Historical Context and Impact of Chhatrapati Shivaji Maharaj Surat Raid मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यापासून गेले काही दिवस मराठा इतिहास, शिवाजी महाराज आणि त्या अनुषंगाने येणारे वेगवेगळे विषय चर्चेत आहेत. आता त्याच पार्श्वभूमीवर शिवाजी महाराज आणि सूरत मोहिमेचा मुद्दा वादाचा विषय ठरला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर या वादाला तोंड फुटले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटले असा इतिहास शिकवला. महाराजांनी सूरत लुटलेच नाही. उलट सूरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. तरीही काँग्रेसने छत्रपती शिवरायांनी सूरत लुटले असा इतिहास सांगितला. याची माफी काँग्रेस मागणार का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. एकुणातच शिवाजी महाराजांनी सुरत लुटले असा संदर्भ देण्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे. यानंतर देवेंद्र फडणवीसांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. त्याच पार्श्वभूमीवर महाराजांनी सुरतेवर केलेल्या हल्ल्याच्या संदर्भात ऐतिहासिक पुरावे काय सांगतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे. अधिक वाचा: ३५७ वर्षे झाली, छत्रपती शिवरायांचा किल्ला मजबूत; पण पुतळा मात्र कोसळला… छत्रपती शिवाजी महाराजांचे लंडनच्या ब्रिटिश म्युझियममधील चित्र. विलक्षण साहस आणि अद्भुत पराक्रम गाजवून आपल्या शत्रूंना चकीत करावयाचे आणि स्वतः यशाच्या धुंदीत न राहता गोंधळून गेलेल्या शत्रूच्या प्रदेशात सतत हल्ले करावयाचे हे शिवाजी महाराजांचे खास तंत्र होते असे वर्णन प्र. न. देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज या त्यांच्या पुस्तकात केले आहे. कमी सैन्य शक्तीच्या जोरावर शत्रूवर मात करण्याचे कसब महाराजांच्या ठायी होते, हे इथे अर्थाच वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यासाठी त्यांनी वापरलेले गनिमी कावा हे तंत्र तर सुपरिचितच आहे. त्यामुळे शत्रूला शिवाजी महाराजांची नेहमीच भीती वाटत होती. म्हणूनच शत्रूंनी महाराजांचे संदर्भ शत्रू याच दृष्टिकोनातून दिले आहेत. नेमकी हीच बाब आपल्याला सूरतेच्या लुटीच्या संदर्भातही आढळून येते. सूरतेची पहिली लूट १६६४ साली जानेवारी महिन्यात शिवाजी महाराजांनी सूरतवर हल्ला करण्याची मोहीम हाती घेतली. त्यावेळी पुणे जिल्हा, मध्य आणि दक्षिण कोकण त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका व प्रतापगड हे प्रदेश स्वराज्याचा भाग होते. तर उर्वरित महाराष्ट्रात मुघलांचे प्रस्थ होते. सूरत मुघल साम्राज्याचे महत्त्वाचे बंदर आणि व्यापारी पेठ होती. मुघलांचा व्यापार प्रामुख्याने याच बंदरातून चालत असे. युरोपीय तसेच इराणी, तुर्की व अरब यांच्या जहाजांची तेथे नेहमीच वर्दळ असे. मध्य आशियातून मक्केला यात्रेला जाणारे यात्रेकरू याच बंदरातून पुढे जात. आर्थिक व्यवहारासाठी हे बंदर विशेष प्रसिद्ध होते. मुघलांची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे लक्ष्य भारतातील पेढी संबंधीचे व्यवहार याच शहरातून चालत असत. शिवाय मुघल साम्राज्यातील वाहतुकीचे बंदर या दृष्टीने सूरत प्रसिद्ध होते. त्यामुळे डच, इंग्रज, फ्रेंच इत्यादी परकीयांच्या वखारी सूरत बंदरामध्ये होत्या. महाराजांनी कल्याण, भिवंडी, डांग या भागांतून पोर्तुगीज हद्दीच्या बाजू- बाजूने पुढे सरकत सूरत गाठले. मुघलांच्या आश्रयामुळे हे पाश्चात्य वखारवाले उन्मत्तपणे वागत असतं. या वखारवाल्यांना धडा शिकवला तर मुघलांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असा महाराजांचा कयास होता. सूरतेसारख्या समृद्ध शहरावर हल्ला करून मुघलांची आर्थिक व्यवस्था खिळखिळी करणे हे या मोहिमेमागील प्रमुख उद्दिष्ट्य होते. शिवाजी महाराजांनी शाइस्ताखानवर पुण्यात केलेल्या अचानक हल्ल्याचे चित्र एम.व्ही. धुरंधर शायिस्तेखानाची फजिती होऊन तो दिल्लीकडे परतल्यानंतर मुघल सरदार जसवंतसिंग याने सिंहगडाला वेढा घातला होता. परंतु महाराजांनी या वेढ्याला कोणत्याही प्रकारची किंमत न देता सूरतेवर हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मुघल सेनेची त्रेधातिरपीट उडाली. मराठे सूरतेच्या अगदी जवळ येईपर्यंत मुघल अधिकाऱ्यांना त्यांचा पत्ताच लागला नाही, हल्ला होताच तेथील मुघल अधिकारी किल्ल्यात जाऊन बसला, तो शेवटपर्यंत बाहेर आलाच नाही. पाश्चात्य वखारवाले भयभीत झाले. इंग्रज, डच इ. यूरोपीय व्यापाऱ्यांनी आपापल्या पद्धतीने वखारींचे संरक्षण करण्याच प्रयत्न केला. जनसामान्यांचे नुकसान नाही ६ जानेवारी ते १० जानेवारी १६६४ असे तब्बल चार दिवस सूरत शहर शिवाजी महाराज्यांच्या ताब्यात होते. सूरतेच्या लुटीतील हाती आलेली संपत्ती रोकड, सोने, चांदी, मोती, रत्ने, वस्त्रे इ. मिळून एक कोटीच्या आसपास होती. शिवाजी महाराजांनी केलेल्या या मोहिमेचा संदर्भ डच-इंग्रज यांच्या पत्रांतून आढळतो. इंग्रज प्रतिनिधी अँटनी सनाथ याने थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मराठ्यांनी त्याला पकडले आणि ३०० रुपये दंड घेऊन मुक्त केले. या हल्ल्यात सामान्य माणसाचे कोणतेही नुकसान झालेलं नव्हते, हे तत्कालीन दस्तऐवजांवरून लक्षात येते. या हल्ल्यामुळे शिवाजी महाराजांचे नाव परदेशातही चर्चिले जाऊ लागले. सूरतेहून आणलेल्या लुटीतून त्यांनी दक्षिण कोकणातील सिंधूदुर्ग बांधला आणि मराठा आरमाराचा विस्तार केला. १० जानेवारी १६६४ रोजी शिवाजी महाराज माघारी परतले. परत जाताना त्यांनी लूट समुद्रमार्गे नेली, असा उल्लेख पोर्तुगीज दप्तरात सापडतो. सर टी. ब्राउन यांना इंग्रजी धर्मगुरू एस्कॅलिओट यांनी लिहिलेलं पत्र..(Bom. Gaz., ii. 301, 90-91; Letter from the English chaplain Escaliot to Sir T. Browne, in Ind. Antiq. viii. 256.) पत्राचा आशय: मंगळवार, ५ जानेवारी, १६६४ रोजी पहाटे, शिवाजी महाराज सैन्यासह २८ मैल दक्षिणेकडे गांडवी येथे आले, ते शहर लुटायला येत आहेत हे समजल्यावर संपूर्ण सुरतची घाबरगुंडी उडाली. बायका आणि मुलांसह बहुतेकजण नदीच्या पलीकडे जीव वाचवण्यासाठी पळून जाऊ लागले. श्रीमंतांना किल्ल्यात लाच देऊन आश्रय मिळाला. नंतर शिवाजी महाराज अजून जवळ आल्याची माहिती दिली आणि रात्री कळले की, ते सुरतेपासून फक्त पाच मैलांवर आहेत. शहराचा गव्हर्नर इनायत खान शहराला शत्रूच्या दयेवर सोडून गडाकडे पळून गेला. त्याने संरक्षणाची कोणतीही सोय केली नव्हती. नगरातील धनप्रेमी व्यापारी, गरीब कलाकार, अग्निपूजक, जैन यांच्यापैकी कोणीही लढण्यासाठी तयार नव्हते. इंग्रजांमध्ये महाराजांची दहशत किंबहुना या लुटीची बातमी लंडन गॅझेटिअर मध्ये सुद्धा आली होती. डचांच्या कागदपत्रांमध्येही या प्रसंगाचे वर्णन आढळते. डचांनी म्हटले आहे की, शिवाजी महाराजांचा लष्करी तळ सुरतेबाहेर दोन कोसांवर होता. केवळ त्यांचाच शामियाना होता. छावणी अत्यंत सुटसुटीत आणि तात्पुरती होती. या हल्ल्याच्या वेळी औरंगजेब दिल्लीत नव्हता. औरंगजेब परतला त्यावेळी त्याला सूरतेच्या लुटीची हकीकत समजली. त्याने या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन तटबंदी बांधण्याचा हुकूम दिला. पाश्चात्य व्यापाऱ्यांना एका वर्षाची जकात माफ केली. पुढील वर्षाच्या जकातीच्या सवलत दिली. इंग्रजांमध्ये शिवाजी महाराजांची दहशत होती. त्यांनी आपली वखार सूरतेहून मुंबईला हलवली. १६६४ साली पोर्तुगीजांकडून इंग्रजांना मुंबई हे बेट आंदण मिळाले. या घटनेचा पाश्चात्य कामगारांवरही परिणाम झाला. शिवाजी महाराजांविरुद्ध अनेक वावड्या उठू लागल्या 'शिवाजीचे शरीर हवा आहे आणि त्याला पंखही आहेत' असा अद्भुत उल्लेख एका पत्रात आढळतो. अधिक वाचा: छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड सोडून राजधानीचे ठिकाण रायगड का निवडले? काय होते यामागील समीकरण? सूरतेची दुसरी लूट १६७० चा पावसाळा थांबला आणि शिवाजी महाराजांनी सूरतेवर पन्हा छापा घालण्याचे ठरवले. या स्वारीच्या वेळेला महाराजांनी समुद्रमार्ग निवडला. ३ आणि ४ ऑक्टोबर १६७० रोजी त्यांनी सूरतेवर हल्ला केला. सुमारे ६६ लाख रुपयांची लूट केली. परंतु यावेळी डच आणि इंग्रजांना संरक्षण दिले असावे. शिवाजी महाराजांनी आम्हाला कसलाही त्रास दिला नाही, असे उल्लेख इंग्रज आणि डचांच्या कागदपत्रांमध्ये आढळतात कारण महाराजांचे लक्ष्य मुघल होते. या स्वारीत त्यांच्याबरोबर मकाजी आनंदराव, वेंकाजी दत्तो, प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे आदी होते. हिरे, मोती, सोने- नाणे अशी सुमारे पन्नास लाखाची लूट या स्वारीत मिळाली. लुटीची बातमी ऐकून औरंगजेबाला मोठा धक्का बसला. मराठ्यांचा प्रतिकार करण्यासाठी दाऊदखान कुरेशी चांदवडला गेला. मोगलांचे मुख्य जिल्ह्याचे ठिकाण मुल्हेर हे होते. मराठे-मोगल यांत लढाई झाली (१७ ऑक्टोबर १६७०). या लढाईत मोगलांचे अनेक सैनिक व सरदार जखमी झाले. मराठ्यांनी सूरतेचा खजिना नाशिक- त्रिंबक- मार्गे सुरक्षितपणे स्वराज्यात आणला.