पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदावर सर्वाधिक कालावधीसाठी राहण्याचा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडीत काढला. मोदी यांना पंतप्रधानपदी १२ वर्षे म्हणजेच ४३९९ दिवस पूर्ण झाले आहेत. दरम्यान, चालू वर्ष हे भारताच्या एका माजी पंतप्रधानाचे जन्मशताब्दी वर्ष आहे. भाजपाने अनेक नेत्यांच्या पुण्यतिथी व जयंती साजरी केल्या आहेत. परंतु, या माजी पंतप्रधानाकडे भाजपाचे दुर्लक्ष झाले. त्यांचे नाव आहे चंद्रशेखर. १७ एप्रिल १९२७ रोजी उत्तर प्रदेशातील बलिया येथे जन्मलेले चंद्रशेखर हे भारताचे माजी पंतप्रधान आहेत. पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक होणार आहे. चंद्रशेखर यांचे धाकटे पुत्र नीरज शेखर हे भाजपाचे राज्यसभा खासदार आहेत. सत्तेत दुसऱ्या क्रमांकावर कधीही राहू न इच्छिणारे, बंड करून पंतप्रधान पद मिळवणारे व भारत यात्रा काढणारे तसेच काँग्रेस फोडण्याबाबत इंदिरा गांधींना स्पष्टपणे चेतावणी देणारे चंद्रशेखर कोण होते, आजच्या राजकारणातही ते महत्त्वाचे का ठरतात? जाणून घेऊयात.
चंद्रशेखर हे राजपूत समाजातील नेते होते. उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील भाग भाजपासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याच भागात चंद्रशेखर यांच्या नावाचा भाजपाला फायदा होऊ शकतो. दरम्यान, सध्या राजकीय पक्षांमध्ये फूट पडण्याचे सत्र सुरू आहे. आधी तृणमूल काँग्रेस, नंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदार फुटले. या परिस्थितीत विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या जनता दलात बंड करून ६३ खासदारांना घेऊन बाहेर पडलेल्या चंद्रशेखर यांना स्मरण करणे महत्त्वाचे ठरते.

काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य असतानाही चंद्रशेखर यांना अटक का झाली?
काँग्रेसचे वर्चस्व कमी होऊन देशात अनेक पक्ष एकत्र येण्याचा तो काळ होता. त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या चंद्रशेखर यांनी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमधील तरूण नेत्यांची एक मोट बांधली होती. आज जसे राहुल गांधी मोदींविरोधात ‘भांडवलशाही’चा (अडाणी-अंबानींना प्राधान्य दिले जाते) आरोप करतात, तसाच आरोप चंद्रशेखर यांनी इंदिरा गांधी यांच्या ‘क्रोनी कॅपिटलिझ्म’ (भांडवलशाही) विरोधात करण्यास सुरूवात केली होती.
२५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी घोषित केली होती. त्यावेळी चंद्रशेखर यांना काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य असतानाही इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांसह अटक करण्यात आली. हाच चंद्रशेखर यांच्यासाठी महत्त्वाचा क्षण ठरला. चंद्रशेखर यांनी काँग्रेस सोडली. इंदिरा गांधी यांच्याविरोधात विरोधकांना एकजूट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. २५ जून १९८३ रोजी चंद्रशेखर यांनी त्यांची ४२०० किमीची कन्याकुमारी ते दिल्ली ही भारत यात्रा संपन्न केली.
दरम्यान, त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत विरोधकांचा दारूण पराभव झाला. दोन वर्षानंतर व्ही. पी. सिंह (विश्वनाथ प्रताप सिंह) काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी विरोधकांना एकत्र करण्यास सुरूवात केली होती. राजीव गांधी यांच्यानंतर विश्वनाथ प्रताप सिंह हे देशाचे पंतप्रधान झाले होते.
“मी काँग्रेसमध्ये फूट पाडेन”, असे चंद्रशेखर यांनी इंदिरा गांधींना तोंडावर का सांगितले?
चंद्रशेखर यांची प्रतिमा एका ‘धाकड’ नेत्याची होती. ते एक धडाडीचे नेते होते. प्रस्थापित नेत्यांविरोधात त्यांनी बंड केले होते. चंद्रशेखर यांनी १९६५ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांची इंदिरा गांधींशी भेट घडवून आणण्यात आली होती. त्यावेळी इंदिरा गांधी या तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात माहिती व प्रसारण मंत्री होत्या. राज्यसभेचे सध्याचे विद्यमान उपसभापती हरिवंश सिंह यांनी चंद्रशेखर यांचे जीवन चरित्र लिहिले आहे. त्यात त्यांनी लिहिले, काँग्रेस पक्षात प्रवेश का केला असे इंदिरा गांधी यांनी तरूण चंद्रशेखर यांना विचारले होते. त्यावर ते म्हणाले, काँग्रेसला समाजवादाकडे वळवण्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. इंदिरा गांधी यांनी पुढे विचारले, जर त्यात यश आले नाही तर काय ? त्यावर चंद्रशेखर म्हणाले, “त्या परिस्थितीत, मी प्रयत्न करेन आणि काँग्रेसमध्ये फूट पाडेन.” इंदिरा गांधींनी विचारले, “का?” त्यावर प्रत्युत्तर देताना चंद्रशेखर म्हणाले, काँग्रेस “आता एक वटवृक्ष झाले आहे. त्याच्या खाली कशाचीही वाढ होणे शक्य नाही.”

दरम्यान, १९६९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पाडण्यात चंद्रशेखर यांनी इंदिरा गांधींना मदत केली होती. काँग्रेस पक्षाच्या पुनरूज्जीवनाचा प्रश्न आज जितका गंभीर आहे तितकाच त्याही वेळी होता. मे १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर चंद्रशेखर हे काळजीवाहू पंतप्रधान बनले होते. त्यावेळी राजीव गांधींच्या अंत्यविधीसाठी जागतिक स्तरावरील नेते आले होते. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफही भारतात आले होते. दरम्यान, त्यावेळी चंद्रशेखर व शरीफ यांच्यात दहशतवादावर वन-टू-वन बैठक झाली होती. त्यावेळी पीएमओमध्ये अधिकारी असलेले व बैठकीतील मुद्द्यांची नोंद करणारे श्याम सरण यांनी लिहिले आहे, चंद्रशेखर नवाज शरीफ यांना म्हणाले, “मला तुम्हाला एक गोष्ट स्पष्टच सांगायची आहे. जर एक घुसला तर एकाला मारलं जाईल, जर दहा घुसले तर दहा जणांना मारलं जाईल. शंभर घुसले तर शंभर मारले जातील. यात तुम्हाला कोणतीही शंका नसावी.” यावर शरीफ यांनी कोणतेही प्रत्युत्तर न देता शांत राहणेच स्वीकारले होते.
६४ खासदारांसह जनता दल सोडले, नवीन पक्ष स्थापन करून पंतप्रधान कसे झाले?
१९८९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला होता. १९८४ मध्ये लोकसभेच्या ४०४ जागा जिंकलेल्या काँग्रेसला १९८९ च्या लोकसभेत १९७ जागा जिंकता आल्या. तर जनता दल १४३ जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. जनता दलाने भाजपा व डाव्या पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले होते. जनता दलाकडून विश्वनाथ प्रताप सिंह म्हणजेच व्ही. पी. सिंह हे पंतप्रधान झाले. चंद्रशेखर यांना उपपंतप्रधान होण्याची ऑफर व्ही. पी. सिंह यांनी दिली होती. परंतु, दुसऱ्या क्रमांकावर राहणे चंद्रशेखर यांना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी नकार दिला. त्यावेळी जनता दलाच्या राजकारणाशी व्ही. पी. सिंह यांच्यापेक्षा आपणच दीर्घकाळापासून जोडले गेलेलो आहोत त्यामुळे आपणच पंतप्रधान व्हायला हवे होते, अशी भावना चंद्रशेखर यांच्या मनात निर्माण झाली. भाजपाने व्ही. पी. सिंह यांच्या सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतल्यानंतर व्ही. पी. सिंह यांचे सरकार पडले. चंद्रशेखर यांनीही ६४ खासदारांसह जनता दल सोडून त्यांचा जनता दल (समाजवादी) हा नवीन पक्ष स्थापन केला.

१० नोव्हेंबर १९९० रोजी चंद्रशेखर यांनी काँग्रेसच्या बाहेरून मिळालेल्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करत पंतप्रधान पदाची शपथ घेतली. परंतु, आठ महिन्यांतच काँग्रेसने चंद्रशेखर यांच्या सरकारला दिलेले समर्थन काढून घेतले. त्यामुळे चंद्रशेखर यांचे २२३ दिवसांचे सरकार पडले. चंद्रशेखर आठ वेळा लोकसभेत निवडून गेले होते. १९७७ ते २००७ या कालावधीत फक्त १९८४ ते १९८९ ही पाच वर्षे वगळून ते लोकसभेचे खासदार होते. चंद्रशेखर आज असते तर त्यांनी विरोधकांची मोट पुन्हा बांधली असती व प्रस्थापित नेत्यांविरोधात पुन्हा लढा उभा केला असता, असे राजकीय इतिहासकारांना वाटते.
