Chandipura Outbreak : गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. यंदाच्या पावसाळ्यात या विषाणूमुळे आतापर्यंत २२ मुलांचा मृत्यू झाला आहे; तर अनेक मुलांवर उपचार सुरू आहेत. या दुर्मीळ, पण धोकादायक विषाणूने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवली आहे. गुजरातचे आरोग्यमंत्री प्रफुल पानशेरिया यांनी सांगितले की, संशयित १८४ जणांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३५ जणांना चांदीपुरा विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे.

दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गुजरात आरोग्य विभागाने प्रभावित भागांमध्ये देखरेख, तपासणी आणि निरीक्षण वाढवले आहे. संशयित रुग्णांची लवकर ओळख करून संसर्गाचा प्रसार रोखण्याचे कसोशीने प्रयत्न करीत आहेत.

चांदीपुरा विषाणू म्हणजे काय?

चांदीपुरा विषाणू (CHPV) हा दुर्मीळ, पण अत्यंत धोकादायक विषाणू असून, तो रॅब्डोव्हिरिडी (Rhabdoviridae) गटातील आहे. या विषाणूमुळे अक्यूट एन्सेफलायटिस सिंड्रोम (AES) हा मेंदूला सूज आणणारा गंभीर आजार होऊ शकतो. सुरुवातीला ताप, उलट्या आणि अशक्तपणा, अशी साधी लक्षणे दिसतात; मात्र काही तासांतच रुग्णाला झटके येणे, शुद्ध हरपणे आणि मेंदूवर परिणाम होण्यास सुरुवात होऊ शकते. विशेषतः १५ वर्षांखालील मुलांमध्ये हा संसर्ग अधिक धोकादायक ठरतो आणि योग्य वेळी उपचार न मिळाल्यास ४८ ते ७२ तासांत परिस्थिती गंभीर होऊ शकते. सध्या या विषाणूवर विशिष्ट औषध किंवा लस उपलब्ध नाही आणि त्यामुळे वेळेत वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे ठरते.

१९६५ मध्ये महाराष्ट्रातील नागपूरजवळील चांदीपुरा गावात हा विषाणू प्रथम आढळून आला आणि त्यावरूनच त्याला ‘चांदीपुरा विषाणू’, असे नाव देण्यात आले. हा विषाणू प्रामुख्याने वाळूमाशी (Sandfly)च्या चाव्यामुळे पसरतो. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि इतर काही राज्यांमध्ये या विषाणूचा प्रसार झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवणे, कीटकांचा प्रादुर्भाव कमी करणे आणि मुलांचे कीटकांच्या चाव्यापासून बचाव करणे, असा सल्ला देण्यात येत आहे.

चांदीपुरा विषाणू संसर्ग कसा होतो?

चांदीपुरा हा कीटकांद्वारे पसरणारा (Vector-borne) आजार आहे. या विषाणूचा प्रसार प्रामुख्याने वाळूमाशीमुळे होत असला तरी काही अभ्यासांमध्ये डास आणि गोचीड यांच्या चाव्यामुळे आजाराची लागण होऊ शकते, असे समोर आले आहे. विशेषत: पावसाळ्यात किंवा पावसानंतरच्या दमट हवामानातही वाळूमाशांची अधिक पैदास होऊ शकते. त्यामुळे यादरम्यान विषाणूचा प्रसार वाढण्याचा अधिक धोका उद्भवतो.

तज्ज्ञांच्या मते, वाळूमाश्या ओलसर आणि अस्वच्छ ठिकाणी जास्त प्रमाणात आढळतात. मातीच्या भिंतींमधील भेगा, ओलसर जमीन, जनावरांचे गोठे आणि सेंद्रिय कचरा साचलेली ठिकाणे ही त्यांची प्रमुख प्रजननस्थळे आहेत. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवणे, कचरा साचू न देणे आणि कीटकांपासून संरक्षणासाठी आवश्यक खबरदारी घेणे महत्त्वाचे मानले जाते.

चांदीपुरा विषाणूची लागण झाल्यानंतर काय होते?

चांदीपुरा विषाणूची लागण झाल्यानंतर सुरुवातीला साधा ताप किंवा व्हायरल संसर्ग असल्यासारखी लक्षणे दिसू शकतात. मात्र, हा विषाणू शरीरात गेल्यानंतर २४ ते ४८ तासांतच गंभीर स्वरूप धारण करू शकतो. हा विषाणू मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम करीत असल्याने मेंदूला सूज (Acute Encephalitis Syndrome – AES) येऊ शकते. त्यामुळे रुग्णाची प्रकृती अतिशय वेगाने खालावू शकते.

चांदीपुरा विषाणूची सुरुवातीची लक्षणे

  • अचानक तीव्र ताप येणे
  • तीव्र डोकेदुखी
  • उलट्या किंवा मळमळ होणे
  • अंगदुखी
  • प्रचंड अशक्तपणा आणि थकवा येणे

संसर्ग गंभीर झाल्यास दिसणारी लक्षणे

  • झटके (फिट्स) येणे
  • गोंधळलेली अवस्था किंवा शुद्धीवर परिणाम होणे
  • सतत झोप येणे
  • शुद्ध हरपणे
  • मेंदूला सूज येणे
  • कोमामध्ये जाणे

चांदीपुरा विषाणू इतका धोकादायक का?

चांदीपुरा विषाणूचा सर्वांत मोठा धोका म्हणजे हा आजार अतिशय वेगाने गंभीर स्वरूप करू शकतो. विशेषतः लहान मुलांमध्ये संसर्ग झाल्यानंतर काही तासांतच मेंदूवर परिणाम होऊ शकतो. याआधीच्या उद्रेकांमध्ये मुलांमधील मृत्युदर ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे तापासोबत फीट येणे, गोंधळ किंवा शुद्ध हरपण्यासारखी लक्षणे दिसताच तातडीने रुग्णालयात दाखल करणे अत्यंत गरजेचे असल्याचे डॉक्टर सांगतात.

चांदीपुरा विषाणूचे निदान कसे केले जाते?

चांदीपुरा विषाणूची लागण झाली आहे की नाही, हे निश्चित करण्यासाठी डॉक्टर प्रयोगशाळेतील काही विशेष चाचण्या करतात.

आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचणी – रक्त किंवा मेंदूभोवतीच्या द्रवामध्ये (CSF) विषाणूचे जनुकीय अंश आहेत का, हे तपासले जाते.

आयजीएम एलिसा (IgM ELISA) चाचणी – विषाणूविरुद्ध शरीराने तयार केलेल्या प्रतिपिंडांची (Antibodies) तपासणी केली जाते.

उपचारासाठी लस किंवा औषध उपलब्ध आहे का?

सध्या चांदीपुरा विषाणूवरील उपचारांसाठी कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा विशिष्ट अँटीव्हायरल औषध उपलब्ध नाही. त्यामुळे उपचार हे रुग्णाची प्रकृती स्थिर ठेवण्यावर आणि गुंतागुंत टाळण्यावर भर देणारे असतात.

उपचारांमध्ये प्रामुख्याने पुढील गोष्टींचा समावेश होतो

गंभीर रुग्णांसाठी अतिदक्षता विभागात (ICU) उपचार
फीट नियंत्रित करण्यासाठी औषधे
शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि रक्तदाब टिकवण्यासाठी शिरेतून द्रव (IV Fluids)
मेंदूची सूज कमी करण्यासाठी उपचार

ही लक्षणे दिसताच रुग्णालयात दाखल झाल्यास मृत्यूचा धोका कमी होण्यास मदत होते. विशेषतः तपासासोबत मेंदूवर परिणाम झाल्याची चिन्हे दिसण्यास सुरू झाले, तर उपचारात अजिबात विलंब करू नये, असे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले आहे.