वायव्य चीन ग्रेट ग्रीन वाॅलच्या रूपाने वाळवंटाभोवती वनस्पतींचे रान उभे करीत आहे, ज्यामुळे कार्बन व्यवस्थापन आणि वाळवंटावर नियंत्रण आणणे शक्य होत आहे. हे चीन कसे करत आहे, याचा हा आढावा.
काय आहे ‘ग्रेट ग्रीन वाॅल’?
वायव्य चीनमध्ये तकलामकान वाळवंट आहे. ते चीनमधील शिनजियांग प्रांतात असून जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे वाळवंट आहे. तालीम खोऱ्यात कुनलुन आणि तियान शान पर्वतरांगांच्या मध्ये ते आहे. तकलामकान या नावाचा अर्थ ‘मृत्यूचा समुद्र’ असा लावला जातो. या वाळवंटात ८५ टक्क्यांपेक्षा जास्त वाळूचे ढिगारे सतत सरकत असतात. येथे अत्यंत कमी पाऊस पडतो. या वाळवंटाचा विस्तार रोखण्यासाठी चीन सरकारने या वाळवंटाच्या चारही बाजूंनी ‘ग्रेट ग्रीन वॉल’ नावाची हरित मोहीम राबवली. यामुळेच आता या वाळवंटाचे ‘कार्बन सिंक’मध्ये रूपांतर होत आहे. चीनच्या ‘ग्रेट ग्रीन वाॅल’मुळे वाळवंटाच्या सीमेवर वनस्पतींचे आच्छादन वाढत आहे.
‘ग्रेट ग्रीन वाॅल’ मोहीम कशी सुरू झाली?
थ्री-नॉर्थ शेल्टर फॉरेस्ट हा प्रकल्प १९७८ मध्ये सुरू झाला. यालाच ‘ग्रेट ग्रीन वाॅल’ मोहीम असेही म्हणतात. या मोहिमेचे उद्दिष्ट गोबी आणि तकलामकान वाळवंटाचा प्रसार कमी करणे आहे. प्रकल्प सुरू झाल्यापासून उत्तर चीनमध्ये ६६ अब्जांहून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत या शतकाच्या मध्यापर्यंत अजून अब्जावधी झाडे लावण्याचा चीनचा प्रयत्न आहे. या वृक्षांमुळे तयार झालेले जंगल आणि हरितपट्टे वाळवंटाच्या दिशेने येणारे वारे अडवण्याचे काम करतात. मातीची धूप कमी करतात आणि शेतजमिनी आणि वस्त्यांवर वाळूचे लोट येऊ देत नाहीत. धुळीच्या वादळांची तीव्रता आणि वनस्पती निर्देशांक यांचा तुलनात्मक अभ्यास करणाऱ्या संशोधकांना अनेक भागांत अधिक वनस्पती असलेले क्षेत्र आणि धुळीचे वादळ यांच्यामध्ये एक मजबूत संबंध आढळला. त्याच्या मते १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून, चीनच्या उत्तरेकडील काही प्रांतांमध्ये धुळीच्या वादळांची संख्या झपाट्याने कमी झाली.
संशोधनात काय आढळले?
संशोधकांनी तकलामकान वाळवंटाचे परीक्षण केल्यावर येथे ‘ग्रेट ग्रीन वाॅल’मुळे अतिउष्ण प्रदेशाचे काही भाग ‘कार्बन सिंक’ म्हणून काम करू लागल्याचे दिसून आले. शास्त्रज्ञांनी जमिनीवरील निरीक्षणांसह उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले. यातून वाढत्या वनसंपत्तीमुळे उन्हाळ्यातील प्रकाशसंश्लेषण आणि घटत्या कार्बन उत्सर्जनाचा शोध लागला. या नवीन संशोधनाने वनस्पतींचे वाढते आच्छादन आणि हंगामी कार्बन शोषण हे काही दशकांपासून हरितपट्टावाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा परिणाम असल्याचे दिसून आले. संशोधनाच्या निष्कर्षांमध्ये हरितपट्ट्याचे प्रमाण आणि टिकाऊपणाबद्दल अनिश्चितता असली तरी, अत्यंत कोरड्या जमिनीदेखील शाश्वत पर्यावरणीय अभियांत्रिकीला प्रतिसाद देऊ शकतात, हे सिद्ध झाले. रॉयल जिओग्राफिकल सोसायटीच्या मते, उत्तर चीनच्या बहुतेक भागांत दरवर्षी सरासरी १०० ते २५० मिलिमीटर पाऊस पडतो. जवळच्या पर्वतरांगा ओलसर हवा रोखतात, ज्यामुळे कोरड्या ऋतूंचा काळ वाढतो. तरीही जुलै ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या महिन्यांत पर्जन्यमान वाढते. संशोधकांनी त्या काळात सरासरी १६ मिलिमीटर पाऊस नोंदवला. वनस्पतींचे आच्छादन माफक प्रमाणात पण सातत्याने वाढत असल्याची नोंद यावेळी करण्यात आली. तसेच यामुळे कार्बनचे शोषण मोठ्या प्रमाणात होत असल्याचेही संशोधकांना दिसून आले.
चीनच्या उत्तरेला वाळवंटीकरण का होत आहे?
चीनच्या ‘ग्रेट ग्रीन वाॅल’ मोहिमेनंतरही उत्तर चीनमध्ये वाळवंटीकरणाचा दबाव कायम असल्याचे दिसून येत आहे. याचे कारण येथील जमिनीचा दीर्घकाळापासून झालेला ऱ्हास. चीनमध्ये १९५० नंतर शहरीकरणात वाढ झाली. यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होत गेली. त्यामुळे उत्तरेकडील भागात वाळवंटाचा विस्तार होत गेला. संशोधकांच्या मते दरवर्षी सुमारे ३,६०० चौरस किलोमीटर गवताळ प्रदेश नष्ट होत आहे, त्याचबरोबर जमिनीच्या वरच्या थराचेही लक्षणीय नुकसान होत आहे. गोबी आणि तकलामकान वाळवंटांचे एकत्रित क्षेत्रफळ १.६ दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा जास्त आहे. या प्रदेशांमधून येणाऱ्या धुळीमुळे बीजिंगसह इतर शहरांमध्ये धुलिकणांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. गांसु प्रांताच्या काही भागात वृक्ष लागवडीच्या प्रयत्नांनंतरही वाळवंटाचा विस्तार सुरूच आहे. दक्षिणेकडील तकलामकानमध्ये भूगर्भीय परिस्थितीमुळे वृक्ष लागवड करणे कठीण झाले आहे. भूगर्भीय परिस्थिती आणि पर्यावरणातील मर्यादा यामुळे सर्वत्र सारखीच परिस्थिती नसते. शुष्क प्रदेशात वृक्षारोपण केल्याने फायदा होतो. मात्र येथील झाडांना पाण्याची अधिक आवश्यकता असते. हे पाणी बहुतेकदा आधीच कमी असलेल्या जलसाठ्यांमधून घेतले जाते. त्यामुळे ते त्या झाडांना मुबलक प्रमाणात मिळणे अवघड जाते. मिन्किन काउंटीच्या काही भागांत, गेल्या काही दशकांमध्ये भूजल पातळी झपाट्याने घसरली आहे. कोरड्या परिस्थितीत रोपे निकामी झाल्यामुळे काही लागवडींमध्ये वारंवार पुनर्लागवड करावी लागली आहे. पर्यावरणशास्त्रज्ञांनीही मोनोकल्चर लागवडीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अनेक क्षेत्र चिनार आणि विलो वृक्षांनी व्यापले आहे. मर्यादित प्रजातींमुळे वृक्षांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते, असे संशोधकांचे मत आहे. ‘ग्रेट ग्रीन वाॅल’ मोहीम या समस्यांचे निराकरण करत नाही. मात्र या मोहिमेने मानवी हस्तक्षेपाने सर्वात कोरड्या वाळवंटामध्ये बदल होऊ शकतो हे दाखवून दिले आहे.
dharmesh.shinde@expressindia.com
