औद्योगिक नगरी आणि प्रदूषणासाठी ओळखल्या जाणारा चंद्रपूर जिल्हा सध्या भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षातील नेत्यांमधील टोकाच्या वादामुळे राज्यभर चर्चेत आला आहे. काँग्रेसमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर विरुद्ध विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यात तर भाजपमध्ये ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार विरुद्ध आ. किशोर जोरगेवार यांच्यात जिल्ह्यातील राजकारणावर वर्चस्वासाठी संघर्ष सुरू आहे.

भाजपमध्ये मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार

भाजप नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आ. किशोर जोरगेवार यांना पक्षात घेण्यास त्यांचा विरोध होता. परंतु तत्कालीन परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत जोरगेवार यांचा भाजप प्रवेश घडवून आणला. त्यामुळे मुनगंटीवार पक्ष नेतृत्वावर नाराज झाले. तेथून या दोन नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. त्यानंतर पक्ष नेतृत्वाने जोरगेवार यांना विधानसभेची उमेदवारी दिली. ते विजयी झाल्यानंतर त्यांना पक्षात अधिक महत्त्व देण्यात आले. त्यामुळे बाहेरून आलेल्यांना पक्षात महत्त्व दिले जात असल्याने निष्ठावंतावर अन्याय होतो, अशी भावना मुनगंटीवार यांची झाली. त्यातून वाद अधिक चिघळला. त्याचा फटका भाजपला प्रथम नगरपालिका, नगरपंचायती व नंतर महापालिका निवडणुकीत बसला.

नेत्यांच्या वादामुळे भाजपची पीछेहाट?

जोरगेवार-मुनगंटीवार वादाचा फटका भाजपला नगरपालिका व जिल्हा परिषदेत बसला. या निवडणुकीत संपूर्ण राज्यात भाजपला घवघवीत यश मिळाले असताना चंद्रपूर जिल्ह्यात मात्र पक्षाला काँग्रेसकडून दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवासाठी मुनगंटीवार यांनी पुन्हा निष्ठावंताचा मुद्दा उपस्थित करीत एकप्रकारे जोरगेवार यांना जबाबदार धरले. पालिका निवडणुकीत झालेला पराभव लक्षात घेऊन प्रदेश भाजपने महापालिका निवडणुकीत या दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर जोगरेवार यांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी वाटपाचे अधिकार दिल्याने मुनगंटीवार यांची नाराजी अधिकच वाढली. प्रदेश भाजपने पाठवलेल्या उमेदवार यादीत जोरगेवार समर्थकांनी केलेल्या बदलाचा मुद्दा चांगलाच गाजला. एकूणच दोन नेत्यांमध्ये समेट होण्याऐवजी दुरावा आणखी वाढला. दोन्ही नेत्यांमधील वादाचा परिणाम व्हायचा तोच झाला. भाजपला महापालिका निवडणुकीतही अपयश आले.

काँग्रेसमध्ये वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर

चंद्रपूर काँग्रेसमध्येही परिस्थिती वेगळी नाही. माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला. वडेट्टीवार यांनी जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांत आपला पाया भक्कम केला आहे. संघटनात्मक बांधणीपासून निवडणूक रणनीतीपर्यंत त्यांनी मेहनत घेतली आहे. मात्र, गेल्या सहा वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय झालेल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांना जिल्ह्याच्या राजकारणात एकहाती नियंत्रण हवे आहे. धानोरकर यांना वडेट्टीवार यांनी केवळ ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघापुरतेच मर्यादित राहावे, असे वाटते. तर वडेट्टीवार यांना जिल्ह्याच्या राजकारणावरील वर्चस्व अबाधित ठेवायचे आहे. पालिका, नगरपंचायत निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाचे श्रेय वडेट्टीवार हे घेतात तर खासदार म्हणून धानोरकरांना या यशाचे भागीदार व्हायचे आहे. दोन्ही नेत्यांमधील धुसफूस लक्षात आल्यावर प्रदेश काँग्रेसने महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही नेत्यांना उमेदवारी वाटपात समान स्थान दिले. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. काँग्रेस या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. मात्र नंतर महापौरपदाच्या मुद्द्यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली. जाहीर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. वडेट्टीवार यांनी काँग्रेस नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवले. पण धानोरकर यांनी त्यांच्या गटाचे नगरसेवक पळवले असा आरोप वडेट्टीवार यांच्यावर केला. नगरसेवक पक्षाचे आहेत. खासदार हा जिल्ह्याचा मालक नसतो, असे प्रत्युत्तर धानोरकर यांना दिले.

महापौर निवडीवर परिणाम?

महापालिकेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असला तरी तो बहुमतापासून दूर आहे. त्यांना मित्रपक्ष आणि अपक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी काँग्रेस एकसंध असणे आवश्यक आहे. सध्या काँग्रेसकडे असलेले नगरसेवक वडेट्टीवार व धानोरकर या दोन गटात विभागले आहेत. या दोन्ही नेत्यांना त्यांच्याच गटाचा नगरसेवक महापौर व्हावा असे वाटते त्यामुळे पेच निर्माण झाला आहे. दोन्ही नेत्यांमधील वादावर भाजप नजर ठेवून आहे. या पक्षाचे नेते मुनगंटीवार यांनी काँग्रेसचा एक गट त्यांच्या संपर्कात असल्याचे सूतोवाच यापूर्वीच केले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा फायदा भाजप घेऊ शकतो, अशी सध्याची राजकीय स्थिती आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या मध्यस्थीचे फलित काय?

चंद्रपूरमधील नेत्यांच्या वादामुळे महापौर निवडणुकीत पक्षाला फटका बसू नये म्हणून खुद्द प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढाकार घेतला. त्यांनी नागपुरात येऊन वडेट्टीवार यांच्याशी चर्चा केली. महापौरपद पाच वर्षे काँग्रेसकडे राहील. यासाठी रणनीती आखणे आणि अडीच वर्षे वडेट्टीवार यांनी सुचवलेल्या नगरसेवकाला आणि उर्वरित अडीच वर्षे धानोरकर यांनी सुचवलेल्या नगरसेवकाला महापौरपद देण्याचे ठरले. चंद्रपूर महापालिकेतील वादावर अखेर पडदा पडला असून महापौर कोण होणार याचा निर्णय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेणार आहेत. चंद्रपूरमध्ये पाच वर्षे काँग्रेसचाच महापौर असेल आणि सर्वांचे समाधान होईल, असे वडेट्टीवार म्हणाले.

चंद्रपूर महापालिकेचे पक्षीय संख्याबळ

चंद्रपूर महापालिका महापौरपदासाठी आवश्यक संख्याबळ भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांकडे नाही. काँग्रेसकडे २७ नगरसेवक आहे. त्यांच्यासोबत आघाडीत लढलेल्या जनविकास पक्षाचे तीन नगरसेवक आहेत. अशा प्रकारे काँग्रेस आघाडीचे एकूण संख्याबळ ३० आहे. महापौरपदासाठी काँग्रेसला आणखी चार नगरसेवकांची गरज आहे. दुसरीकडे भाजपचे २३ नगरसेवक व शिवसेनेचा एक नगरसेवक आहे. असे युतीचे एकूण संख्याबळ २४ असून सत्ता स्थापनेसाठी त्यांना दहा नगरसेवकांची आवश्यकता आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे सहा नगरसेवक असून सध्या ते किंगमेकरच्या भूमिकेत आहेत.