How to easily identify Cheetah vs Leopard vs Jaguar: भारतात तब्बल ७० वर्षांनंतर ‘प्रोजेक्ट चित्ता’ (Project Cheetah) अंतर्गत मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांचे पुनरागमन झाले आणि वन्यजीवांबद्दलची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. मात्र, चित्ते भारतात आल्यापासून सामान्य नागरिकांमध्ये एक नवा गोंधळ पाहायला मिळत आहे. अनेकदा लोक चित्ता, बिबट्या (Leopard) आणि जॅग्वार (Jaguar) या तिन्हींना एकच समजण्याची चूक करतात. हे तिन्ही प्राणी मार्जारवर्गीय (Cat Family) असले, तरी त्यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.

बिबट्यांचे अस्तित्त्व आधीपासूनचे…

भारतातून चित्ता हा प्राणी १९५२ साली नामशेष झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे ७० वर्षांनी भारत सरकारने ‘प्रोजेक्ट चित्ता’ अंतर्गत नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आफ्रिकन चित्ते आणून मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडले. कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ते सोडण्यापूर्वीच स्थानिक बिबट्यांचे अस्तित्व होते. बिबट्या हा भारतात मोठ्या संख्येने आढळणारा मार्जारवर्गीय प्राणी आहे. तो दाट जंगल, डोंगराळ भाग, गवताळ प्रदेश, खडकाळ भाग आणि काही वेळा मानवी वस्तीजवळही राहू शकतो. त्यामुळे कुनोमध्ये चित्ते आणि बिबट्यांमधील अधिवास, शिकार आणि जागेच्या वापराबद्दल चर्चा सुरू झाली. काही अभ्यासांमध्ये प्रोजेक्ट चित्त्याविषयी विविध मतमतांतरे मांडली गेली आहेत. काही संशोधकांनी हा प्रकल्प भारतातील गवताळ परिसंस्थांकडे लक्ष वेधणारा असल्याचे म्हटले, तर काहींनी अधिवासाची गुणवत्ता बिबट्यांचे अस्तित्त्व आणि दीर्घकालीन व्यवस्थापन या बाबींवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

जॅग्वार नव्हे काळा बिबट्या

याशिवाय, कुनोमध्ये आफ्रिकन चित्त्यांनी पिल्लांना जन्म दिल्यानंतर सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. अनेकांना चित्त्याची पिल्ले आणि बिबट्याची पिल्ले यांच्यात फरक ओळखणे कठीण जाते. त्यातच काळ्या बिबट्याचे, म्हणजेच ‘ब्लॅक पँथर’चे व्हिडिओ व्हायरल झाले की, काही लोक त्याला जॅग्वार समजतात. प्रत्यक्षात जॅग्वार भारतात नैसर्गिकरीत्या आढळत नाही. तो प्रामुख्याने मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळणारा मोठा मांजरवर्गीय प्राणी आहे. भारतात दिसणारा काळा पँथर बहुतांश वेळा काळा बिबट्याच असतो.

ठिपक्यांच्या पॅटर्नमध्येही फरक

चित्ता, बिबट्या आणि जॅग्वार हे तिन्ही प्राणी दिसायला काही प्रमाणात सारखे वाटतात, कारण त्यांच्या अंगावर काळे ठिपके असतात आणि ते सर्व शिकारी प्राणी आहेत. पण त्यांच्या शरीररचनेत, ठिपक्यांच्या पॅटर्नमध्ये, अधिवासात आणि शिकारीच्या पद्धतीत मोठे फरक आहेत.

चित्त्याचे टीअर मार्क्स

चित्ता सहज ओळखता येतो. चित्त्याच्या डोळ्यांच्या खाली नाकाकडे जाणाऱ्या काळ्या अश्रूसारख्या रेषा असतात. या रेषांना ‘tear marks’ म्हणतात. शिकारीदरम्यान सूर्यप्रकाशाचा त्रास कमी करण्यास त्या मदत करतात, असे मानले जाते. बिबट्या आणि जॅग्वार यांच्या चेहऱ्यावर अशा रेषा नसतात. त्यांचा चेहरा चित्त्यापेक्षा रुंद आणि जड दिसतो.

जॅग्वार पॉवर लिफ्टर

शरीराच्या आकारातही स्पष्ट फरक दिसतो. चित्ता हा वेगावान प्राणी आहे. त्याचे शरीर सडपातळ असते आणि वजनाला हलके, लांब पाय असतात. तो अतिशय वेगाने धावू शकतो आणि काही क्षणांत लांबचा पल्ला गाठू शकतो. बिबट्या चित्त्यापेक्षा अधिक मजबूत आणि लवचिक असतो. तो झाडांवर चढण्यात अत्यंत तरबेज असतो. जॅग्वार मात्र या तिघांमध्ये सर्वाधिक जड, स्नायुमय आणि ताकदवान दिसतो. त्याची मान, खांदे आणि जबडे खूप शक्तिशाली असतात. म्हणूनच जॅग्वारला मोठ्या मांजरांमधील ‘पॉवर लिफ्टर’ असेही म्हटले जाते.

बिबट्याचा रोझेट पॅटर्न

ठिपक्यांचे पॅटर्न हा फरक ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. चित्त्याच्या अंगावर स्वतंत्र, गोलसर, काळे ठिपके असतात. हे ठिपके एकमेकांना जोडलेले नसतात. बिबट्याच्या अंगावर रोझेट पॅटर्न असतो; म्हणजे गुलाबाच्या पाकळ्यांसारखी वर्तुळाकार ठिपक्यांची रचना. जॅग्वारच्या अंगावरही रोझेट असतात; पण ते बिबट्याच्या रोझेटपेक्षा मोठे असतात आणि त्यांच्या आत आणखी लहान काळे ठिपके दिसतात. त्यामुळे ठिपक्यांचा नमुना नीट पाहिला, तर जॅग्वार आणि बिबट्या वेगळे ओळखता येतात.

आजुबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेणारा प्राणी

भौगोलिक दृष्ट्याही हे तिन्ही प्राणी वेगळे आहेत. चित्ते मूलतः आफ्रिकेतील गवताळ प्रदेश आणि सवाना भागात आढळतात. ऐतिहासिकदृष्ट्या आशियातही चित्ते होते, पण आज आशियाई चित्त्यांची संख्या अत्यंत कमी असून ते मुख्यतः इराणमध्ये आढळतात. भारतात आणलेले चित्ते आफ्रिकन आहेत. बिबट्या मात्र भारतासह आफ्रिका आणि आशियातील अनेक भागांत आढळतो. तो आजुबाजूच्या वातावरणाशी अत्यंत जुळवून घेणारा शिकारी आहे. जॅग्वार भारत, आफ्रिका किंवा आशियात आढळत नाही; तो मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील पर्जन्यवन, दलदलीचे प्रदेश आणि नदीखोऱ्यांमध्ये राहतो.

बिबट्या शिकार झाडावरही ठेवतो

शिकार करण्याच्या पद्धतीतही फरक आहे. चित्ता हा वेगावर अवलंबून असतो. तो उघड्या मैदानात शिकार पाहतो, वेगाने धावतो आणि काही क्षणांत शिकार पकडतो. बिबट्या दबा धरून शिकार करतो. तो झुडपांच्या आडून किंवा अंधाराचा फायदा घेऊन अचानक हल्ला करतो. शिकार केल्यानंतर तो ती झाडावरही नेऊ शकतो, जेणेकरून इतर शिकारी ती हिसकावू शकणार नाहीत. जॅग्वार मात्र जबरदस्त चावण्याच्या ताकदीवर अवलंबून असतो. तो कासवे, मासे, केमन्ससारखे जलचर प्राणीही खातो आणि उत्तम पोहू शकतो.

शेपटीचे महत्त्व

शेपटी आणि हालचालींवरूनही फरक ओळखता येतो. चित्त्याची शेपटी लांब आणि सडपातळ असते. ती वेगाने धावताना अचानक वळण्यासाठी संतुलन राखते. बिबट्याची शेपटी झाडांवर चढताना आणि फांद्यांवर तोल सांभाळताना मदत करते. जॅग्वारची शेपटी शरीराच्या मानाने तुलनेने लहान असते.

ब्लॅक पँथर नव्हे काळा बिबट्या

या तिन्ही प्राण्यांच्या संदर्भात भारतातील सर्वात मोठा गोंधळ म्हणजे ‘ब्लॅक पँथर’. ब्लॅक पँथर ही स्वतंत्र प्रजाती नाही. तो बहुतांश वेळा मेलॅनिझममुळे काळा दिसणारा बिबट्या किंवा काही प्रदेशांत काळा जॅग्वार असू शकतो. भारतात आढळणारा ब्लॅक पँथर म्हणजे काळा बिबट्या. त्याच्या अंगावरचे रोझेट पॅटर्न जवळून किंवा योग्य प्रकाशात पाहिल्यास दिसू शकतात.

मार्जारवर्गीयच पण फरक असतो

एकूणच, भारतात चित्ते परत आल्यानंतर चित्ता, बिबट्या आणि जॅग्वार यांच्याबद्दलची उत्सुकता वाढणे स्वाभाविक आहे. परंतु या उत्सुकतेबरोबर अचूक माहितीही आवश्यक आहे. चित्ता ओळखायचा असेल तर त्याच्या डोळ्याखालील काळ्या रेषा, सडपातळ शरीर आणि स्वतंत्र ठिपके पाहावेत. बिबट्या ओळखायचा असेल तर रोझेट पॅटर्न, झाडांवर चढण्याची क्षमता आणि मजबूत शरीररचना पाहावी. जॅग्वार ओळखायचा असेल तर मोठे रोझेट, त्यांच्या आतले ठिपके, जड शरीर आणि पाण्याजवळचे अधिवास लक्षात घ्यावेत. भारतात जॅग्वार नसतो, त्यामुळे भारतीय जंगलातील काळा मोठा मांजरवर्गीय प्राणी दिसल्यास तो जॅग्वार नसून काळा बिबट्या असण्याची शक्यता जास्त असते.

फरक ओळखणे संवर्धनासाठी महत्त्वाचे

वन्यजीवांविषयीचा हा गोंधळ दूर करणे केवळ सामान्य ज्ञानासाठी नाही, तर संवर्धनासाठीही महत्त्वाचे आहे. कारण एखादा प्राणी अचूक ओळखला, तर त्याच्या अधिवासाची, वर्तनाची आणि संरक्षणाच्या गरजांची योग्य समज निर्माण होते. भारतातील प्रोजेक्ट चित्ता हा फक्त एका प्राण्याच्या पुनरागमनाचा विषय नाही; तो गवताळ प्रदेश, मोठे शिकारी, स्थानिक जैवविविधता आणि मानव-वन्यजीव सहअस्तित्व यांचा मोठा धडा आहे.