अन्वय सावंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘युएफा’ चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या शनिवारी (२८ मे) होणाऱ्या अंतिम लढतीत लिव्हरपूल आणि रेयाल माद्रिद हे बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत. चॅम्पियन्स लीग ही युरोप आणि किंबहुना जगातील सर्वात प्रतिष्ठेची क्लब फुटबॉल स्पर्धा मानली जाते. त्यामुळे यंदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावत क्लब फुटबॉलवरील मक्तेदारी पुन्हा एकदा सिद्ध करण्याचा लिव्हरपूल आणि रेयाल या दोन्ही माजी विजेत्या संघांचा मानस असेल.

कोणत्या संघाचे पारडे जड आहे? 

स्पॅनिश संघ रेयाल माद्रिदने विक्रमी १३ वेळा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावले आहे, तर इंग्लिश संघ लिव्हरपूलला सहा वेळा ही स्पर्धा जिंकण्यात यश आले आहे. तसेच गेल्या आठ हंगामांमध्ये रेयालने (२०१४, २०१६, २०१७, २०१८) चार वेळा, तर लिव्हरपूलने (२०१९) एकदा चॅम्पियन्स लीगच्या चषकावर आपले नाव कोरले आहे. त्यामुळे या आकड्यांच्या आधारे रेयालचे पारडे जड मानले जाऊ शकते. परंतु, जर्मन प्रशिक्षक युर्गन क्लॉप यांच्या मार्गदर्शनात लिव्हरपूलनेही गेल्या काही हंगामांत दर्जेदार कामगिरी केली आहे. त्यातच २०१८च्या अंतिम सामन्यात लिव्हरपूलला रेयालकडून पराभव पत्करावा लागला होता. यंदा त्या पराभवाची परतफेड करण्याचा लिव्हरपूलचा प्रयत्न आहे. 

लिव्हरपूलचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास कसा होता?

यंदा साखळी फेरीत लिव्हरपूलचा ब-गटात समावेश होता. त्यांनी ॲटलेटिको माद्रिद, एसी मिलान आणि पोर्टो या संघांना प्रत्येकी दोन वेळा पराभूत करत गटविजेत्याच्या थाटात बाद फेरीत प्रवेश केला. तसेच एखाद्या हंगामात आपले सर्व साखळी सामने जिंकणारा लिव्हरपूल हा पहिलाच इंग्लिश संघ ठरला. त्यानंतर त्यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत ‘सेरी ए’ स्पर्धेतील गतविजेत्या इंटर मिलानवर २-१ (दोन टप्प्यांतील सामन्यांत मिळून)  अशी मात केली.  नंतर उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत अनुक्रमे बेनफिका (६-४) आणि व्हिलारेयाल (५-२) या तुलनेने दुबळ्या संघांना पराभूत करत त्यांनी दहाव्यांदा चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी गाठली.

रेयालने अंतिम फेरी गाठण्यासाठी कोणत्या संघांवर मात केली?

यंदा ड-गटात समाविष्ट असणाऱ्या रेयालने सहा पैकी पाच साखळी सामने जिंकत गटविजेतेपद मिळवले. त्यानंतर बाद फेरीतील त्यांची वाटचाल लिव्हरपूलच्या तुलनेत खडतर ठरली. रेयालला फ्रेंच स्पर्धेतील गतविजेता पॅरिस सेंट-जर्मेन, चॅम्पियन्स लीगचा गतविजेता चेल्सी आणि गतउपविजेता मँचेस्टर सिटी या संघांचा बाद फेरीतील सलग फेऱ्यांमध्ये सामना करावा लागला. उपउपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या टप्प्याचा सामना सेंट-जर्मेनने १-० अशा फरकाने जिंकल्यानंतर रेयालने दमदार पुनरागमन करताना दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात ३-१ अशी बाजी मारली.

त्यानंतर चेल्सीविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या टप्प्याचा सामना रेयालने ३-१ असा जिंकला. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात चेल्सीने पुनरागमन केले. त्यांनी ९० मिनिटांच्या खेळात ३-१ अशी आघाडी मिळवल्याने एकूण लढतीत ४-४ अशी बरोबरी झाली. त्यानंतर बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी झालेल्या ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत करीम बेन्झिमाने गोल केल्याने रेयालने स्पर्धेत आगेकूच केली. उपांत्य फेरीत दोन्ही टप्प्यांतील सामन्यावर मँचेस्टर सिटीने वर्चस्व गाजवले. त्यांनी पहिल्या टप्प्यातील सामना ४-३ असा जिंकल्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या सामन्यात आणखी एक गोल केला. या सामन्याच्या ८९व्या मिनिटांपर्यंत त्यांच्याकडे एकूण ५-३ अशी आघाडी होती. मात्र, सामना संपायला काही मिनिटेच शिल्लक असताना रॉड्रिगोने दोन गोल करत रेयालला ५-५ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर अतिरिक्त वेळेत बेन्झिमाने गोल करत रेयालला अंतिम फेरीत पोहोचवले. 

अंतिम फेरीत कोणत्या खेळाडूंवर नजर असेल? 

लिव्हरपूल आणि रेयाल या दोन्ही संघांमध्ये तारांकित खेळाडूंचा भरणा आहे. मात्र, रेयालची भिस्त प्रामुख्याने आघाडीपटू बेन्झिमावर आहे. त्याने यंदा चॅम्पियन्स लीगमध्ये ११ सामन्यांत १५ गोल झळकावले आहेत. तसेच त्याला बाद फेरीत १० गोल करण्यात यश आले आहे. त्यामुळे त्याने एका हंगामात बाद फेरीमध्ये सर्वाधिक गोल करण्याच्या ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. रेयालकडून लुका मॉड्रिच आणि व्हिनिसियस यांनीही सातत्यपूर्ण खेळ केला आहे. दुसरीकडे लिव्हरपूलकडे मोहम्मद सलाह आणि सादियो माने यांसारखे आघाडीपटू आहेत. या दोघांकडेही महत्त्वाच्या सामन्यांत गोल करण्याचा अनुभव आहे. तसेच बचावपटू व्हर्जिल व्हॅन डाइक आणि गोलरक्षक ॲलिसन यांना बेन्झिमाला रोखण्यासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागेल. 

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Champions league football final liverpool reyal match print exp pmw
First published on: 27-05-2022 at 19:46 IST