Ocean Color and Climate Change: पृथ्वीवर असताना सूर्योदय पाहायला मिळतो तसाच अंतराळात गेल्यानंतर पृथ्वीचाही उदय पाहायला मिळतो. पृथ्वीच्या उदयाचे विल्यम अँडर्स यांनी अंतराळातून टिपलेले छायाचित्र १९६८ साली खूप गाजले. तर अपोलो १७ मिशनमध्ये हॅरिसन स्मिथने अंतराळातून टिपलेले निळ्याशार पृथ्वीचे छायाचित्र तर अजरामर झाले. त्यात निळाशार महासागराचा भाग व्यवस्थित पाहाता येतो. त्या छायाचित्राला ‘ब्लू मार्बल’ असेही म्हटले जाते. अंतराळातून पृथ्वी आजही तशीच निळी दिसते, असे अलीकडेच अंतराळात जाऊन आलेले अंतराळवीरही सांगतात. हजारो वर्षे महासागरांचा हा निळेपणा तसाच टिकून आहे, असा आपला समज होता. पण आता उपग्रहांच्या नजरेतून दिसणारी एक वेगळीच, आणि काहीशी अस्वस्थ करणारी गोष्ट समोर येते आहे…, ती म्हणजे जगभरातील महासागरांचा रंग हळूहळू बदलतो आहे!

हा बदल धोक्याचा इशारा देणारा!

महासागरांचा हा रंग ठरतो तो प्रामुख्याने अतिसूक्ष्म सजीवांमुळे अर्थात फायटोप्लँक्टनमुळे. हे सूक्ष्म वनस्पतीसदृश जीव सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने अन्ननिर्मिती करतात आणि संपूर्ण सागरी अन्नसाखळीचा पाया तेच रचतात. हेच जीव पृथ्वीवरील जवळपास ५० टक्के ऑक्सिजन निर्माण करतात, हे आपल्याला फारसे ठाऊकही नसते.

रंग म्हणजे जीवशास्त्र

महासागर गडद निळे दिसले, तर तिथे पोषकद्रव्ये आणि प्लँक्टन कमी असतात. हिरवट रंग अधिक दिसू लागला, तर तिथे प्लँक्टनची घनता वाढलेली असते. त्यामुळे महासागरांचा रंग बदलतोय, याचा अर्थ महासागरातील जैविक रचना बदलते आहे.

जागतिक तापमानवाढ आणि महासागरांचा रंग

२००२ पासून नासाच्या MODIS उपग्रहांनी महासागरांच्या रंगाचा सातत्याने अभ्यास केला. नेचर या प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकात २०२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, जगातील ५६ टक्क्यांहून अधिक महासागरांमधील रंगांत लक्षणीय बदल आढळून आला. हा बदल केवळ नैसर्गिक चक्रांमुळे नाही, तर जागतिक तापमानवाढीशी त्याचा संबंध थेट जोडलेला आहे.

तापमानवाढ आणि प्लँक्टन

महासागरातील उष्णता वाढते आहे. उष्ण पृष्ठभागामुळे खोल समुद्रातील पोषकद्रव्ये वर येण्याची प्रक्रिया मंदावते. परिणामी, उष्ण कटिबंधातील अनेक भागांत प्लँक्टनचे प्रमाण घटत आहे. काही ठिकाणी प्लँक्टन पूर्णपणे नाहीसे होत नसले, तरी त्यांचे प्रकार बदलत आहेत म्हणजेच मोठ्या, कार्यक्षम प्रजातींची जागा लहान, कमी प्रभावी प्रजाती घेत आहेत.

याचा परिणाम साखळीप्रमाणे होतो:

  • मासेमारीवर परिणाम
  • सागरी जैवविविधतेत बदल
  • कार्बन शोषण क्षमतेत घट

पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साइड महासागर मोठ्या प्रमाणावर शोषून घेतात. प्लँक्टन मृत होतात तेव्हा हा कार्बन खोल समुद्रात साठवला जातो. यालाच ‘बायोलॉजिकल कार्बन पंप’ म्हणतात. प्लँक्टनच्या अस्तित्त्वात बदल झाला, तर ही प्रक्रिया कमकुवत होऊ शकते.

NASA-Ocean-color
महासागरांचा रंग बदलतोय (Photo Credit: NASA Earth Observatory)

आपल्याला का दिसत नाही रंगातील बदल?

हा बदल किनाऱ्यावर उभ्या असलेल्या माणसाला दिसत नाही. समुद्र आजही निळाच दिसतो. पण प्रकाशाच्या अशा तरंगलांबी उपग्रह टिपतात, ज्या मानवी डोळ्यांनाही दिसत नाहीत. त्यामुळे हा बदल आपल्याला थेट दिसणारा नसला तरीही तो धोकादायकच आहे.

शास्त्रज्ञ सांगतात, महासागरांचा रंग बदलणे म्हणजे आपत्तीची भविष्यवाणी नव्हे, तर पूर्वसूचना आहे. ज्या वेळी मासे मोठ्या प्रमाणावर मृत होतील, मृत क्षेत्रे (dead zones) वाढतील, तेव्हा ही प्रक्रिया टोकापर्यंत पोहोचलेली असेल.

निळ्या ग्रहाचा प्रश्न

पृथ्वी निळी का आहे, हा प्रश्न कधीकाळी शास्त्रीय कुतूहलाचा होता. आज या प्रश्नाचे स्वरूप बदलले असून त्याने गंभीर रूप धारण केले आहे. पृथ्वी निळी किती काळ राहील?

महासागर शांतपणे बदलत आहेत. आणि त्या शांततेतच सर्वात मोठा इशारा दडलेला आहे!

संदर्भः

  1. Cael, B. B., et al. (2023)Global climate-driven trends in ocean colour, Nature
  2. NASA Earth Observatory — Ocean colour and phytoplankton monitoring (MODIS data)
  3. IPCC Sixth Assessment Report (AR6) — Ocean warming and biogeochemical cycles
  4. Woods Hole Oceanographic Institution — Phytoplankton and carbon cycling research
  5. NOAA — Marine ecosystems and climate indicators
  6. Falkowski, P. G. (2012) — Ocean science and global biogeochemistry, Science