Tree Collapse Incident BMC Compensation : मुंबईत मोठ्या प्रतीक्षेनंतर जोरदार पाऊस सुरू झाला. संततधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचल्याने सार्वजनिक वाहतुकीला फटका बसत आहे. तर, अनेक ठिकाणी पडझडीच्या दुर्घटना घडल्या आहेत. ३० जूनला मुंबईच्या चेंबूर परिसरात शाळेच्या बसवर झाड कोसळले. या दुर्घटनेत ११ वर्षीय विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला; तर बसमधील आणखी चार विद्यार्थीदेखील जखमी झाले. या घटनेनंतर मुंबईकरांनी शोक व्यक्त केला. तसेच, पालिका प्रशासनाच्या कारभारावर संतापदेखील व्यक्त केला आहे. पण मृत मुलाच्या कुटुंबाचं पुढे काय, हा सवाल सर्वांनाच भेडसावत आहे.
मुंबईत झाड कोसळण्याच्या घटनांतील पीडित किंवा त्यांच्या कुटुंबीयांना बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)कडून स्वतंत्र भरपाई धोरणांतर्गत आर्थिक मदत मिळते का? त्याबाबत नियम काय सांगतात? जाणून घेऊया सविस्तर…
बीएमसीचे भरपाई देण्याचे धोरण काय?
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) भरपाई धोरणानुसार, घटनेतील परिणामांच्या तीव्रतेनुसार आर्थिक मदत दिली जाते.
१. झाड कोसळून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्यांच्या कुटुंबाला किंवा जवळच्या नातेवाइकाला एक लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते.
२. झाड कोसळल्यामुळे एखादी व्यक्ती कायमस्वरूपी अपंग झाली, तर ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
३. झाड कोसळून जखमी झालेल्या व्यक्तीवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू असतील, तर त्या उपचारांचा संपूर्ण खर्च बीएमसीकडून उचलला जातो.
भरपाईव्यतिरिक्त अतिरिक्त मदत?
बीएमसीच्या भरपाई धोरणात निश्चित रक्कम नमूद आहे. पण याव्यतिरिक्त मोठ्या दुर्घटनांमध्ये राज्य सरकार आणि महापालिका यांच्याकडून सानुग्रह अनुदान (Ex Gratia) म्हणून अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाते.
यापूर्वी घडलेल्या मोठ्या पावसाळी दुर्घटनांमध्ये मुख्यमंत्री कार्यालय किंवा लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केला आणि मृतांच्या कुटुंबीयांसाठी २.५ लाख ते चार लाख रुपयांपर्यंतची अतिरिक्त मदत देऊ केली. त्यामुळे कुटुंबीयांना आधार मिळतो.
खासगी जागेवर झाड कोसळल्यास जबाबदार कोण?
एखाद्या खासगी गृहनिर्माण संस्थेच्या (Housing Society) आवारात किंवा व्यावसायिक बांधकामाच्या ठिकाणी देखभालीअभावी झाड कोसळले, तर ती जबाबदारी पालिकेची नसते. संबंधित मालमत्ताधारक, गृहनिर्माण संस्था किंवा विकसक यांना जबाबदार धरले जाऊ शकते. त्यांना कायद्यानुसार त्यांना भरपाईचे आदेश दिले जातात.
अशा काही दुर्दैवी प्रकरणांमध्ये मुंबईतील न्यायालयांनी मृतांच्या कुटुंबीयांना २० लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई देण्याचे आदेश संबंधित गृहनिर्माण संस्थांना दिले आहेत. या सर्व बाबींमुळे भरपाई मिळण्याची प्रक्रिया सुकर होते.
वाहनावर झाड कोसळल्यास भरपाईचे नियम काय?
रस्त्यावर उभ्या किंवा धावत्या वाहनावर झाड किंवा झाडाची फांदी कोसळल्याने नुकसान झालेल्या अनेक पीडितांनी यापूर्वी भरपाई मागितली आहे. मोटार वाहन कायद्यांतर्गत (Motor Vehicles Act) आर्थिक मदत मागण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अशा घटना मोटार वाहन अपघाताच्या व्याख्येत मोडत नाहीत, असे स्पष्ट सांगितले. कारण- या अपघात घडवून आणण्यात वाहनाची कोणतीही भूमिका नसते, त्यामुळे यामध्ये आर्थिक भरपाई मिळू शकत नाही.
तथापि, झाडांच्या देखभालीत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निष्काळजीपणा झाल्याचे सिद्ध झाल्यास त्यांना जबाबदार धरून प्रश्न विचारू शकता. सर्वोच्च न्यायालयाने न्यायिक तत्त्वांचा आधार घेत म्हटले की, महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे काही गंभीर घटना घडली, तर पीडितांना भरपाईचे देण्याचे आदेश दिले आहेत. गंभीर स्वरूपाची दुखापत किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आले असेल, तर पीडितांना २५ लाख रुपयांपर्यंतच्या नुकसानभरपाईचे आदेश संबंधित महापालिकांना दिले आहेत.
भरपाईसाठी अर्ज कसा करायचा?
झाड कोसळल्याच्या घटनेनंतर भरपाईचा दावा करण्यासाठी काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागते,
१. सर्वप्रथम पोलिसांकडे घटनेची नोंद करावी लागते. मृत्यू झाल्यास अपघाती मृत्यूची नोंद (ADR) किंवा इतर प्रकरणांमध्ये संबंधित पोलिस ठाण्यात घटनेची सविस्तर माहिती नोंद करणे आवश्यक असते.
२. त्यानंतर संबंधित बीएमसी वॉर्ड कार्यालयात भरपाईसाठी अर्ज सादर करावा लागतो. हा अर्ज वॉर्ड अधिकारी किंवा उद्यान विभागाच्या (Garden Department) संबंधित अधिकाऱ्याकडे देता येतो.
३. नुकसानीच्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. त्यामध्ये रुग्णालयातील उपचारांची कागदपत्रे, वैद्यकीय खर्चाच्या पावती, जखमी व्यक्तीचा तपशील किंवा मृत्यू झाल्यास शवविच्छेदन अहवाल (Postmortem Report) सादर करावा लागतो.
याप्रमाणे अर्ज केल्यास भरपाईची रक्कम मिळणे सुलभ होते.
