वनस्पती त्यांना आवश्यक असलेली पोषक तत्त्वे जमिनीतून मुळांद्वारे शोषून घेतात. मात्र काही वनस्पती मांसभक्षक असतात हे सिद्ध झाले आहे. चार्ल्स डार्विन यांनी मांसाहारी वनस्पतींवर सखोल अभ्यास केला होता. सॅक्सिफ्रागा प्रजातीतील काही वनस्पती मांसभक्षक असल्याचे डार्विन यांचे म्हणणे होते. मात्र हे सिद्ध करण्यात ते अयशस्वी ठरले. मात्र १५० वर्षांनंतर डार्विन यांचा अंदाज खरा ठरला असून या वनस्पती मांसभक्षक असल्याचे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे.

चार्ल्स डार्विन यांचा मांसभक्षक वनस्पतींबद्दल अभ्यास काय होता?

चार्ल्स डार्विन या प्रसिद्ध उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञाने मांसभक्षक वनस्पतींचाही सखोल अभ्यास केला. मांसाहारी वनस्पती हे त्यांच्या सर्वात चिरस्थायी आकर्षणांपैकी एक होते. त्यांनी व्हीनस फ्लायट्रॅप्सना ‘जगातील सर्वात अद्भुत वनस्पतींपैकी एक’ म्हटले होते. १८७५ मध्ये डार्विन यांनी मांसाहारी वनस्पतींवर एक प्रबंध प्रकाशित केला, ज्यात अशा अनेक प्रजातींचा समावेश होता, ज्या त्यांच्या मते मांसभक्षक वनस्पती असू शकतात. त्यामध्ये सॅक्सिफ्रागा (Saxifraga) वंशातील डोंगराळ भागातील कणखर वनस्पतींचा समावेश होता, ज्यांच्यावर चिकट केस होते. डार्विन यांनी खाद्य प्रयोगांदरम्यान सॅक्सिफ्रागाच्या दोन युरोपीय प्रजातींना कीटकांचे आमिष दाखवले, परंतु त्या प्रजाती मांसाहारी आहेत हे सिद्ध करण्यात ते अखेरीस अयशस्वी ठरले.

डार्विनच्या सिद्धांताला पुष्टी

१५० वर्षांहून अधिक काळानंतर, शास्त्रज्ञांनी डार्विनच्या सिद्धांताला पुष्टी दिली आहे. संशोधकांच्या एका गटाने अलीकडेच चीनमधील सॅक्सिफ्रागाच्या दुसऱ्या प्रजातीला लहान माश्या खाऊ घातल्या. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकात नुकत्याच प्रकाशित झालेल्या त्यांच्या निष्कर्षांनुसार, ही वनस्पती पकडलेल्या भक्ष्याचे पचन करून त्यातील पोषणद्रव्ये शोषून घेते, आणि यामुळे मांसाहाराच्या अस्तित्वाचा पुरावा वनस्पतींच्या एका नवीन कुळापर्यंत विस्तारला आहे. ‘चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या कुनमिंग इन्स्टिट्यूट ऑफ बॉटनी येथील संशोधक आणि या शोधनिबंधाच्या लेखकांपैकी एक असलेल्या हँग सन यांच्या मते, या निष्कर्षांवरून असे दिसून येते की मांसाहाराची मुळे खूप खोलवर रुजलेली आहेत. “याचा अर्थ असा होतो की मांसाहारी वनस्पती आपल्याला सध्या माहीत असलेल्यापेक्षा अधिक व्यापक असू शकतात आणि अनेक प्रजातींमध्ये भक्ष्य पचवण्याची क्षमता दडलेली आहे,” असे ते म्हणाले.

शास्त्रज्ञांनी या वनस्पतीवर काय संशोधन केले?

सॅक्सिफ्रागा या सपुष्प वनस्पतींच्या १४ कुळांमध्ये मांसाहाराचा गुणधर्म स्वतंत्रपणे विकसित झाला आहे. मांसाहारी असल्यामुळे वनस्पतींना नापीक जमिनीत आणि खडतर अधिवासात जगणे शक्य होते. याची दोन सर्वात प्रसिद्ध उदाहरणे म्हणजे, व्हीनस फ्लायट्रॅप आणि द्रवाने भरलेली पिचर वनस्पती, जी दलदलीच्या ठिकाणी, पाणथळ प्रदेशात आढळतात. उंच पर्वतांची शिखरे ही अशीच इतर ठिकाणे आहेत जिथे वनस्पतींना उघड्या जमिनीतून पोषक तत्त्वे मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि तिथेच तुम्हाला सॅक्सिफ्रागा कॅन्डेलाब्रम ही वनस्पती आढळेल; ही एक फांद्या असलेली बहुवार्षिक वनस्पती आहे, जिला दोन रंगांची पिवळी फुले येतात आणि ती तिबेटच्या पठारावरील खडकांच्या फटींमध्ये वाढते. त्याच्या खोडावर आणि फांद्यांवर लालसर ग्रंथीयुक्त केस असतात, जे एक चिकट पदार्थ स्रवतात.

ही वनस्पती कीटकभक्ष्यी कशी?

नैर्ऋत्य चीनमधील युनान प्रांतातील एका पर्वतावर क्षेत्रीय संशोधन करत असताना, डॉ. सन आणि त्यांच्या टीमच्या असे लक्षात आले की ‘सॅक्सिफ्रागा कॅन्डेलाब्रम’ (S. candelabrum) या वनस्पतींचे अनेक नमुने कीटकांनी वेढलेले होते. एका पाहणीदरम्यान संशोधकांना असे आढळून आले की, पूर्ण वाढ झालेल्या वनस्पतींच्या सूक्ष्म केसांवर सरासरी ७० हून अधिक कीटक अडकलेले होते. या वनस्पतींनी कीटकांना पकडण्यासाठी आणि त्यांचे भक्षण करण्यासाठी काही विशिष्ट उत्क्रांती साधली आहे का, असा प्रश्न संशोधकांना पडला. सुरुवातीला, त्यांनी जाळी आणि काचेच्या आवरणांचा वापर करून असा निष्कर्ष काढला की, ही वनस्पती तिच्या फुलांमधून येणाऱ्या गंधाने कीटकांना आकर्षित करते. ही वनस्पती कोणत्या कीटकांना पकडायचे याबद्दल निवडक होती. तिच्यावरील ग्रंथीयुक्त केस फक्त डासांसारख्या लहान कीटकांनाच पकडत होते; तिच्या फुलांचे परागण करणाऱ्या मोठ्या माश्या क्वचितच पकडल्या जात होत्या. ‘‘ही वनस्पती फक्त लहान कीटकांना लक्ष्य करते आणि मोठ्या परागण करणाऱ्यांना सुरक्षित ठेवते,” असे डॉ. सन म्हणाले.

शास्त्रज्ञांना यश कसे मिळाले?

शास्त्रज्ञांनी सॅक्सिफ्रागा कॅन्डेलाब्रमला एका अशा रसायनाचा लेप दिला, जे पाचक एन्झाइम उपस्थित असल्यास हिरव्या रंगात चमकते. वनस्पतीचे केस खरोखरच चमकले, ज्यामुळे सक्रिय पचनक्रिया होत असल्याची पुष्टी झाली. शेवटी या प्रजातीला कीटकांकडून अन्न मिळाले की नाही हे तपासण्यासाठी, शास्त्रज्ञांच्या पथकाने वनस्पतींनी त्यांच्या केसाळ देठांवर ठेवलेल्या माश्यांमधून नायट्रोजन आयसोटोप शोषून घेतला की नाही याचा मागोवा घेतला. सॅक्सिफ्रागा कॅन्डेलाब्रमला माश्या पचवण्यासाठी सुमारे दोन आठवडे लागले. त्यानंतर संशोधकांनी ऊती गोळा केल्या आणि नमुन्यांमध्ये नायट्रोजन आयसोटोप पाहिला. हा पुरावा होता की सॅक्सिफ्रागा कॅन्डेलाब्रमने आपल्या भक्ष्याकडून पोषक तत्त्वे शोषून घेतली होती.

sandeep.nalawade@expressindia.com