजगी कार्यालये असलेल्या इमारतीत नेहमीचाच गजबजाट होता. मात्र त्या दिवशी पोलिसांच्या दृष्टीने मात्र तो एक ‘स्पेशल ऑपरेशन झोन’ होता… संध्याकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास, एक सडपातळ, मध्यम उंचीची (सुमारे ५ फूट ७ इंच) ६२ वर्षीय व्यक्ती विडी ओढण्यासाठी बाहेर आली. विडीचे झुरके ओढत असतानाच अचानक मागून आवाज आला… “छब्बी लाल, इथे ये!” त्या व्यक्तीने वळून पाहिले… आणि गेली ३५ वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी पोलिसांच्या हाती लागला!

१९९१ पासून फरार

त्याने मागे वळून पाहिल्यानंतर तत्काळ दिल्ली पोलिसांच्या पथकाने त्याला घेरले आणि अटक केली. तब्बल १९९१ पासून पोलीस या फरार आरोपीच्या शोधात होते. खुनाच्या आरोपाखाली ज्याला पोलिसांनी अटक केली, त्याचे नाव होते, छब्बी लाल उर्फ चावी लाल वर्मा! १९९१ च्या सुरुवातीला, उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथून चावी लाल वर्मा नोकरीच्या शोधात दिल्लीत आला. पूर्व दिल्लीतील एका पडद्यांच्या दुकानात त्याला काम मिळाले. राहण्यासाठी त्याने पश्चिम विनोद नगर येथे एक खोली भाड्याने घेतली. हे घर होते अमरजीत सुरी यांचे, जे परदेशात राहत होते. त्यांच्या पत्नी गीता सुरी आणि १८ वर्षांचा मुलगा मोंटू हे त्या घरात राहत होते.

आयुष्याला कलाटणी देणारी रात्र

२ ऑगस्ट १९९१ हा दिवस मात्र त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या रात्री वर्माने चोरीच्या उद्देशाने सूरी यांच्या घरात प्रवेश केला. मात्र गीता सूरी जाग्या झाल्या आणि त्यांनी आरडाओरडा केला. घाबरलेल्या वर्माने धारदार चाकूने त्यांच्यावर हल्ला केला. या गोंधळात मोंटूही जागा झाला आणि आईला वाचवण्याचा प्रयत्न करताना वर्माने त्याच्यावरही हल्ला केला. दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. गीता सूरी यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला, तर मोंटूला उपचारासाठी रुग्णालयातच ठेवण्यात आले. या घटनेनंतर वर्मा मात्र तिथून पसार झाला…

Delhi Murder Case accused Chhabbi Lal arrest | 35 years after murder case investigation Delhi Police | दिल्ली मर्डर केस आरोपी अटक | ३५ वर्षांनंतर पकडला खुनाचा आरोपी छब्बी लाल
तब्बल ३५ वर्षांनंतर आरोपीला शिताफीने पकडणारे पोलीस पथक आरोपीसह

पोलिसांना दिला चकवा

हल्ल्यानंतर काही तास रस्त्यावर भटकत राहिल्यानंतर, वर्मा याने ट्रेनकडून कोलकात्याला पोबारा केला. तिथे तो नातेवाईकांकडे सहा-सात महिने लपून राहिला. त्यानंतर तो मुंबईत गेला, धारावीमध्ये राहिला आणि मजुरी केली. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी त्याच्या सुलतानपूर येथील घरी छापा टाकल्याची माहिती त्याला मिळाली. भीतीपोटी त्याने पुन्हा ठिकाण बदलले आणि नागपूरला गाठले, तिथे संत्र्यांच्या बागेत काम केले. काही वर्षांनी त्याने गोवा गाठले आणि तिथे एका हॉटेलमध्ये काम करू लागला.

आधार कार्डही तयार केले

गोव्यातच त्याची भेट पंजाबमधील एका व्यावसायिकाशी झाली. त्याने लुधियान्यातील गारमेंट मिलमध्ये कामाची ऑफर दिली. वर्माने ती स्वीकारली आणि पुन्हा एकदा स्थलांतर केले. या दरम्यानच्या काळात त्याने ‘छब्बी लाल वर्मा’ या नावाने आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे तयार केली. ओळख बदलून तो समाजात वावरू लागला.

पोलिसांसाठी आव्हानांची मालिका

१९९० च्या दशकात पोलिसांकडे आजच्या सारखी तांत्रिक साधने नव्हती. मोबाईल फोन नव्हते, सीसीटीव्ही नव्हते आणि भाडेकरू पडताळणीची व्यवस्थाही नव्हती. त्यामुळे वर्माचा माग काढणे पोलिसांसाठी अतिशय कठीण होते. पोलिसांनी त्याच्या सुलतानपूरमधील घरी चौकशी केली. त्याच्या पत्नीने सांगितले की, तो दिल्लीहून परतलाच नाही. काही काळानंतर न्यायालयाने त्याला ‘फरार आरोपी’ घोषित केले आणि प्रकरण ‘कोल्ड केस सेल’कडे वर्ग करण्यात आले.

फाईल पुन्हा उघडली आणि…

अलीकडेच दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचने हे प्रकरण पुन्हा हाती घेतले. सहा महिन्यांपूर्वी एक महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला. वर्माच्या कुटुंबीयांना एका विशिष्ट नंबरवरून कॉल येत होते, तो नंबर शोधणे अत्यंत कठीण होते. अनेक नातेवाईकांचे फोन तपासून अखेर त्या नंबरचा माग काढण्यात आला. तांत्रिक विश्लेषणातून पोलिसांच्या लक्षात आले की, हा नंबर स्मार्टफोनमध्ये नव्हे, तर जुन्या बटने असलेल्या फीचर फोनमध्ये अॅक्टिवेट करण्यात आला आहे. शिवाय तो फोन अनेकदा बंदच असतो. तरीही पोलिसांनी संयम सोडला नाही आणि अखेरीस हा नंबर पोलिसांना लुधियान्यातील एका इमारतीपर्यंत घेऊन गेला.

जुन्या फोटोची मदत आणि पोलिसांचे चातुर्य

पोलिसांकडे वर्माचा फक्त ३५ वर्षांपूर्वीचा धूसर फोटो होता. त्या फोटोच्या आधारे त्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्या इमारतीभोवती तब्बल सहा तास सापळा रचला होता. संध्याकाळी ती विडी ओढणारी व्यक्ती पाहून त्यांना संशय आला होता. त्याचा बांधा आणि उंची फोटोशी जुळत होती. त्याने खिशातून फीचर फोन बाहेर काढला आणि परत ठेवला… तेव्हा पोलिसांच्या मनातील संशयाला बळकटी मिळाली आणि त्यांनी त्याचा पाठलाग केला. एका ठिकाणी तो ट्रान्सफॉर्मरजवळ तो थांबलेला असतानाच . पोलिसांनी डाव साधला आणि त्याला जुन्या नावाने हाक मारली… “छब्बी लाल!” त्याने मागे वळून पाहिले तेव्हा पोलीस तयारच होते!

फरार आयुष्याचा शेवट

अटकेनंतर चौकशीत वर्माने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला वाटले होते की, आई- मुलगा दोघेही मृत झाले आहेत आणि त्यामुळे तो या गुन्ह्यातून कायमचा सुटला आहे. तो लुधियानामध्ये एका इमारतीत १५ हजार रुपये पगारावर केअरटेकर म्हणून काम करत होता आणि तिथेच गच्चीवर असलेल्या छोटेखानी खोलीमध्ये राहात होता. फरार असताना तो अधूनमधून आपल्या कुटुंबालाही भेटत होता. त्याला दुसरा मुलगाही झाला, जो सध्या विवाहित असून त्या मुलालाही एक वर्षांचा मुलगा आहे.

गुन्ह्याचा माग कधीच पूर्णपणे पुसला जात नाही

या प्रकरणातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, काळ कितीही लोटला तरी गुन्ह्याचा माग कधीच पूर्णपणे पुसला जात नाही. एक साधा फीचर फोन, एक जुना फोटो, आणि पोलिसांची चिकाटी या तिन्हींच्या जोरावर ३५ वर्षांपूर्वीचा गुन्हा उघड झाला. ज्या घरात खून झाला ते त्रिलोकपुरीतील घर आज अस्तित्वात नाही. त्या जागी चार नवीन घरे उभी आहेत. सुरी कुटुंब त्यानंतर कुठे राहायला गेले याबाबतही कुणाला फारशी माहिती नाही. पण त्या रात्रीचा रक्तरंजित इतिहास आणि आरोपीचे तब्बल ३५ वर्षे फरार होणे, यााला आता पूर्णविराम मिळाला आहे.

पोलिसांची हाक आणि प्रतिकात्मक क्षण

ही कहाणी केवळ एका आरोपीच्या अटकेची नाही, तर तपास यंत्रणांच्या सातत्याची आहे. तंत्रज्ञान बदलते, पद्धती बदलतात, पण न्यायाची प्रक्रिया थांबत नाही हेच या प्रकरणाने पुन्हा एकदा सिद्ध केले. आणि कदाचित म्हणूनच, “छब्बी लाल” ही पोलिसांनी मारलेली हाक भारतीय गुन्हेगारी इतिहासातील एक प्रतिकात्मक क्षण ठरते.