पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये शुक्रवारी (६ फेब्रुवारी) झालेल्या हल्ल्यात ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनने या हल्ल्याचा निषेध केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत एक निवेदन जारी केले. “चीन इस्लामाबादमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो. तसेच कोणत्याही स्वरूपाच्या दहशतवादाला चीनचा विरोध आहे. पाकिस्तानची राष्ट्रीय सुरक्षा, स्थिरता यांसाठी चीनचे पाकिस्तान सरकारला समर्थन आहे”, असे चीनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तानने हल्ल्यात सहभागी आत्मघाती बॉम्बर हे अफगाणिस्तानचे असल्याचे म्हटले आहे. इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

अफगाणिस्तान व पाकिस्तानमधील संबंधांमध्ये कटुता आल्याच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे. दरम्यान, पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये चीनच्या प्रकल्पांना तसेच चिनी नागरिकांना दहशतवादी मागील काही वर्षांपासून सातत्याने लक्ष्य करत आहेत. चीनने अफगाणिस्तान मधील तालिबान सरकारबरोबर संबंध सुधारण्यासाठी बोलणी सुरू केली आहे. चीन व अफगाणिस्तानमधील संबंध कसे आहेत ? त्याबाबत हा आढावा.

अफगाणिस्तानमध्ये चिनी नागरिकांवर सातत्याने हल्ले

अफगाणिस्तानमध्ये चीनचे काही प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे तिथे चिनी नागरिक उपस्थित आहेत. चिनी प्रकल्प व नागरिकांना अफगाणिस्तान मधील दहशतवादी समूहांकडून सातत्याने लक्ष्य केले जाते. मागील महिन्यात काबुलमधील एका रेस्तराँमध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात (सुसाईड बॉम्बर) एका चिनी नागरिकासह एकूण सात जणांचा मृत्यू झाला होता. त्याआधी मागील वर्षात झालेल्या तीन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये नऊ चिनी नागरिकांना प्राण गमवावे लागले होते.

दोन दशकांपूर्वी म्हणजेच २००४ मध्ये चीनकडून एक रस्ता बांधकाम सुरू होते. तिथे झालेल्या हल्ल्यात एकूण ११ चिनी नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामागे तालिबानचा हात असल्याचा संशय चीनने त्यावेळी व्यक्त केला होता. अफगाणिस्तानमध्ये चिनी नागरिकांवर सध्या होत असलेल्या हल्ल्यांची जबाबदारी इस्लामिक स्टेट खोरासान (ISKP) या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये चिनी नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत चीनने सतत चिंता व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानमध्ये चीनकडून अनेक प्रकल्प राबवले जात आहेत. चीनबरोबर संबंध सुधारण्यासाठी अफगाणिस्तानमधील सध्याचे तालिबान सरकारदेखील प्रयत्नशील आहे.

चीन व अफगाणिस्तानमधील संबंधाचा इतिहास

चीन व अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये दोन दशकांपूर्वी संबंध सुधारले असले तरी या दोन देशांमधील संबंधांचा इतिहास प्राचीन काळातला आहे. एकेकाळी दोन्ही देशांमध्ये बौद्ध विचारसरणीचा प्रभाव होता. अफगाणिस्तान हे प्राचीन काळी बौद्ध धर्माच्या केंद्रांपैकी एक होते. तर चीनमध्ये मध्य आशियातून बौद्ध धर्माचा प्रचार, प्रसार झाला होता. चिनी स्कॉलर फॅक्झिन आणि शुएनझँग यानी चौथ्या व सातव्या शतकात अफगाणिस्तानमार्गे भारतात प्रवेश केला होता. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात चीनमधील माल युरोपात अफगाणिस्तानमार्गे पाठवला जात असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. बौद्ध कालखंडात चीन व अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये संबंध प्रस्थापित झाल्याचे मानले जाते. त्यानंतर नवव्या-दहाव्या शतकात अफगाणिस्तान व मध्य आशियात इस्लामचा प्रसार होण्यास सुरूवात झाली होती.

भारतात मुघलांची सत्ता आल्यानंतर त्याचा परिणाम अफगाणिस्तानवरही झाला. अफगाणिस्तान पर्शियन व मुघल यांच्यात पिचला गेला होता. पश्चिम अफगाणिस्तानातील नागरिकांवर त्या काळात पर्शियन संस्कृतीचा प्रभाव पडला. सतराव्या व अठराव्या शतकाच्या मध्यात मुघल व पर्शियन लोकांनी अहमद शाह अब्दालीमुळे अफगाणिस्तानवरील वर्चस्व गमावले.

अफगाणिस्तान, सोव्हिएत संघ आणि चीन

१९ व्या शतकात भारतात ब्रिटिशांचे, तर मध्य आशियात सोव्हिएत संघाचे राज्य होते. ब्रिटिश व रशिया या दोन्ही देशांचे या काळात अफगाणिस्तानवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना चीन मात्र बघ्याची भूमिका घेत होता. कारण, चीनकडे त्यावेळी आजच्या इतकी ताकद नव्हती. १९१९ मध्ये अफगाणिस्तान हा ब्रिटिश व रशिया यांच्यातील संघर्षातून मुक्त झाला.

१९५० मध्ये चीन व अफगाणिस्तानमधील संबंध सुधारण्यास सुरूवात झाली होती. दोन्ही देशांचे नेतृत्व त्यावेळी एकमेकांच्या संपर्कात होते. १९५० मध्ये चीनचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष झु-एन-ली यांनी अफगाणिस्तानचा दौरा केला होता. चीनकडून अफगाणिस्तानला आर्थिक व तंत्रज्ञानाशी संबंधित मदत मिळाली होती. १९६३ मध्ये चीन व अफगाणिस्तान या दोन्ही देशांनी त्यांच्या सीमा निश्चित केल्या होत्या. दरम्यान, या कालावधीत अफगाणिस्तानला चीनपेक्षा सोव्हिएत संघाने जास्त पाठिंबा दिला होता. अफगाणिस्तान व सोव्हिएत संघामधील असलेले संबंध चीनसाठी चिंताजनक ठरत होते.

अफगाणिस्तानमधील कम्युनिस्टांचे पतन आणि सोव्हिएत संघाची माघार

अफगाणिस्तान मध्ये १९७३ मध्ये असलेली राजवट किंग जहीर शाह यांचे बंधु दाऊद खान यांनी अफगाण लष्कराच्या सहाय्याने संपवली होती. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये कम्युनिस्टांचा प्रभाव सुरू झाला. पाच वर्षांनंतर दाऊद यांची कम्युनिस्टांनी हत्या केली. दाऊद यांच्या हत्येनंतर अफगाणिस्तानात अराजकता माजली होती. अफगाणिस्तान मधील कम्युनिस्ट शासकांना सोव्हिएत संघाने मदत पुरवली होती. तसेच १९७९ मध्ये सोव्हिएत संघाने स्थिरता आणण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये लष्कर पाठवले होते. दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर कम्युनिस्टांमध्येच फूट पडली. त्यानंतर कम्युनिस्ट व सोव्हिएत संघाविरोधात ‘अफगाण जिहाद’ सुरू झाला होता.

याच कालावधीत चीनने अमेरिका, पाकिस्तान व सौदी अरेबियाबरोबर मिळून मुजाहिद्दिनला (बंडखोर) पाठिंबा देणे सुरू केले होते. अफगाणिस्तामधील कम्युनिस्ट व सोव्हिएत संघाविरोधात लढा देणाऱ्या मुजाहिद्दीनला चीनने शस्त्र पुरवले. त्यानंतर सोव्हिएत संघाचा अफगाणिस्तानमध्ये विजय अशक्य झाला होता. त्यामुळे १९८९ मध्ये सोव्हिएत संघाने त्यांचे सैन्य अफगाणिस्तानमधून माघारी बोलावून घेतले होते. सोव्हिएत संघाला अफगाणिस्तानातून माघारी फिरण्याची नामुष्की ओढवल्यानंतर नजीबुल्लाह यांचे शासन अफगाणिस्तान मध्ये आले.

चीन व अफगाणिस्तानमधील सध्याचे संबंध

१९९० मध्ये चीनने समर्थन दिलेल्या मुजाहिद्दीनचे (नजीबुल्लाह) अफगाणिस्तानवरील वर्चस्व कमी होत होते. त्यावेळी तालिबानचा उदय झाला. तालिबान आल्यानंतर अफगाणिस्तानात अस्थिरता निर्माण झाली होती. चीनने तालिबान सरकारला मान्यता दिली नव्हती. परंतु, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनने तालिबानबरोबर वाटाघाटी करणे सुरू केले होते. तसेच चीनने अफगाणिस्तानमध्ये तालिबानविरोधक असलेल्या उईघुर दहशतवादी गटाला पाठिंबा देणे सुरू केले होते.

दरम्यान, त्यानंतर तालिबानचे अफगाणिस्तानवरील वर्चस्व जाऊन नंतर पुन्हा अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन झाले होते. त्या सरकारला चीनने केलेल्या प्रगतीचे कौतुक होते. अफगाणिस्तानच्या विकासासाठी चीनची मदत घेण्याचा त्यांचा मानस होता. परंतु, चीनने त्यावेळी अफगाणिस्तान सरकार व तालिबान यांच्यात मध्यस्थी करणे पसंत केले नाही. दरम्यान, २०१२ मध्ये दोन्ही देशांमध्ये परस्पर भागीदारीबाबत अनेक महत्वाचे करार झाले. अफगाणिस्तानमधील हिंदू कुश पर्वत भागात असलेल्या खनिजांच्या साठ्यावर चीनचे लक्ष होते. परंतु, तालिबानने चीनला त्याबाबत काहीही पाऊल उचलण्यास विरोध केला होता. तसेच अफगाणिस्तान मधून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ चीनमध्ये पाठवले जातात. त्याला चीनचा विरोध आहे.

चीनने अफगाणिस्तानमध्ये लष्करी हस्तक्षेप करणे टाळले आहे. तसेच चीनने अफगाणिस्तानमधील बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची भूमिका वेळोवेळी घेतली. तालिबान व पाकिस्तानमधील संबंध सुधारावे यासाठी चीनने अनेकदा प्रयत्न केले असले तरी चीनला अद्याप त्यात यश मिळालेले नाही.