China Caste System : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर चीनशी संबंधित अनेक व्हिडिओ, फोटो आणि मजकूर पोस्ट केले जात आहेत. एकीकडे चीन प्रगती करत असता तरी चीनने एक वास्तव लपवले आहे, असा दावा केला जातोय. तेच वास्तव उघडे पाडण्यासाठी सोशल मीडियावर स्पर्धा रंगली आहे. चीनमध्ये जातिव्यवस्था असून जातिव्यवस्थेचा शिकार झालेला एक समूह अत्यंत तळागाळात राहतोय, असा दावा केला जातोय. चीनमधील गरीबी, छोट्या गल्ल्या व बोळ, रस्त्यांवरील कचरा, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहणारा कामगार वर्ग यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. चीनच्या प्रगतीच्या, तिथल्या पायाभूत सुविधांच्या व्हिडीओआड हे भीषण वास्तव लपले आहे, असा दावा केला जातोय.

चीनमध्ये समाजव्यवस्थेशी संबंधित दोन व्यवस्था आहेत. एक म्हणजे “शि-नाँग-गाँग-शँग” म्हणजे “विद्वान, शेतकरी, कारागीर, व्यापारी” आणि दुसरी व्यवस्था म्हणजे “हुकोउ”. हुकोउ या व्यवस्थेत लोकांचे शहरी भागातील व ग्रामीण भागातील असे वर्गीकरण केले जाते. तशी नोंदणी ठेवली जाते. चीनमधील या व्यवस्थांचा इतिहास काय आहे? तसेच आधुनिक चीनच्या समाजजीवनावर यांचा परिणाम होतोय का? जाणून घेऊयात.

चीनमधील प्राचीन समाजव्यवस्था ‘शि-नाँग-गाँग-शँग’ काय आहे?

सोशल मीडियावर चीनमधील जातिव्यवस्थेची तुलना भारतातील जातिव्यवस्थेशी होत होती. या तुलनेचे खंडण करणारा लेख चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्राने १८ जून रोजी प्रकाशित केला. चीनच्या बिजिंगमधील पेकिंग विद्यापीठातील प्राध्यापक झँग यीवू यांचा एक लेख प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात यीवू म्हणतात, शि (विद्वान)-नाँग (शेतकरी)-गाँग (कारागीर, कलाकुसरीचे काम करणारे)-शँग (व्यापारी) ही प्राचीन संकल्पना असून ती पूर्णत: व्यक्तींच्या व्यवसायावर/कामावर आधारलेली होती. जन्माने स्थापित होणाऱ्या जातव्यवस्थेसारखी ती नव्हती. ही व्यवस्था भारतातील जातव्यवस्थेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. दरम्यान, ‘ग्लोबल टाइम्स’ हे चीनमधील चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र आहे. चीनी सरकारला जगात जो संदेश पोहोचवायचा आहे, फक्त तेवढेच या मुखपत्रातून प्रकाशित केले जाते.

शि-नाँग-गाँग-शँग व्यवस्था हजारो वर्षांपासून अस्तित्वात?

‘चायनीज हिस्टोरिकल रिव्ह्यू’ या मासिकात प्राध्यापक विक्टर कनरुइ शिआँग यांनी चीनमधील प्राचीन काळापासून सुरू असलेल्या या चार वर्गीय समाजव्यवस्थेबाबत लिहिले आहे. ही व्यवस्था इसवी सन पूर्व ६८५ मध्ये (२७१० वर्षांपूर्वी) सुरू झाली किंवा त्याआधीच्या एक-दोन शतकांपासून सुरू झालेली असावी. चीनमधील काही ग्रंथांनुसार या व्यवस्थेत कालांतराने बदल होत गेले. या व्यवस्थेत सर्वात उच्च स्थानी विद्वानांना स्थान होते. त्यानंतर शेतकरी व त्या खालोखाल व्यापाऱ्यांना महत्त्व होते. ‘शि’ वर्गातील व्यक्ती नैतिकतेचे पालन करत असत. त्यांना विद्वान समजले जात होते. त्यामुळे समाजात त्यांना आदर व सन्मान होता. तर गैर’शि’ वर्गातील लोकसंख्येत प्रामुख्याने शेतकरी होते. त्यांना समाजात ‘शि’ वर्गातील लोकांपेक्षा कमी मान दिला जात होता.

चीनच्या इतिहासाशी संबंधित ‘झुओ झुआन’ (Zuo Zhuan) या पुस्तकात चीनमधील प्राचीन समाजव्यवस्थेशी संबंधित माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, त्याकाळी लोक विद्वत्ता आणि क्षमता असलेल्यांचा आदर करायचे. शेतकरी वर्ग त्यांच्यासाठी काम करायचा. कोणीही कोणाचा द्वेष अथवा खुशामत करत नव्हते. त्यामुळे एक आदर्श व्यवस्था अस्तित्वात होती. ही व्यवस्था कन्फुशियन यांच्या तत्त्वज्ञानाशी मिळती जुळती होती. दरम्यान, कालांतराने या दोन्ही वर्गांमध्ये वाद झाले. त्यानंतर त्यांच्यातील संबंध कमालीचे बिघडले होते. याच पुस्तकातील एका ओळीनुसार, त्याकाळी “विद्वान लोक त्यांच्या बुद्धीने काम करत होते, तर छोटी माणसं शारीरिक श्रम करत होते” चीनमधील ही व्यवस्था जातिव्यवस्थेशी मिळतीजुळती नव्हती, असे चीनमधील अभ्यासकांचे म्हणणे आहे.

हुकोउ व्यवस्था काय आहे?

हुकोउ ही चीनमध्ये तुलनेने एक नवीन व्यवस्था आहे. या व्यवस्थेचा चीनमधील समाजजीवनावर प्रभाव आहे. या व्यवस्थेत चिनी लोकांना त्यांची नोंदणी करणे बंधनकारक आहे. हुकोउ या व्यवस्थेत चीनमधील घरांची नोंदणी केली जाते. जन्माने आधारित नोंदणी होत असल्याने ही व्यवस्था जातव्यवस्थेशी थोडी मिळतीजुळती वाटते. व्यक्तीचा जन्म कोणत्या ठिकाणी (शहरी किंवा ग्रामीण भागात) झाला आहे, यावरून त्या व्यक्तीला सामाजिक अधिकार प्राप्त होतात.

हुकोउ व्यवस्थेमुळे कोणत्या समस्या?

उदाहरणार्थ, चीनमध्ये विद्यापीठांकडून घेतली जाणारी ‘गाओकाओ’ ही प्रवेश पूर्व परीक्षा हुकोउवर जो पत्ता आहे, त्याच प्रांतात जाऊन विद्यार्थ्यांना द्यावी लागते. प्रत्येक विद्यापीठात स्थानिक विद्यार्थ्यांसाठी आरक्षण निश्चित केलेले असते. या व्यवस्थेमुळे बिजिंग किंवा शांघाय या चीनमधील मोठ्या शहरांमध्ये इतर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकत नाही. तर बिजिंग व शांघायमधील विद्यार्थ्यांना मात्र प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो. स्थलांतरित झालेल्या कामगारांच्या मुलांना त्यांच्या हुकोउत जो पत्ता आहे, त्याच प्रांतात जाऊन परीक्षा द्यावी लागते. दोन वेगवेगळ्या प्रांतातील स्थलांतरितांमध्ये विवाह झाला असेल तर त्यांना त्यांच्या मूळ गावी जाऊन विवाह नोंदणी करावी लागते. हुकोउ या व्यवस्थेमुळे ही पद्धत चीनमध्ये आहे. ही व्यवस्था १९५० पासून कम्युनिस्टांच्या राज्यात लागू झाली होती.

शहरीकरणाचा दर २६ टक्क्यांवरून ६६ टक्क्यांवर कसा आला?

१९७८ मध्ये चीन मध्ये औद्योगिक विकास होत होता. त्यावेळी कामगारांची मोठ्या प्रमाणात उद्योगांना आवश्यकता होती. परंतु, हुकोउमुळे कामगारांना स्थलांतर करणे अवघड जात होते. त्यावेळी हुकोउमध्ये काही सूट देण्यात आली होती. १९९० ते २०२० या कालावधीत चीनमध्ये शहरीकरणाचा दर २६ टक्क्यांवरून ६६ टक्क्यांपर्यंत वाढला. हुकोउ व्यवस्थेमुळे शहरात राहणाऱ्यांना सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि इतर लाभ मिळतात. ‘ग्लोबल टाइम्स’च्या वृत्तानुसार, शहरी भागात काम करणारे जवळपास ३०० दशलक्ष कामगारांना आणि रहिवाशांना अद्याप ‘पूर्ण शहरीकरण’ आत्मसात करायचे आहे. २०१४ पासून हुकोउ व्यवस्थेत ढील देण्यास चिनी सरकारने सुरूवात केली आहे. चीनच्या एका मार्गदर्शक सुचनेनुसार, लोकांच्या हुकोउ नोंदणीची दखल न घेता, ते ज्या भागात आहेत, तिथेच त्यांना सगळ्या मूलभूत सुविधांचा लाभ द्या, असे चिनी सरकारकडून तिथल्या प्रशासनाला सांगण्यात आले होते.