scorecardresearch

विश्लेषण : तैवानजवळ चीनचा युद्धसराव की युद्धभडका?

क्षेपणास्त्रे, युद्धनौका आणि लढाऊ विमानांच्या साह्याने चिमुकल्या तैवानवर दडपण आणण्याचे, त्याला जागा दाखवून देण्याचे वेगवेगळे प्रकार सुरू आहेत.

China Taiwan Issue
चीनने तैवानवर आपला राग व्यक्त करण्यास सुरुवात केलेली आहे

-सिद्धार्थ खांडेकर

अमेरिकेच्या प्रतिनिधिगृह सभापती नॅन्सी पलोसी यांच्या तैवानभेटीमुळे खवळलेल्या चीनने आपला राग व्यक्त करण्यास सुरुवात केलेली आहे. क्षेपणास्त्रे, युद्धनौका आणि लढाऊ विमानांच्या साह्याने चिमुकल्या तैवानवर दडपण आणण्याचे, त्याला जागा दाखवून देण्याचे वेगवेगळे प्रकार सुरू आहेत. वरकरणी चीनच्या सध्याच्या आक्रमक हालचालींना सराव असेच संबोधले जाते. परंतु चीनचा हेतू सरावापलीकडचा आहे, हे उघड दिसते. चीन तैवानवर हल्ला करणार का, हल्ला केला नाही तरी निव्वळ नाविक कोंडी करणार का आणि या दोहोंचे काय परिणाम संभवतात, याचा वेध – 

चीनचा युद्धसराव कशा प्रकारे सुरू आहे?

तैवानच्या अगदी समीप, त्या देशाला अक्षरशः चिनी ताकदीची आणि संतापाची झळ पोहोचेल या हेतूने युद्धसराव आणखी काही दिवस सुरू ठेवणे हा एक पर्याय असून, चीनने सध्या तो स्वीकारलेला आहे. गुरुवारी सुरू झालेला हा कथित युद्धसराव रविवारपर्यंत चालणार आहे. चीनच्या क्षेपणास्त्रांनी तैवानच्या समुद्रात क्षेपणास्त्रांनी लक्ष्यवेध केला. ही क्षेपणास्त्रे काही वेळा तैवानच्या किनाऱ्याच्या अगदी समीप येऊन पडली. चीनच्या लढाऊ विमानांनी अनेकदा दोन देशांमधील निर्धारित हवाई सीमा ओलांडून तैवानच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला. या सरावाचे वर्णन चीनने ‘जिवंत सराव’ (लाइव्ह ड्रिल्स) असे केले आहे. चीनने स्वामित्व सांगितलेल्या सहा सागरी विभागांमध्ये हा खेळ सुरू असला, तरी त्याची झळ तैवानसह जपानलाही बसू लागली आहे. या संपूर्ण टापूत कोणत्याही प्रकारची सागरी वा हवाई वाहतूक करू नये, असा इशारा चीनने जारी केला आहे. पण चीनची काही क्षेपणास्त्रे जपानच्या विशेष सागरी आर्थिक क्षेत्रात पडली. त्यामुळे त्या देशाच्या चिंतेतही भर पडली. सहा विशेष विभाग म्हणून चीन ज्यांचे वर्णन करतो, ते तैवानच्या किनाऱ्यापासून साधारण वीसेक किलोमीटरच्या परिघात आहेत आणि त्यांनी तैवानला घेरले आहे. म्हणजे त्यांनी तैवानची सागरी सीमा आणि सागरी संकेतांचाही भंग केला आहे. जवळपास १०० लढाऊ विमाने आणि १० युद्धनौका सरावात सहभागी झाल्या आहेत.  

युद्ध भडकेल का?

सध्याच्या हालचालींचे वर्णन चीननेच अधिकृतरीत्या सराव असे केले आहे. पण निव्वळ इतक्या शक्तिप्रदर्शनाने तैवानला जरब बसणार नाही हे चिनी नेतृत्व जाणून आहे. त्यामुळे येथून पुढे तैवानची नाविक आणि हवाई कोंडी करण्याकडे वाटचाल सुरू असल्याचे विश्लेषकांना वाटते. तसे झाल्यास तैवानला प्रत्युत्तरादाखल काहीतरी हालचाल करावी लागेल. कारण तैवानच्या अर्थव्यवस्थेचा प्राण व्यापार हाच आहे. व्यापारकोंडी ही त्यांच्यासाठी श्वासकोंडी ठरेल आणि ती घुसमट थांबवण्यासाठी पावले उचलण्याव्यतिरिक्त पर्याय त्यांच्यासमोर राहणार नाही. तैवान हा चीनचाच भूभाग असल्याचे चीन मानतो आणि भविष्यात त्याचे विलीनीकरण्याचा इरादा त्या देशाने नेहमीच बोलून दाखवला आहे. तैवानने स्वतंत्र होण्याची तयारी चालवल्यास, वेळ पडल्यास लष्करी कारवाई केली जाईल हेही चीनने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. पलोसी भेट ही चिथावणीखोर असून, चीनच्या सार्वभौमत्वाला दिलेले आव्हान असल्याचे चीनचे म्हणणे आहे. चीनच्या विद्यमान आक्रमक हालचाली नक्की कुठवर जातील, हे सांगता येत नाही. युक्रेन युद्धाची झळ बसत असताना आणखी एक युद्ध भडकणे जगाला परवडणारे नाही. परंतु चीन याविषयी कितपत सबुरी दाखवतो, यावरच युद्धाचे भवितव्य अवलंबून राहील. 

अमेरिका तैवानच्या मदतीस येईल का?

तैवानच्या लोकशाहीला खंबीर पाठिंबा देण्याचा मुद्दा पलोसी यांनी प्रतिष्ठेचा बनवला होता. परंतु तैवानभेटीची त्यांची वेळ चुकली, असे ‘दि इकॉनॉमिस्ट’ने  नमूद केले आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यंदा त्यांच्या तिसऱ्या पंचवार्षिक कार्यकाळासाठी सज्ज झाले आहेत. परंतु कोविडमुळे चीनची अर्थव्यवस्था आणि जनमत जिनपिंग यांच्यासाठी फारसे अनुकूल नाही. जिनपिंग यांच्यासमोर राजकीय आव्हान फारसे नसले, तरी जनतेमध्ये युद्धजन्य राष्ट्रवाद चेतवून मूळ प्रश्नाकडून लक्ष इतरत्र वळवण्याची खेळी जिनपिंग खेळतीलच. अशा परिस्थितीत चीनकडून काही आक्रमक हालचाली होऊ शकतो. या समीकरणात अमेरिका ओढली गेली, तर परिस्थिती आणखी चिंताजनक होऊ शकते. अमेरिकेची तैवानला अधिकृत मान्यता नाही. परंतु त्या देशाला स्वसंरक्षणार्थ मदत करण्याचे वचन अमेरिकी काँग्रेसने १९७९मध्ये विशेष कायदा संमत करून दिलेले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी नुकतेच याविषयी तैवानला मदत करण्याचे आश्वासन निःसंदिग्ध शब्दांत दिलेले आहे. काही विश्लेषकांच्या मते चीन आणि अमेरिका आमने-सामने येण्याची शक्यता जवळपास शून्य आहे. पण तैवानची नाविक कोंडी करण्याचा प्रयत्न चीनने केला आणि प्रशांत महासागरातील  नाविक ताफ्याच्या मदतीने अमेरिकेने ती फोडण्याचा प्रयत्न केला, तर संघर्ष भडकू शकतो.      

तैवानसमोर काय पर्याय?

तैवानचे ३ लाखभर सैन्य चीनच्या २० लाख खड्या सैैन्यासमोर अगदीच चिमुकले आहे. तसाच असमतोल हवाई आणि नौदलांच्या बाबतीतही दिसून येतो. पण तैवानचे आखात ओलांडून जवळपास १ लाख चिनी सैनिक तैवानमध्ये उतरवणे वाटते तितके सोपे नाही. शिवाय अत्युच्च तंत्रज्ञानाच्या जोरावर चीनला काही दिवस, काही प्रमाणात इलेक्ट्रॉनिक युद्धात नामोहरम करण्याची क्षमता तैवान नक्कीच बाळगून आहे. तैवानकडे अमेरिकी बनावटीची शस्त्रसामग्री असून, तिची धार दुर्लक्षिण्यासारखी नाही. पण थेट युद्धापेक्षाही नाविक कोंडी हा तैवानसमोर अधिक वास्तव आणि गंभीर पेच आहे. जगभरातील सेमीकंडक्टर बाजारपेठेतील जवळपास ६० टक्के उत्पादन तैवानमध्ये होते. याशिवाय कोणत्याही उद्योगप्रधान देशाप्रमाणे हा देशही कृषिमालाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळे समुद्री व्यापार थांबणे आणि कृषिमाल आयात गोठणे हे दोन्ही घटक तैवानच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत प्रतिकूल ठरू शकतात. सेमीकंडक्टर चिप हा घटक मोबाइलपासून मोटारी-विमानांसारख्या उत्पादनांमध्ये अविभाज्य मानला जातो. तैवानकडून चिपचा तुटवडा झाल्यास उच्च तंत्रज्ञान उत्पादनांची एक शृंखलाच विस्कळीत होईल. एकीकडे युक्रेन युद्धामुळे जीवाश्म इंधने, धान्य, खते, रसायने व खनिजे यांचा तुटवडा अजूनही खंडित असताना, हे नवीन संकट करोनाजर्जर जागतिक अर्थव्यवस्थेसाठी भीषण तापदायक ठरू शकते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: China dangerous war games near taiwan and its consequences print exp scsg

ताज्या बातम्या