चीनने ग्वांगडोंग प्रांताच्या किनारपट्टीपासून दक्षिण चीन समुद्रात एक लाईव्ह फायर ड्रील ( युद्ध सराव) सुरू केली आहे. हा युद्ध सराव तैवानपासून काही अंतरावर असलेल्या दक्षिण चीनी समुद्राजवळ होत आहे. या युद्ध सरावात चीनी सैन्याच्या पाणबुड्या, युद्धनौका आणि फर्स्ट अटॅक वेसल्स यांचा समावेश आहे. अमेरिकी संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिल्याच्या एक दिवसानंतरच चीनने आपल्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करत तैवानजवळ एक लाईव्ह फायर ड्रील ( युद्ध सराव ) सुरू केली आहे. यावेळी चीनकडून ११ बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्यात आली आहे. मात्र, हे लाईव्ह फायर ड्रील नेमकं काय असतं? जाणून घेऊया.

लाईव्ह फायर ड्रील नेमकं काय असतं?

लाईव्ह फायर ड्रील हा एक युद्ध सराव आहे. हा युद्ध सराव आर्मीकडून केला जातो. यावेळी सराव करताना खऱ्या युद्धाप्रमाणे जीवंत बॉम्ब, क्षेपणास्र आणि इतर शस्त्र वापरले जातात. जर युद्ध झाले तर अशा परिस्थितीत सैनिकांना आत्मविश्वास वाढावा हा यामागचा महत्त्वाचा उद्देश असतो.

हेही वाचा – विश्लेषण : स्विगीची मूनलाईट पॉलिसी काय आहे? यातून कर्मचारी अधिक पैसे कसे कमवू शकतात?

यापूर्वी झाली आहे लाईव्ह फायर ड्रील?

१९९५-९६ या दरम्यान, तैवानचे माजी राष्ट्राध्यक्ष ली टेंग-हुई यांनी चीनचा विरोधात जात अमेरिकचा दौरा केला होता. याला विरोध म्हणून चीनकडून तैवान-चीन सीमेवर क्षेपणास्र डागण्यात आली होती. तर यावर्षी अमेरिकेनेही दक्षिण कोरियात असाच युद्ध सराव केला होता. उत्तर कोरियाने शस्त्रास्त्र चाचण्यांचा सपाटा लावल्यानंतर अमेरिकेने उत्तर कोरियांच्या सीमेजवळ क्षेपणास्र डागत युद्ध सराव केला होता.

चीनच्या युद्ध सरावाचा जपाकडून विरोध

दरम्यान, चीनच्या युद्ध सरावाचा जपानेही विरोध केला आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी या युद्ध सरावाचा निषेध करत हा युद्ध अभ्यास आमच्या राष्ट्रीय सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा असल्याचे म्हटले आहे.