China Atlas Drone Swarm India Analysis: How PLA’s automated warfare is shifting the power balance at LAC: लडाखच्या दुर्गम पर्वतरांगांपासून ते हिंदी महासागराच्या अथांग सागरतळापर्यंत चीनने आता ‘इंटेलिजंट’ युद्धाची तयारी पूर्ण केली आहे. चीनची ‘अ‍ॅटलस’ (Atlas) ही ड्रोन स्वॉर्म प्रणाली केवळ तांत्रिक प्रगती नाही, तर ती भारताच्या पारंपरिक संरक्षण भिंतीला छेद देणारी एक ‘मशीन-लर्निंग’वर आधारित रणनीति आहे.

गेल्या काही वर्षांत पायदळ, नौदल आणि हवाईदल अशा पारंपरिक पद्धतीने चीनच्या लष्करी हालचालींचे विश्लेषण करणे धोकादायक ठरते आहे. कारण बीजिंगची रणनीती ही कोणत्याही एका दलापुरती किंवा शस्त्रप्रणालीपुरती मर्यादित नाही; त्यांनी एक परिपूर्ण असा ‘सिस्टम-ऑफ-सिस्टम्स’ दृष्टीकोन अंगिकारला आहे. एका बाजूला अत्याधुनिक ‘अ‍ॅटलस’ ड्रोन स्वॉर्म प्रणाली, तर दुसऱ्या बाजूला समुद्रतळाचे सूक्ष्म मॅपिंग आणि पाण्याखाली असणारे सेन्सरचे नेटवर्क या दोन्ही घडामोडींकडे एकत्र पाहिले, तर भारतासमोरील मोठ्या आव्हानाचे खरे स्वरूप नेमके स्पष्ट होते.

केवळ तांत्रिक स्पर्धा नाही; तर युद्धाच्या व्याकरणात बदल

‘अ‍ॅटलस’ ड्रोन स्वॉर्म: संख्येपेक्षा बुद्धिमत्तेचा खेळ

चीनच्या People’s Liberation Army (PLA) ने सादर केलेली ‘अ‍ॅटलस’ ड्रोन स्वॉर्म प्रणाली ही केवळ मोठ्या प्रमाणावर ड्रोनचा वापर करण्याची क्षमता नसून, ती स्वयंचलित आणि बुद्धिमान युद्धतंत्राची झलक आहे. China Electronics Technology Group Corporation (CETC) या चिनी सरकारी संस्थेने विकसित केलेल्या या प्रणालीत एकाच वेळी ९६ ड्रोन लॉन्च करण्याची क्षमता आहे. पण खरी क्रांती या संख्येत नाही, तर या प्रणालीच्या स्वायत्त विचारक्षमतेत आहे.

ही ड्रोन्स:

  • स्वतः लक्ष्य ओळखू शकतात
  • परिस्थितीनुसार मार्ग बदलू शकतात
  • एकमेकांशी थेट संवाद साधू शकतात
  • आणि कमांड सेंटरशी संपर्क तुटला, तरी मोहीम सुरू ठेवू शकतात

याचा अर्थ असा की, युद्धभूमीवर आता ‘मानवी नियंत्रण’ राहिलेले नाही. मशीन स्वतः निर्णय घेऊ लागली आहेत.

China's Atlas drone swarm system launch | Undersea sensors mapping in Indian Ocean | चीनची अ‍ॅटलास ड्रोन स्वॉर्म यंत्रणा | हिंदी महासागरातील चिनी हेरगिरी
चीनची अ‍ॅटलास ड्रोन यंत्रणा: भारताच्या संरक्षणासमोर नवे आव्हान (Image- Gemini)

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) समीकरणे बदलणार

उंच हिमालय पर्वत, तिथे असलेले अरुंद मार्ग आणि अतिशय कठीण हवामान ही भौगोलिक स्थिती आजवर भारतासाठी Line of Actual Control (LAC)वर पारंपरिक अडथळ्याचे काम करत होती. पण आता ड्रोन स्वॉर्म तंत्रज्ञानामुळे चीनने या समीकरणावर यशस्वी मात केल्याचे दिसते आहे. यापूर्वीच चीनने तिबेटमध्ये गेल्या दशकभरात पायाभूत सुविधांच्या उभारणीवर भर देत रस्ते, रेल्वे, हवाईतळ उभारले आहेत. त्यामुळे आता अशा प्रकारच्या यंत्रणांची जलद वाहतूक सीमारेषेवर करणे चीनला सहज शक्य आहे.

परिणाम काय?

१. पुरवठा व्यवस्थेवर थेट हल्ले

भारतीय सैन्याच्या पुढील चौक्यांपर्यंत पोहोचणाऱ्या रस्त्यांवर आणि ताफ्यांवर ड्रोन स्वॉर्म सहज हल्ला करू शकतात.

२. फॉरवर्ड पोस्ट्सना देशाच्या मुख्य भागापासून वेगळे पाडणे

दळणवळण आणि पुरवठा खंडित करून सीमारेषेवर असलेल्या भारतीय तुकड्यांना वेगळे पाडणे चीनला सहज शक्य होणार आहे.

३. सतत नजर ठेवण्याची क्षमता

ड्रोन सतत आकाशात असल्याने भारतीय सैन्याच्या हालचाली लपवणे कठीण होईल.

४. हवाई संरक्षणावर ताण

मोठ्या संख्येने येणाऱ्या स्वस्त ड्रोनना पाडण्यासाठी महागड्या क्षेपणास्त्रांचा वापर करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे हवाई संरक्षणावरचा ताण वाढणार आहे.

यामुळे चीनला मर्यादित संघर्षातही मोठा तांत्रिक फायदा मिळू शकतो, ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यासाठी त्यांना पूर्ण युद्ध करण्याची गरज नाही. या यंत्रणांद्वारे भारतीय सैन्यावर सतत दबाव निर्माण केला जाऊ शकतो.

प्रतिकार करणे कठीण?

भारतातील हवाई संरक्षण आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर प्रणाली सक्षम असल्या तरी, स्वॉर्म तंत्रज्ञानामुळे त्यांना काही मूलभूत अडचणींना सामोरे जावे लागेल.

  • जॅमिंग निष्फळ ठरू शकते: ड्रोन एकमेकांशी नेटवर्कद्वारे संवाद साधतात
  • किंमतीतील तफावत: स्वस्त ड्रोन विरुद्ध महागडी इंटरसेप्टर्स
  • ओळखण्याची समस्या: लहान ड्रोन रडारला सहज लक्षात येत नाहीत
  • बहुआयामी हल्ले: एकाच वेळी गोंधळ, निरीक्षण आणि हल्ला

म्हणजेच, पारंपरिक संरक्षण प्रणालींना नव्या पातळीवर पुनर्रचना करावी लागेल.

समुद्राच्या तळाशी ‘अदृश्य’ स्पर्धा

जिथे ‘अ‍ॅटलस’ आकाशातील धोका दर्शवते, तिथे चीनचे समुद्रतळाचे मॅपिंग हे शांत पण अधिक खोलवर परिणाम करणारे पाऊल आहे.

चीन सध्या:

  • समुद्राच्या तळाची रचना
  • पाण्याचे तापमान, क्षारता
  • प्रवाहांची दिशा
  • सोनारची (पाण्याखाली असलेला धोका शोधणारी रडारसारखी यंत्रणा) क्षमता

यांचा व्यापक अभ्यास करत आहे.

हे का महत्त्वाचे?

कारण आधुनिक पाणबुडी युद्धात जो दिसणार नाही, (म्हणजे शत्रूची सोनार यंत्रणा हुडकू शकणार नाही) त्याला सर्वाधिक फायदा असतो.

हिंदी महासागर: भारताच्या प्रभावक्षेत्रातील बदल

भारतासाठी हिंदी महासागर हा पारंपरिकदृष्ट्या प्रभावक्षेत्र राहिला आहे. पण इथे चीनच्या वाढत्या अस्तित्त्वामुळे ही धारणेला छेद जातो आहे.

या मॅपिंगमुळे चीनला:

  • १. पाणबुड्यांची लपण्याची क्षमता वाढवता येते
  • ‘शॅडो झोन’चा वापर करून पाणबुडीचा शोध टाळता येतो.
  • २. सेन्सर नेटवर्क उभारता येते
  • महत्त्वाच्या सागरी मार्गांवर सतत नजर ठेवता येते.
  • ३. सोनार प्रणाली अधिक प्रभावी करता येते
  • स्थानिक परिस्थितीनुसार सेटिंग बदलता येते.
  • ४. भविष्यातील रणनीति
  • समुद्रतळावर उपकरणे किंवा शस्त्रे बसवता येऊ शकतात.
  • यामुळे भारताच्या सागरी गोपनीय माहितीवर चीनचे सततचे लक्ष राहू शकते .

तैवानचा संदर्भ: चीनसाठी ‘रिहर्सल’?

तैवानभोवती चीन सध्या करत असलेले युद्धसराव हे केवळ प्रादेशिक राजकारण नाही. तर ते भविष्यातील युद्धतंत्राची प्रयोगशाळाच आहेत.

  • ड्रोन स्वॉर्मद्वारे हवाई संरक्षण भेदणे
  • सगरी नाकेबंदी
  • संयुक्त ऑपरेशन्स

ही सर्व तंत्रे इतर भागातही वापरली जाऊ शकतात, त्यात भविष्यात भारताचाही समावेश असू शकतो.

म्हणजेच, तैवानमध्ये जे घडते आहे, ते उद्या LAC किंवा हिंदी महासागरातील संघर्षाचे संकेत असू शकतात.

बहुआयामी दबाव: सर्वात मोठे आव्हान

भारतासाठी खरी चिंता कोणत्याही एका तंत्रज्ञानाची नाही, तर त्यांच्या एकत्रित वापराची आहे.

कल्पना करा:

  • LAC वर ड्रोन स्वॉर्म हल्ले आहेत
  • त्याचवेळी सायबर हल्लेही होत आहेत
  • भारतीय महासागरात चीनच्या पाणबुड्यांची हालचाल त्याचवेळेस सुरू आहे
  • आणि सागरीतळी असलेले सेन्सर भारताच्या नौदलावर नजर ठेवून आहेत

अशा परिस्थितीत चिनी कारवायांना प्रतिसाद देणे ही भारतासाठी मोठी कसोटी असेल.

निर्यात आणि शत्रूराष्ट्राला मदत

चीनने अनेकदा अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञान निर्यात केले आहे. ‘अ‍ॅटलस’सारख्या प्रणालींच्या निर्यातीची शक्यता नाकारता येत नाही.

यामुळेच

  • शेजारी देशांकडेही अशी क्षमता येऊ शकते (पाकिस्तान)
  • भारतासाठी धोका केवळ उत्तरेपुरता मर्यादित राहणार नाही
  • प्रादेशिक सामरिक संतुलन बिघडू शकते

भारत नेमका कुठे?

भारताकडे क्षमता आहे, पण गती आणि एकात्मता वाढवणे गरजेचे आहे.

महत्त्वाच्या प्राधान्यक्रमांमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो:

  • १. काउंटर-स्वॉर्म रणनीति
  • एकात्मिक, बहुआयामी संरक्षण व्यवस्था
  • २. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
  • जलद निर्णयक्षम प्रणाली
  • ३. पाण्याखालची टेहळणी
  • स्वदेशी सेन्सर नेटवर्क आणि मॅपिंग
  • ४. संयुक्त लष्करी संरचना
  • तीनही दलांमध्ये समन्वय
  • ५. धोरणात्मक संकेत
  • प्रबळ प्रतिबंधात्मक क्षमता दाखवणे

नव्या वेगवान आणि बुद्धीमान रणनीतिची भारताला गरज

चीनचे ड्रोन स्वॉर्म आणि सागरी तळाचे मॅपिंग हे वेगवेगळे प्रकल्प नाहीत. ते एका व्यापक रणनीतीचा भाग आहेत, त्यामुळेच माहिती, वेग आणि नियंत्रण यावर आधारित युद्धनीतिची आखणी करणे भारतासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. भारतासाठी धोका केवळ शस्त्रसामर्थ्याचा नाही, तर नेटवर्क-आधारित युद्धात मागे पडण्याचा आहे. युद्ध आता केवळ रणांगणावर जिंकले जात नाही; ते जिंकले जाते तर कोण जास्त वेगाने पाहतो, विचार करतो आणि कृती करतो यावर… आणि सध्या, चीन त्या दिशेने वेगाने पुढे जात आहे.